महाराष्ट्राच्या कोकणातील ग्रामीण भागातील भूमिपुत्रांना त्यांच्या गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासन नवनवीन उपाययोजना करीत आहे. कोकणातील विकास कामांची गती वाढविण्यासाठी, ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटनाचा विकास होणाऱ्या गावामध्ये पर्यटनासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे व पर्यायाने गावांचा विकास करणे या उद्देशाने राज्य शासनाने कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम ही योजना घोषित केली आहे याविषयीची ही माहिती आहे.
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यासाठी राज्यस्तरीय समिती व प्रत्येक जिल्ह्यात कार्यकारिणी समिती गठीत करण्यात आली आहे. याबाबत ग्रामविकास विभागाने दि.23 नोव्हेंबर 2015 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे. कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या कार्यक्रमांतर्गत पर्यटनाच्यादृष्टीने प्रचलित असा एखादा गावाचा समूह अस्तित्वात असल्यास त्या समूहाच्या पर्यटन विकासास प्राधान्य देण्यात येणार आहे.
स्थानिक ग्रामस्थांना पर्यटन विकासासाठी सक्षम करण्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने पाठ्यक्रम आयोजित करणे, ग्रामस्थांना प्रशिक्षण देणे, कोकण कृषी विद्यापीठात कोकण पर्यटनास उपयुक्त प्रशिक्षण देण्यासाठी (Demo Structure) उभारण्यास साह्य करणे, स्थानिक ग्रामस्थांना अशा कार्यक्रमात सहभागी व्हायचे असल्यास पर्यटनास पूरक उद्योग उभारण्यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतल्यास त्या कर्जाच्या 4 टक्क्याच्या वरील मात्र 12 टक्क्याच्या मर्यादेपर्यंत व्याजाच्या रकमेचा फरक राज्यस्तरीय समिती मंजूर करणार आहे.
एक कोटीपेक्षा कमी किमतीच्या छोट्याछोट्या प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येणार असून सादर करण्यात येणाऱ्या प्रकल्प प्रस्तावाची प्रत्येकी किंमत कमाल रु.3 कोटी व सरासरी एकत्रित प्रस्तावाची कमाल किंमत रु.5 कोटी पेक्षा जास्त नसावी. विभागीयस्तरावरील प्रकल्प प्रस्तावाची किंमत रु.5 कोटीपेक्षा अधिक नसावी. पर्यटनविषयक सोयी सुविधांच्या बांधकामावर जास्तीत जास्त 80 टक्के पर्यंतचा खर्च करण्यात येणार असून 20 टक्के खर्च हा प्रशिक्षण व क्षमता बांधणीसाठी पर्यटनदृष्ट्या उपयुक्त असणाऱ्या गावांच्या सौंदर्यस्थळांची सुधारणा/बळकटीकरण करण्यासाठी करण्यात येणार आहे.
कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत 45 कोटीची विकासकामे प्रस्तावित असून अनेक ठिकाणची कामे सुरु झालेली आहेत. गावातून पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचण्याच्या रस्त्याची बांधणी, विद्युत व्यवस्था, वाहनतळ उभारणे यासारखी कामे या कार्यक्रमांतर्गत हाती घेण्यात आली आहेत. शासनामार्फत त्यासाठी निधी वितरीत करण्यात आला आहे.
कोकण हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. शासनाच्या कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमामुळे ग्रामीण भागातील पर्यटनाला चालना मिळून गावांच्या सौंदर्यस्थळांचे बळकटीकरण होऊन गावात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कोकणासाठी असणाऱ्या या पर्यटन विकास कार्यक्रमामुळे पर्यटनस्थळाचा विकास होऊन नागरिकांना चांगल्या सोयी सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
लेखिका: शैलजा पाटील
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 3/8/2024