অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सलाम सुजाता

सलाम सुजाता

सुजाता कोंडिकिरे ही तरुणी अंबरनाथ पश्चिमेकडील मातोश्री नगर मध्ये राहते. स्टेट बँक ऑफ म्हैसूर च्या डोंबिवली शाखेत ती गेल्या 3 महिन्यांपासून प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून रुजू झाली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि तिच्या सहयोगी बँकांसाठी घेतलेल्या स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाल्यावर सुजाताची निवड स्टेट बँक ऑफ म्हैसुरसाठी झाली आणि नेमणूक डोंबिवली शाखेत झाली. या बँकेत रुजू होण्यापूर्वी तिचे बँगलोर येथे बँकेच्या प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण झाले. अर्थात सुजाताची बँकेत झालेली निवड ही सहजासहजी झाली नाही. 2012 पासून तिने विविध बँकेच्या स्पर्धा परीक्षा दिल्या. नक्कीच सांगायच्या तर 26 परीक्षा ‍दिल्या. त्यात जवळपास 13 परीक्षा ती उत्तिर्ण झाली.

आता हे वर्णन ऐकून आपल्याला वाटेल, त्यात काय एवढे ! शेकडो हजारो मुले, मुली दरवर्षी स्पर्धा परीक्षा देतात आणि उत्तीर्ण झाल्यावर बँकेत किंवा अन्य शासकीय/निमशासकीय कार्यालयात नोकरीस लागतात. तशीच सुजाताही लागली असेल. पण तसे नाही. सुजाता ही दोन्ही डोळ्यांनी पूर्ण अंध आहे आणि पूर्ण अंधत्वावर मात करीत तिने अत्यंत जिद्दीने हे यश प्राप्त केले आहे.

सुजाताचे वडिल बाळासाहेब नोकरीसाठी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील शिंगणापूर हे मूळ गाव सोडून अंबरनाथला आले आणि येथे स्थायिक झाले. त्यांच्या संपूर्ण नातेवाईकांमध्ये मुलींना शिक्षण दिले जात नसे. पण ते प्रागतिक विचारांचे असल्याने त्यांनी तिन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले. सुजाताचे प्राथमिक शिक्षण अंबरनाथ येथे भगिनी मंडळ शाळेत तर पुढील शिक्षण अंबरनाथ येथीलच महात्मा गांधी विद्यालयात झाले.

घरची परिस्थिती बेताची म्हणून सुजाताला अकरावीसाठी सांगलीला जावे लागले. पहाटे फिरायला जाताना अंधारात मोठे झाड लागले आणि क्षणार्धात सुजाताच्या डोळ्यापुढे अंधार पसरला. त्या धक्क्याने तिची दृष्टी गेली. त्यानंतर 2 महिने उपचार घेतल्यावर दृष्टी आली. 17 व्या वर्षी दृष्टी गेली ती 18 व्या वर्षी आली. सुजाताने 2002 मध्ये बीए अर्थशास्त्र ही पदवी मिळविली. नंतर बीएड करायचे होते पण आर्थिक परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. त्यामुळे तिने खाजगी कंपनीत पॅनेल असेब्लिंग आणि स्टोअर किपरचे काम मिळविले.

पैसे वाचवून बीएड करायचे होते पण 2005 च्या अखेरीस दृष्टी जाऊ लागल्याने ते कामही तिला सोडावे लागले आणि 27 व्या वर्षी ती पूर्णच गेली. मदत करावयाच्या ऐवजी नातेवाईक मात्र अंधत्वामुळे तू काही करु शकणार नाही, घरच्यांवर बोजा बनू नको म्हणून जीव दे असे सरळ सांगायचे. सुजातालाही धीर खचून काही वेळ जीव देण्याचे विचार डोक्यात यायचे. ती आईला म्हणायाची पण, मला विष आणून दे, मी मरुन जाते. पण आईने तिला खूप धीर दिला आणि सुजाताला जगण्याचे बळ मिळाले. म्हणून सुजाता म्हणते, समाजाची मानसिकता बदलली पाहिजे. आता सुजाताची परिस्थिती अशी आहे की, तिला पूर्ण अंधत्व आले आहे. याविषयीची शस्त्रक्रिया अत्यंत जोखमीची आहे. मेंदूत शस्त्रक्रिया करण्यात धोका असा आहे की, त्यामुळे पॅरॅलिसिस होऊ शकतो किंवा मृत्युही येऊ शकतो. शिवाय या शस्त्रक्रियेचा खर्च जवळपास 40 लाख रुपये इतका आहे. तो ही करता येणे अशक्यच.

पण सुजाताने हार मानली नाही. मुंबईतील वरळी येथील नॅशनल स्कूल फॉर ब्लाईंड या संस्थेत ती ब्रेल लिपी शिकली आणि त्याबरोबरच बँकेच्या प्रवेश परीक्षा तयारीच्या वर्गांना बसू लागली. वरळीत तिला एमएससी आयटी करता आले. शिवाय संगणकाचे अंधासाठी असलेले जॉर्ज सॉफ्टवेअर तिने आत्मसात केले. 3 वर्षे वेगवेगळ्या परीक्षा दिल्या. दिवसरात्र अभ्यास करायचा आणि यश मिळवायचेच, ह्या जिद्दीने ती तयारी करत राहिली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि बँकेच्या परीक्षा दिल्या. विक्रीकर निरीक्षकाच्या पहिल्या परिक्षेत तिला यश मिळाले, पण दुसऱ्या परीक्षेचे पत्र परीक्षा झाल्यावर मिळाले आणि ती संधी हुकली. पण ती निराश झाली नाही. अंतिमत: तिची स्टेट बँक ऑफ म्हैसूरमध्ये निवड झाली.

सुजाताने दृष्टी नसल्याने सामान्य ज्ञान या विषयाचा सर्व अभ्यास रेडिओ ऐकून विविध व्यापारविषयक वृत्त वाहिन्यांवरील कार्यक्रम ऐकून केला. वरळीत शिकवायला येणारे श्री.संजय मोरे सर श्री. भरत पांडे सर हे तिला दूरध्वनीवरुन मार्गदर्शन करत राहिले. घरी सुजाताची आई सुजाता सांगायची त्या नोटस् लिहून घ्यायची आणि सतत सुजाताला सोबत करायची.

मुलींच्या शिक्षणामुळे थोरली सुजाता, दुसऱ्या क्रमांकाची ज्योती आणि तिसरी प्रिती आणि भाऊ प्रवीण असे सर्व शिकले. प्रिती वीज मंडळात संगणक चालक आहे. तर ज्योती एसटी महामंडळात वाहक म्हणून काम करते. भावाने आय.टी.आय. मधून एसी मॅकॅनिकचा कोर्स केला. आज तो 2 वर्षापासून दुबईत चांगली नोकरी करतोय. वडिलांच्या प्रागतिक विचारांमुळेच हे शक्य झाले हे सांगताना वडिलांच्या आठवणीने सुजाताला खूप भरुन आले.

सुजाताचे वडिल पॅरॅलिसिसमुळे 2011 पासून काही नोकरी/व्यवसाय करु शकत नव्हते. गेल्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये त्यांचे निधन झाले. अशा दु:खी परिस्थितीत तिने या बँकेची नोव्हेंबर महिन्यात परीक्षा दिली. 26 जानेवारीला निकाल लागला. त्यात ती उत्तीर्ण झाली. 21 फेब्रुवारीला बँकेच्या वांद्रे येथील मुख्यालयात मुलाखत झाली आणि 20 एप्रिलला निवड झाल्याचे नेटवरुन समजले आणि कितीतरी वेळ तिचा विश्वासच बसेना. पूर्ण भारतातून 7 अंध निवडले गेले. त्यातून महाराष्ट्रातून निवडली गेलेली आणि मुलगी असलेली सुजाता एकमेव आहे, हे विशेष.

बँकेत काम करताना सुद्धा सुजाता अधिकाधिक स्वावलंबी राहण्याचा प्रयत्न करते. स्वत:च्या अनेक गोष्टी स्वत:च करते. अंधासाठी असलेले सॉफ्टवेअर अजून बँकेत आलेले नाही. त्यामुळे सुजाता सध्या ग्राहक मित्र म्हणून काम करते. ती बँकेच्या विविध योजना ग्राहकांना समजावून सांगते. काहीवेळा दूरध्वनीवरुन ती ग्राहकांना या योजना समजावून सांगते. तिच्या बरोबर निवड झालेल्या अन्य 6 अंध व्यक्तीही देशाच्या विविध शहरांमधील बँकांमध्ये सध्या अशाच स्वरुपाचे काम करतात.

बँकेत नोकरी लागली तरी सुजाताची शिक्षणाची इच्छा पूर्ण झाली नाही. ती आता समाजकार्यात मास्टरची पदवी प्राप्त करु इच्छिते. शिवाय आपल्याला परत दिसणार जरी नसले तरी आपले डोळे अन्य अंध व्यक्तींना बसू शकतात हे तिला कळल्यामुळे तिने नेत्रदानाचाही संकल्प केला आहे.

डोळ्यांचे डॉक्टर डॉ.सोनल शहा, मानसोपचार तज्ज्ञ डॉ.गौतम जटाले यांचे ती खूप आभार मानते. वडिलांच्या आजारपणामुळे व नंतर मृत्युमुळे बहिण ज्योती आणि तिचे पती श्री.संजय भंडारे यांनी मनापासून साथ दिली, सहकार्य दिले. त्यामुळे सुजाता त्यांच्याविषयीची खूप कृतज्ञता व्यक्त करते.

अंधारातून प्रकाशाकडे निघालेल्या सुजाताला भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

 

लेखक: देवेंद्र भुजबळ, संचालक (माहिती)(प्रशासन)

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate