অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महागुणी आरोग्यदायी - गुळ

महाराष्ट्रात उसाचे जास्त उत्पादन घेतले जाते. बहुधा हवामान आणि माती त्याला पूरक आहेत म्हणून. हिरवेगार उसाचे मळे आणि त्यात लांब रसरसीत ऊस बघायला आणि खायला गोड लागतात. या उसाचे फायदेसुद्धा अनेक आहेत. उसाचा थंडगार रस, गोड रसरसीत काकवी आणि कडक गुळ या सर्वांचा आस्वाद घ्यायला मजा येते.

पण सर्वात लांब पट्टा गाठला गुळ या पदार्थाने. गुळ हा सर्व स्वयंपाक घरात अवश्य आढळतो. एवढेच नाही तर देवाच्या मंदिरातसुद्धा गुळ खोबऱ्याचा मोठा मान आहे. गुळ जेवणात आणि एक न्याहरीचा प्रकार म्हणून खाल्ला जातो. भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ गुळ आहे. चला बघूया या बहुगुणी गुळाचे फायदे.

रक्ताची शुद्धी

नियमित आणि योग्य प्रमाणात गुळाच्या सेवनाने आपले रक्त शुद्ध होण्यास मदत होते. रक्तामधील हिमोग्लोबिन वाढते. रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते.

उत्तम पचन क्रिया

गुळ आपल्या पाचन शक्तीची ऊर्जा वाढवते आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होते. हिवाळ्यात गुळ जरूर खावा. कारण त्यावेळी शरीराची पचन क्रिया मंदावते आणि गुळामुळे ती पूर्ववत होण्यास मदत होते. बद्धकोष्ठता आणि अपचन यावर गुळ तर रामबाण उपाय आहे.

ऊर्जा स्त्रोत

साखर ही फक्त गोडवा देते आणि एक आधुनिक प्रकार आहे. मात्र गुळात नैसर्गिकता जास्त असल्यामुळे तो शरीराला हळूहळू आणि दीर्घ काळापर्यंत ऊर्जा देतो. गुळाने थकवा जाणवत नाही व स्नायू बळकट बनतात.

हाडांचा मित्र

गुळ जर आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून आराम मिळू शकतो. दुध आणि गुळ हे एकत्रित हाडांसाठी एक मजबूत उपाय आहे.

अर्धशिशी थांबते

ज्या लोकांना अर्धशिशीचा त्रास आहे, त्यांनी गुळ आणि शुद्ध तूप एकत्रित रिकाम्या पोटी खाल्ल्याने आराम मिळतो. गुळ हा अशावेळी लाभदायक ठरतो.

वजन कमी करण्यासाठी

गुळात भरपूर प्रमाणात खनिज आहे. त्यात आढळलेल्या पोटॅशियम या घटकामुळे शरीरातील चयापचय वाढते आणि वजन कमी होण्यास मदत होते. शरीराची पाणी जतन करून ठेवण्याची सवयसुद्धा गुळाने मोडण्यास मदत करते व आपले वजन कमी होते.

सर्दी-खोकल्यावर गुणकारी

साधारण सर्दी-खोकला झाला असल्यास गुळाच्या चहाने किंवा गुळ मिश्रित गरम पाणी पिल्याने आराम पडतो. रात्री झोपण्याआधी गुळ चोखून खाल्ल्याने खोकल्यापासून आराम मिळेल.

रक्तक्षय टाळतो

गुळात प्रचंड प्रमाणात लोह आहे. तो खाल्ल्याने शरीरातील लोह कमतरता भरून येते. त्याच्या सेवनाने लाल रक्त पेशी वाढण्यास मदत होते व अशक्तपणा जाणवत नाही. थकवा आणि ऊर्जेची कमी असे विकार गुळ खाल्ल्याने होत नाहीत.

स्त्रियांसाठी उपयुक्त

मासिक पाळीच्यावेळी होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीवर गुळ खूप गुणकारी आहे. त्याचे सेवन हे सर्व दुखणे कमी करण्यास मदत करतात. ओटीपोटातील दुखणे, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा प्रकारच्या सर्व गोष्टींवर गुळ हा सोपा आणि स्वस्थ उपाय आहे.

त्वचा आणि केसांचे आरोग्य

सुंदर, लांब सडक आणि चमकदार केसासाठी गुळाचे सेवन आवश्य करा. जीवनसत्त्वे आणि खनिजे यांनी भरलेला गुळ त्वचेवर एक छान चमक आणतो आणि सर्व मुरुम, पुरळ आणि डाग नाहीसे करण्यास मदत करतो.

रसायनमुक्त आणि पोषक गुळ आरोग्यदायी आहे. पण आपल्याला मधुमेह किंवा अन्य काहीही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेऊनच पुढचे पाऊल टाकणे फायद्याचे ठरेल.

 

लेखिका - सुजाता चंद्रकांत

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 10/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate