অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अनुलोम ॲपमुळे जानकीबाईला मिळाला विहिरीचा लाभ

अनुलोम ॲपमुळे जानकीबाईला मिळाला विहिरीचा लाभ

शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. कृषीविषयक विविध योजनांसोबतच शेतकऱ्यांसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी सिंचन विहिरीचा कार्यक्रम देखील राबविण्यात येत आहे. पूर्व विदर्भातील जास्तीत जास्त शेती संरक्षित सिंचनाखाली यावी यासाठी शासनाने 11 हजार धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम हाती घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्य मार्गदर्शक असलेल्या अनुलोम या संघटनेने सरकारी प्रयत्नांना जनसहभागाची साथ या ब्रीदवाक्याला सार्थकी ठरवून काम केले आहे. अनुलोमच्या मोबाईल ॲप्लिकेशनमुळे गोंदिया तालुक्यातील घिवारी येथील शेतकरी जानकीबाई चंद्रकुमार हनवते यांना 2016-17 या वर्षात धडक सिंचन विहिरीचा लाभ मिळाला.

जानकीबाई हनवते यांच्या नावाची घिवारी येथे तीन एकर धानशेती आहे. शेतात सिंचनासाठी कुठलीही व्यवस्था यापूर्वी नव्हती. मुलगा अजय याच्या स्मार्टफोनवर अनुलोम ॲप डाऊनलोड केल्यामुळे त्या ॲपवर अजयला धडक सिंचन विहिरीची माहिती मिळाली. या योजनेची माहिती मिळाल्यानंतर अजयने आईच्या नावावर असलेल्या शेतीत धडक सिंचन विहीर मिळावी यासाठी गोंदिया येथील एका सायबर कॅफेमधून ऑनलाईन अर्ज भरला. या अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजे शेतीचा सातबारा, गाव नमूना-8, लाभार्थ्याचे आधारकार्ड, बँकेचे पासबुक व इतर आवश्यक कागदपत्रे या अर्जासोबत जोडले. ऑनलाईन अर्ज भरतांना कुठलाही त्रास झाला नाही. राजकीय हस्तक्षेप, अधिकारी-कर्मचाऱ्यांची अडवणूक सुद्धा झाली नाही.

जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत या योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जातील त्रुटींची छाननी झाली. आवश्यक असलेली कागदपत्रे जोडल्यामुळे अर्ज त्रुटीत जाणार नाही याची जानकीबाईच्या मुलाला खात्री होती. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस शिल्लक असतांना अर्ज भरला. दहा दिवसानंतर यादी प्रसिद्ध झाली. अर्ज केल्यानंतर महिन्याभरात पहिल्याच यादीत जानकीबाईचे नाव आले. आता आपल्या शेतात सिंचनासाठी विहीर खोदून मिळणार असल्याचा आनंद जानकीबाई व परिवारातील सदस्यांना झाला. तालुका समितीने पात्र लाभार्थी म्हणून जानकीबाई हनवतेची निवड केली. जानकीबाईच्या मुलाच्या मोबाईलवर विहीर मंजूर झाल्याचा लघु पाटबंधारे कार्यालयातून संदेश आला. काही दिवसातच विहीर मंजूरीचे पत्र देखील पंचायत समितीच्या लघु पाटबंधारे विभागाच्या उपअभियंत्याकडून मिळाले.

अभियंत्याने शेतीची पाहणी करुन विहीर खोदण्याची जागा निश्चित केली. लघु पाटबंधारे विभागाने विहीर खोदण्याचा कार्यारंभ आदेश देऊन विहिरीच्या कामाला सुरुवात केली. विहीर 20 फूट खोदल्यानंतर कामाची पाहणी करुन केलेल्या कामाची रक्कम जानकीबाईच्या खात्यात जमा करण्यात आली. टप्‍प्याटप्‍प्याने विहिरीचे काम करण्यात आले. 40 फूट खोल विहीर खोदण्यात आल्यानंतर विहिरीत 150 फुट खोल बोअर करण्यात आले. त्यामुळे विहिरीला मुबलक प्रमाणात पाणी लागले. 13 फुट व्यास असलेल्या विहिरीचे काँक्रीटचे काम पूर्ण झाल्यानंतर केलेल्या कामाचे 2 लक्ष 50 हजार रुपये जानकीबाईच्या बँक खात्यात जमा झाले.

पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून शेती करणाऱ्या जानकीबाईच्या चेहऱ्यावर विहीर मिळाल्याचा आनंद ओसंडून वाहत होता. आता विहिरीमुळे शेतात संरक्षीत सिंचनाची व्यवस्था झाली. भविष्यात कुटूंबाची आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी आता धान पिकाव्यतिरिक्त भाजीपाला व इतर पिके घेण्याचा संकल्पही जानकीबाईने केला. ज्या शेतात विहीर बांधण्यात आली त्या शेतात पूर्वी 25 ते 30 हजार रुपयांचा जवळपास 20 क्विंटल धान व्हायचा. मात्र विहिरीमुळे संरक्षीत सिंचनाची व्यवस्था झाल्यामुळे धानाला यंदा मुबलक पाणी मिळाले. यावर्षी जवळपास 60 ते 65 क्विंटल धान होईल, असा विश्वास जानकीबाईने व्यक्त केला. धडक सिंचन विहीर योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेतून अर्ज मागविण्यात आल्याने पारदर्शकता आली. कुणाकडेही वशिला लावण्याचे काम पडले नाही. गतिमानता व पारदर्शकतेमुळे या योजनेचा लाभ मिळाल्याने जानकीबाईंनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

-जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate