অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ध्येयवेडा लेखक लक्ष्मणराव

ध्येयवेडा लेखक लक्ष्मणराव

एखाद्या लेखकांच्या बाबतीत आपले मत काय असू शकते. एक तर तो खूप श्रीमंत असेल आणि छंदापोटी लिहीत असेल किंवा अत्यंत गरीब, पीडित, शोषित असेल व आपल्या अनुभवातून लिखाणाची सृजनता निर्माण करीत असेल. एखादा लेखक दुसऱ्यांचे अनुभव मांडतो आणि एखाद्याचे ध्येयच लेखक व्हायचे असते. त्यासाठी पडेल ते कष्ट भोगण्याचीही त्यांची तयारी असते. असेच एक लेखक दिल्लीत आहेत. लेखक म्हणून कारकीर्द करताना त्यांनी महाराष्ट्रातील अमरावतीपासून ते दिल्लीपर्यंतचा प्रवास केलाय. मराठीत न लिहिता हिंदी लेखक बनायचे त्यांनी ठरविले. आज राजधानीतील दिग्गज साहित्यकांमध्ये त्यांचे नाव आदराने घेतले जाते. ते आहेत लक्ष्मणराव शिरभाते.

दिल्लीतील गजबजलेल्या आयटीयो क्षेत्रातील हिंदी भवनाच्या पुढे एक चहाची टपरी आहे. बाजुला एक पुस्तकांचा छोटासा स्टॉल आहे. या पुस्तकांवर नजर फिरवली तर सर्वच पुस्तकांचे लेखक लक्ष्मण राव असे दिसून येते. मराठी मातीतल्या या लक्ष्मण रावांनी तब्बल 24 पुस्तके हिंदीत लिहिली. त्यांच्या या जिद्दीला इंदिरा गांधी यांच्यापासून तर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सलाम केला. लक्ष्मण राव शिरभाते हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील तडेगाव दशासरचे.

त्यांच्याशी संवाद साधल्यावर एक गोष्ट लक्षात आली, इतके मोठे व्यक्तीमत्व असणारी व्यक्ती पण स्वभावात अत्यंत नम्रपणा. ते चहा विकून उदरनिर्वाह करतात. याबद्दल त्यांना तुच्छता वाटत नाही. ‘पोटासाठी चहा विकतो, बाई,’ असे सहज सांगतात. ‘सुरूवातीला अमरावतीमध्ये सुत गिरणीत काम करीत होतो. पण गिरणी बंद पडली आणि रोजगाराकरिता धडपड सुरू झाली. वडीलांकडे 40 रूपये मागीतले. आधी भोपाळची व नंतर दिल्लीची वाट धरली. शिक्षण फारसे न झाल्यामुळे बाबुचे काम तर मिळणारे नव्हते, हातात येईल ते काम करीत दिवस काढले. नंतर पान ठेला लावला’. पोटभरण्यासाठी त्यांना अशी धडपड करावी लागल्याचे ते सांगतात.

मनात यापेक्षाही काही वेगळे करायचे होते. त्यांना लेखक बनायचे होते. वाचनाची आवड लहानपणापासूनच होती. आवडीचा लेखक ‘गुलशन नंदा’ ज्याने एका काळी आपल्या लिखाणातून वाचकांना अक्षरश: वेड लावले होते. त्यांनी वाचून वाचूनच लेखक होण्याचे स्वप्न पाहिले. 1979 मध्ये लक्ष्मण रावांनी आपले पहिले पुस्तक ‘नई दुनिया की नई कहानी’ लिहिले. विविध प्रकाशन संस्थेत फिरून पुस्तक छापण्याकरिता विनवणी केली. मात्र सगळीकडून नकार मिळत गेला. शेवटी स्वत: ‘भारतीय साहित्य कला प्रकाशन संस्था’ नावाची प्रकाशन संस्था स्थापन केली आणि या प्रकाशन संस्थेमार्फत स्वत:चे पुस्तक प्रकाशित केले. त्यावेळी लक्ष्मणराव विडी, पान विकत असत. पण त्यांनी लेखक म्हणून पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मागे वळून कधी पाहिले नाही. त्यांची एकामागून एक पुस्तक प्रकाशित झाली. यामध्ये रामदास रेणु, नर्मदा, राजनीति, दृष्टिकोण, पत्तियों की सरसराहट, सर्पदंश, साहिल, प्रात:काल, प्रशासन, राष्ट्रपती, साहित्य व्यासपीठ, समकालीन संविधान, अंहकार, अभिव्यक्ती, मौलिक पत्रकारिता प्रधानमंत्री अशी अनेक पुस्तक आहेत. आज लेखक म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख असली तरी आजही ते चहा विकूनच आपला उदरनिर्वाह करतात.

दिल्लीतील जवळपास 500 शाळांच्या वाचनालयात त्यांची पुस्तके आहेत. ही सर्व पुस्तके त्यांनी सायकलवर फिरून विकली. नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून आज ते ऑनलाईन पुस्तके विकतात. महिन्याला त्यांच्या दुकानातून 10-15 हजार रूपयांची पुस्तकांची विक्री होते. तर ऑनलाईन पुस्तक विक्रीच्या माध्यमातून दहा हजार रूपयांच्या जवळपास विक्री होते. लक्ष्मणराव हे लेखक, साहित्यीक, प्रकाशक, विक्रेते अशा सर्वच भुमिका लिलया पेलत आहेत. हे विशेष !

हिंदी भाषेच्या प्रेमात कसे पडलात ? असे विचारल्यावर ते सांगतात, ‘लहानपणापासून वाचनाची ओढ होती, त्यात सुरूवातीपासून हिंदीचे वाचन अधिक केले. दिल्लीत आल्यावर येथील जुन्या पुस्तकांच्या दुकानातून हिंदी लेखकांची पुस्तके आणून वाचायचो. यामध्ये मुख्यत: गुलशन नंदा, मुंशी प्रेमचंद, चट्टोपाध्याय यांच्यासह शेक्सपीयर आणि यूनानी नाटककार सोफोक्लीज यांचेही साहित्य वाचले. त्यांची वाचनाची आणि लिहिण्याची ओढ यावरूनही दिसून येते.

त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी दिल्ली विद्यापीठातून कला शाखेत पदवी शिक्षण पूर्ण केले. आता इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून हिंदी पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. भविष्यात त्यांना हिंदीमध्ये पीएचडी करायची आहे. रोज पाच हिंदी वर्तमान पत्र तसेच दोन इंग्रजी वर्तमान पत्राचे ते वाचन करतात. याशिवाय पुस्तका वाचन, रोज लिहिणे दुपारनंतर चहाचा व्यवसाय करणे असा त्यांचा दिनक्रम असतो. दिल्लीत ते मागील चाळीस वर्षापासून राहत आहेत. परंतु, अद्याप त्यांनी स्वत:चे घरही विकत घेतले नाही. त्यांना दोन मुले आहेत. एक एम.बी.ए. करीत आहे. दुसराही शिकत आहे. त्यांच्या लेखन कार्यास त्यांच्या कुटूंबातील सदस्यांचा सदैव पाठींबा राहिला आहे. अशा या मराठमोळ्या मातीतील हिंदी लेखकास सलाम.

लेखिका: अंजू निमसरकर-कांबळे, माहिती अधिकारी, महाराष्ट्र परिचय केंद्र नवी दिल्ली

मोबा. 09899114130 ईमेल: anjuykamble15@gmail.com

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate