অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान तारका स्नेहल राजपूत

आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील कर्तृत्ववान तारका स्नेहल राजपूत

ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या वर्ल्डकप मास्टर्स ॲथलेटिक्स स्पर्धेत आयकर विभागाच्या पालघर अधीक्षक स्नेहल राजपूत यांनी भारताला ब्राँझपदक जिंकून दिले. ऑस्ट्रेलियात 20 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत झालेल्या या अथलेटिक स्पर्धेत जगातील 147 देशांनी भाग घेतला होता, स्नेहल राजपूत यांनी येथे झालेल्या 400 मीटर अडथळा शर्यतीत ही कामगिरी केली.
भारतीय क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्रीडा जगतात महाराष्ट्रातील जे मोजके खेळाडू नावलौकिक कमावत आहेत, त्यापैकीच एक महाराष्ट्र कन्या स्नेहल संजय राजपूत… मागील तीन दशकांपासून स्नेहल या आपल्या क्रीडा कौशल्यामुळे सर्वांना सुपरिचित आहेत. वयाच्या सोळाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या ज्युनिअर भारतीय खेळाडू आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करुन 18 देशांत तिरंगा मानाने फडकविला आहे

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात जन्मलेली ही महाराष्ट्राची ‘सुवर्णकन्या’ वयाच्या 10 व्या वर्षांपासून या क्षेत्रात आपले कौशल्य पणास लावत आहे. खेळाने या कन्येला अनेक मानसन्मान मिळवून दिले आहेत. विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आज त्या आयकर विभागात कार्यरत आहेत.
साताऱ्यातील ‘श्री शिवाजी उदय मंडळ’ या क्रीडा मंडळातून खेळाचे बाळकडू घेऊन अपार कष्ट, सातत्यपूर्ण सराव यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या त्या उद्योन्मुख खेळाडू आहेत. क्रीडा क्षेत्रात आभाळाएवढी उंची गाठूनसुद्धा त्या आपले गुरू बबनराव उथळे उर्फ अण्णा व आपल्या कुटूंबालाच आपल्या यशाचे श्रेय देतात.

1993 साली त्यांचा विवाह व्यवसायाने प्रोडक्शन इंजिनिअर असलेल्या संजय राजपूत यांच्याशी झाला. विवाहानंतर खेळास रामराम ठोकावा लागेल व घर, गृहस्थीमध्येच गुंतावे लागेल या कल्पनेला पतिराजांनी छेद दिला आणि पालघरसारख्या शहरातसुद्धा त्यांच्या अंगभूत क्रीडा गुणांना प्रोत्साहन देऊन त्यांना मोलाची साथ दिली.

ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये खेळाची प्रचंड ऊर्जा आहे. परंतू कौशल्याचा अभाव व परिपूर्ण मार्गदर्शन मिळत नसल्याने हे खेळाडू मागे पडत असल्याचे स्नहेल यांच्या चाणाक्ष नजरेने हेरले आणि या खेळाडूंना ॲथेलेटिक्सचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यासाठी ‘स्पोर्टस ॲकॅडमी’ची स्थापना केली. आज येथे 73 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. त्यामध्ये 16 कर्णबधिर खेळाडूंचा समावेश आहे. या कर्णबधिर खेळाडूंना त्यांच्या कलेने प्रशिक्षण व योग्य मार्गदर्शन देता यावे याकरिता राजपूत यांनी स्वत: कर्णबधिरांसाठी भाषा कौशल्ये अवगत केली आहेत.

मागील 23 वर्षांपासून स्नहेल यांनी आपल्या अकादमीमधून अनेक खेळाडू घडविण्याचे कार्य केलेले आहे. यापैकी बरेच खेळाडू राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेत तर 8 खेळाडूंना क्रीडा कौशल्याच्या जोरावर शासकीय नोकरीसुद्धा मिळालेली आहे. मातीशी इमान राखणाऱ्या या खेळाडू आजही परदेशात स्पर्धा खेळायला जाताना आपल्या आर्यन मैदानाची माती सोबत घेऊन जातात व स्पर्धा सुरू होण्याआधी ही माती आपल्या माथी लावूनच स्पर्धेची सुरूवात करतात.स्नेहल संजय राजपूत (आंतरराष्ट्रीय)

  1. ज्युनिअर मिनी ऑलिम्पिक 3000 मीटर धावणे- रौप्य पदक विजेती.
  2. 2016 - (सिंगापूर) दिनांक 4 ते 8 मे, 2016 दरम्यान होणाऱ्या आशियाई पातळीवर अँथलॅटिक्स स्पर्धत भारताचे प्रतिनिधित्व.
  3. 2016 - (ऑस्ट्रेलिया) दिनांक 26 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान जागतिक पातळीवर अँथलॅटिक्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व.
  4. 2015- पॅरिस (जागतिक पातळी)
  5. 2014- जपान (जागतिक पातळी)
  6. 2013 - ब्राझील (जागतिक पातळी)
  7. 2012 - चायना (आशियाई पातळी)
  8. 2012 - फिनलँड (जागतिक पातळी इनडोअर मीट)
  9. 2011 - अमेरिका - सॅक्रेमेंटो (जागतिक पातळी )
  10. 2010 - श्रीलंका (आशियाई पातळी)
  11. 2009 - मलेशिया (आशियाई पातळी)
  12. 2008 - बँकाँक (आशियाई पातळी)
  13. 2007 - हाँगकाँग (आशियाई पातळी)
  14. या देशांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून 2000 मीटर स्ट्र्रीपल चेस व अडथळा शर्यतीमध्ये सुवर्ण व रौप्यपदक विजेती.
  15. राष्ट्रीय पातळीवर 28 वेळा सहभाग व 22 वेळा विजेतेपद संपादन केले.
  16. आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये 7 वेळा सहभाग व 6 वेळा प्रथम क्रमांक, डबल हॅट्रीकचा नवीन विक्रम.
  17. भारतीय संघाचे कप्तान पद 4 वेळा व महाराष्ट्राचे 7 वेळा भुषविले.
  18. माजी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन क्रिडा गौरव पुरस्कार प्राप्त.
  19. 2013 चा लोकमत सखी सन्मान हिरकणी पुरस्कार प्राप्त.
  20. 2015 सातारा क्रिडारत्न भूषण पुरस्कार प्राप्त.
मातृभूमी व कर्मभूमीला जिवापाड मानणाऱ्या या कर्तृत्ववान ‘तारके’ ला मानाचा मुजरा.

लेखक - मनीषा पिंगळे,
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर.
स्त्रोत - महान्युज

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate