অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आदर्श तळणी प्राथमिक शाळा

आदर्श तळणी प्राथमिक शाळा

शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये म्हणून राज्य व केंद्र शासन प्रयत्नशील आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहचले पाहिजे ह्यासाठी शिक्षण विभागाच्यावतीने विविध योजना शासनपातळीवर राबविल्या जात आहेत. रोजंदारीसाठी स्थलांतरित होणाऱ्या व ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कुटुबियांतील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून साखर शाळा शासनाच्यावतीने सुरू करण्यात आल्या होत्या. अत्यंत दुर्गम भागातील मुलांना शिक्षणाच्या कक्षेत आणण्यासाठी राज्य सरकारने वस्तीशाळा ही संकल्पना आणली राज्यात अनेक वस्तीशाळा होत्या. या दुर्गम भागातील भौगोलिक परिस्थिती बघता ह्या वस्ती शाळा नियमित चालविणे खूप कठीण बाब होती. याची प्रचिती जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील तळणी वस्ती शाळेला भेट दिल्यावर येते.

तळणी ह्या आदिवासी माळरानावर सन 2002 मध्ये जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्यावतीने वस्ती शाळा सुरु करण्यात आली. पुढे 2008 मध्ये या वस्तीशाळेचे रुपांतर प्राथमिक शाळेत झाले. तळणी वस्ती विकासापासून कोसो दूर. शिक्षणाचा गंध नाही. तळणी या दुर्गम भागाची वस्ती जेमतेम 30 ते 40 घरांची. लोकसंख्या जवळपास 175. या वस्ती शाळेची सुरुवात झाली तेव्हा विद्यार्थीसंख्या होती फक्त 22 ते ही नियमित येत नव्हते. मुलांचे आईवडिल हे ऊसतोडीला जात असल्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांची संख्या जास्त त्यामुळे ऊसतोडीच्या हंगामाच्या महिन्यात तर विद्यार्थ्यांची उपस्थिती अगदी नगण्य असायची. झाडाखाली भरणारी ही वस्तीशाळा कालांतराने पत्र्यांच्या शेडमध्ये भरु लागली. पावसाळ्यात तर शेळ्या, कुत्रे देखील पावसापासून बचाव व्हावा म्हणून विद्यार्थ्यांसोबत येऊन बसत. शिक्षणासाठी योग्य असे शैक्षणिक वातावरण नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण कमी कमी होऊ लागले होते.

या वस्ती शाळेसाठी 2009 मध्ये शिक्षक शालीग्राम निकम ह्यांची नियुक्ती झाली. शाळेची अशी परिस्थिती पाहून त्यांनी हे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न सुरु केले. शिक्षणाचे महत्त्व पालकांना समजावले की ते आपल्या पाल्यांना नक्कीच शाळेत पाठवतील त्यामुळे प्रथम त्यांनी पालकांशी या संदर्भात भेटीगाठी सुरु केल्या. त्यासाठी भाषेशी अडचण निर्माण झाली. संपूर्ण वस्ती ही अदिवासी बांधवांची असल्यामुळे त्यांची बोलीभाषा भिलाऊ होती. त्यांना इतर भाषा अवगत नव्हती. त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर त्यांची बोलीभाषा शिकली पाहिजे म्हणून प्रथम त्यांनी भिलाऊ भाषा शिकली. भिलाऊ भाषेत संवादामुळे पालकांशी संवाद वाढू लागला विद्यार्थ्यांना सुरुवातीला भिलाऊ भाषेत शिकवायला सुरुवात केल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या साहजिकच वाढू लागली. मुलांना शाळेविषयी आवड निर्माण झाली. पुढे सर्व शिक्षा अभियानअंतर्गत षटकोनी आकाराच्या शाळा खोल्या बांधण्यात आल्या. शाळेचे खऱ्या अर्थाने रुप पालटण्यास इथून सुरुवात झाली.

लर्न बाय फन या प्रमाणे मुलांना हसत खेळत आनंददायी शिक्षण देण्यास सुरुवात केल्यामुळे मुलांमध्ये शिक्षकाविषयी भिती दूर झाली. त्यामुळे मुले ज्ञान अधिक ग्रहण करु लागली, शंका, प्रश्न विचारु लागली. गाणी, कविता, विनोद खेळामुळे विद्यार्थी बहुश्रुत झाली. रंगभरण स्पर्धा गायन स्पर्धा, मातीच्या वस्तू बनविणे, कागदापासून वस्तू निमिर्ती इ. उपक्रमातून ज्ञानरचनावाद नाविण्यपूर्ण पद्धतीने शिक्षण दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेविषयी गोडी वाढली. शिक्षकांची धडपड पाहता अनेक दानशूर लोक मदतीसाठी पुढे आले. शाळेचा भौगोलिक विकास लोकसहभागातून झालेला आहे. शाळेला संगणक भेट म्हणून मिळाला. संगणकामुळे विद्यार्थी आता संगणकाचे धडे गिरवू लागली आहेत. रोटरी क्लब ऑफ मिल्कसिटीतर्फे मुलांना दर्जेदार शालेय साहित्य मिळाले. शाळेतील विद्यार्थ्यांचा अधिक उत्कर्ष व शैक्षणिक विकास होणेसाठी ई-लर्निंगचा सेटही भेट म्हणून मिळाला आहे.

आरोग्यदूत संकल्पनेतून छोट्या मोठ्या आजारावर उपचार व्हावेत यासाठी शाळेत प्रथमोपचार पेटी ठेवण्यात आली आहे. शाळेच्या परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. अज्ञानाच्या गर्तेत सापडलेल्या या विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी म्हणून अनेक वैज्ञानिक साहित्यही ठेवण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिन व स्वातंत्र दिनी शाळेत विविध कार्यक्रम घेतले जातात. यात विद्यार्थी विविध कला गुणांचे सादरीकरण करतात या दिवशी गावातील ग्रामस्थदेखील मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. पालक आपल्या पाल्यांचे कला गुण बघतांना अनेकदा भारावून जातात. वैज्ञानिक दृष्टीकोन मुलांमध्ये अधिक दृढ व्हावा म्हणून येथील विद्यार्थी विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत सहभागी होऊ लागले. तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन स्पर्धेत यशस्वी देखील झाले आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होत असतांना समाजातील दातृत्ववान व्यक्तींनी शाळेतील विद्यार्थ्यांची बसण्याची सोय व्हावी म्हणून बाक भेट दिलीत. आज ह्या आदर्श प्राथमिक शाळेतील मुले शालेय गणवेशात बाकावर बसून शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. विद्यार्थी विविध क्रीडास्पर्धेत सहभागी होऊन यश संपादन करत आहे. शाळेची शैक्षणिक गुणवत्तेत देखील वाढ झाली असून या आदर्श शाळेला भेट देणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

लेखन: निलेश किसनराव परदेशी,

चाळीसगांव, जि.जळगांव

मो.7588646750

माहिती स्रोत: महान्यूज

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate