অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डोळस तरुणाईसमोर कृतिकाचा आदर्श

डोळस तरुणाईसमोर कृतिकाचा आदर्श

अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जातांना तरुण पिढीतील अनेक मंडळी निराश होताना दिसतात. एखाद्या अपयशाने खचून जातात. नैराश्यानेग्रस्त झालेली ही तरुणाई व्यसनांच्या गर्तेत अडकलेले चित्र दिसते. अशा सर्व तरुणांसमोर कृतिकाचे कर्तृत्व दीपस्तंभासारखे उजळणारे आहे.

‘आकांक्षा पुढती जिथे गगन ठेंगणे’ ही उक्ती सार्थ ठरते कृतिकाच्या बाबतीत. कृतिकाने आपल्या कर्तृत्वाने केवळ दृष्टीबाधितांसमोरच नव्हे तर डोळस तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. मुंबईच्या कृतिका हिने फिजिओथेरेपीची आरोग्य शिक्षणाची महत्त्वपूर्ण पदवी प्राप्त केली आहे.

लुई ब्रेल, यांनी ब्रेल लिपीची निर्मिती करुन अंधाना शिक्षण व इतर कौशल्याची दारे खुली करुन दिली. आजवर अनेकांनी पदवी, पदव्युत्तर शिक्षण, कौशल्य शिक्षण घेत स्वत:ला आपल्या पायावर उभे केले आहे. आज माहिती व तंत्रज्ञानाच्या सहाय्याने दृष्टीहीन प्रगतिची नवी क्षितीजे शोधत आहेत. कृतिकाची कामगिरी अशीच प्रेरणादायक ठरणारी आहे. अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जातांना तरुण पिढीतील अनेक मंडळी निराश होऊन जातांना दिसतात. एखाद्या अपयशाने खचून जातात. नैराश्यानेग्रस्त झालेली ही तरुणाई व्यसनांच्या गर्तेत अडकलेले चित्र दिसते. अशा सर्व तरुणांसमोर कृतिकाचे कर्तृत्व दीपस्तंभासारखे उजळणारे आहे.

नालासोपारा येथील रहिवाशी आणि 8 जानेवारी 1993 ला जन्मलेली कृतिका जन्मत:च अंध नव्हती. मात्र वयाच्या आठव्या वर्षी अचानक तिला हा आघात सोसावा लागला. कृतिका तिसरीत असतांना तिच्या दृष्टीपटलाची नर्व्हस सि‍स्टीम डॅमेज झाली आणि तिला अंधत्व आले. जे वाट्याला आले त्याचा स्वीकार करीत ती व तिच्या कुटुंबियांनी पुढे जाण्याचा निर्धार केला. आठवीपर्यंत ती इंग्रजी माध्यमिक शाळेत शिकत होती. अंधत्व आल्यानंतर तिला अंधाच्या शाळेत टाकण्याविषयी हालचाली सुरु झाल्या. पण तिला इंग्रजी माध्यमातच शिकायचे होते. त्यामुळे संस्थाचालकांचे मन वळवीत बी.पी.एम. हायस्कूल खार (वेस्ट) येथे तिने दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तिला दहावीला 82 टक्के तर तिने डी.जी.रूपारेल कॉलेजला विज्ञान शाखेत प्रवेश मिळवून बारावीच्या परीक्षेत 65 टक्के गुण मिळवले होते.

मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तिला सेठ जी. एस. मेडिकल कॉलेज, मुंबई येथे फिजीओथेरेपीच्या अभ्यासक्रमास प्रवेश मिळाला. प्रवेश तर मिळाला पण पुढे काय असा प्रश्न होताच. तिच्या आईने यात तिला सर्वतोपरी मदत केली. तिच्या आईने अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके वाचून काढली आणि सर्व शैक्षणिक साहित्य ध्वनीमुद्रित रेकॉर्ड केले. परीक्षेच्या वेळीही ती कृतिकाला सर्व वाचून दाखवायची. परीक्षेच्या वेळी कृतिकाने लेखनीकही घेतला होता. प्रॅक्टीकललाही तिने सहकाऱ्याची मदत घेतली. 2010 ते 2015 या कालावधीत अत्यंत जिद्दिने आणि परीक्षणपूर्वक कृतिकाने फिजीओथेरेपी चे सन्मानपत्र यशस्वीरित्या पूर्ण केले. आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विशेष समारंभात कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी तिचे विशेष कौतुक केले आणि विद्यापीठातर्फे सन्मानित केले.

कृतिकाला वक्तृत्व, संगीत, रोप मल्लखांब या खेळांची आवड आहे. यात तिने आजवर अनेक बक्षिसेही मिळविली आहेत. तिला पॉझिटिव्ह हेल्थ 2011 चा पुरस्कारही मिळाला आहे. तिला अभ्यासाव्यतिरिक्त कथा, कादंबऱ्या वाचण्याची, ज्योतिषशास्त्राचे ज्ञान मिळविण्याची आणि संगीताची आवड आहे. गाण्यांच्या स्पर्धेत तिने शालेय जीवनात सलग सातत्याने चार वर्षे विजेतेपद मिळवले आहे. नुकताच तिचा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड, युनिट महाराष्ट्र तर्फे गुणवंत म्हणून सत्कार करण्यात आला आहे.
अशा हुरहुन्नरी व्यक्तिमत्वाच्या कृतिका पुरोहितला भावी आयुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा !

लेखक  - डॉ. स्वप्नील तोरणे
आरोग्य संवाद तज्ज्ञ,

स्त्रोत - महान्युज

 

अंतिम सुधारित : 8/2/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate