অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शूर वीर बालकांची देशाने घेतली दखल

शूर वीर बालकांची देशाने घेतली दखल

शूरविरांचा महाराष्ट्र म्हणून देशाला ओळख आहे. या मातीत मुलांवर होणारे साहस व सामाजिक भान जपण्याचे संस्कार देशवासियांना नुकतेच बघायला मिळाले. प्रसंग, राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराच्या घोषणा आणि यात महाराष्ट्रातील चार बालकांच्या समावेशाचा. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्य करणाऱ्या भारतीय बालकल्याण परिषदेने वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराची घोषणा केली त्यात देशातील ३ मुली व २२ मुलांसह २५ बालकांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील चौघांचा समावेश आहे. त्यांचा थोडक्यात परिचय...

शौर्य पुरस्कारामधील सर्वोच्च गणला जाणारा ‘भारत पुरस्कार’ नागपूरच्या गौरव सहस्त्रबुद्धे याला मरणोत्तर जाहीर झाला. जळगाव जिल्ह्यातील कोथळीच्या निलेश भिल, वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वेच्या वैभव घंगारे आणि मुंबईतील वाळकेश्वरच्या मोहीत दळवी ला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांना २४ जानेवारी रोजी या पुरस्कारांनी गौरविण्यात येणार आहे. तसेच, २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचालनात सहभाग घेऊन देश-विदेशातील दिग्गज मान्यवरांना हे बालक अभिवादन करणार आहेत.

भारत देशाच्या विविध भागातील अतुल्य शौर्य दाखविणाऱ्या ६ ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाअंतर्गत कार्यरत राष्ट्रीय बालकल्याण परिषदेच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी पंप्रधानांच्या हस्ते राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तसेच राजपथावरील पथसंचालनात हे बालक सहभागी होतात. महाराष्ट्रातील ३ शूर बालकांसह गौरव सहस्त्रबुध्देची आई पुरस्कार वितरण व प्रजासत्ताक दिन सोहळयात सहभागी होण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राज्यपाल नजीब जंग आणि भारताचे उपराष्‍ट्रपती महंमद हमीद अन्सारी यांनी या बालकांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधला आहे. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतही हे शूर बालक संवाद साधणार आहेत.

राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील बालकांच्या शौर्याबद्दल

नागपूरच्या गौरव सहस्त्रबुध्दे याने अंबाझरी तलावात बुडणाऱ्या ४ मुलांचा प्राण वाचविला, त्यात गौरवला आपले प्राण गमवावे लागले. दहावीत शिकणारा गौरव ३ जून २०१४ ला आपल्या ४ मित्रांसह अंबाझरी तलावजवळ खेळत असताना अचानक त्याचे मित्र पाण्यात बुडत असल्याचे त्याने पाहीले. प्राणाची पर्वा न करता त्याने आपल्या तीन मित्रांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले आणि चौथ्या मित्राला सुखरूप बाहेर काढत असतानाच गौरव पाण्यात बुडाला व त्यातच त्याचा मृत्यू झाला. गौरवच्या या साहसी कर्तृत्वासाठी त्याला ‘भारत पुरस्कार’ प्राप्त झाला आहे. गौरवची आई रेखा कवडूजी सहस्त्रबुध्दे हा पुरस्कार स्वीकारणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी गावात राहणाऱ्या निलेश रेवाराम भिल याला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. ३० ऑगस्ट २०१४ ला ऋषिपंचमीच्या दिवशी आपल्या कुटुंबियांसोबत दर्शनासाठी आलेला मुलगा मंदिरा समोरच्या घाटावर पाय धुण्यासाठी गेला असता पाण्यात पडला. हे चित्र मंदिरात दर्शनासाठी आलेल्या निलेश भिलच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखत क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेऊन त्याने मुलाचे प्राण वाचविले. निलेश भील हा कोथळी येथील जिल्हा परिषद शाळेत ५ वीत शिकत आहे.

वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे येथील सहावीत शिकणाऱ्या वैभव रामेश्वर घंगारे ला शौर्य पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. वैभव हा २६ जुलै २०१४ ला गावातील नंदी नदी किनारी मित्रांसोबत खेळत असताना अचानक नदीला पूर आला. नदीतील पाण्याच्या प्रवाहासोबत वैभवचा मित्र सुहास बोरकर वाहून गेला. तो पुढे एका पुलाखालील सिमेंटच्या पाईपजवळ अडकला. तिथे उभ्या असणाऱ्या लोकांपैकी सुहासच्या मदतीला कोणीच धजावले नाही मात्र वैभवने जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेतली व मित्राचे प्राण वाचविले.

मुंबईतील वाळकेश्वर भागात आत्याकडे राहणाऱ्या मोहीत ने परिसरातील तलावात स्नान करताना बुडत असलेल्या मुलीचे प्राण वाचवले. २५ एप्रिल २०१५ ला आपल्या मामाकडे दिवाळीच्या सुटीत आलेल्या कृष्णा पाष्टे ही मुलगी तलावात आंघोळीसाठी गेली असता बुडत होती. तिने आपल्या मैत्रीणीला हात मागितला, पण तिला पोहता येत नसल्याने मैत्रीणीनेही हात न दिल्याचे चित्र मोहीत ने पाहिले. तोच त्याने २५ फुट खोल तलावात उडी घेऊन कृष्णाचे प्राण वाचविले व तिला नजिकच्या इस्पितळात भरती केले. मोहीतच्या आई वडीलांचे निधन झाले असून आत्याकडे राहणारा मोहीत वाळकेश्वर येथील महानगर पालिकेच्या बालगंगा कवळेमठ शाळेत आठवीत शिकत आहे.

३ मुली आणि २२ मुलं अशा एकूण २५ बालकांना वर्ष २०१५ च्या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. पदक, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त बालकांना भारतीय बालकल्याण परिषदेच्यावतीने शालेय शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत करण्यात येते. तसेच वैद्यकशास्त्र आणि अभियांत्रीकीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंदिरा गांधी शिष्यवृत्तीअंतर्गत पदवी पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत पुरविण्यात येते. महाराष्ट्रातील चार बालकांना मिळणारा हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्राच्या शूर वीर बालकांची देशाने घेतली दखलच म्हणावी लागेल.

लेखक: रितेश मोतीरामजी भुयार, उपसंपादक, महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली.

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 2/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate