অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राज्यातील क्षयरुग्णांना आता दैनंदिन औषधी पुरवठा

राज्यातील क्षयरुग्णांना आता दैनंदिन औषधी पुरवठा

सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमात महाराष्ट्राचा समावेश क्षयरुग्णांना सध्या “डॉटस्” उपचारपद्धती अंतर्गत औषधे पुरविण्यात येतात. या अंतर्गत क्षयरोग रुग्णांना आठवड्यातून तीनवेळा औषध देण्यात येतात. तथापि, या उपचार पद्धतीला क्षयरोगाचे जंतू प्रतिसाद देत नसल्याचे संशोधनातून पुढे आले आहे. तसेच काही रुग्णांमध्ये सध्याच्या उपचार पद्धतीमध्ये देण्यात येणाऱ्या औषधांना प्रतिरोध तयार झाल्याचेही संशोधनाद्वारे निदर्शनास आले आहे.

या उपचार पद्धतीमध्ये सुधारणा करुन क्षयरुग्णांना दैनंदिन औषधी पुरवठा करण्याचा निर्णय नुकताच केंद्र शासनाने घेतला आहे. या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सुरुवातीच्या टप्प्यातील पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्यात आला असून महाराष्ट्रासह बिहार, केरळ, हिमाचल प्रदेश आणि सिक्कीम या राज्यांमध्ये सुधारित क्षयरोग उपचार पद्धती राबविण्यास सुरुवात झाली आहे. देशभरात उर्वरित राज्यात हा उपक्रम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.

याबरोबरच देशातील 50 जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्व्हेक्षणाद्वारे क्षयरुग्ण शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात या मोहिमेने वेग घेतला आहे. या दोन्ही उपक्रमांमध्ये महाराष्ट्राचा समावेश होण्यासाठी राज्य शासनाने पाठपुरावा केला होता.

राज्यात क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी शासनाच्या क्षयरोगविषयक धोरणांमध्ये गतिमानता आणली आहे. राष्ट्रीय क्षयरोग विभागाकडून पुरविण्यात आलेला औषधी साठा उपलब्ध होताच तत्काळ क्षयरुग्णांना दैनंदिन औषध पुरवठा सुरु करण्यात येणार आहे. तसेच क्षयरुग्ण आढळण्याची शक्यता असलेल्या निकषांचा विचार करुन, देशभरातील 50 जिल्ह्यांमध्ये घरोघरी जाऊन क्षयरुग्ण शोधण्यासाठी सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अनेकदा क्षयरोगाची लागण झाल्याचे जाणवत नाही आणि त्याचे निदान होईपर्यंत तीव्रता वाढलेली असते.

अशा स्थितीत प्राथमिक टप्प्यात निदान होऊन तातडीने उपचार झाल्यास क्षयरोगाचा प्रसार होण्यापासून रोखता येईल, हे उद्दिष्ट ठेवून अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाने अधिसूचित आजार म्हणून निर्देशित केलेल्या क्षयरोगाचा रुग्ण आढळल्यास त्याची सूचना संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांकडे तत्काळ देणे सर्व वैद्यकीय व्यावसायिक, वैद्यकीय संस्था आणि संबंधितांना बंधनकारक आहे.

मात्र, त्यात टाळाटाळ करणाऱ्यांवर पुढील कार्यवाही करण्यासाठी कायदा करण्याची कार्यवाही राज्य शासनाकडून वेगाने सुरु आहे. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार असून क्षयरुग्णांची निश्चित माहिती उपलब्ध होणे, त्यांना वेळीच व परिपूर्ण उपचार उपलब्ध होणे, यासाठी निश्चितच त्याचा फायदा होणार आहे. तसेच कुपोषण उपचार केंद्रांमध्ये येणाऱ्या प्रत्येक बालकाची तपासणी करताना त्यामध्ये क्षयरोगाची चाचणीही आता आवश्यक करण्यात आली आहे.

बालकांमध्ये आढळणारे क्षयरोगाचे प्रमाण हा एक गंभीर प्रश्न असून कुपोषित बालकांना त्याची लागण झाली असल्यास योग्य औषधोपचार करता येण्यासाठी उचलण्यात आलेल्या या उपायांची परिणामकारकता सिद्ध झाली आहे. कुपोषण आणि क्षयरोगाची लागण आढळलेल्या बालकांच्या उपचार व आहाराकडे विशेष लक्ष पुरविण्यास यामुळे मदत झाली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्हानिहाय 36 कुपोषण उपचार केंद्रांमध्ये जुलै ते डिसेंबर 2016 या कालावधीमध्ये एकूण 3 हजार 761 बालके कुपोषणविषयक उपचारांसाठी दाखल करण्यात आली. या बालकांमध्ये केलेल्या तपासणीअंती एकूण 64 बालकांना क्षयरोगाची लागण आढळून आली.

या बालकांना आवश्यकतेनुसार सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत उपचार सुरु करण्यात आले आहेत. 72 जीन एक्सपर्ट संयंत्रांचा पुरवठा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्हा रुग्णालये आणि सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये जीन एक्सपर्ट हे संयंत्र उपलब्ध करुन देण्यात येत असून या संयंत्रामुळे क्षयरोगाचे निदान अचूक आणि जलदगतीने होणार आहे. परिणामी क्षयरोगाचे निदान होताच तातडीने उपचार सुरु करण्यात येणार असून उपचारांमधला विलंब आता टळणार आहे.

बृहन्मुंबई महापालिका परिक्षेत्रात 22, ठाणे परिक्षेत्रात 8, नागपूर परिक्षेत्रात 4, पुणे परिक्षेत्रात 4, नाशिक परिक्षेत्रात 3, कोल्हापूर परिक्षेत्रात 2 व इतर जिल्ह्यांमध्ये एक याप्रमाणे एकूण 72 संयंत्रे राज्यभरात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. लोकसंख्या, लोकसंख्येची घनता, क्षयरोग आढळण्याचे निकष यांचा सारासार विचार करुन ही संयंत्रे सर्वत्र उपलब्ध करण्यात आली आहेत. शासनाच्या या सर्व उपक्रमांमुळे क्षयरोगास प्रतिबंध करण्याच्या प्रयत्नांना बळकटी मिळाली आहे.

राज्यातील सर्वप्रकारच्या क्षयरोग रुग्णांवर या सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाद्वारे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती क्षयरोग सहसंचालक डॉ.संजीव कांबळे यांनी दिली. सर्व क्षयरोग रुग्णांना या उपचार पद्धतीतील औषधांचा पुरवठा मोफत करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे सुधारित क्षयरोग उपचार पद्धतीमध्ये रुग्णांना वयोमानाप्रमाणे औषधांचा डोस देण्यात येणार आहे. लहान बालकांना विरघळणाऱ्या गोळ्यांच्या स्वरुपात औषधे देण्यात येणार आहेत. या सुधारित उपचार पद्धतीमुळे क्षयरोगावर नियंत्रण मिळण्यात यश मिळेल, अशी आशा डॉ. कांबळे यांनी व्यक्त केली.

 

लेखक - जयंत कर्पे, माहिती सहायक, जिल्हा माहिती कार्यालय, पुणे.

स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate