অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्‍यंगचित्रकारांनी तेंडुलकरांविषयी जागवलेल्‍या आठवणी

व्‍यंगचित्रकारांनी तेंडुलकरांविषयी जागवलेल्‍या आठवणी

सर्व व्‍यंगचित्रकारांचे प्रेरणास्‍थान असणारे ज्‍येष्‍ठ व्‍यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्‍या निधनामुळे साहित्यिक, सांस्‍कृतिक, सामाजिक क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. व्‍यंगचित्रे हा साहित्‍याचाच एक प्रकार आहे, हे त्‍यांचे ठाम आणि आग्रही मत होते. एकलव्‍याप्रमाणे त्‍यांनी आपली कलासाधना शेवटच्‍या श्‍वासापर्यंत चालू ठेवली. सार्वजनिक जीवनातील उणिवा, व्‍यंग आपल्‍या कुंचल्‍याच्‍या माध्‍यमातून साकारणारा एक रेषांचा जादूगार असेच त्‍यांना म्‍हणावे लागेल. ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’च्‍या वतीने त्‍यांना आदरांजली अर्पण करण्‍यात आली. व्‍यंगचित्रकारांनी तेंडुलकरांविषयी जागवलेल्‍या आठवणी...

परखड रेषा... बोचरी भाषा... तरीही समाजाभिमुख -विवेक मेहेत्रे

परखड रेषा.... बोचरी भाषा.... तरीही समाजाभिमुख 'मंगेश तेंडुलकर' अशा शब्‍दात ‘कार्टूनिस्‍ट्स कंबाईन’चे अध्‍यक्ष विवेक मेहेत्रे यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. ते म्‍हणाले, ‘वक्ता मुद्देसुद विचार सांगतो, नाटककार व लेखक पानेच्या पाने लिहितात, कवी मोजक्या शब्दात व यमक रचनेत भावना इतरांपर्यंत पोहोचवितात... पण यापेक्षा प्रभावी व सशक्त पद्धत वापरून म्हणजेच कुंचल्यांच्या फटक्यांच्या बळावर व्यंगचित्रकार आपले विचार दूरवर पोहोचवत असतात. अशी दुहेरी ताकद असलेले व्यंगचित्रकार व लेखक मंगेश तेंडुलकर आज आपल्यामध्ये नाहीत.

मी शाळेत असताना (सन 1971 ते 1976) मराठी दिवाळी अंक (अगदी प्रौढांचेही) झपाटल्यासारखे वाचत असे. त्यामुळेच महाविद्यालयाच्या प्रथम वर्षापासूनच माझी हास्यचित्रे साकारली व व्यावसायिक नियतकालिकात प्रकाशित होऊ लागली. ज्ञानेश सोनार, गवाणकर, वसंत हळबे यांच्याप्रमाणे आणखी एका मातब्बर व्यंगचित्रकाराच्या चित्राची मोहिनी माझ्यावर पडली व ते चित्रकार म्हणजे मंगेश तेंडुलकर. चित्रांतून परिचय झालेले तेंडुलकर पुढे माझ्या जीवनात खऱ्या परिचयाचेही झाले. पण हे रसायन थोडे अलग होते. त्यांचा गंभीर चेहरा, तत्त्वज्ञानी व्यक्तीप्रमाणे धीरगंभीर व भारदस्त वागणे यामुळे तत्कालिन तरुण व्यंगचित्रकारांच्या मनात एक भीतीयुक्त आदर असे. रेषेतली ताकद व ब्रशचे फटकारे लक्ष्मण किंवा ठाकरे बंधूपेक्षा कमालीचे वेगळे, यामुळेच तेंडुलकरांची चित्रे परिणामकारक व भेदक वाटायची. श्याम जोशी, प्रभाकर ठोकळ किंवा गवाणकरांची चित्रे फाऊंटन पेन किंवा मायक्रोटीप पेनच्या बारीक रेषेने रेखाटलेली असत व ती गोड शिकरणासारखी वाटत असत. पण तेंडुलकरांची चित्रे म्हणजे जणू कोल्हापुरी मसाला किंवा वऱ्हाडी ठेचाच ! अन्य दिवाळी अंकांमध्ये मंगेश तेंडुलकरांची हास्यचित्रे / मालिका सुट्या स्वरुपात / विस्कळीतरित्या मांडलेली असत. त्यामुळे त्यांचा म्हणावा तसा परिणाम होत नसे. पण पाटकरांच्या ‘आवाज’ या लोकप्रिय दिवाळी अंकात मात्र विशेष स्वरुपात ले-आऊट (मांडणी) केलेली तेंडुलकरांची व्यंगचित्रमालिका हे दरवर्षीचे एक विशेष आकर्षण ठरत असे. सन 1978 पासून 2016 पर्यंत सलगपणे तेंडुलकरांच्या व्यंगचित्रमालिका ‘आवाज’मध्ये अगदी हमखास दाद मिळवणारी बाब ठरत गेली.

विषयांची विविधता, रोख-ठोकपणा, समाजस्वास्‍थ्‍याविषयीचे पराकोटीचे भान यामुळे त्यांची व्यंगचित्रे बोचरी व तिरसटपणाचा वास असलेली भलेही वाटत असली तरी ती सिद्धहस्त होती. त्यांच्या कठोर चित्रपद्धतीमुळे काही दिवाळी अंकाचे संपादक त्यांच्यापासून चार हात दूर राहत असत. स्वत:च्या मर्जीप्रमाणे वागणे, लाळघोटेपणा न करणे व व्यंगचित्रकला समाजाभिमुख करणे या वृत्तीमुळेच ते अस्सल जीवन जगले. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत, दिवाळीत प्रदूषण व ध्वनीप्रदूषण मोठ्या प्रमाणात करू नये, यासाठी स्वत: चितारलेल्या संदेशांच्या प्रती चक्क पुण्यातील चौका-चौकांत उभे राहून वाटणारा हा अवलिया समीक्षकांना कधीही नीट समजू शकला नाही.

नोकरीनंतरच्या निवृत्तीच्या काळात स्वत:च्या दुचाकीवरून भटकताना जीवनाकडे कमालीच्या तटस्थतेने पाहणारा हा व्यंगचित्रकार कधीही इतरांना स्वत:हून आपण नाटककार विजय तेंडुलकर यांचे बंधू आहोत, असे सांगत नसे. त्यांनी अनेक वर्षे, सातत्याने परखडपणे, कुणाचाही मुलाहिजा न ठेवता नाट्यपरीक्षण लेखनाचे काम अतिशय चोखपणे केले. पुस्तके, चित्रप्रदर्शने, क्वचितप्रसंगी भाषणे यामुळे कलाजगतात रममाण झालेले हे आदरणीय व्यक्तिमत्त्व, मंगेशजी आज आपल्यात नाहीत.

शब्दमाहात्म्य उपजतच -शि. द. फडणीस

मंगेश तेंडुलकर हे मला सर्वप्रथम लेखक म्हणून परिचित झाले. तेंडुलकर घराण्यातील शब्दमाहात्म्य त्यांच्याकडेही उपजत होते. नाट्यसमीक्षक म्हणूनही ते नावारुपाला आले. 1994पासून माझी आणि त्यांची घट्ट मैत्री झाली. त्यांच्या ‘संडे मूड’ व ‘तेंडुलकरी स्ट्रोक्स’ या दोन पुस्तकांमध्ये विविध राजकीय, सामाजिक समस्यांवर प्रभावीपणे भाष्य केले आहे. त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते या समस्या मांडताना सामान्य कार्यकर्त्याच्या भूमिकेतून रस्त्यावर उतरुन काम करत.

ब्रशच्या फटकाऱ्याचे दिवाणे- रवींद्र बाळापुरे

आदरणीय मंगेशजी तेंडुलकर 11 जुलै 17 ला स्वर्गवासी झाल्याचे कळले. एक रेषेचा फटकारा मारल्यागत त्यांची एक्झिट झाली. मीच नाही तर झाडून सर्व व्यंगचित्रकार त्यांचे ब्रशच्या फटकाऱ्याचे दिवाणे होते. तसेच ते नाट्यसमीक्षक सुद्धा होते. त्यांची 'आवाज' मधली हास्यचित्रमालिका बघायला खरं तर मी आतुर असे. त्यांचे 'संडे मुड' हे पुस्तक एकदा तरी वाचायला हवे. त्यातील व्यंगचित्रे आणि सरांची जगण्याकडे पाहण्याची दृष्टी मनाला छेदून जाणारी आहे. असा हा 'रेषेचा फटकारा' आपल्यातून निघून गेला.

व्यंगचित्र हे विनोदी साहित्याचे अंग- महेंद्र भावसार

आधी त्यांची एक आठवण सांगतो. सात वर्षांपूर्वी दादर येथे माटुंगा कल्चरल हॉलमध्ये साहित्य संमेलन भरले होते. त्यात विनोदी सहित्यावर परिसंवाद होता. त्यात सहभाग होता तो शिरीष कणेकर, अनंत भावे, श्रीकांत बोजेवार, वसंत सरवटे आणि मंगेश तेंडुलकर या दिग्गजांचा. व्यंगचित्र हे विनोदी साहित्याचे अंग आहे हा चर्चेत आलेला मुद्दा सर्वमान्य झाला. पण त्यात सरवटेंनी तेंडुलकरांची चित्र ही व्यंगचित्र नाहीत, व्यंगचित्रांची भाषा त्यांना कळलेली नाही, असे विधान केले. यावर 'मी व्यंगचित्रकार नाहीच' असे तेंडुलकरांनी जाहीर करून टाकले. या दोघात काय मतभेद होते कळावयास मार्ग नाही.

तेंडुलकरांना सुरूवातीला चित्रकला फारसी अवगत नसावी. त्यांची जुनी चित्रे फार त्रोटक नि ओबडधोबड आहेत. मात्र, सातत्‍यपूर्ण प्रयत्नांनी त्यात जी प्रगती केली ती लक्षणीयआहे. तीही उतारवयात कायम प्रगतीशील राहिली. त्यांच्‍या चित्रातील चमत्कृतीपूर्ण विनोद, प्रयोगशीलता, विविधता आणि सामाजिक आशय याबाबतीत त्यांच्यासारखा दुसरा मराठीत व्यंगचित्रकार नाही.

फार वर्षांपूर्वी आवाज दिवाळी अंकात त्यांनी आवाजचे संपादक मधुकर पाटकर आणि ‘आवाज’ दिवाळी अंकाची निर्मिती यालाच व्यंगचित्राचा विषय बनवलं होतं! असे प्रयोग केवळ तेच करु जाणे!

बापू लिमये नावाचे एक ज्येष्ठ नाट्यसमीक्षक व नेपथ्यकार आमच्‍या कल्याणात होते. त्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त त्यांचा सत्कार करायचे आम्‍ही ठरवले होते. निमंत्रण पत्रिकेत व जाहिरात फलकावर स्वतःचा फोटो न छापण्याची त्यांची इच्छा होती पण आम्‍ही आग्रह केला तेव्हा त्यांनी एक कागद आमच्या हाती दिला. त्या कागदावर तेंडुलकरांनी चितारलेले बापू लिमये यांचे अर्कचित्र होते. बापूंचे समीक्षकी उग्र व्यक्तिमत्व तेंडुलकरांनी प्रभावीपणे रेखाटले होते. पण विशेष म्हणजे चित्रात बापू रंगमंचावर झाडू घेऊन उभे आहेत, असे दाखवले होते. नेपथ्यकाराचे काम झाडू मारणे हे ही असते नि समीक्षकास कलावंतांना झाडू मारण्याचा अधिकार असतो हे ही सुचवले होते. मला वाटतं ते अस्सल पुणेरी होते. अत्यंत गांभिर्याने उच्चकोटीचा विनोद करणे, एखाद्याची दमदार फिरकी घेणे व 'शहाणे करावे सकल जनासी' हा पुणेरी बाणा त्यांनी चित्रातून नेमका दाखवला.

विनोदाची वेगळी जातकुळी- चारुहास पंडित

लहानपणी सुटीत दिवाळी अंक पाहणे, हा आमच्यासाठी एक आनंदाचा भाग होता. बाहेर फटाके फुटत असायचे आणि अंकात मराठीतले मातब्बर व्यंगचित्रकार आपल्या रेषांमधून हास्याचे भुईनळे उडवत. याच रेषांनी आमच्यासारख्या हौशी व्यंगचित्रकारांना या क्षेत्रात येण्याची भुरळ घातली. या मराठी व्यंगचित्रकारांच्या मांदियाळीत मला भेटलेले एक व्यंगचित्रकार म्हणजे मंगेश तेंडुलकर… अतिशय वेगळी रेषा, वेगळी शैली, विनोदाची वेगळी जातकुळी घेऊन!

रंग रेषा आणि शब्द यांचे जादूगार- व्यंगचित्रकार लहू काळे

मंगेश तेंडुलकर हे प्रतिभासंपन्न रंग, रेषा आणि शब्द यांचे जादूगार होते. सामाजिक भान असलेले, विसंगतीवर नेमकं बोट ठेवणारे, शब्दविरहीत चित्रांतून खळखळून हसायला लावणारे असे दिग्गज व्यंगचित्रकार होते. या वयातही त्‍यांच्‍या रेषांचे फटकारे खूप ताकदीचे होते. ‘तुमची व्यंगचित्रे मला आवडतात बरं!’ असं मला आवर्जून सांगायचे. भेट झाली की मोलाचे मार्गदर्शन करायचे. व्यंगचित्राव्दारे समाजप्रबोधनाचा विडा त्यांनी उचलला होता. सर्व व्यंगचित्रकारांचे ते आदर्श होते. शेवटी ‘या सम हाच’ असे म्हणावे लागेल. असा एका वेगळ्या धाटणीचा प्रतिभासंपन्न व्यंगचित्रकार पुन्हा होणे नाही.

रस्त्यावर उतरुन प्रबोधनात्मक कार्य - घनश्याम देशमुख

'बोलक्या रेषेच्या' 2001 मध्ये आयोजित पहिल्या प्रदर्शनाला मंगेश तेंडुलकर उद्घाटक होते. चित्रकलेचे कुठलेही शिक्षण न घेता त्यांच्या चित्रातील तर्कशुध्द रंगसंगती हे त्यांच्याबद्दल प्रेम व आकर्षण निर्माण होण्याचे कारण होते. माझ्या चित्रांविषयी बोलताना एक गुरुमंत्र त्यांनी दिला. ते म्हणाले, ‘कुणाच्या शैलीचे अनुकरण केलेस तर आयुष्यभर तुला अनेक अडथळे येतील. स्वत:ची शैली विकसित कर’. वर्तमानपत्रे, मासिके, यांच्यापलीकडे जाऊन रस्त्यावर उतरुन प्रबोधनात्मक कार्य प्रणालीची तेंडुलकरांची पद्धत आमच्यासारख्या कुठल्याही व्यंगचित्रकाराला निर्माण करणे शक्य झाले नाही. बाहेरगावी प्रदर्शन भरविताना ते नेहमी आपल्या पत्नीसह दुचाकीवर चित्र घेऊन जात असत. यातून त्यांची स्वावलंबनाची शिस्त समजते.

निकोप आणि अभिरुचीयुक्त आशयाशी बांधिलकी- डॉ. सुजाता जोशी-पाटोदेकर

अगदी परवापर्यंत हास्यचित्रांचा आनंद देणारे मंगेश तेंडुलकर हे एक बहुरंगी व्यक्तिमत्व म्हणून आपली संपन्न कारकीर्द घडवून गेले. त्यांच्या चित्रात जाणवायची ती पात्रांची उंची, आणि लांब हात-पाय..! चित्र संकल्पना आणि विचारांच्या उंचीशी सुसंगत अशीच ही रेखाटने मनामधे ठसा उमटवून जातात. निकोप आणि अभिरुचीयुक्त आशयाशी बांधिलकी त्यांच्या चित्रांनी जपली. एक चिंतनशील, अभ्यासू हास्यचित्रकार काळाच्या पडद्याआड गेला.

अविस्मरणीय आठवणी- शरयू फरकांडे

सकाळी- सकाळी मोबाईल हातात घेतला आणि सरांच्या निधनाची बातमी समजली. अजूनही विश्वास बसत नाही की मंगेश तेंडुलकर सर आता आपल्यात नाहीत.

प्रसंग आहे संभाजी गार्डनमधला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नोटबंदीच्या निर्णयाला कार्टूनच्‍या माध्यमातून पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण जमलो होतो. तेंडुलकर सरांच्या अगदी शेजारची जागा मला मिळाली आणि काय आंनद झाला विचारू नका. मी जे काही काढले ते सरांनी बघितलं आणि म्हणाले, 'स्त्रिया या क्षेत्रात खूप कमी आहेत, काम करत रहा. त्यांच्या चेहऱ्यावर कौतुक स्पष्ट दिसून यायचं. आजही तो प्रसंग डोळ्यासमोरुन हालत नाही. 'चिंटु गँग' या नियतकालिकाच्या उद्घाटनाच्यावेळी मी काढलेले त्यांचे कॅरिकेचर दाखवले. ते खूप खूष झाले. मला म्हणाले, 'तुझ्यात कॅरिकेचरसाठी लागणारे गुण आहेत, तुला त्याची नस सापडलीय. काम चालू ठेव'. जेव्हा नंतर भेट झाली, तेव्‍हा त्‍यांनी आर्वजुन सांगितलं, तू दिलेले कॅरिकेचरचे कॅलेंडर जपून ठेवलंय मी. त्यांचे असे अचानकपणे जाणे मनाला चटका लावणारे आहे.

व्यंगचित्रातला बाप माणूस- चंद्रशेखर भालेराव

ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून समाजातील विविध विषयांवर भाष्य केले आहे. जिवंतपणी आपली अंत्ययात्रा काढणारा (चित्रीत करणारा) एक अवलिया व्यंगचित्रकार आज आपल्यातून निघून गेला. ज्याही वेळेस कुठेही व्यंगचित्राचे नाव निघेल, त्याठिकाणी आवर्जून तेंडुलकरांचे नाव घ्यावेच लागेल... तेंडुलकरांच्या जाण्याने महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे.

मंगेश तेंडुलकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व- अमोल गवळी

मंगेश तेंडुलकर हे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांच्याकडे सामाजिक भान आणि विनोदाचे अजब कौशल्य होते. त्यांची हास्यचित्रे 'सदाबहार', 'टवटवीत' आहेत, दरवेळी त्यातून एक नवा आनंद मिळतो.

स्मशानातीलही व्यंग टिपून हसवणारे अजरामर व्यंगचित्रकार- महेश ढाकणे

व्यंगचित्रकाराने आपल्या कुंचल्यातून व्यंग टिपावे आणि ते बघणाऱ्यांनी खळखळून हसावे. 'मोजके शब्द, मोजक्या रेषा आणि प्रसंगावधानाने साधलेली कधी विनोदी तर कधी मार्मिक टोलेबाजी म्हणजे व्यंगचित्र' असा साधारण कयास असतो. मात्र काही व्‍यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रांतून कुंचल्याच्या फटका-याने समाजव्यवस्थेच्या मेंदूला चिकटलेली धूळ झटक्यात फुंकतात. तेव्‍हा मात्र ती व्यंगचित्रे आणि व्यंगचित्रकार खरंच कलावंत असण्याचा धर्म पाळतात. त्यापैकीच एक म्हणजे मंगेश तेंडुलकर. व्यंगचित्रातून हसवणे सोपे नाही, पण त्यातल्या त्यात रडायच्या प्रसंगावरही जर कुणी हसवले तर? ते ही मृत्यूला हसत समोर जात आपल्याच मृत्यूनंतर थडग्यावर कुत्री कशी पाय वर करतील, हे सहज चित्रीत करुन मंगेश तेंडुलकरांनी खऱ्या व्‍यंगचित्रकलेची नवी खिडकीच उघडी केली. माणसांनी हसावे, हसत- हसत संकटे पेलावीत अगदी मृत्युनंतरही हसवावे हा यामागचा खरा हेतू.

मंगेश तेंडुलकरांची व्यंगचित्रे समाजव्यवस्थेचा आरसा होती. त्यातून कधी हसवणं कमी-जास्त असेल. मात्र हादरा भयंकर बसायचा. तो गरजेचा होता आणि आहे सुध्दा. त्यांचा फटकारा चंद्र-सूर्य यावर कविता-व्यंगचित्र करण्यापेक्षा गरीब गरजूंना चंद्र-सूर्यापेक्षा मोठ्या वाटणाऱ्या 'रोटी' वर होता.

सर्वसामान्य नागरिकांमध्ये व्यंगचित्रकला पोहोचवली- मुकीम तांबोळी

बहुतेक व्यंगचित्रकार आपल्या स्टुडिओमध्ये काम करतात. मात्र, तेंडुलकर हे रस्त्यावर उभे राहूनदेखील चित्रे रेखाटायचे. सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांनी व्यंगचित्रकला पोहोचवली. त्यांची दिवाळी अंकातील व्यंगचित्रे पाहून मी लहानाचा मोठा झालो. वाहतुकीवर त्यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे आयुष्यभर स्मरणात राहतील. व्यंगचित्रांची सुमारे 90 प्रदर्शने भरवणारा हा पहिलाच व्यंगचित्रकार असेल, असे वाटते.

लेखक: राजेंद्र सरग, संपर्क- 9423245456

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/21/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate