लीमन सरोवर. मध्य यूरोपातील सर्वांत मोठे सरोवर. हे आग्नेय स्वित्झर्लंड व फ्रान्सचा ऑट सव्हॉय प्रांत यांच्या सीमेवर असून त्याचे क्षेत्रफळ ५८१ चौ. किमी.; कमाल खोली ३०७ मी. व सरासरी खोली १५२ मी. आहे. जिनीव्हा सरोवर अर्धचंद्राकृती असून त्याच्या परिसरात बर्नीज आल्प्स, जूरा इ. पर्वतराजी असल्याने हा सर्व भूभाग निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. सरोवराच्या क्षेत्रफळापैकी ३४७ चौ. किमी. स्वित्झर्लंडच्या व २३४ चौ.किमी. फ्रान्सच्या हद्दीत आहे. आल्प्स पर्वतात उगम पावणारी ऱ्होन नदी व्हीलनव्ह गावाजवळ सरोवरात शिरते; हिच्याच पाण्याने जिनीव्हा सरोवर निर्माण झाले आहे. ऱ्होन जिनीव्हा शहराजवळ सरोवराबाहेर पडून फ्रान्समधून वाहत जाऊन अटलांटिक महासागराला मिळते.
जिनीव्हा सरोवराचे पाणी स्वच्छ निळसर असून त्यावर ईशान्य, आग्नेय, नैर्ऋत्य आणि वायव्य दिशांनी वारे वाहतात. सरोवराच्या पाण्याची एका काठापासून दुसऱ्या काठापर्यंत एकसारखी लयबद्ध हालचाल होत असते. सु. एक मी. उंचीच्या लाटा उत्पन्न होतात व त्यामुळे सरोवराच्या पातळीत अचानक फेरफार होतात. सरोवरात सु. वीस जातींचे मासे सापडतात, यांपैकी कारेगॅनस फेरा प्रमुख होत.जिनीव्हा सरोवराच्या काठावर जिनीव्हा, लोझॅन, मात्र ही शहरे व अनेक विहारस्थळे आहेत. याच्या पूर्व किनाऱ्याजवळील एका बेटावर बायरनच्या ‘शिलॉनचा कैदी’ या कवितेने विख्यात झालेला शिलॉनचा किल्ला आहे. सरोवराच्या काठावरील शहरे व विहारस्थळे लोहमार्गाने जोडलेली आहेत. १८२३ पासून वाफेवर चालणाऱ्या बोटींनीही वाहतूक होत असते. एकंदरीत येथे जलविहाराची उत्तम सोय असून नौकाविहार करता करता आल्प्सची बदलती रूपे पाहून हौशी प्रवाशांना आनंद लुटता येतो.इतिहासपूर्व काळातही जिनीव्हाच्या परिसरात मानववस्ती असावी. पाण्यात मोठेमोठे खांब ठोकून त्यावर झोपड्या बांधून राहणाऱ्या टोळ्या राहत असल्याचे अनेक पुरावे संशोधनात सापडले आहेत.
लेखक : द. ह. ओक
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/21/2023
सरोवर : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खोलगट भागातील जमि...
टॉनले सॅप : ख्मेर प्रजासत्ताकाच्या मैदानी प्रदेशात...
गीहा सरोवर : मध्य अमेरिकेतील एक निसर्गरम्य सरोवर. ...
अॅल्बर्ट सरोवर : मध्य आफ्रिकेतील सरोवर. याला ‘अॅ...