অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वादळातील दिवे

वादळातील दिवे

सध्याच्या परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात अभियांत्रिकी महाविद्यालये विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता उपलब्ध आहेत. काही महाविद्यालयांमध्ये जागा पूर्णपणे भरल्या जात नाहीत. काही विद्यार्थी अभियांत्रिकी शाखा सोडून इतरत्र क्षेत्रात काम करीत असतानाही दिसत आहे. त्यामुळे, समाजात काहीसं चित्र निर्माण झाले आहे की अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आजकाल फारच कमी प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध आहेत, व्यवसायाची संधी कमी होत आहे, मोठ्या शहरातच फक्त नोकरीची संधी उपलब्ध आहे व फ्रेशर्स विद्यार्थ्यांना सुरूवातीला कमी पगाराच्या नोकऱ्या कराव्या लागतात. अशा पार्श्वभूमीवर काही विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रात देदिप्यमान कामगिरी करून छोट्या गावात सुद्धा नावलौकिकास आले आहेत. असाच एक विद्यार्थी म्हणजे पंकज काशेटवार.

पंकजने वर्ष २००० मध्ये सिव्हील अभियांत्रिकीची पदवी प्रथम श्रेणी मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, अमरावती येथून उत्तीर्ण केली. दुर्दैवाचा भाग म्हणजे तो अंतिम वर्षाला असताना त्याचे वडील वारले. घरची आर्थिक परिस्थिती एकदम बेताची होती. वडिलांचे छोटेसे किराणा दुकान तेही छोट्या गावात होते. वडिलांच्या निधनानंतर आईला व लहान बहिणीला घेऊन पंकज अमरावतीला आला. सिव्हील अभियांत्रिकीची पदवी तर मिळाली होती आता पुढे काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. घरची बेताची आर्थिक परिस्थिती पाहता सगळ्यांनी त्याला एखादी छोटीशी नोकरी करण्याचा सल्ला दिला. पण पंकजने परिस्थितीसमोर हार मानली नाही. त्याचाच वर्ग मित्र होता अमोल डोहीफोडे. दोघांनी मिळुन काहीतरी नवीन व वेगळे करण्याचा चंग बांधला.

त्यांनी नगरपालिका व महानगरपालिकेला मालमत्तेचा कर आकारण्यासाठी संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करून, मालमत्तेची माहिती संगणकात साठवून व जी.आय.एस. प्रणालीचा उपयोग करून स्वॉफ्टवेअर तयार करण्याचा संकल्प केला. या स्वॉफ्टवेअरद्वारे नगरपालिका व महानगरपालिकेला संपूर्ण शहरातील मालमत्तेची माहिती, त्याचे क्षेत्रफळ, अचूक स्थान, मालमत्तेचे छायाचित्र, प्लान, मालमत्ता धारकाला भरावयाचा कर, यापूर्वीचा थकीत कर या बद्दलची माहिती व कर पावती उपलब्ध होईल, असे प्रगत स्वॉफ्टवेअर तयार केले. त्यामुळे आतापर्यंत प्रचलित असलेल्या कार्यप्रणालीपेक्षा ही प्रणाली सरळ, सोपी, वेगवान व फायदेशीर ठरली. यामुळे शहरातील बऱ्याच नवीन झालेल्या वस्त्या कर प्रणाली मध्ये समाविष्ट झाल्या. जुनी कर पद्धती अद्ययावत झाली. त्यामुळे नगरपालिकेच्या उत्पनात भरघोस वाढ झाली.

सुरवातीला नगरपालिकेच्या लोकांना याचे फायदे समजावून देणे व पटवून देणे जिकरीचे ठरले. खूप मेहनत करावी लागली नंतर मात्र एक एक नगरपालिका व महानगरपालिकांची कामे मोठ्या प्रमाणात मिळू लागली. मजल दरमजल करीत महाराष्ट्र व गोव्या मधील बहुतांश नगरपालिका व महानगरपालिका त्यांनी काबीज केल्या. आज त्यांच्या कंपनीचे मुख्य कार्यालय अमरावती येथे असून पुण्यामध्ये शाखा आहे. कंपनीची उलाढालही मोठी आहे. कंपनीमध्ये जवळपास तीनशे कर्मचारी असून सुमारे दिडशे अभियंते काम करीत आहेत. अमरावतीला कंपनीची कार्यालयाची चार मजली संपूर्ण वातानुकुलीत इमारत आहे. कार्यालयात शंभर ते दिडशे संगणक असून इंटरनेटची संपूर्ण सुविधा आहे. हा सगळा डोलारा पंधरा वर्षाच्या कालावधीत स्वत:च्या बळावर शून्यापासून सुरवात करून, कोणाचीही शिफारस, आधार, मार्गदर्शन व मदत नसताना उभारलेला आहे. अशाच यशस्वी अभियंत्याकडून सध्याच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घेणे आवश्यक आहे. ज्यांनी स्वत:चा व्यवसाय तर वाढवला पण इतर अभियंत्यांना सुद्धा नोकरी उपलब्ध करून दिली आहे. यालाच तर म्हणतात ना वादळातील दिवे जे वादळातही सतत तेवत राहतात व सभोतालच्या लोकांना प्रकाश देतात.

-प्रा.डॉ.संदीप पांडुरंग ताटेवार

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 8/13/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate