महाराष्ट्र राज्य शासनामार्फत वेगवेगळ्या विभागामार्फत वेगवेगळ्या योजना, उपक्रम राबविले जातात. या योजनेचा फायदा विद्यार्थी, महिला याबरोबरच सर्वसामान्य जनता यांना होत असतो. अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन संस्था सुरु करणे याविषयीची माहिती.
धार्मीक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे बाहुल्य असलेल्या राज्यातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भरीव निधीची तरतुद करण्यात आली आहे. राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी तंत्रनिकेतन संस्था सुरु करण्यात आली आहे.
योजनेचा लक्ष्यगट :राज्यातील अल्पसंख्याक समाजातील (मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, पारशी व जैन) बेरोजगार उमेदवार.
योजनेचे उद्दिष्ट :अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांमधील बेरोजगार उमेदवारास रोजगार मिळण्यास मदत करणे.
योजना :अल्पसंख्याक समाजातील उमेदवारांना तांत्रिक शिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने नवीन तंत्रनिकेतन संस्था सुरु करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार मुक्ताईनगर जि. जळगाव येथे नवीन तंत्रनिकेतन विद्यालय निर्माण करण्यात येत आहे. अनुदान अल्पसंख्याक विकास विभागाकडून उपलब्ध करुन दिले जाईल.
भौतिक उद्दिष्ट:1 तंत्रनिकेतन संस्था
योजनेची अंमलबजावणी करणारी यंत्रणा :अल्पसंख्याक विकास विभाग तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक.
-वर्षा फडके, वरिष्ठ सहायक संचालक.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 4/14/2020