स्वित्झर्लंडच्या जिनीव्हा कँटनची आंतरराष्ट्रीय महत्त्वाची राजधानी. लोकसंख्या १,७३,६१८ (१९७०) असून उपनगरांसह ३,२१,१०० आहे. जिनीव्हा सरोवरातून ऱ्होन नदी जेथे निघते, तेथे हे शहर असून ‘लघु नगरींची राणी’ असे जिनीव्हाचे सार्थ वर्णन करण्यात येते. स्वित्झर्लंडच्या भूमीवर आहे म्हणूनच याला स्विस नगर म्हणावयाचे. एरवी जिनीव्हा आंतरराष्ट्रीय नगर आहे. आंतरराष्ट्रीय रेडक्रॉस, आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटना, जागतिक आरोग्य संघटना व एतत्समान अन्य संघटनांची मुख्य कार्यालये येथे आहेतच. शिवाय १९२० पासून राष्ट्रसंघाची कचेरी येथे होती व आता संयुक्त राष्ट्र संघटनेचे यूरोपीय कार्यालय जिनीव्हालाच आहे.
येथील लोकांत १९७० मध्ये ३४% परदेशी, मूळचे जिनीव्हातील ३०% व बाकीचे इतर स्विस कँटनमधून आलेले होते. नेहमीच्या इटली आणि फ्रान्समधून आलेल्यांशिवाय स्पेन व पोर्तुगाल, अमेरिका, आशिया, आफ्रिका, येथूनही आलेले आप्रवासी होते. पूर्वीचे ‘प्रॉटेस्टंट रोम ’ हे वैशिष्ट्य जाऊन आता कॅथलिकांचीच संख्या जास्त आहे. आल्प्स व जूरा पर्वतांदरम्यानच्या वाटेवर प्रभुत्व ठेवणारे व इटलीत जाणाऱ्या अनेक खिंडींचे केंद्र, असे मोक्याचे स्थान जिनीव्हाला मिळालेले आहे. जिनीव्हा सरोवराचे सान्निध्य, ऱ्होनचा स्वच्छ निळसर खळखळणारा प्रवाह, त्यावरील सुंदर पूल, शहराच्या पार्श्वभागी असलेले सालेव्हचे उंचच उंच सुळके व जूरा पर्वताची रांग, दूरवर शामॉनी खोऱ्यात दिसणारे ‘माँ ब्लां’ किंवा मौंट ब्लँक हे आल्प्सचे सर्वोच्च शिखर, नदीच्या पात्रात विहार करणाऱ्या लहान लहान नौका आणि सरोवरातील लहानमोठ्या बोटी इत्यादींमुळे जिनीव्हाला आगळेच सौंदर्य प्राप्त झाले आहे.
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020
टॉनले सॅप : ख्मेर प्रजासत्ताकाच्या मैदानी प्रदेशात...
सरोवर : पृथ्वीच्या पृष्ठभागावरील खोलगट भागातील जमि...
मध्य यूरोपातील सर्वांत मोठे सरोवर. हे आग्नेय स्वि...
अॅल्बर्ट सरोवर : मध्य आफ्रिकेतील सरोवर. याला ‘अॅ...