অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शालेय पोषण आहार योजनेमुळे वाढली शिक्षणाची गोडी

शालेय पोषण आहार योजनेमुळे वाढली शिक्षणाची गोडी

हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र शाळांना 18 जून 2009 च्या शासन निर्णयानुसार दिनांक 2 फेब्रुवारी 2011 अन्वये शालेय पोषण आहार योजना लागू झालेली आहे. जिल्ह्यातील एक हजार 26 शाळांमधून सदरील योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून हजारो शालेय विदयार्थ्यांना दुपारचे जेवण शासनाकडून दिले जात आहे. त्यामळे विद्यार्थ्यांची शाळेमध्ये उपस्थिती वाढली असून त्यांच्यामध्ये शैक्षणिक आवड (गोडी) ही निर्माण होत असल्याचे निर्देशनास आलेले आहे.

शालेय पोषण आहार योजनेत पात्र ठरलेल्या जिल्ह्यातील 1 हजार 26 शाळांमध्ये जिल्हा परिषदेच्या एकूण 863 (ग्रा. 833, श.30) तर खाजगी एकूण 163 (ग्रा. 114, श. 49) शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना कामकाजाच्या प्रत्येक दिवशी शासन निर्णयाप्रमाणे आहार देण्यात येतो. शाळांची तालुकानिहाय संख्या पुढीलप्रमाणे :- हिंगोली– 203, वसमत– 229, कळमनुरी– 221, औंढा नागनाथ– 178, सेनगाव– 195 अशा एकूण 1026 शाळांमधून विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जात आहे.

या योजनेतील आहाराचा आठवडाभराचा दिवसानिहाय मेनू पुढीलप्रमाणे

1) सोमवार : डाळ, तांदुळाची खिचडी व (पुरक आहार उदा. बिस्कीट),

2) मंगळवार : वरण पांढरा भात (तुरदाळ),

3) बुधवार : भात आणि कडधान्याची उसळ (मटकी/ हरभरा/ वाटाणा पैकी एक),

4) गुरूवार : डाळ तांदुळाची खिचडी,

5) शुक्रवार : वरण पांढरा भात,

6) शनिवार : भात आणि कडधान्याची उसळ (मटकी/ हरभरा/ वाटाणा पैकी एक).

इ. 1 ली ते 5 वी या प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 450 उष्मांक आणि 12 ग्रॅम प्रथिने युक्त तसेच इ. 6 वी ते 8 वी या उच्च प्राथमिक वर्गातील विद्यार्थ्यांसाठी 700 उष्मांक आणि 20 ग्रॅम प्रथिने युक्त आहार देण्यात येतो. या पद्धतीने इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जात असल्यामुळे शाळा गळतीचे प्रमाण कमी झालेले असून विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गोडी निर्माण होत आहे.

या योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी 100 ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी 150 ग्रॅम तांदुळ पुरविण्यात येतो. माहे जून 2010 पासून शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शहरी भागाकरीता तांदुळ व ग्रामीण भागाकरिता तांदळाबरोबरच इतर धान्य मालाचा पुरवठा हा पुरवठाधारकाकडून होतो. माहे नोव्हेंबर 2011 पासून ते आजपर्यंत हा पुरवठा महाराष्ट्र स्टेट को. ऑप.

कंझ्युमर्स लि. मुंबई विभागीय कार्यालय औरंगाबाद यांच्याकडून पुरवठा होत आहे. पुरवठाधारकास तांदुळ वाहतुकीपोटी प्रति किलो 1.20 पैसे प्रमाणे वाहतुकी देयक अदायी मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य पुणे येथून केले जाते.

तसेच धान्यादी मालाकरिता प्राथमिक वर्गासाठी (1 ते 5) रु. 1.31 पैसे व उच्च प्राथमिक वर्गासाठी (इ. 6 ते 8) रु. 1.64 पैसे प्रमाणे खर्च अदायी केली जाते. (शहरी भाग वगळून) यामध्ये मा. शिक्षण संचालक (प्राथमिक) व महाराष्ट्र स्टेट को. ऑप. कझ्युमर्स लि. मुंबई यांच्या करारनाम्याप्रमाणे दर निश्चिती करण्यात आलेली आहे.

शहरी भागाकरिता फक्त तांदळाचा पुरवठा होतो. त्यांना धान्यादी माल व इंधन भाजीपाला व पुरक आहार इ. चा खर्च प्राथमिक वर्गासाठी रु 3.50 पैसे प्रतिदिन प्रतिलाभार्थी व उच्च प्राथमिक वर्गासाठी रु 5.20 पैसे प्रतिदिन प्रतिलाभार्थी प्रमाणे अदायी गट विकास अधिकारी यांच्या कडून करण्यात येते. नागरी भागातील शाळांना शालेय पोषण आहार पुरवण्याकरिता स्वारस्याची अभिव्यक्ती नेमणूक करण्याची प्रक्रिया संचालनायस्तरावर चालु आहे.

सन 2014-15 या वर्षाकरिता शालेय पोषाण आहार योजनेच्या अंमलबजावणीकरिता जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्रा.) ला मार्च 2015 अखेर पर्यंत 15 कोटी 29 लाख 42 हजार अनुदान प्राप्त झालेले होते. यातील 11 कोटी 77 लाख 91 हजार राज्य शासनाकडून प्राप्त झालेले होते तर 3 कोटी 51 लाख 42 हजार केंद्र शासनाकडून मिळालेले होते.
याप्रमाणे जिल्ह्यातील 1 हजार 26 जि.प. व खाजगी शाळांमधील हजारो विद्यार्थ्यांना आहार पुरविण्यात येतो व या योजनेची जिल्ह्यात शिक्षण विभाग (प्रा.) कडून चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी होत आहे.

-संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

अंतिम सुधारित : 11/14/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate