অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समचिकित्सा साथी प्रशिक्षण

समचिकित्सा साथी प्रशिक्षण पुस्तिका-शुभेच्छा

डॉ. ढवळे मेमोरियल ट्रस्टच्या कामाशी मी गेली ८-१० वर्ष परिचित आहे. मी मुक्त विद्यापीठात आरोग्य शाखेचा संचालक असताना या प्रकल्पातले आरोग्यमित्र मुक्त विद्यापीठाच्या शिक्षण क्रमात सामील झाले होते. हा शिक्षणक्रम ग्रामीण आरोग्य कार्यकर्त्यांसाठी मुद्दाम आम्ही विकसित केला होता. या क्षेत्रातले माझे २०-२५ वर्षांचे आकलन आणि अनुभव वापरून आम्ही हा शिक्षणक्रम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सुरू केला. त्यात ढवळे ट्रस्टचेच पन्नासेक कार्यकर्ते होते. पुढे त्यांच्या परीक्षा, प्रमाणपत्र इ. यथासांग पार पडले. नाशिकला जवळ असल्याने एकदा मी जव्हार रस्त्याने त्यांच्या विक्रमगड प्रकल्पात फेरफटकाही मारून आलो. ढवळे ट्रस्टबद्दल बरेच ऐकले होते आणि या दुर्गम आदिवासी विभागात त्यांचा बराच नावलौकिक आहे. हे काम पाहायची इच्छा होती ती अशी पूर्ण झाली.

महाराष्ट्रात १९७२ पासून ग्रामीण आरोग्य प्रकल्पांचे जागोजागी प्रयोग चालू आहेत. त्यातला मुख्य भाग म्हणजे स्थानिक कार्यकर्त्यांना छोटे-मोठे प्रशिक्षण आणि काही साधने देऊन मानधनावर त्यांना आरोग्याची काही कामे दिली जातात. मुख्यत: स्वयंसेवी तत्वांवर चाललेल्या या विविध प्रकल्पांमध्ये बरीच विविधता आहे. मी स्वत:ही असा एक प्रयोग नाशिक मध्ये दिंडोरी तालुक्यात १९९० साली करून पाहिला पण त्यातली एकूण आर्थिक जटिलता लक्षात घेऊन मला तो गुंडाळावा लागला. तथापि मी अशा प्रकल्पांना आवश्यक अभ्यासक्रम व पुस्तके वगैरे काम करत राहिलो.

समचिकित्सा शास्त्र

पुढे पुढे तर तेच माझे काम झाले. याच ओघात १९९६ साली मी भारतवैद्यक हा ४५० पानी जाडजूड पुस्तक तयार केले, त्याचे इंग्रजी भाषांतरही पुढे प्रकाशित झाले. मात्र मुक्त विद्यापीठात आल्यावर आरोग्य कार्यकर्त्यांसाठी अधिक वेगळ्या पद्धतीने आणि सोपे करून लिहिले पाहिजे अशी माझी खात्री झाली. योगायोगाने याच वेळी आम्ही काही मित्रांनी मिळून राष्ट्रीय आशा योजनेची प्रशिक्षण पुस्तिके लिहिली, आता ती देशभर अनेक प्रांतांमध्ये वापरली जातात. हा सगळा इतिहास सांगण्याचे मुख्य प्रयोजन म्हणजे ढवळे ट्रस्टने तयार केलेले हे नवे प्रशिक्षण पुस्तक आणि त्याची प्रस्तावना मी लिहावी अशी त्यांची विनंती. त्या निमित्ताने मला हे विविध टप्पे परत पाहायची संधी मिळाली.

डॉ. ढवळे ट्रस्टमार्फत केलेले हे पुस्तक काहीसे वेगळे आहे. पुस्तिकेच्या पहिल्या काही भागामध्ये आरोग्य कार्यकर्त्यांसाठी काही सामान्य सार्वत्रिक मुद्दे दिलेले आहेत. उदा. स्वच्छता किंवा ग्रामविकास वगैरे. मात्र पुस्तकाचा मुख्य उद्देश कार्यकर्त्यांसाठी समचिकित्सा उर्फ होमिओपथी शिकवणे हा आहे. हे काम ढवळे ट्रस्ट गेली अनेक वर्षे करीत आहे आणि आता देखील त्यांचे कार्यकर्ते गावोगावी समचिकित्सा पद्धत वापरतात. याआधी काही निवडक ग्रामीण आरोग्य प्रकल्पात कार्यकर्त्यांमुळे समचिकित्सेचा उपयोग झाला आहे; पैकी महाराष्ट्रात अमरावतीत डॉ. मधुकर गुंबळेे यांचा एक प्रकल्प होता.

भारतवैद्यक पुस्तकात मी पुण्याच्या श्रीमती संजीवनी कुलकर्णी व नाशिकचे श्री. रत्नाकर पटवर्धन या दोघांकडून होमिओपथीचा पाठ लिहून घेतला आहे. त्यातही सुमारे ४० औषधे, त्यांचे वर्णन आणि सुमारे १०० आजारांवर त्यांचा उपयोग वगैरे विस्ताराने दिले आहे. तथापि मी स्वत:ही समचिकित्सा पद्धतीचा फार काही वापर केलेला नाही. त्यातले सूक्ष्म ज्ञान माझ्याकडे नाही हे मी मान्य करतो.

जर मी स्वत: ही पद्धत नीट वापरू शकत नसेल तर कमी प्रशिक्षित कार्यकर्ते गावात ती कशी काय वापरू शकतील याच्याबद्दल माझ्या मनात संभ्रम होता व थोडा अजूनही आहे. ढवळे ट्रस्टचे काम बर्यावपैकी शास्त्रीय आणि काटेकोर असते व त्यांनी हा प्रयोग अनेक वर्षे सक्षमपणे चालवलेला दिसतो. त्यामुळेच एक नवे दालन ग्रामीण आरोग्यात सार्वत्रिक वापरासाठी उघडता येईल असे मला वाटते.

समचिकित्सा उर्फ होमिओपथी ही जरी आयुष वर्गात धरली जाते तरी ती मूलत: जर्मनीतून आलेली आहे. कदाचित त्याची मुळे पौर्वात्य वैद्यकात असू शकतात. तथापि आजतरी युरोपमध्ये या चिकित्सा पद्धतीचा वापर तुरळकच होतो असे म्हणावे लागेल. त्या मानाने भारतात त्याचा बर्या पैकी प्रसार आहे. भारतात होमिओपथीची स्वतंत्र शाखा असून त्याचे वेगळे नियामक मंडळ आहे, शिक्षक आहेत व कॉलेजेस देखील आहे. एक चिकित्सा पद्धती म्हणून ऍलोपथी आणि आयुर्वेद या दोन्हीपेक्षा फारच वेगळी आहे.

आधुनिक वैद्यक शास्त्र

ऍलोपथी म्हणजे आधुनिक वैद्यक शास्त्रात आजाराचे निदान करून त्यावर उपलब्ध औषधांपैकी काही औषधे निवडून वापरतात. आयुर्वेदामध्ये देखील आजार आधी शोधला जातो पण उपचार प्रकृतीच्या गुणधर्मानुसार बेतले जातात. आयुर्वेदातली औषधे वेगळीच आहेत पण ऍलोपथी व आयुर्वेद या दोन्ही शास्त्रात काही काही समांतर आहेत व त्यात देवाण घेवाण होऊ शकते एवढे निश्चिलत. होमिओपथीची मात्र पद्धतच वेगळी आहे.

कुठलेही औषध सामान्य किंवा मोठ्या मात्रेत विषारी ठरते. तथापि सूक्ष्म मात्रेमध्ये दिल्यास हे चक्क रोगनिवारक म्हणून काम करते. ते कुठल्या आजारांवर किंवा लक्षणांवर उपयोगी ठरेल हे अभ्यासांती निश्चिात झाले आहे. होमिओपथीत हजारो औषधे आहेत आणि त्यात भर पडू शकते. प्रत्येक औषधाचे वर्णन मिळते. त्यावरून कोणत्या प्रकारच्या लक्षणात हे औषध लागू पडेल हे ठरवणे व निरनिराळ्या औषधांमधून निवड करणे हे ज्ञानाचे आणि कौशल्याचे काम आहे.

चांगला होमिओपॅथ यावरूनच ठरतो. सतत अभ्यास आणि अनुभव हे समचिकित्सेचे मुख्य साधन आहे. असे असताना खेड्यापाड्यात एखादा कार्यकर्ता थोड्याशा प्रशिक्षणावर हे काम कसे करू शकेल हे मला पाहायचे होते यासाठी अर्थातच गावातल्या आजारांच्या दृष्टिकोनातून निवडक औषधे सुचवावी लागतील. ढवळे ट्रस्टच्या पुढच्या पुस्तिकेत असे आजार आणि औषध निवड याची सांगड घातलेली आहे असे मला लेखकाने सांगितले. हेही सांगितले की सध्या कार्यकर्ते याच पद्धतीने काम करताहेत.

अशा पद्धतीने समचिकित्सा कार्यकर्त्यांच्या पातळीवर नीटपणे वापरता आली तर एक मोठा प्रश्ने खूप सोपा होणार आहे. मुख्य म्हणजे या औषधांना फार त्रासदायक दुष्परिणाम नसतात. दुसरे म्हणजे यांची किंमत इतकी कमी असते की रुग्णाला ती अगदी फुकट दिली तरी प्रकल्पांना फार खर्च येणार नाही. तिसरे म्हणजे साखरेच्या गोळ्यांचा एक पुडा, मूळ औषधांची द्रवरुप मिश्रणे आणि गोळ्या देण्यासाठी पुड्या किंवा छोट्या बाटल्या एवढे असले की पुरते. आणि मुख्य म्हणजे गावातल्या ४०-५० सामान्य आजारांवर याने चांगले उपचार होणार असतील तर फारच सोपे होईल. या दृष्टीने या प्रकल्पात झालेले काम व त्याचे काही शास्त्रीय विश्लेाषण व्हावे अशी माझी विनंती आहे. या उपचारांमध्ये सुरक्षितता, सावधानतेच्या सूचना, करा-करू नका इ. तपशिल असायला हवा. तो पुढच्या पुस्तिकेत नीटपणे येईल असे मला समजले.

प्रशिक्षण पुस्तिकांचे रंगरुप इतर पुस्तकांपेक्षा थोडे वेगळे आणि कार्यकर्त्यांना अनुकूल असे असले पाहिजे. मुख्य म्हणजे यात छोटी छोटी प्रकरणे, चित्रमय भाषा व लक्षात ठेवायला सोपे मुद्दे असायला हवेत. या पुस्तकात तशी काळजी घेतली जाईल अशी मला खात्री आहे.

प्रशिक्षण केंद्र

प्रशिक्षण केंद्र म्हणून ढवळे ट्रस्टकडे अनुभवाचा साठा आहेच. हे प्रशिक्षण कमीत कमी खर्चात, अधिकाधिक चांगले आणि निरंतरपणे कसे करता येईल व त्यात क्रमश: अधिक शिकण्याची संधी कशी देता येईल हा सगळाच भाग महत्त्वाचा आहे. कदाचित ही माहिती संगणकावर आली तर प्रशिक्षण केंद्रासाठी उपयोगी पडेल आणि अंशत: मोबाईलवर येऊ शकली तर कार्यकर्त्यांनाही अधिक सोपे जाईल असे मला तरी वाटते.

माहिती तंत्रज्ञानाच्या दृष्टीनेही हे पुस्तक व प्रशिक्षण पद्धती रुपांतरीत करता आली तर चांगले होईल. समचिकित्सा पद्धतीचा एक विशेष म्हणजे औषधांची निवड बर्या पैकी अचूक व्हावी लागते तरच ते लागू पडते. त्याचप्रमाणे काही आजारात जास्त उपयोगी पडते तर काही आजारांसाठी इतर पद्धती लागू शकते, याचे देखील विवेचन असावे. समचिकित्सा पद्धतीत कार्यकर्त्यांच्या वापरासाठी फार काही अडचणी नसाव्यात, त्यात फारशी कायद्याची गुंतागुंतही नाही.

प्राथमिक आरोग्याची गरज याने भागू शकल्यास ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही परिस्थितीत याचा उपयोग होऊ शकतो. कार्यकर्त्यांकडे औषधे आली तर त्यांच्या क्षमतेत आणि कामामध्ये मोठी सुधारणा होते, आत्मविश्वाशसही वाढतो. या पुस्तिकांचा प्रसार या प्रकल्पात तर होईलच पण इतरही प्रकल्पात तो व्हावा यासाठी ढवळे ट्रस्टने पुढाकार घ्यावा अशी माझी विनंती आहे. तसे त्याचे शास्त्रीय नोंदी करून मिळालेले यश-अपयश जोखून सुधारणा करायला पाहिजेत. या विश्लेीषणाशिवाय या कामाला खरी धार येणार नाही.

एखादी वस्तू चांगली असेल तर ती केवळ ग्रामीण भागातच नाही तर कोणत्याही परिस्थितीत उपयुक्त असू शकते. अंगभूत गुणवत्ता असेल तरी प्राथमिक उपचार व्यवस्था भारतात सर्वत्र उपलब्ध आणि उपयुक्त होऊ शकते.

प्रतिजैविक औषध

ऍलोपथीमध्ये अनेक नवनवी आव्हाने उभी राहताहेत. अँटीबायोटिक्स औषधांच्या किमती वाढत चालल्या आहेत आणि एका वेळी रुग्णांचे २००-३०० रु. देखील खर्च होतात. अँटीबायोटिक्स म्हणजे प्रतिजैविक औषधांनी जंतूंचा प्रतिकार होत असल्याने काही औषधे निकामी ठरत जातात व नवी शोधावी लागतात. समचिकित्सा यावरचे एक वेगळेच पण चपखल उत्तर असू शकते.

हे पुस्तक साधारणपणे ७वी शिकलेल्या व तिशीतल्या महिल्या कार्यकर्त्यांसाठी आहे. त्यादृष्टीने समचिकित्सा-साथी ही शब्दयोजना थोडी अवघड वाटते. यासाठी मी अशी १-२ नावे इथे सुचवतो. उदा. सूक्ष्म दवा/ सूक्ष्म औषध/ साखर औषध / समौषध/ होमि औषध / होमि उपचार वगैरे.

पुस्तक लेखनाची संकल्पना व प्रत्यक्ष काम काहीसे किचकट असते. ही पहिली पुस्तिका पूर्ण केल्याबद्दल डॉ. श्रीमती मीना आंबेकर, सुजाता गोडा, व मार्गदर्शन/ संपादनासाठी डॉ. बिपिन जैन, श्रीमती रोहिणी बेलसरे, डॉ. कुमार ढवळे यांचे मी अभिनंदन करतो.  या कामात १-२ प्रशिक्षणार्थी सामील करून घ्यावेत असे मी सुचवेन.

ढवळे ट्रस्टच्या या आणि पुढच्याही पुस्तिकेस माझ्या शुभेच्छा!!

 

डॉ. शाम अष्टेकर
२१, चेरी हिल्स सोसायटी,
पाईपलाईन रोड, आनंदवल्ली,
गंगापूर रोड, नाशिक ४२२०१३

फोन : 9422271544
दि. ९ एप्रिल २०१४

स्त्रोत: आरोग्यविद्या

अंतिम सुधारित : 4/18/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate