অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्व-कष्टाचा पहिला रुपया

वयाच्या विसाव्या वर्षी पहिला रुपया कमावण्यासाठी घराबाहेर पडलो. भांडवल होते फक्त डी.एड.ची पदविका व बुद्धिमत्ता ! खाजगी संस्थांमध्ये भरायला पाच लाख डोनेशन नसल्याने तेथे शिक्षकाची नोकरी मिळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्यामुळे नांदुरा व खामगाव शहरातल्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळांना भेटी व मुलाखती दिल्या, मात्र काहीही उपयोग झाला नाही. असाच महिना निघून गेला. शेवटी नाईलाजाने ६०० रु महिन्याने एका एसटीडी बुथवर फोन ऑपरेटरचे काम स्वीकारले.

छोट्या काचेच्या केबीनमध्ये दिवसभर बसून जीव गुदमरायचा. त्याहीपेक्षा बुथवर येणाऱ्या ओळखीच्या लोकांचे व वर्गातल्या मुला-मुलींचे ‘आपल्या वर्गातला हुशार मुलगा होता...पण आता बिचारा काय करतोय !’ असे उद्गार जिव्हारी लागायचे. मन अस्वस्थ व्हायचे. आठ दिवसानंतर मी ते काम सोडले. पुन्हा कमाईसाठी पायपीट सुरु झाली. मलकापूरला प्रेम गांधी यांच्याकडे सायबर कॅफेवर रंजना वहिनींच्या ओळखीमुळे काम मिळाले. मला कॉम्प्युटर, टायपिंग येत नसल्यामुळे मी तेथे पगार न घेता शिकाऊ उमेदवार म्हणून काम करणार होतो. पुढे सराव झाल्यावर पगार मिळणार होता. खुमगाववरून पहाटे सहा वाजता कडाक्याच्या थंडीत रेल्वेने मलकापूरला जावे लागे.

आठ ते दहा वाजेपर्यंत प्रेम काकांच्या मुलांची शिकवणी, दहाला दुकान उघडणे, साफसफाई, दिवसभर सायबर कॅफे सांभाळणे व रात्री नऊच्या रेल्वेने खुमगावला परत असा दिनक्रम तीन महिने चालला. व्यवसाय कसा करावा, इंटरनेटचा वापर अशा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, मात्र पगार मिळत नव्हता.

अशातच रामेश्वर भाऊंच्या ओळखीने आसलगाव येथे बलदेवराव चोपडे यांच्या आश्रमशाळेवर शिक्षणसेवकाची नोकरी मिळाली. शाळा विनाअनुदानित असल्याने वेतन मिळणार नव्हतेच, तरी भविष्यात अनुदान मिळेल या आशेवर खुमगाव ते आसलगाव वारी सुरु झाली.

इंटरनेट युगातून थेट आदिवासी युगात पोहोचलो. म.फुले व कर्मवीरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपणही शिक्षण क्षेत्रात काहीतरी करू, अशा निश्चयाने नव्या जोमाने कामाला सुरूवात केली. मात्र परिस्थिती खूपच प्रतिकूल होती. गावाजवळच्या एका शेतात १० बाय २० ची ताट्याची खोली, टीनाचे छप्पर, १ कपाट, १ टेबल, २ खुर्च्या, १ लाकडी फळा, २ शिक्षक व २० विद्यार्थी अशी एकंदरीत अवस्था !

शाळेपासून तीन किमी अंतरावर गोंड समाजाचे लोक पालांमध्ये राहत. त्यांना पिढ्यान पिढ्यापासून शिक्षणाचा गंधही नव्हता. रोज पायी जाऊन तेथून विद्यार्थ्यांना आणावे लागे. पालकांना समजावून मुलांची अंघोळ वगैरे स्वच्छता करायला सांगून शाळेत त्यांना घेवून येईपर्यंत दुपार व्हायची.

स्वयंपाकीणबाई जाड पोळ्या व फोडणीची डाळ बनवून आमच्यासह सर्वांना खाऊ घालत. गाणी, खेळ असे आनंददायी पद्धतीने शिकवावे लागे. असेच तीन महिने निघून गेले. पगार नसल्याने, भाड्यालाही पैसे नसायचे. शिवाय घरीही आर्थिक हातभार लावणे आवश्यक होते. मी जळगाव जामोदला मुक्कामी राहून आणखी काही काम मिळते का यासाठी शोधाशोध सुरु केली. शाळेवर सोबत काम करणाऱ्या शिक्षकांनी त्यांची एक ५ बाय ८ ची टीनाची खोली भाडे न घेता राहायला दिली.

एक पितळी स्टोव्ह. दोन-चार भांडी, एक खाट असा संसार थाटला. घराजवळच देशमुख सरांचे शिकवणी वर्ग होते. त्यांच्यासोबत ८ वी ते १० वी इंग्रजी विषयाची शिकवणी ५-६ विद्यार्थ्यांपासून घ्यायला सुरूवात केली. लवकरच १०० विद्यार्थी झाले. अशाप्रकारे तब्बल एक वर्ष खटाटोप केल्यानंतर आयुष्यातला स्वत:च्या कष्टाचा पहिला रुपया शिकवणीच्या माध्यमातून मिळाला.

पहिला पगार अन व्यवस्थेची ओळख !

डी.एड. झाल्यावर दीड वर्षांनंतर जिल्हा परिषदेची शिक्षणसेवक पदाची जाहिरात आली. डी. एड. झाल्यावर महिन्याला दहा हजार पगार मिळेल व त्यातून आपली आर्थिक समस्या कायमची सुटेल हे स्वप्न मात्र भंगले. दि.१० ऑक्टोबर २००१ रोजी मी शिक्षणसेवक म्हणून प्रतिमाह ३००० रु.मानधनावर खामगाव पंचायत समितीला रुजू झालो. मला जायला बसही नसलेले अत्यंत गैरसोयीचे कुंबेफळ गाव मिळाले.

मी चिडून गटविकास अधिकारी साहेबांना भेटलो. मी गुणवत्ता यादीत अव्वल आहे, माझ्यावर कौटुंबिक जबाबदारी आहे, वडिलांच्या उपचारासाठी जवळचे गाव द्या अशी विनंती केली, मात्र उपयोग झाला नाही. शेवटी नाईलाजाने बीईओ साहेबांना भेटलो त्यांनी ऑर्डर बदलून अटाळी हे गाव दिले.

नवी शाळा, नवे विद्यार्थी, नवे सहकारी मी नव्या उत्साहाने व प्रामाणिकपणे विद्यादानाचे कार्य करायला लागलो. महिना उलटून गेला. दोन दिवसानंतर दिवाळी होती. ३००० रु. का होईना पण पहिला शासकीय पगार मिळणार होता.

दिवाळीला घरी सर्वांना नवीन कपडे घेणार होतो. बऱ्याच वर्षांनंतर दिवाळी आनंदात साजरी होणार होती. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. पहिला पगार घ्यायला पंचायत समितीला गेलो. सर्वांना पगाराचे चेक मिळाले. मात्र यादीत माझे नावच नव्हते. माझ्या पायाखालची जमीनच सरकली.

मी रडकुंडीला आलो. तसाच बीडीओ साहेबांना भेटायला गेलो व पगार मिळण्यासाठी विनंती केली. साहेबांनी सांगितले की, “माझ्या आदेशाप्रमाणे तुम्ही कुंबेफळला काम करायला पाहिजे होते. तुम्ही मात्र बीईओच्या आदेशानुसार अटाळी येथे काम केले. तुमची ऑर्डर ज्या दिवशी बदलली त्याच दिवशी बीईओना एका जुन्या प्रकरणात अटक झाली व सध्या ते निलंबित आहेत.

कुंबेफळच्या लोकांनाही हा सर्व प्रकार माहित झाल्यामुळे ‘आम्हाला वावगे हेच शिक्षक पाहिजे’ यासाठी शाळा बंद आंदोलन केले. खूप पेपरबाजी झाली. त्यामुळे तुम्हाला जर पगार हवा असेल तर मुकाट्याने कुंबेफळला काम करा !” हे ऐकून मला अक्षरश: रडू कोसळले. पहिला पगार मिळाला नाही. दिवाळी अंधारात गेली. हाच पहिला पगार मला तब्बल सात वर्षांनंतर जेव्हा मी शिक्षक पदावरून कार्यमुक्त होऊन विक्रीकर निरीक्षक पदावर रुजू झालो तेव्हा मिळाला. या बलाढ्य व्यवस्थेशी माझी पहिली ओळख झाली ती अशी पहिल्या पगाराच्या माध्यमातून आणि यातूनच प्रशासनात मोठ्या पदावर काम करण्याची ठिणगी माझ्यात पेरल्या गेली !

जगाची ओळख ...स्वप्नांची राख !

कुंबेफळला मी तीन वर्षे काम केले. शाळेतच एका खोलीत मी माझा संसार थाटला होता. सहकारी शिक्षक,गावकरी व विद्यार्थी यांनीही भरभरून प्रेम दिले. यादरम्यान कमी पगारात भागणे शक्य नसल्याने मी रविवारी स्वत: शेतात राबत होतो. वडिलांची एलआयसी एजन्सी होती.

मीही पॉलिसी काढण्याचे काम करत होतो. केंद्रातील सर्व शाळांना हार्डबोर्ड, पुठ्ठे तयार केलेले शैक्षणिक साहित्य पुरवत होतो. यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून कौटुंबिक जबाबदारी समर्थपणे पेलत होतो. सोबतच मी बहि:शाल विद्यार्थी म्हणून अमरावती विद्यापीठाची बीएची परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. या सर्व अनुभवातून शिकायला मिळत होते व लहान वयातच मोठी जबाबदारी सांभाळत असल्याचे समाधानही होते. बहिणी व भाऊ यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी ठेवणे आवश्यक होते. आम्ही सर्वजण नांदुरा येथे भाड्याच्या एका खोलीत राहायला आलो.

चारही बहिण भाऊ एका ८ बाय १० च्या खोलीतही सुखाने राहत होतो. मोठी बहिण प्रीतीची पदवी, माधुरीची १२ वी व श्रीकांतची १० वी होती. सर्वजण जीव तोडून अभ्यास करीत होते. मीही बहि:शाल एमए करीत होतो. आई वडील गावाकडे राहून शेती सांभाळत होते. वाढता खर्च भागविण्यासाठी नोकरीसोबतच पुन्हा शिकवणी घ्यायलाही सुरवात केली.

संघर्षातही सर्वजण आनंदाने जगत होतो. अशातच वडिलांचा अस्थिर मधुमेह व पार्किन्सनचा आजार बळावला. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करावे लागले. सावकाराकडून व्याजाने पैसे घेवून इलाज सुरु होता. संकटात व गरीबीत जग तुम्हाला ओळखत नाही हेच खरे ! शेवटी आयुष्यातला सर्वात दु:खद दिवस उजाडला. दि.७ एप्रिल २००४. दोन दिवसाआधीच डॉक्टरांनी तब्येत चांगली झाली म्हणून वडिलांना सुटी दिली होती.

मी सकाळी ६ ते ८ शिकवणी आटोपल्या. वडिलांचा श्वास वाढत होता. त्यांची दाढी केली, आंघोळ घातली व ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती केले. दुपारपर्यंत त्यांची प्रकृती बिघडत गेली व नंतर ते कोमात गेले ते कायमचेच. रात्री १२ वाजता डॉक्टरांनी वडील गेल्याचे सांगितले अन आम्ही सर्वजण धाय मोकलून रडू लागलो. माझा आधारस्तंभ हरवला होता. डोळ्यांसमोर आंधार दाटून आला.

सारे काही संपले असे वाटायला लागले.आजही त्यांचे ते थिजलेले डोळे मला आठवतात व मृत्यूसमोर मानव किती हतबल आहे, याची जाणीव करून देतात. वडिलांना रंगीत टी.व्ही.घेवून देण्याचे व स्वत:च्या कारमधून फिरविण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले. सारे काही संपले असे वाटायला लागले.मी आतून पूर्ण उद्ध्वस्त झालो होतो !

 

लेखक: प्रशांत भा.वावगे व रश्मी तेलेवार-वावगे, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, नागपूर.

ईमेल: pbwawge@gmail.com

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate