অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिव आरोग्य सेवा

राज्य सरकारने आरोग्य सेवा अधिक गतिमान करण्यासाठी नवीन शिव आरोग्य सेवा सुरू केली आहे. सध्या ही सेवा अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात सुरु झालेली आहे. आणि त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळतो आहे. वाचकांचे स्मरणात असेल, हाच तो मेळघाट परिसर आहे. जेथे दरवर्षी कुपोषणांने बालकांचा मृत्यू होतो. दरवर्षी वृत्तपत्रात मेळघाटातील कुपोषणाच्या बातम्या प्रसिद्ध होत असतात. अशा बातम्यांची वारंवार पुनरावृत्ती होणे, राज्य सरकारसाठी भूषणावह निश्चितच नव्हे. त्यामुळेच नव्या सरकारने दोन वर्षापूर्वी अधिकारावर येताच मेळघाटातील प्रश्नाकडे आरोग्य खात्याने लक्ष केंद्रित करून शिव आरोग्य सेवेची मुहूर्तमेढ रोवली. राज्याच्या दुर्गम भागातील जनतेला अत्याधुनिक आरोग्य सेवा सुरू केलेली आहे. मेळघाटातील सेवा निष्कर्षानंतर, शिव आरोग्य सेवेचा नंदुरबार, वाडा, मोखाडा, जव्हार आणि नाशिक जिल्ह्यातील पहाडी मुलखात विस्तार करण्यात येणार आहे.

शिव आरोग्य सेवा आहे तरी काय…

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दुर्गम भागातील जनतेच्या आरोग्याची तपासणी करण्यात येते. अशी सोय जिल्हास्तरावरच आजपर्यंत उपलब्ध होती. ती सेवा दूरदूरच्या प्रदेशापर्यंत नेलेली आहे. डोळ्यांची तपासणी, त्वचा विकार, ह्रदयविकार यासारख्या विकारांची घटनास्थळीच तपासणी करून रूग्णाला औषधोपचार सुरू केला जातो.

मेळघाटात माता आणि बालमृत्यू रोखण्यात सरकारी आरोग्य सेवेला बरेच यश आलेले आहे. अतिरिक्त जिल्हा आरोग्य दर्जाचा स्पेशल नोडल ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली आहे. जेथे संपर्क साध्य नसेल, त्या गावातील गरोदर महिलांना सरकारी वाहनातून नजिकच्या सरकारी इस्पितळात आणण्यात येते. सोनोग्राफी, रक्त तपासणी करुन या महिलांना औषधे, लोहयुक्त गोळ्या इत्यादी आवश्यक औषधोपचार पुरविला जातो. तसेच बालकांची निगा राखणे होते. यासाठी ‘आशा’ या विशेष सेविका ठिकठिकाणी मदतीसाठी उपलब्ध आहेत. याचा दृश्य परिणाम म्हणजे, माता आणि बालमृत्यूच्या प्रमाणात घट झाली आहे. सामान्यत: प्रत्येकजण सेकंड ओपिनियन घेण्याच्या मनस्थितीत असतो. शहरवासियांना पावलोपावली डॉक्टर उपलब्ध असल्याने अडचण नसते. परंतु खेड्यापाड्यात सोय नसल्याने इच्छा असूनही सेकंड ओपिनियन घेता येत नाही.

विशेषज्ञ डॉक्टरांची सेवा अथवा सल्ला शहरामध्ये लगेच उपलब्ध होतो. याच प्रकारची सेवा आता खेड्यापाड्यातील रुग्णांना उपलब्ध करू दिलेली आहे. लवकरच ‘हेल्थ मिनिस्टर ऑनलाईन’ अशी व्यवस्था सर्वांना लाभणार आहे. या व्यवस्थेने आरोग्य खात्यातील कर्मचारी, राज्यभरातील सामान्य जनता आरोग्यमंत्र्याशी थेट संपर्क साधून तक्रारी, सूचना करू शकणार आहेत.

न्यूक्लि अॅसिड टेस्ट

वेळकाढू वृत्ती, नेत्र तपासणीला प्राधान्य न देणे किंवा कौटुंबिक कारणामुळे वेळच्यावेळी डोळ्यांची तपासणी होत नाही. परिणामी अंधत्वाला सामोरे जावे लागते. खेड्यापाड्यात तर नेत्ररूग्णांची अधिकच दुरवस्था होते. त्यामुळेच २३ ते ३० जानेवारी २०१५ मध्ये राज्यभरात ५००० मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा संकल्प राज्य आरोग्य खात्याने केला होता. उद्दिष्टापेक्षा कितीतरी अधिक १५ हजार १८९ मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या तर ४६७२ रुग्णांच्या डोळ्यांची वेळीच तपासणी झाल्याने परिस्थितीमुळे लादल्या जाणाऱ्या नेत्ररोगातून त्यांची सुटका झाली.

रूग्णांना माफक किंमतीत रक्त उपलब्ध होणे गरजेचे असते. नवे सरकार अधिकारावर आल्यानंतर सर्व प्रथम रक्ताचे दर कमी केले. १०५० रूपयाला मिळणारी रक्त पिशवी रु. ८५० मध्ये मिळत आहे. रक्तातून होणाऱ्या नफेखोरीला आळा बसला. रक्ताच्या संक्रमणामुळे एड्स, कावीळ इत्यादी आजारांना पायबंद बसणे गरजेचे आहे. न्यूक्लि अॅसिड टेस्टने ही जोखीम कमी करता येते. म्हणूनच निवडक शासकिय हॉस्पिटलमधील रक्तपेढ्यात अशी चाचणी सुरू झालेली आहे आणि लवकरच राज्यभरातील सर्व सरकारी इस्पितळात या चाचणीची सोय उपलब्ध होत आहे.

कम्युनिटी रेडिओच्या माध्यमातून सुदूरच्या जनसंख्येपर्यंत पोचणे शक्य असते. साथीचे आजार, त्याबद्दल घ्यावयाची काळजी, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला इ. ते ध्यानात घेवूनच राज्यातील नऊ जिल्ह्यात १७ कम्युनिटी रेडिओ सेंटर्स सुरू झालेली आहेत. त्याचा अपेक्षित परिणाम साध्य होतो आहे. हे लक्षात घेवून नंतर राज्यभरात ही योजना राबविली जाणार आहे. रूग्णांना तत्काळ सेवा लाभणे नितांत आवश्यक असते. म्हणूनच लंडनमधील अॅम्ब्युलन्सच्या धर्तीवर एअर बोट, मोटरसायकल, बायसिकल अॅम्ब्युलन्स सुरु करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. हॉस्पिटल्स नेटकी असावीत, अद्ययावत सेवा उपलब्ध होणे गरजेचे असते, त्यादृष्टीने आरोग्य विभागात आवश्यक त्या सुधारणा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे.

लेखक - युधिष्ठिर जोशी,
ज्येष्ठ पत्रकार

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 3/9/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate