অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

डिजीटल घोडेगाव जिल्हा परिषद शाळा

डिजीटल घोडेगाव जिल्हा परिषद शाळा

शहरापुरती मर्यादित असलेल्या इंग्रजी शाळेचे पेव ग्रामीण भागातदेखील पोहोचले आहे. अनेक ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना या इंग्रजी शाळेच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा टिकविणे फार आव्हानात्मक झाले आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांनी उभे केलेल्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी जिल्हा परिषद शाळेचा दर्जा व गुणात्मक बदलासाठी शिक्षण विभाग विविध कार्यक्रम व अभियानाद्वारे सरसावले आहे. शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी जि.प. शिक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद त्यास मिळाल्यास जिल्हा परिषद शाळाही डिजीटल व दर्जेदार शिक्षण जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून मिळू शकते.

याचा प्रत्यय चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव शाळेस भेट दिल्यावर आपणास नक्कीच अनुभवाला मिळते. चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव जिल्हा परिषद शाळातील मुख्याध्यापक, शिक्षकांनी सकारात्मक दृष्टिकोन आणि स्वयंप्रेरणेतून घोडेगाव जिल्हा परिषद शाळेचे रुप पालटले आहे. त्यामुळे येथील पालकांचा ओढा या शाळाकडे वाढू लागला आहे. आज या शाळेत 565 विद्यार्थी ज्ञानग्रहण करीत आहेत. उत्कृष्ट शिक्षण प्रणालीच्या आधारावर येथील शाळेची वाटचाल गुणवतेच्या दिशेने सुरु झाली आहे. दोन वर्षापूर्वी या शाळेची दुरवस्था बघता मुख्यापक लक्ष्मण चव्हाण व त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने केलेला बदल निश्चितच कौतुकास पात्र आहे. क वर्ग श्रेणीत असलेल्या शाळेला आता ‘अ’श्रेणी प्राप्त झाली आहे. घोडेगाव जिल्हा परिषद शाळेची निर्मिती ही एक एकर क्षेत्रात झाली असली तरी तेथील ग्रामस्थ या शालेय परिसराचा उपयोग रोज नैसर्गिक विधीसाठी करत होते. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत होता. मुख्याध्यापक म्हणून रुजू होताच श्री.चव्हाण यांनी शालेय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत हा विषय मांडला. शालेय परिसर हा स्वच्छ असला पाहिजे ही भूमिका मांडली. शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण शालेय परिसर स्वच्छ करण्यात आला.

शालेय परिसर कायम स्वच्छ राहावा, म्हणून शालेय परिसराला लोकवर्गणीतून सुमारे दीड लाख रुपयांचे तारेचे कंपाऊंड करण्यात आले. शालेय व्यवस्थापन समितीची मासिक बैठक नियमित घेतली जाते.त्यामुळे शाळेच्या विविध उपक्रमात ग्रामस्थांचा सहभाग वाढला आहे. शालेय परिसरात विविध जातीच्या वनस्पती लागवड करुन विद्यार्थ्यांच्या मदतीने सुंदर अशी पारसबागेची निर्मिती करण्यात आली आहे. झाडांना नियमित पाणी मिळावे म्हणून लोकवर्गणीतून कूपनलिका बसविण्यात आली आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ व पोषक शालेय पोषण आहार मिळावा म्हणून आहार शिजविण्यासाठी व आवश्यक असलेला धान्यसाठा ठेवण्यासाठी स्वतंत्र खोल्याही बांधण्यात आल्या आहेत. शाळेच्या सर्व खोल्यांना आकर्षक रंगरंगोटीही करण्यात आली आहे. ई-लर्निंगच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना डिजीटल पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. त्यासाठी डिजीटल क्लासरुमची निर्मिती करण्यात आली आहे. ज्ञानरचनावादी पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे म्हणून येथील शिक्षकांनी ज्ञानरचनावादी साहित्याची स्वत: निर्मिती केली आहे.

ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना आनंददायी ज्ञानपूर्वक शिक्षण मिळत आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध उपक्रमात येथील विद्यार्थी हिरीरीने सहभागी होतात. शासनाच्या वतीने नुकताच राबविण्यात आलेल्या जलसप्ताहात सहभागी होत येथील शिक्षिका चेतना निकम यांनी नाटिकेची निर्मिती करुन त्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेला उत्कृष्ट अभिनयाने जलदिनी झालेल्या कार्यक्रमात उपस्थितीची दाद मिळविली. या नाटिकेचे सादरीकरण चौका-चौकात करण्यात आले. त्या माध्यमातून जलजागृतीचा संदेश गावात पोहोचविला. 26 जानेवारी व 15 आगस्ट या राष्ट्रीय सणानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. त्यासाठी सांस्कृतिक रंगमंचाची उभारणी करण्यात आली आहे. कार्यक्रमाला ग्रामस्थ आपल्या पाल्यांचे कौतुक करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. योगा व कवायतीचे शिक्षण ही येथील विद्यार्थ्यांना नियमित दिले जाते. शालेय क्रीडा स्पर्धेसह विविध स्पर्धेत सहभागी होत तालुकास्तर, जिल्हास्तरीय स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

शालेय परिसरातील स्वच्छता, पटसंख्या, शालेय दप्तरातील नियमितपणामुळे या शाळेला आयएसओ मानांकनही नुकतेच मिळाले आहे. घोडेगाव गावात ऊसतोडणी करणाऱ्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. ऊसतोडीच्या हंगामात पालक आपल्या पाल्यांसह स्थलांतर करत असल्यामुळे साहजिकच त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. गावातील कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शाळेच्या माध्यमातून वस्तीगृहाची निर्मिती करण्यात येणार असून त्याला शासनाची परवानगी देखील मिळाली आहे. आगामी शैक्षणिक वर्षांपासून वस्तीगृह सुरु होणार आहे, त्यामुळे 100 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती मुख्याध्यापक लक्ष्मण चव्हाण यांनी दिली. शाळेची वाढलेली गुणवत्ता टिकविण्याचे आव्हान आता आमच्यासमोर असून आम्ही ती सहकारी शिक्षक, ग्रामस्थांच्या मदतीने नक्कीच टिकवून ठेवू, असा आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो.

लेखक - निलेश किसनराव परदेशी, 
चाळीसगाव, जि.जळगाव 
मो.नं.७५८८६४६७५०

स्त्रोत : महान्युज

 

अंतिम सुधारित : 12/19/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate