অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महिलांना अमृत आहार योजनेतून मिळतोय चौरस आहार

महिलांना अमृत आहार योजनेतून मिळतोय चौरस आहार

नांदेड जिल्ह्यातील किनवट व माहूर हे तालुके दुर्गम व डोंगराळ आहेत. या भागात आदिवासी जमातीची लोकसंख्या जास्त आहे. हे आदिवासी पारंपरिक शेती उद्योगावर आपला उदरनिर्वाह करतात. आदिवासी प्रगत व्हावेत व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून महाराष्ट्र शासन विविध योजना राबवित असून कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या नावे अमृत आहार योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत किनवट, माहूर तालुक्यातील 22 हजार 852 आदिवासी महिला लाभार्थ्यांना दिवसातून एक वेळेस चौरस आहार देण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने किनवट, माहूर तालुक्यात अमृत योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी मंडल स्थापन केले आहेत. किनवट तालुक्यातील या 9 मंडळामध्ये इस्लापूर, जलधारा, बोधडी, शिवणी, मांडवी, अंबाडी, राजगड, उमरी, दहेलीतांडा या गावांचा समावेश करण्यात आला आहे. यामधील 253 अंगणवाडी शाळेवर अमृत आहार योजना राबविण्यात येत आहे. माहूर तालुक्यात 6 मंडळामध्ये माहूर, आष्टा, वाई, वानोळा, सिंदखेड, येवलेश्वर या गावांचा समावेश करण्यात आला आहे. माहूरमधील 70 अंगणवाडी शाळेत ही योजना सुरू असून दोन्ही तालुक्यातील 323 अंगणवाडी शाळेत गरोदर महिला व स्तनदा मातांना दररोज एक वेळचे पूर्ण जेवण दिले जात आहे.

अमृत आहार योजनेत गरोदर महिला व स्तनदा मातांना चौरस आहारामध्ये डाळ, भात, पालेभाजी, चपाती, भाकर, दर शनिवारी शेंगदाणा लाडू, महिन्यातून 16 दिवस अंडी, केळी, सोया, नाचणी हलवा, कडधान्य, साखरेसह दूध देण्यात येत आहे. किनवट तालुक्यात जवळपास 123 तर माहूरमधील 52 अशा एकूण 175 वाडी, गाव, तांडा याठिकाणी चौरस आहार, स्थानिक महिला व अंगणवाडी सेविकाच्या मदतीने देण्यात येत आहे. राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेली माजी राष्ट्रपती भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना प्रसुती झालेल्या (स्तनदा माता) महिलांसाठी अत्यंत उपयोगाची ठरली आहे.

बालक सुदृढ करण्यासाठी प्रसुतीनंतर 6 महिने चौरस आहारात पौष्टिक पदार्थ देण्यात येत आहेत. लहान बालकांचे वजन वाढावे, बाळ निरोगी रहावे यासाठी दर आठवड्याला वैद्यकिय तपासणी करण्यात येत आहे. दोन्ही तालुक्यात प्राथमिक आरोग्य अधिकाऱ्याच्या देखरेखीत वैद्यकिय पथक तयार केले आहे. गाव, वाडी, तांडा येथे असलेल्या अंगणवाडी शाळेतील सेविका, मदतनिस, प्रकल्प अधिकारी यांच्या मदतीने ही योजना राबविल्या जात आहे. अमृत आहार योजनेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या अंगणवाडीसेविकेपासून ते प्रकल्प अधिकारी यांच्यासाठी वेळोवेळी शासनाकडून तालुका व जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात येत आहे.

किनवट, माहूर तालुक्यातील आदिवासी क्षेत्रात येणाऱ्या गरोदर महिलांच्या बालकांची गर्भातच चांगली वाढ व्हावी, बालक सुदृढ, वजनदार जन्मास यावे यासाठी दररोज चौरस आहारात बदल करण्यात येत आहे. अंगणवाडीसेविका नवजात बालकांच्या जन्मापासून प्रत्येक महिन्याला अंगणवाडीमध्ये नोंद करीत आहेत.

अमृत आहार योजनेचा दुसरा टप्पा प्रस्तावित आहे. दुसऱ्या टप्प्यात नवजात बालकांचे संगोपन, आरोग्य आहार पुरवठा असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. किनवट, माहूर तालुक्यात अमृत आहार योजनेत 22 हजार 852 महिला लाभार्थींना चौरस आहार पुरविण्यात येत आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी.जी. चाटे, किनवटचे विस्तार अधिकारी श्री.सोनावणे, माहूरचे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री. सोनार यांनी दिली.

अमृत आहार योजना आता राज्याच्या आदिवासी क्षेत्रात प्रभावीपणे राबविली जात आहे. गरोदर महिला, प्रसुतीनंतरचे नवजात बालक सुदृढ होण्यामुळे दुर्गम, डोंगराळ आदिवासी क्षेत्रातील महिलांचा सर्वांगीण विकास साधता येणार आहे. महाराष्ट्राची ही कुपोषण मुक्तीची वाटचाल आहे.

लेखक - पी. सोनकांबळे

स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 8/7/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate