औषध म्हणजे एक रासायनिक पदार्थ असतो. रोगावरच्या उपचाराबरोबर इतर अनेक परिणामही औषधाने होत असतात. यांतले काही परिणाम शरीराच्या दृष्टीने वाईट असू शकतात. दुष्परिणामांचे दोन प्रकार आहेत :
औषधाबरोबर 'आपोआप' येणारे अवांतर दुष्परिणाम : औषध घेतले, की हे दुष्परिणाम दिसतात. नाइलाज म्हणून ते सहन करावे लागतात. पिकामध्ये तण जसे आपसूक येते तसे हे परिणाम नेहमी दिसतात. उदा. 'ऍस्पिरिन' गोळयांमुळे पोटात जळजळ होणे. अशा 'अवांतर' दुष्परिणामांची कल्पना रुग्णास दिली पाहिजे. या त्रासावर आधीच उपाय करणे शक्य असल्यास करावे. 'कधीकधी' होणारे आगंतुक दुष्परिणामः औषध घेणा-यांपैकी काही जणांना औषधाचे विशेष किंवा वेगळे दुष्परिणाम दिसतात.अपघात जसा नेहमी घडत नाही तसेच हे दुष्परिणाम नेहमी होत नाहीत. प्रत्येक औषधाचे 'आगंतुक' दुष्परिणाम ठरावीक असतात. उदा. पेनिसिलीनमुळे चक्कर येणे (रिअक्शन), सल्फामुळे तोंड येणे, इत्यादी. औषधे देणा-याला ह्या दुष्परिणामांची पुरेशी माहिती असावी.रिअक्शन म्हणजे प्रतिक्रिया. हा आगंतुक दुष्परिणामच असतो. कोठल्याही औषधाची प्रतिक्रिया येऊ शकते; पण इथे आपण 'अचानक येणारी प्रतिक्रिया' एवढाच मर्यादित अर्थ घेऊ. रिअक्शनबद्दल आता जरा समजावून घेऊ.
एखादे औषध (इंजेक्शन, गोळया, पातळ औषध यांपैकी) रुग्णास दिल्यानंतर ते रक्तात प्रवेश करते. त्या क्षणी त्या पदार्थाविरुध्द शरीरातल्या तयार प्रतिघटकांचा त्या विशिष्ट पदार्थाशी संयोग होऊन शरीरात अचानक काही द्रव्ये तयार होतात.यामुळे शरीरात'हिस्टॅमिन' नामक द्रव्य अचानक वाढते. हिस्टॅमिनमुळे शरीरातल्या केशवाहिन्यांचे सर्व जाळे अचानक फाकून बहुतेक रक्त या जाळयात उतरते. यामुळे रक्तदाब अचानक कमी होतो. यामुळे मेंदूस रक्तपुरवठा कमी होतो व चक्कर येते. या बरोबरच खूप घाम येणे,नाडी वेगाने चालणे, वावडयामुळे शरीरावर गांध,खाज येणे, श्वासनलिकांचे जाळे आकुंचन पावून श्वास कोंडणे, दम लागणे, इत्यादी दुष्ट परिणाम होतात. बेशुध्दीही येऊ शकते. रिअक्शन तीव्र असेल आणि उपचार मिळाले नाही तर मृत्यू झाल्याची उदाहरणे आहेत. अशी रिअक्शन पेनिसिलीन इंजेक्शनने येते हे आपण कधीतरी ऐकलेही असेल.
रिअक्शनचे वैशिष्टय असे, की ती विशिष्ट व्यक्तीला विशिष्ट औषधाचे वावडे असेल तरच येते. एकाच औषधाची एकजात सर्वांना रिअक्शन येईल असे नाही. तसेच एखाद्या व्यक्तीला विशिष्ट एक औषध चालत नसले, तरी दुस-या औषधांची अशीच रिअक्शन येईल असे नाही. म्हणून रिअक्शन- विशिष्ट औषध टाळून इतर औषधयोजना करता येते. पण ते ठरावीक औषध मात्र त्या रुग्णाने पूर्णपणे टाळावे हे चांगले. शक्य झाल्यास (रक्तगटाच्या माहितीप्रमाणे) अशा रिअक्शन आणणा-या औषधांची नावे लिहून असे कार्ड जवळ बाळगणे चांगले. म्हणजे हे औषध टाळायला मदत होईल.
इंजेक्शनमुळे जशी 'रिअक्शन' येऊ शकते, तशीच रिअक्शन तोंडाने घ्यायच्या औषधानेही येऊ शकते. फक्त इंजेक्शनची रिअक्शन लगेच (मिनिटभरात) तर औषधगोळयांची रिअक्शन काही काळाने (5-10 मिनिटे ते तासापर्यंत) येते.
औषध घेतल्यावर खाज सुटणे, चक्कर येणे, छातीत कोंडल्यासारखे वाटणे, खूप घाम येणे, इत्यादी परिणाम दिसून आल्यास ही रिअक्शन असू शकेल हे लक्षात ठेवा. अशा वेळेस रुग्णाला ताबडतोब इंजेक्शने द्यावी लागतात.
- कातडीखाली एक मि.लि. ऍड्रेनॅलिन इंजेक्शन, शिरेमध्ये, किंवा स्नायूत डेक्सामिथासोन व सी.पी एम. इंजेक्शन द्यावे, म्हणजे एक-दोन मिनिटांतच सुधारणा दिसून येते. गरज वाटल्यास ऍड्रेनॅलिन इंजेक्शन 5 मिनिटांनी परत द्यावे.
रुग्णास चटकन सलाईन लावता आल्यास चांगले.ही औषधे झटकन मिळावीत यासाठी एका पेटीत ही इंजेक्शने, सलाईनचे सामान,निर्जंतुक सिरिंज, सुई,, इत्यादी साधनसामग्री नेहमी तयार ठेवावी. रिअक्शन जास्त असेल तर मृत्यू येऊ शकतो, पण सौम्य असेल तर काही वेळाने आपोआपच आराम वाटू शकतो. रिअक्शनची शक्यता तशी फारच कमी असते. पेनिसिलीन इंजेक्शनने लाखात एकाला रिअक्शन येते. आपण निवडलेल्या गोळयांत रिअक्शनची शक्यता याहूनही कमी आहे, पण तयारी ठेवलेली बरी. अशी तयारी इतर वेळीही कामी येऊ शकते.
रोगांवर उपचार करताना औषधांचे हे दुष्परिणाम लक्षात घ्यावे लागतात. कमीत कमी दुष्परिणाम असणारे सुरक्षित औषध निवडावे लागते.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्यविद्या
अंतिम सुधारित : 6/29/2020
आधुनिक औषधशास्त्राप्रमाणे औषधांची एक वर्गवारी इथे ...
होमिओपथीच्या तत्त्वाप्रमाणे कोणताही पदार्थ 'औषध' ह...
औषध ही आजच्या जीवनातील आवश्यक बाब झालेली आहे. अन्न...
आवळ्याचा उपयोग सर्व आयुर्वेद औषधात करतात. आवळ्यापा...