पृथ्वीगोलावरील उत्तर दक्षिण या भौगोलिक ध्रुवांपासून सर्वत्र समान अंतरावर असणाऱ्या, पूर्व-पश्चिम दिशेने जाणाऱ्या व पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे दोन समसमान भाग करणाऱ्या काल्पनिक वर्तुळास ‘विषुववृत्त’ (भौगोलिक किंवा भौतिक) असे म्हणतात. दक्षिण अमेरिकेचा उत्तर भाग, मध्य आफ्रिका व इंडोनेशियन द्वीपसमूहांत जमिनीवरून, तर अन्यत्र समुद्रातून विषुववृत्त गेलेले आहे. विषुववृत्तीय स्थान लाभलेल्या दक्षिण अमेरिकेतील एक्वादोर या देशाचे नाव इक्वेटर (विषुववृत्त) या स्पॅनिश शब्दावरून पडले असावे. विषुववृत्त हे शून्य अंशाने दर्शविले जाणारे आणि सर्वांत मोठे अक्षवृत्त आहे. विषुववृत्तावर असणाऱ्या सर्व स्थानांचे पृथ्वीगोलातील मध्यबिंदूपासून कोनीय अंतर शून्य अंश असल्याने त्यांचे अक्षांश शून्य अंश असते. विषुववृत्त हे मूळ अक्षवृत्त आहे.
विषुववृत्ताला समांतर कल्पिलेल्या वर्तुळांना ‘अक्षवृत्ते’ असे म्हणतात. अशी अनंत वर्तुळे (अक्षवृत्ते) काढणे शक्य होते. कोणत्याही स्थळाचे अक्षांश सांगताना त्याचे विषुववृत्तासारखे अंशात्मक (कोनीय) अंतर आणि ते स्थळ विषुववृत्ताच्या उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे हे सांगितले जाते. पृथ्वीच्या आसाला विषुववृत्त काटकोनात छेदते. तसेच दोन्ही ध्रुवांतून दक्षिणोत्तर जाणारी रेखावृत्ते विषुववृत्ताला काटकोनात छेदतात. विषुववृत्ताची लांबी ४०·०६८·६६ किंमी. आहे. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तांमधील अंतर १११·३२ किमी. असते. पृथ्वीगोलावरील ज्या वर्तुळाची पातळी गोलमध्यातून जाते, त्या वर्तुळास ‘बृहद्वृत्त’ असे म्हणतात. विषुववृत्त हे एक बृहद्वृत्तच आहे आणि प्रत्येक रेखावृत्त हे अर्ध्या बृहद्वृत्ताएवढे असते.
विषुववृत्तावरील दिनमान व रात्रीमान नेहमीच समसमान म्हणजे १२-१२ तासांचे असते. २१ मार्च व २३ सप्टेंबर या दोन दिवशी सूर्य विषुववृत्तावर येतो, त्या दिवशी पृथ्वीवरील सर्व ठिकाणी दिनमान व रात्रीमान समसमान असते. या दोन दिवसांना विषुवदिन (ईक्विनॉक्स) असे म्हणतात. ईक्विनॉक्स हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ समान रात्र असा होतो. या दोन दिवशी प्रकाशवृत्त बरोबर दोन्ही ध्रुवांतून जाते आणि प्रत्येक अक्षवृत्ताला बरोबर निम्म्यावर छेदते. त्यामुळे पृथ्वीचा बरोबर निम्मा भाग उजेडात व त्याच्या विरूद्ध बाजूचा निम्मा भाग अंधारात असतो.
विषुववृत्तापासून उत्तरेस सु. १०° व दक्षिणेस १०° यांदरम्यानच्या पट्ट्याला विषुववृत्तीय प्रदेश असे म्हणतात. हवामानशास्त्र, महासागरविज्ञान यांच्यानुरूप हे क्षेत्र कमीजास्त होत असते. विषुववृत्ताच्या अनुषंगाने विषुववृत्तीय हे विशेषण येते. त्याचा संबंध विषुववृत्तीय हवामान, विषुववृत्तीय पर्जन्यप्रदेश, विषुववृत्तीय वनप्रदेश, विषुववृत्तीय समुद्रप्रवाह, विषुववृत्तीय वायुराशी यांच्याशी दिसतो.
पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल पृथ्वीच्या बरोबर मध्यातून जाते. खगोल शास्त्रामध्ये पृथ्वी हे केंद्रस्थान मानून काढलेल्या अनंत व्यासाच्या काल्पनिक खगोलाची संकल्पना आहे. पृथ्वीचे विषुववृत्तीय प्रतल (पातळी) सर्व बाजूंना वाढविल्यास खगोलास ज्या काल्पनिक वर्तुळास छेदते, त्या वर्तुळाला ‘खगोलीय विषुववृत्त’ असे म्हणतात. ग्रह व तारे यांची स्थाने निश्चित करण्यासाठी खगोलीय विषुववृत्ताची मदत होते. ग्रह, तारे इ. खस्थ पदार्थांच्या बाबतींतही पृथ्वीप्रमाणेच विषुववृत्त कल्पिलेले असते. अशाच तऱ्हेने आकाशगंगेसारख्या दीर्घिकेचे विषुववृत्तही मानले जाते. विषुववृत्ताशी सदृश ऊष्मीय विषुववृत्त (थर्मल इक्वेटर), चुंबकीय विषुववृत्त (मॅग्नेटिक इक्वेटर) अशा संकल्पनादेखील प्रचलित आहेत.
लेखक: वसंत चौधरी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/22/2020
काँगो नदी (झाईरे नदी) : विषुववृत्त दोनदा ओलांडणारी...