অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुदृढ आरोग्यासाठी पोषण आहार चळवळ

प्रस्तावना

सुदृढ शरीरातंच निरोगी मन वास करते असे म्हणतात! अशी सुदृढ व्यक्तीही त्या देशाची संपत्ती असते. सदृढ समाजासाठी चौरस आहार, संतुलित आहाराचे महत्त्व याबाबत लोकांमध्ये सजगता असणे गरजेचं आहे, त्याचबरोबर माता आणि बालकांची घ्यावयाची काळजी याबाबत समाजामध्ये जनजागृती होणं गरजेचे आहे.

कुपोषण हे अन्न कमी पडल्याने आणि विशिष्ट अन्नघटक कमी पडल्याने देखील होते. कुपोषण काही वेळा गैरसमजुतीतूनही होत असते. माता व बालकांना योग्य आहार व त्याचे आरोग्य व पोषण याबाबत जनजागृती करण्यासाठी शासनाने राजमाता जिजाऊ, माता-बाल, आरोग्य पोषण मिशन सुरू केले आहे.

शासनाने १५ एप्रिल २०१६ ते २६ जाने २०१७ या कालावधीत पोषण चळवळ सुरू केली आहे. या पोषण चळवळीतील उपक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आकाशवाणीवरून प्रसारित होणाऱ्या दिलखुलास या कार्यक्रमात, राज्याच्या राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या महासंचालक तथा प्रधानसचिव लेखा व कोषागरे वंदना कृष्णा यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मुलाखतीचा थोडक्यात आढावा.

सर्वसामान्यपणे आहार व पोषणामधील अडचणी

खरं तर पोषण चळवळीचा मुख्य पाया आहे तो संतुलित आहार घेणे. आपण बऱ्याचवेळा पाहतो लोक संतुलित आहार घेत नाहीत. जाहिरातींना लोक जास्तीत जास्त आकर्षित होऊन जंक फुड अथवा फास्ट फुड खाण्यावर लोकांचा जास्त भर असतो. बहुतांशी महिलांना घरात मिळणाऱ्या दुय्यम स्थानामुळे शेवटी जेवणे, अन्न शिळे खाणे असे प्रकार होतात परिणामत: कुपोषण वाढत असते. फास्ट फुडचे जास्त सेवन केल्याने भविष्यात लठ्ठपणा, हायपरटेंशन, असे आजार होण्याची जास्त शक्यता असते तर कुपोषणामुळे बुटकेपणा, बारिक शरीरयष्टी असणारी मुलं पाहतो जी वारंवार आजारी पडतात. अशा मुलांचा शारीरिक विकास नीट न झाल्याने बौद्धीक विकासही नीट होत नाही. त्यामुळे आपण जे खातो तो आहार संतुलित असला पाहिजे याकडे लक्ष देणे गरजेचे कमी खा पण संतुलित खा असाच संदेश यामधून द्यायचा आहे.

लठ्ठपणा वाढण्याची कारणे

आपली बदललेली जीवनशैली याला कारणीभूत आहे. आजकाल आपल्याला कमी वेळात जास्त काम करायची असतात. सहाजिकच तात्काळ तयार होतील, असे पदार्थ बाजारातून खरेदी करून ते खाण्यावर भर दिला जातो. सहाजिकच जंक फूडमुळे अतिरिक्त फॅटस शरिरात तयार होतात.

पालकही मुलांना हिरव्या पालेभाज्या अथवा केळी, पपई असे पदार्थ काही वेळेस मुलाला सर्दी होईल या गैरसमजुतीतून देत नाहीत तर सातत्याने एकाच पदार्थाचे सेवन केले जाते हे टाळले पाहिजे कोणताही एक विशिष्ट पदार्थ न खाता आहारात हिरव्या पालेभाज्या डाळींचे सेवन, मासांहार योग्य प्रमाणात असावा कोणत्याही आहाराचा अतिरेक न करता चौरस आहार घेतल्यास आपणास लठ्ठपणा सारख्या समस्यापासून दूर राहता येईल.

पोषण चळवळीमधील विषयांवर भर

पोषण चळवळीमध्ये प्रत्येक घटकाची वर्गवारी करण्यात आली आहे. यामध्ये गर्भवती माता, स्तनदा माता व बालक, किशोरी व कमी वजनांच्या मुलांच्या पालकांना समुपदेशनचा स्वतंत्रपणे कार्यक्रम राबविण्यात येत आहे. गर्भवती मातांना त्यांचा आहार व गरोदरपणाच्या कालावधीत घ्यावयाची काळजी तसेच बालकाचा जन्म झाल्यानंतर घ्यावयाची काळजी, तसेच किशोरवयीन मुलींना आहाराबाबत मार्गदर्शनही या उपक्रमाअंतर्गत करण्यात येत आहे. तसेच लहान मुलांचे कुपोषण दूर करण्याकरिता त्यांचे वजन, उंची वृध्दीदरपत्रक ही देण्यात येते ज्यामुळे पालकांनाही आपल्या मुलांची उंची किती असावी हे समजते त्याचे वजन किती असले पाहिजे याचीही समज येते.

स्तनदा मातांसाठी राबविण्यात येणारे उपक्रम

ऑगस्ट महिन्यात स्तनपान सप्ताह राबविण्यात येत आहे. स्तनपान सप्ताह निमित्ताने जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. प्रसुतीनंतर एका तासाच्या आत बालकाला मातेच्या अंगावरील दुध पाजणे आवश्यक आहे. तसेच माता व बालकाच्या दृष्टीने देखील अत्यंत आवश्यक अशी बाब आहे. तसेच मातेच्या दुधा इतका उत्कृष्ट दुसरा कोणताही पर्याय नाही. बालक निरोगी राहण्याकरिता तसेच तंदुरुस्त असावे याकरिता मातेने बालकाला दूध वेळेवर द्यावे. बालकाच्या हालचालीवरून बालकाला भुक लागली आहे का हे देखील समजू शकते त्यामुळे पहिल्या सहा महिन्यात बालकाला वरचे पाणी देखील न देता पुर्णपणे दूध दिले जावे. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर बालकाला वरील खाण्याबरोबर दोन वर्षापर्यंत आईचे दूध देणे आवश्यक आहे. याबाबतही पुर्णपणे जनजागृती या सप्ताहात करण्यात येत आहे.

पोषण चळवळीतील नाविन्यपूर्ण उपक्रम

पोषण चळवळीमध्ये लोकस हभागातून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. जसे अक्षयपात्र या उपक्रमाअंतर्गत गावातील लोकांनी अंगणवाड्यांना फळे भाज्या यांचा पुरवठा करावा, असे आवाहन करण्यात आले या उपक्रमाला इतका चांगला प्रतिसाद मिळाला की गावातील लोक या अक्षयपात्रामध्ये आपल्याकडे अतिरिक्त उपलब्ध असलेल्या भाज्या व फळे या अक्षयपात्रामध्ये देतात. अंगणवाडी परिसरामध्ये परसबागा तयार करणे, मटका फ्रीज मध्ये भाज्या ठेवणे मनोरंजनात्मक बैठकांचे आयोजनही केले जाते.

किशोरवयीन मुलींकरिता उपक्रम

किशोरवयीन मुलींकरिता पोषण चळवळ या कार्यक्रमाअंतर्गत गडचिरोली, हिंगोली, बीड व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमातंर्गत किशोरवयीन मुलींचे वजन, उंची व हिमोग्लोबीन तपासणी कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तसेच किशोर मुलींसाठी आरोग्य, पोषण व कौशल्या विकास प्रशिक्षण कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. यामध्ये किशोरवयीन मुलींच्या पालकांनाही समुपदेशन करण्यात येणार आहे. तसेच मासिक पाळी व्यवस्थापन, मी मुलगी आहे हा व्हीडिओ दाखविणे व किशोरवयीन मुलींना या संदर्भात जनजागृतीही करण्यात येत आहे.

माता व बाल संगोपनात लोकांना आवाहन

मातांचे व बालकांचे पोषण उत्कृष्टरित्या होण्याकरिता कुटूंबाचा व समाजाचाही सहभागही महत्त्वाचा आहे. कुटूंबाचा व समाजाचा पाठिंबा असेल तर महिलांना मोठ्या प्रमाणात मदत होईल. कारण बऱ्याच वेळा महिलांना मुलाची जबाबदारी सांभाळण्याबरोबर घरकाम, शेती, नोकरी ही कामेही करावी लागतात अशा वेळी गरोदरपण ते प्रसुतीनंतर बालकाची जबाबदारी सांभाळण अवघड होते. अशा वेळी पती, आई, वडील यांची जबाबदारी मोठी राहते तसेच समाजाकडूनही पाठिंबा असेल मुलाचे पालन पोषण करण्यामध्ये मदत होते. त्यामुळे माता आणि बालकाचे आरोग्य चांगले रहावे याकरिता सामाजिक व कौटुंबिक पाठिंबाही अत्यंत महत्त्वाचा आहे.

 

शब्दांकन : संध्या गरवारे
उपसंपादक

स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate