पृथ्वीवरील पाणी सूर्याच्याही आधीचे
आपल्या सौरमंडळातील सूर्याच्या निर्मितीच्याही आधीपासून अंतराळामध्ये बर्फाच्या माध्यमात पाणी असावे, असे मिशीगन विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या संशोधनातून दिसून आले आहे. हे संशोधन "सायन्स' या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित केले आहे.
पाणी हे मूलद्रव्य आपल्या सौरमंडळामध्ये सर्वत्र आढळते. ते केवळ पृथ्वीवर द्रव स्वरूपात असले तरी अन्य अंतराळामध्ये विविध ग्रहांच्या उपग्रहावर (चंद्रावर) बर्फाच्या स्वरूपात दिसून आले आहे. मंगळाच्या पृष्ठभागावर, त्यांच्या चंद्रावर मेटेरॉईट्ससारख्या खनिजांच्या नमुन्यामध्ये पाणी आढळले आहे. पृथ्वीवर असलेल्या पाण्याचा मूळ स्रोत नेमका कोणता होता, हे ओळखण्यासाठी मिशीगन विद्यापीठामध्ये संशोधन करण्यात येत आहे.
सौर मंडळ निर्मितीच्या सुरवातीचा अभ्यास करण्यासाठी बर्फ असलेले कॉमेट आणि ऍस्टेरॉईड हे मुख्य घटक आहेत. त्यावरील सूर्याच्या निर्मितीनंतर त्यांचे गोलाकार स्वरूपात रूपांतर झाले असावे. मात्र, या बर्फाचा नेमका स्रोत अद्यापही कळू शकलेला नाही. सूर्याच्या निर्मितीच्या कालखंडामध्ये त्या भोवती वेढलेल्या सोलर नेब्युलातून विविध ग्रहांची निर्मिती झाली असे मानले जाते. मात्र, त्या वेळी या नेब्युलामध्ये असलेल्या मूलद्रव्यातून बर्फाची निर्मिती झाली की आधीपासून असलेल्या घटकांच्या रासायनिक प्रक्रियेतून बर्फनिर्मिती झाली, याविषयी अद्याप कळू शकलेले नाही.
असा आहे अभ्यास
- संशोधक कोनेल ऍलेक्झाडर यांनी सांगितले की, जर पाणी हे सौर मंडळाच्या आधीपासून अंतराळामध्ये उपलब्ध होते, तर त्यातही सेंद्रिय जैव घटक असणार आहेत. तेच पुढील टप्प्यामध्ये पसरले गेले असण्याची शक्यता आहे. मात्र, सूर्याच्या निर्मितीवेळी होत असलेल्या विविध घटनांमध्ये पाण्याचा उगम असेल, तर मात्र प्रत्येक ताऱ्याच्या निर्मितीवेळची स्थिती वेगळी असणार आहे. अभ्यासातून एक गोष्ट ठळकपणे समोर येते, ती म्हणजे पाणी हे सूर्यजन्माच्या आधीपासूनच अंतराळामध्ये असावे.
- सौरमंडळामध्ये असलेल्या हायड्रोजन आणि त्याचा जड आयसोटोप ड्युटेरीयम यांच्या अभ्यासावर मिशीगन विद्यापीठातील एल. इसेडोर क्लिव्हज यांच्या गटाने लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे पाण्याच्या मूलद्रव्यातील हायड्रोजन आणि ड्युटेरीयम या आयसोटोपच्या गुणोत्तरातून पाणी मूलद्रव्य कसे तयार झाले, याविषयी माहिती होऊ शकते. (उदा. पाणी आणि बर्फाच्या दरम्यानच्या स्थितीमध्ये ड्युटेरियम ः हायड्रोजनचे गुणोत्तर अधिक येते. त्याच्या निर्मितीवेळी तापमान अत्यंत कमी असते.) सध्या सूर्यनिर्मिती वेळच्या स्थितीचे प्रारूप तयार करून अभ्यास केला जात आहे.
- सध्या मंगळाच्या कक्षेत पोचलेले भारताचे मंगळ यान हायड्रोजन आणि ड्युटेरीयमच्या प्रमाणाचेही मोजमाप करणार आहे. ग्रहावर जीवन फुलण्यासाठी पाणी सर्वांत महत्त्वाचे मानले जाते.
मुख्य अडचण
- सूर्य जन्माच्या वेळी ड्युटेरीयमचा रासायनिक प्रक्रियेद्वारे ऱ्हास किती प्रमाणात झाला, हे ज्ञात नाही.
- किंवा नवीन तयार होत असलेल्या सौरमंडळामध्ये अधिक ड्युटेरियम असलेले पाणी- बर्फ निर्मितीची क्षमता किती असते, हे ज्ञात नाही.
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.