हिवताप हटवण्यासाठी 1955 पासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योजना चालू झाल्या. त्यावेळी दरवर्षी (संपूर्ण वर्षभरात मिळून) हिवतापाने निदान 10 टक्के लोक आजारी असायचे. जेव्हा ही योजना आखली गेली तेव्हा हिवतापाचे प्रचंड प्रमाण हे देशाच्या आर्थिक प्रगतीसमोर मोठेच आव्हान होते. त्यामुळे प्रचंड साधनसामग्री ओतून ही योजना राबविली गेली. सुरुवातीला इतके यश मिळाले, की देशातील हिवतापाच्या रुग्णांची संख्या नगण्य झाली. असे वाटले, की आता आपण नुसत्या हिवताप नियंत्रणाऐवजी निर्मूलनच करू शकू. पण हळूहळू हिवतापाने परत डोके वर काढले. आता जवळजवळ संपूर्ण देशातच हिवतापाचे रुग्ण आढळतात. दरवर्षी देशात सुमारे 25-30लाख हिवताप रुग्ण आढळतात. या अनुभवानंतर हिवताप निर्मूलन योजनेची पुनर्रचना करण्यात आली आहे. नवीन कार्यक्रमाची उद्दिष्टे आणि आखणी याप्रमाणे आहे.
हिवतापाचा प्रादुर्भाव कमी किंवा जास्त असलेल्या भागात वेगवेगळी धोरणे असतात. वर्षभरात घेतलेल्या तापाच्या रक्तनमुन्यांपैकी दर हजार रक्तनमुन्यांत किती जंतू आढळले याचे प्रमाण काढतात. याला आपण वार्षिक जंतूदर म्हणू या. समजा एक हजार लोकवस्तीमागे वर्षभरात 100 रक्तनमुने गोळा झाले,त्यात दोन जंतूदूषित नमुने सापडले तर वार्षिक जंतुदर दोन आहे असे म्हणता येईल . हा दर दोनपेक्षा जास्त असेल तो प्रदेश 'जास्त हिवताप जंतूभार प्रदेश'आणि कमी असेल तर 'अल्प हिवताप जंतूभाराचा प्रदेश' म्हणतात. जास्त हिवताप प्रमाणाच्या प्रदेशात वर्षातून सर्व घरांची कीटकनाशक फवारणी केली जाते. मात्र इतर गोष्टी - तापाची घरोघरी पाहणी, रक्तनमुने, समूळ उपचार, इत्यादी दोन्ही भागांत समानच असतात. मात्र फॉल्सिपेरम जंतू सापडले कमी जंतुभार असला तरी त्या भागापुरती फवारणी केली जाते.
कोणताही ताप हा हिवताप असू शकतो. हे गृहीत धरून रक्त नमुना घेतल्यानंतर वयोमानानुसार क्लोरोक्वीन गोळयांचा जो उपचार देण्यात येतो, त्याला गृहीत उपचार म्हणतात.
आरोग्य कर्मचा-याने क्लोरोक्वीन गोळयांचा उपचार रुग्णास जेवणानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर स्वतःच्या समक्ष द्यावा. उपाशीपोटी उपचार देऊ नये.
(1) समस्याग्रस्त विभागातून आलेले लोक, (2) मेंढपाळ, (3) मजूर वर्ग यांना क्लोरोक्वीन गोळयांचा वयोमानानुसार एक दिवसीय उपचार खालीलप्रमाणे देण्यात येतो. त्यामुळे भविष्यात उद्भवणा-या संभाव्य उद्रेकांस वेळीच आळा घालता येतो.
हिवताप समस्याग्रस्त विभागात, राज्यांच्या सीमालगत विभागातील लोकांच्या रक्तात हिवतापाचे जंतू असण्याची बरीच शक्यता असते. अशा वेळेस हिवतापाचा उद्रेक होण्याची शक्यता संभवते. असा उद्रेक होऊ नये म्हणून अशा विभागातील समस्त लोकांना क्लोरोक्वीन गोळयांचा (रक्त नमुने न घेताच) उपचार करण्यात येतो. यास सामुदायिक गृहीत उपचार असे म्हणतात. हा उपचार आरोग्यकर्मचारी/ आरोग्यसहाय्यक/ आरोग्यप्रतिनिधी यांनी वैद्यकीय अधिका-यांच्या सूचनेनुसार स्वतःसमक्ष करावा.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 10/7/2020
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक ग्रामपंचायत...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
भारत हा कृषी प्रधान देश आहे. यासाठी कृषी विकासासाठ...
अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी (वन हक्कम ...