অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गुप्तमतदान पद्धति

गुप्तमतदान पद्धति

गुप्तमतदानपद्धति : आधुनिक काळात एका व्यक्तीचे मत इतर कोणाही व्यक्तीस समजू नये, अशा पद्धतीने जे मतदान होते, तिला गुप्तमतदानपद्धती म्हणतात.

लोकशाही पद्धत अस्तित्वात आल्यानंतर मतदानाचा हक्क सार्वत्रिक व समान झाला. मतदान गुप्त व्हावे, ही मागणी होऊ लागली. मतदानाचा हक्क समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बळ व सामाजिक दृष्ट्या कनिष्ठ अशा लोकांनाही मिळाला. त्यांना मतदान करताना सामाजिक वरिष्ठांचे वा आर्थिक व्यवहारातील मालकवर्गाचे वर्चस्व असू नये, निर्वेध मतदान करता यावे, हा या पद्धतीचा मुख्य हेतू होय. मतदार एकटाच व गुप्तपणे मतदान करीत असल्यामुळे, त्याला इतरांपासून मुख्यतः सहकाऱ्यांपासून अलिप्त राहून मतदान करता येते. निवडणुका कायदेशीरपणे निर्विवाद राखण्यासाठी आणि निवडणुकांची प्रतिष्ठा रहावी, म्हणून निवडणुका सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून अलिप्त राखणे आवश्यक होते. सार्वत्रिक मतदानाचा हक्क प्रसृत झाल्यानंतर खुल्या मतदानपद्धतीत हे उद्देश साधणे अशक्य होते. म्हणून गुप्तमतदानच स्वीकृत करण्यात आले.

आधुनिक काळात ज्या ठिकाणी मतदानाने एखाद्या प्रस्तावावर निर्णय घ्यावयाचा असतो अथवा प्रातिनिधिक संस्थांवर निर्वाचित प्रतिनिधी पाठवावयाचे असतात अथवा पदाधिकारी निवडावयाचे असतात, त्या ठिकाणी गुप्तमतदानपद्धतीचा उपयोग करण्यात येतो. मतपत्रिका या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कागदावर निवडणुकीसाठी उभ्या असलेल्या उमेदवारांची नावे अथवा ज्यांच्याबाबत निर्णय घ्यावयाचा ते प्रस्ताव लिहिलेले असतात व मतदार आपली निवड, दुसऱ्या कोणालाही न समजेल अशा पद्धतीने मतपत्रिकेवर नमूद करतात.

गुप्तमतदानाची पद्धती तशी नवी नाही. ग्रीकांच्या वेळी पांढऱ्या व काळ्या रंगाच्या गोट्या अथवा खुणा केलेले शिंपले यांसाठी वापरीत. रोममध्ये कोरीव लाकडी चिपा मतदारांना देण्यात येत. भारतात मौर्यकाळापूर्वी आणि नंतरही काही गणराज्यांतून गुप्तमतदानपद्धती अस्तित्वात असल्याचे उल्लेख आढळतात. यूरोपात पोप निवडण्यासाठी ही पद्धती वापरण्यात येत असे. विधिमंडळाचे सभासद निवडण्यासाठी या पद्धतीचा उपयोग हल्ली सर्वत्र केला जातो.

आधुनिक काळात बहुतेक सर्व प्रकारच्या निवडणुकांत आणि बहुमताने निर्णय घ्यावयाचा असेल, अशा ठिकाणी या पद्धतीचा उपयोग करण्यात येतो.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्स, इंग्लंड वगैरे देशांनी प्रथम ऑस्ट्रेलियात १८५६ मध्ये रूढ झालेली ही पद्धत अंमलात आणली. फ्रान्समध्ये ही पद्धत प्रथम अंशतः स्वीकारण्यात आली. १८७२ मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने जॉन स्ट्यूअर्ट मिलसारख्या उदारमतवाद्यांच्या विरोधाकडे लक्ष न देता या पद्धतीला मान्यता दिली. अमेरिकेत १८८८ मध्ये केंटकी संस्थानाने प्रथम ही पद्धत स्वीकारली. १८५० पर्यंत अमेरिकेतील सर्वच संस्थानांत या पद्धतीचा प्रसार झाला होता.

लाचलुचपत होण्याचे व धाकदडपशाहीचे प्रमाण गुप्तता किती राखली जाते, त्यांवर अवलंबून असते. पूर्वी मतपत्रिका राजकीय पक्षांकडून पुरविल्या जात. त्या वेळी लाचलुचपत व इतर गैरप्रकार जास्त प्रमाणात घडत. पण आधुनिक काळात बहुतेक ठिकाणी प्रचलित असलेल्या ऑस्ट्रेलियन गुप्तमतदानपद्धतीमुळे गुप्तता राखली जाऊन गैरप्रकारांचे प्रमाण घटले आहे. या पद्धतीत शासनाकडून पुरविल्या जाणाऱ्या अधिकृत मतपत्रिकाच ग्राह्य मानल्या जातात. उमेदवारीचा अर्ज भरणे, मागे घेणे इ. निवडणुकींचा सर्व कारभार आणि कार्यवाही कायद्याने नियंत्रित असतात. प्रत्यक्ष मतदान शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होते व मतपत्रिकेवर मतदार आपली निवड करीत असताना त्याच्या जवळपास, तो कोणाला मत देतो हे कळू नये म्हणून, कोणीही असणार नाही अशी खबरदारी घेण्यात येते.

मतपत्रिकेवर नमूद केलेल्या मतावरून मागाहून ते कोणी दिले, हे समजू नये यासाठी मत नमूद करण्याच्या निरनिराळ्या पद्धती प्रचलित आहेत. साधारणतः मतदाराला ज्याला मत द्यावयाचे असेल, त्याच्या नावासमोर फुली मारण्याची पद्धती सार्वत्रिक आहे. कधी ही फुली पेन्सिलीने केली जाते, तर कधी फुलीचा शिक्का मारला जातो. अधिमान्य प्रतिनिधित्वाची पद्धती असेल, तर मतपत्रिकेवर निवडीच्या क्रमानुसार एक, दोन, तीन असे आकडे लिहिण्यात येतात. अलीकडे मतदान यांत्रिक पद्धतीने करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आपल्याला ज्याला मत द्यावयाचे असेल, त्या उमेदवाराच्या नावासमोरचा खटका दाबून मतदार आपले मत नोंदवितो व यंत्राने त्या मताची नोंद होते.

मात्र ऑस्ट्रेलियन पद्धती वापरली म्हणजे गैरप्रकार होतच नाहीत, असे नाही. फक्त एक मतपत्रिका मतदानकेंद्राच्या बाहेर नेल्यास तिच्या साह्याने साखळी पद्धतीने हवे असेल, त्या उमेदवारालाच मत मिळेल अशी व्यवस्था होऊ शकते. मतदार अशिक्षित असेल, तर त्याला मतदान करताना अधिकृत-निर्वाचन अधिकाऱ्याची मदत घेता येते व अशा ठिकाणी गैरप्रकार होण्याचा संभव असतो. भारतात यासाठी उमेदवाराच्या नावासमोर त्याची निशाणी छापलेली असते व मतदार त्या निशाणीवर फुलीचा शिक्का उठवितो.

काही ठिकाणी फक्त पक्षालाच मत द्यावयाचे असते, तेथे उमेदवाराच्या नावाचा प्रश्नच येत नाही. मतपत्रिका जेवढी लहान–जितके उमेदवार व निवडावयाच्या पदाधिकाऱ्यांची संख्या कमी–तितके मतदाराचे काम सोपे असे आढळून येते.

 

लेखक - श्री. प. सोहोनी

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate