कुपोषण आणि जास्त काम यांमुळे मुलींमध्ये रक्तपांढरी आढळते.
अपु-या माहितीमुळे एच.आय.व्ही. आणि एड्सची लागण होण्याचा धोका या गटाला अधिक आहे. किशोरवयीन मुलांनादेखील लिंग सांसर्गिक रोगांची लागण होऊ शकते.
लहान लग्न झाल्यामुळे आई आणि मूल दोघांच्याही आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होतो. आई अधिक अशक्त होते, रक्तपांढरीचा त्रास सुरु होतो आणि लहान वयात लैंगिक संबंध आल्यामुळे, लैंगिक आजार होण्याचा धोकाही वाढतो. बाळालाही रक्तपांढरी होते, ते कमी वजनाचे होते आणि बालमृत्यूचे प्रमाणही वाढते.
लहान वयातल्या लग्नामुळे मुलीला मानसिक आणि सामाजिक त्रासही सोसावा लागतो.
आपल्या लैंगिकतेचा शोध घेण्याची इच्छा या वयात जास्त असते. मात्र समाजात किशोरवयीन मुलांना लैंगिकतेबद्दल बोलणेदेखील अवघड होते. हे बदलले पाहिजे. कारण एका बाजूने लहान वयात लग्न करायचे दडपण मुलींवर आणले जाते. पण मुलींनी लैंगिकतेविषयी थोडी जरी उत्सुकता दाखविली तर मात्र ते अतिशय लाजिरवाणे आणि वाईट समजले जाते.
पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की स्वतःच्या लैंगिकतेचा शोध घेण्याचे काही मार्ग धोकादायक ठरू शकतात. उदाहरणार्थ वेश्येबरोबर लैंगिक संबंध तेही निरोध न वापरता ठेवणे धोकादायक असते. मुलींनी प्रौढ माणसाबरोबर लैंगिक संबंध ठेवले तर संसर्ग होण्याची आणि गरोदर राहण्याची जास्त भीती असते. ही भीती मुलांबरोबर संबंध ठेवले तरी काही प्रमाणात असतेच. असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारे आजार आपण पुढील घटकात पाहणार आहोत. निरोधचा योग्य वापर केल्यास हे आजार टाळता येतात
आपल्या समाजात गावांमध्ये अजूनही कमी वयात विवाहाची रीत आहे. मुलीचे संरक्षण करण्यासाठी आणि कुटुंबाचे नाव वाईट होऊ नये म्हणून पूर्वी समाजाने ही पध्दत मान्य केली होती. पण बालविवाह हे या समस्यांचे उत्तर नाही. या पध्दतीमुळे मुलींचे बालपण हिरावून घेतले जाते त्यांच्यावर न झेपणा-या वैवाहिक जबाबदा-या पडतात गरोदरपण शारीरिक इजा व इतर घातक अनुभवांना सामोरे जावे लागते. तिची पुरेशी शारीरिक मानसिक तयारी नसतानाच तिला बाई म्हणून कामाला लावतात.
शिक्षण, विकास, गर्भप्रतिबंधक साधने व सुरक्षित गर्भपात या सर्वांमुळे बालविवाह पूर्णपणे गैरलागू झाले आहेत. ही घातक सामाजिक कुप्रथा तत्काळ थांबवली पाहिजे.
मुलींवर (आणि कधीकधी मुलांवरही) लैंगिक अत्याचार होत असतात. अत्याचार करणारी व्यक्ती कधी कुटुंबातली असते तर कधी बाहेरची असते. चिडवण्यापासून ते बलात्कार व खून अशा लैंगिक अत्याचारांच्या अनेक पातळया आहेत. लैंगिक शोषण हा एक गुन्हा आहे आणि आपण याविरुध्द आवाज उठवला पाहिजे.
हा अत्याचार वैयक्तिक आणि सामाजिक मानसिकतेला हानीकारक असतो. त्यामुळे पुढच्या आयुष्यातील लैंगिक जीवनावर दुष्परिणाम होतो, चुकीचा दृष्टिकोन तयार होतो आणि समाजातदेखील हिंसकता वाढते.
कोणत्याही स्त्रीच्या मनाविरुध्द लैंगिक जबरदस्ती करणे गुन्हा आहे. अगदी ती लग्नाची बायको असली तरी हा मुद्दा लागू पडतो. तसेच अठरा वर्षांखालील कोणत्याही स्त्रीशी, तिची संमती असली तरी, लैंगिक संबंध ठेवणे हा एक गुन्हा आहे. पण हा कायदा क्वचितच वापरला जातो.
मुलांशी योग्यवेळी बोलून त्यांना याची माहिती देणे, याच्या विरुध्द जागृती करणे आणि धीटपणे न्याय मागणे हे आपण त्यांना शिकवू शकतो. यात महिला गट आणि तरुणांच्या गटांनी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे. यासंबंधी मुलामुलींना फोनवर मदत मागण्यासाठी प्रत्येक शहरात (Child helpline) काही फोन नंबर्स उपलब्ध आहेत.
या वयात जे काही बरे-वाईट अनुभव येतात त्यामुळे मुलांचे वय व व्यक्तिमत्त्व घडत असते. म्हणून या वेळेला कुटुंब,शाळा आणि समाज यांनी मुलांमधील चांगल्या गुणांना प्रोत्साहन दिले पाहिजे. त्यांना मदत केली पाहिजे. एखादी छोटीशी मदतदेखील बरेच काही साध्य करू शकते.
उदाहरणार्थ, एका मंडळाने एका गावात मुलींसाठी दोन सायकली दिल्या. त्यांनी आळीपाळीने या वापरायच्या होत्या. प्रत्येक गावातल्या मुली दोन महिने सायकल चालवायला शिकायच्या आणि मग त्या दुस-या गावात पाठवून द्यायच्या. या एवढयाशा मदतीने त्या गावातल्या पुष्कळ मुली सायकल चालवायला तर शिकल्याच पण त्याचबरोबर त्यांचा आत्मविश्वासही वाढला. त्या एकेकटया फिरायला शिकल्या. मग त्यांनी गट करुन पैसे जमवून एक सायकल घ्यायची ठरवली. काही मुलींनी जवळच्या गावी मोठया शाळेत पुढच्या शिक्षणाला जाण्याचे ठरवले. एवढया एका गोष्टीने त्यांच्या जीवनात किती फरक पडू शकतो हे बघायलाच पाहिजे.
लेखक : डॉ. श्याम अष्टेकर (MBBS, MD community Medicine)
संदर्भ : आरोग्याविद्या
अंतिम सुधारित : 12/14/2019
पीक व्यवस्थापन करताना मुख्यतः नत्र, स्फुरद व पालाश...
या विभागात डाळिंब पिक पोषनाविषयी माहिती दिली आहे.
हेल्थ फोन निर्मित आईचे पहिले दाट दुध यावरील चित्रफ...
या विभागात अ जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे म्हणजेच योग...