महाराष्ट्र राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जातात. या योजनेचा फायदा विद्यार्थी, महिला याबरोबरच सर्वसामान्य जनता यांना होत असतो. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहेत. औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अभ्यासक्रम सुरु करणे या योजनेविषयी माहिती.
अल्पसंख्याक समाजातील युवक/युवतींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या प्रगतीमधील अडथळे समजावून त्यांच्यामध्ये जागृती करणे आवश्यक आहे. तसेच अल्पसंख्याक युवक, युवतींमध्ये सकारात्मक बदल होऊन सामाजिक प्रगतीमध्ये त्यांचा सहभाग वाढविणे आवश्यक आहे. यासाठीच अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी मांडवी (मुंबई शहर) व चांदिवली (मुंबई उपनगर) येथे नवीन औद्योगिक प्रशिक्षण संस्था व विद्यमान 42 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये दुसऱ्या/तिसऱ्या पाळीमध्ये अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे.
योजनेचा लक्ष्यगट :राज्यातील अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन) विद्यार्थी यामध्ये अंतर्भूत आहेत.
योजनेचे उद्दिष्ट :अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व्यावसायिक शिक्षण देणे हेच हा अभ्यासक्रम सुरु करण्यामागचे उद्दिष्ट आहे.
योजना :अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी मांडवी (मुंबई शहर) व चांदिवली (मुंबई उपनगर) येथे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था व राज्यातील अल्पसंख्याक बहुल 42 विद्यमान औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी दुसऱ्या / तिसऱ्या पाळीमध्ये सप्टेंबर,2010 पासून अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत.
भौतिक योजना:4416 विद्यार्थी या योजनेअंतर्गत सामावून घेता येऊ शकतील.
योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा:या योजनेची अंमलबजावणी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक (प्रशिक्षण)
-वर्षा फडके, वरिष्ठ सहायक संचालक.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 2/2/2020