অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

शिल्पकला भाग १

प्रस्तावना

दुसरा रॅमसीझ : प्राचीन ईजिप्शियन पाषाण-मूर्तिशिल्प.

शिल्प या संज्ञेचा अर्थ सामान्यपणे कौशल्यपूर्ण निर्मिती असा सर्वसमावेशक व म्हणून विविधार्थसूचक असल्याने तिच्या वापरात नेमकेपणा येण्यासाठी वास्तुशिल्प, काष्ठशिल्प, शब्दशिल्प, स्वरशिल्प, मूर्तिशिल्प यांसारख्या सामासिक शब्दांचा उपयोग करण्यात येतो. प्रस्तुत नोंदीत शिल्पकला म्हणजे मूर्तिकला एवढ्या मर्यादित अर्थाने विवेचन केलेले आहे.

शिल्पाविष्कार हा इंद्रियगोचर त्रिमित आविष्कार असल्याने त्याला पार्थिव अस्तित्व असते आणि वास्तव अवकाशावर अतिक्रमण करून त्याला स्वतःचे अस्तित्व प्रस्थापित करावे लागते. चित्राविष्काराप्रमाणे तो अभ्यासात्मक किंवा संकल्पनात्मक अवकाशामध्ये मूर्त होऊ शकत नाही. चित्राला सन्मुख परिप्रेक्ष्य अपेक्षित असल्याने चित्रातील आकार आणि त्याचे रूप बऱ्याच अंशी अव्ययी स्वरूपाचे असते. शिल्पाचे स्वरूप मात्र बदलत्या परिप्रेक्ष्याबरोबर बदलत असल्याने त्याला एकच एक बाह्यरेषा किंवा आकार असत नाही. आकार आणि अवकाश यांच्या परस्परांवरील बदलत्या ताणतणावात शिल्पानुभूती सतत नव्याने साकारत जाते. शिल्पाकृती ही जड, शारीर असली, तरी तिची दृश्यानुभूती अशा तऱ्हेने चेतन आणि गतिमान ठरते.

कोणत्याही प्रकारच्या व नव्या-जुन्या शिल्पांच्या संदर्भात वरील वैशिष्ट्ये अबाधित राहतात; कारण ती निसर्गदत्त आहेत. शिल्पाविष्काराची प्रयोजने स्थलकलासंस्कृतिविशिष्ट असल्याने त्यांच्या दृश्याभिव्यक्तीमध्ये अपार वैविध्य आढळून येते. म्हणून शिल्पकला या संकल्पनेची सम्यक कल्पना येण्यासाठी निरनिराळ्या कालखंडात, वेगवेगळ्या सांस्कृतिक परंपरांमध्ये, विविध कलावंतांनी ही संकल्पना कशा प्रकारे साकार केली, हे पाहणे आवश्यक ठरेल.

त्रिमित निर्मितीसाठी कलावंतांनी विविध क्लृप्त्यांचा अवलंब केला व त्यांतून शिल्पकलेच्या अनेकविध तंत्रांचा जन्म झाला. ओल्या मातीसारख्या प्रसरणशील, मऊ पदार्थांच्या हाताळणीतून आकार घडविणे, लाकूड किंवा दगडासारख्या घनाकारातून अभिप्रेत असलेली आकृती कोरून काढणे आणि उपलब्ध असलेल्या त्रिमित वस्तूंमधून चपखल आकार निवडून त्यांची कल्पकतेने पुनर्रचना करणे, अशा तीन प्रमुख प्रक्रिया या निर्मितीसाठी वापरल्या जातात. या प्रक्रिया प्रागैतिहासिक काळापासून मानवाने आपल्या अभिव्यक्तीसाठी वापरलेल्या आहेत.

शिल्पाच्या सर्वांत प्राचीन माध्यम

माती हे शिल्पाच्या सर्वांत प्राचीन माध्यमांपैकी एक आहे. मणी, पदके, छापील मुद्रा इ. वस्तूंपासून ते अतिशय संश्लिष्ट किंवा गुंतागुंतीच्या अशा शिल्पपटापर्यंतची निर्मिती या माध्यमात झाली. ओल्या मातीची शिल्पे नुसतीच उन्हात सुकविणे किंवा त्यांना जास्त टिकाऊ स्वरूप देण्यासाठी ती भाजणे, हे तंत्रही प्राचीन शिल्पकारांना अवगत होते. जगातील सर्वच संस्कृतींच्या उद्भवकालात भाजलेल्या मातीच्या आकृत्या सापडतात. फ्रान्समधील आदिमानवाच्या गुंफांमध्ये (Tucd’Audoubert) सु. १५,००० वर्षांपूर्वीच्या मातीत बनविलेल्या रानरेड्यांच्या आकृती सापडल्या आहेत. ईजिप्त, सुमेर, अ‍ॅसिरिया, मेसोपोटेमिया (इराक), भारत, चीन येथील सर्वच प्राचीन संस्कृतींमध्ये विविध कलाविष्कारांसाठी मातीचा उपयोग केलेला दिसून येतो. या वस्तूंपैकी काही हातांनी घडविलेल्या, तर काही मातीच्या छापातून दाबून काढलेल्या आहेत. या दोन्ही तंत्रांचा एकत्रित उपयोगही क्वचित दिसून येतो. भारतात मौर्यपूर्व (सिंधू संस्कृती आणि त्यानंतरचा काळ), मौर्य, शुंग व सातवाहन काळांत अशी मृत्तिकाशिल्पे वैपुल्याने सापडतात. सिंधुघाटी, गंगा-यमुना दोआब, बिहार, बंगाल, महाराष्ट्र आणि भोवतालचा प्रदेश येथे प्राचीन मृत्तिकामूर्ती अजूनही हजारोंच्या संख्येने सापडतात. गुप्तकाळात उत्तर भारतामध्ये काही अतिशय महत्त्वाकांक्षी व प्रचंड आकाराची मृत्तिकाशिल्पे निर्माण झाली; परंतु गुप्तोत्तर काळात जी परंपरा जवळजवळ खंडित झाली. पूर्व भारतात ती काही ठिकाणी कशीबशी तगून राहिलेली दिसते; तिचे अस्तित्व फक्त लोककलांपुरतेच उरले होते; परंतु बंगालमधील तसेच इतर काही सद्यकालीन कलावंतांनी हे माध्यम नव्याने आणि कल्पकतेने हाताळलेले आढळते.

मानवी हातांशी-बोटांशी थेट संपर्क आल्याने या तऱ्हेच्या शिल्पाकृती रसरशीत, त्वचेची कांती आणि कोवळीक जपणाऱ्या असतात. कोरीव मूर्तीमध्ये पृष्ठभागाची कोवळीक टिकविणे अवघड जाते. हातांनी घडविलेल्या मूर्तीच्या या ताजेपणाला स्थायी स्वरूप देण्यासाठीच कदाचित धातूचे ओतकाम-तंत्र विकसित झाले असावे. वर उल्लेखिलेल्या सर्वच संस्कृतींमध्ये ओतीव शिल्पाचे नमुने सापडतात. ईजिप्त आणि मेसोपोटेमियामध्ये आणि त्यानंतर क्रीट, मायसीनी आणि ग्रीसमध्ये ओतीव आणि घडीव धातूंचे प्रचंड आकाराचे पुतळे सापडतात. भारतात मात्र हे तंत्र प्राथमिक अवस्थेत असावेसे वाटते. मोहें-जो-दडो येथील नृत्यांगनेची छोटीशी मूर्ती हे प्राचीनतम भारतीय धातुशिल्पाचे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. तत्कालीन इतर भारतीय धातुशिल्पेही अशीच अविकसित तंत्राची द्योतक आहेत. भारतामध्ये मातीऐवजी मूळ प्रतिमा मेणामध्ये घडवून त्याचा साचा घेण्याची पद्धत रूढ आहे. या तंत्राला प्राचीन शिल्पसाहित्यात ‘मधूच्छिष्टविधान’ म्हटले आहे. प्रथम मातीऐवजी मधाच्या पोळ्याचे मऊ मेण वापरून प्रतिमा बनविली जाते. माती, शेण व तांदळाचा कोंडा यांच्या मिश्रणात पाणी घालून केलेल्या लगद्याने ती आच्छादली जाते. प्रतिमेला आधीच एक मेणाची जाडसर वळी जोडलेली असते, जिचे दुसरे टोक प्रतिमेला आच्छादणाऱ्या साच्याच्या पृष्ठभागावर राहील, याची काळजी घ्यावी लागते. हा साचा वाळवून भट्टीत गेला की, त्यामधील सर्व मेण वितळून त्या वळीच्या वाटे वाहून जाते आणि साच्याच्या आत प्रतिमेच्या आकाराची पोकळी निर्माण होते. तीमध्ये वितळविलेल्या धातूचा (ब्राँझ, पितळ किंवा तांबे, क्वचित सोने-चांदी सुद्धा) रस ओतून मूळ मेणाच्या प्रतिमेची प्रतिकृती मिळविता येते. साच्यातून काढलेल्या प्रतिमेला नक्षीदार धातुपत्रांनी सजविण्याची किंवा धातूच्या तगडालाच ठोकून ठोकून मूर्ती घडविण्याची परंपरा पाल काळात दिसून येते. नेपाळमध्ये ही परंपरा आजही जिवंत आहे, परंतु इतर भारतीय धातुमूर्ती ‘ढलाई’ – म्हणजे ओतकामाच्या तंत्राने बनविलेल्या असतात. चोलकालीन दक्षिण भारतातील धातुप्रतिमा हा भारतीय धातुशिल्पाचा परमोत्कर्ष मानला जातो. दक्षिण भारतातील मंदिरांमधील मूर्ती बनविण्यासाठी हे तंत्र आजही राबविले जाते.

पाश्चात्त्य परंपरेतील धातुप्रतिमांचे तंत्र

पाश्चात्त्य परंपरेतील धातुप्रतिमांचे तंत्रही जवळजवळ असेच असते; फक्त त्यामध्ये साच्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिस वापरले जाते, ज्यायोगे मोठ्या आकाराची शिल्पे ओतणेही शक्य होते. पोकळ मूर्ती बनविण्याचे तंत्र पाश्चात्त्य परंपरेने यशस्वीपणे विकसित केले. प्रबोधनकाळातील पुतळे किंवा फ्रांस्वा ऑग्यूस्त रने रॉदँच्या द थिंकर यासारख्या विश्वविख्यात कलाकृती याच पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत. सार्वजनिक जागी उभारलेले पुतळे याच तंत्राने ओतण्यात येतात.

याशिवायही आदिवासी जमातींच्या परंपरांमध्ये धातुप्रतिमा बनविण्याची वेगवेगळी तंत्रे वापरली जातात. भारतात बस्तर, घुसखोरा, डोक्रा इ. स्थानिक परंपरा प्रचलित आहेत. औद्योगिक क्षेत्रामध्ये वस्त्रगाळ कोरड्या धुळीत साखरेची मळी मिसळून आणि त्यात लाकडी नमुने दाबून ठसे घेऊन ओतकाम करण्याचे एक तंत्र वापरले जाते. प्राचीन चीनमध्ये कलानिर्मितीसाठीही या तंत्राचा उपयोग केलेला दिसून येतो.

चीन, जपान, कोरिया इ. अतिपूर्वेकडील देशांमध्ये मृत्तिकाशिल्पाला टिकाऊ आणि आकर्षक बनविण्यासाठी त्यावर रंगीत झिलई चढविण्याची कला विकसित झाली. ज्याला ‘सिरॅमिक्स’ (मृत्तिकाशिल्प किंवा मृत्स्नाशिल्प) म्हणून सामान्यतः ओळखले जाते, त्यामध्ये विशिष्ट उष्णतामानावर वितळून पृष्ठभागावर काचेप्रमाणे पसरणारी खनिजे वापरली जातात. पश्चिमेतही या तंत्राचा उपयोग झाला; परंतु चिनी-जपानी परंपरेमध्ये रंग आणि आकारांचे जे विभ्रम पाहायला मिळतात, त्याची सर इतर ठिकाणच्या मृत्तिकाशिल्पांत अजूनही येत नाही.

त्रिमितिपूर्ण आविष्काराची दुसरी शक्यता म्हणजे घनाकारातून शिल्प कोरून काढणे, हीसुद्धा मृद्शिल्पाइतकीच, किंबहुना त्याहूनही प्राचीन परंपरा असावी. व्हिलेनडॉर्फची तथाकथित व्हीनस  ही ४-५ इंची अश्मप्रतिमा कदाचित २५,००० वर्षे जुनी असू शकेल. दॉरदॉन्यू (फ्रान्स) येथे सापडलेला रेनडियरच्या शिंगातून कोरलेला गवा निदान बारा ते चौदा हजार वर्षे मागे जाऊ शकेल. गुंफांच्या भिंतीवरील अनघड आकारांतच काही फेरफार करून पशूंच्या आकृतीही मोठ्या हुशारीने कोरून काढलेल्या दिसतात.

लाकडातून किंवा दगडातून शिल्पाकृती कोरून काढण्याची परंपरा

लाकडातून किंवा दगडातून शिल्पाकृती कोरून काढण्याची परंपरा आजही प्रचलित आहे. प्राचीन ईजिप्त, मेसोपोटेमिया (इराक), ग्रीस, पार्शिया (इराण) येथील संस्कृतींमध्ये या तंत्राचा विकास पूर्णत्वाला पोचलेला दिसतो. भारतीय परंपरेमध्ये मात्र मौर्यकाळाच्या आधी फारसे प्रगत शैलशिल्प सापडत नाही. सिंधू संस्कृतीमधील काही पाषाणशिल्पे मिळतात, पण ती तांत्रिकदृष्ट्या प्राथमिक अवस्थेत आहेत. अशोकस्तंभ  प्रगत पाषाणशिल्पाचे उदाहरण ठरावेत; परंतु त्यांची उपरी शैली आणि भारतीय परंपरेतील याआधीच्या काळातील शैलशिल्पांचा पूर्ण अभाव लक्षात घेता, हे तंत्र आणि तंत्रज्ञही इराणमधून आलेले असण्याची शंका उद्भवते. या शैलीतील शिल्पे अशोकाच्या मृत्यूनंतर भारतात क्वचित आढळतात, ही वस्तुस्थिती वरील संशयाला पुष्टी देते. त्यामुळे शैलशिल्पाचे एतद्देशीय तंत्र आणि शिल्पकला यांचा उद्गम आपल्याला शुंग-सातवाहन काळातच हुडकावा लागतो (इ. स. पू. पहिले-दुसरे शतक). भारतीय शैलशिल्प सुरुवातीपासूनच अनेकविध जातींच्या पाषाणात कोरले गेले आहे. विविध दर्जांचे आणि पोतांचे वालुकाश्म, सुभाजा (शिस्ट) सारखे ठिसूळ थराचे खडक, सह्याद्रीच्या रांगांमधील काळा अग्निजन्य खडक, संगमरवर यांसारख्या हाती येईल, त्या दगडाशी भारतीय शिल्पींची छिन्नी भिडली आहे. अतिशय भरड पाषाणालाही तिने दैवी सौंदर्य बहाल केले आहे. मथुरेच्या लाल, ठिपकेदार पाषाणातून प्रकटलेले मुसमुसणारे यौवन, सारनाथची पिंगट चुनार दगडातील अभिजात अभिव्यक्ती, वेरूळ-घारापुरीच्या काळ्याकभिन्न कातळातून अवतरलेले रौद्र सौंदर्य, हळेबीड-बेलूरच्या काळ्याभोर आणि दिलवाड्याच्या शुभ्र शिलाखंडातील अद्भुत कारागिरी इ. या विधानाची साक्ष देतील. माध्यमाचा स्वभाव लक्षात घेऊन या शिल्पींनी आपली ‘रीती’ निवडली आहे. याउलट युरोपीय शिल्पपरंपरेत मात्र संगमरवराचा उपयोगच प्रामुख्याने केलेला आढळतो. इतर जातीच्या पाषाणाचा उपयोग वास्तू आणि तिच्या सजावटीचे कोरीवकाम एवढ्यापुरता मर्यादित दिसतो.

रोमनेस्क काळात जेव्हा युरोपीय शिल्पकलेला पुनरुज्जीवन प्राप्त झाले, तेव्हा गिझलबर्टससारख्या शिल्पकाराने साध्या दगडातून महान शिल्पांची निर्मिती केली; पण असे अपवाद थोडेच. फिडीयस, प्रॅक्सीटेलीझ, लायसिपस इ. ग्रीक आणि मायकेलअँजेलो, बेर्नीनी यांसारख्या प्रबोधनकालीन शिल्पींनी आपल्या निर्मितीसाठी संगमरवराचीच निवड केली. चीन आणि जपानमध्ये जेड किंवा स्फटिकासारख्या मौल्यवान आणि अतिशय कठीण दगडांमध्ये कोरलेली शिल्पे अधिक लोकप्रिय झाली. लाकूड, हस्तिदंत यांतून कोरलेल्या शिल्पांची परंपरासुद्धा अतिशय समृद्ध आहे. विशेषतः इसवी सनाच्या पूर्वी आणि सुरुवातीच्या शतकांमध्ये हस्तिदंती कारागिरी जगभर लोकप्रिय होती, असे दिसून येते. सांचीची शिल्पे हस्तिदंताचे काम करणाऱ्या कारागिरांनी कोरल्याचे उल्लेख सापडतात. युरोप तसेच चीनमध्येही हे काम होत असे. उस्मानाबादजवळील तेर गावी सातवाहनकालीन हस्तिदंती प्रतिमा सापडल्या आहेत आणि तशाच प्रतिमा पॉंपेई (रोम) येथेही सापडल्या आहेत. व्यापारी दळणवळणामुळे अफगाणिस्तानात पोचलेल्या बेग्रॅमच्या हस्तिदंती प्रतिमा हा भारतीय शिल्पकलेच्या विकासातील एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो.

लाकडी शिल्पांचे (दारुशिल्प) उल्लेख भारतीय आणि पाश्चात्त्य साहित्यात फार प्राचीन काळापासून सापडतात. परंतु लाकडाच्या नाशवंत गुणधर्मांमुळे त्याचे नमुने तुलनेने कमी सापडतात. इ. स. पू. चौथ्या शतकात जेव्हा अलेक्झांडरने भारतावर स्वारी केली, तेव्हा भारतीय सेनेच्या आघाडीवर एक हर्क्यूलीझसदृश युद्धदेवतेची प्रतिमा मिरविली जाताना त्याने पाहिल्याचा उल्लेख सापडतो. भारतीय साहित्यात जयंत, विजयंत, अपराजिता अशा देवतांच्या लाडकी प्रतिमा कोरून धातूच्या पत्र्याने त्या मढविल्या जात असल्याचे उल्लेख आहेत. दुर्देवाने यांतील कुठलीच शिल्पे आज उपलब्ध नाहीत. गुप्तोत्तर काळातील एक लाडकी शिल्पपट तेर येथील उत्तरेश्वर मंदिराच्या दाराच्या भालावर कोरला आहे. प्राचीन दारुशिल्पाचा हा अप्रतिम नमुना आज तेर (जि. उस्मानाबाद) येथील रामलिंगप्पा लामतुरे संग्रहालयात आहे.

काष्ठशिल्पांची परंपरा

भारतीय काष्ठशिल्पाच्या तुलनेत मध्य आशिया आणि युरोपची काष्ठशिल्पपंरपरा अधिक प्राचीन असावी. ईजिप्तमधील ममींच्या मानवाकारात कोरलेल्या पेट्या, सक्कर येथे सापडलेली शिल्पे आणि शिल्पपट निदान सु. पाच हजार वर्षांपूर्वीचे असावेत. युरोपमध्येही काष्ठशिल्पांची परंपरा दिसून येते. व्हायकिंग जहाजावरील आलंकारिक काष्ठशिल्पे युरोपच्या शिल्पविकासात महत्त्वपूर्ण ठरतात. रोमनेस्क काळात युरोपात आणि विशेषतः जर्मनीत अतिशय उत्कट भावप्रदर्शन करणारी शिल्पे कोरून रंगविण्यात आली.

आदिम जमातींनी काष्ठशिल्पाच्या क्षेत्रात अनेक अभावित प्रयोग केलेले आहेत. कोरलेले लाकडी स्मारकफलक व मुखवटे, गणचिन्हे, भारतातील लाकडी पाळीवे (स्मारकफलक) अशा अनेक जोमदार आविष्कारांनी त्यांनी काष्ठशिल्पांचे दालन समृद्ध केले आहे.

उपलब्ध त्रिमितिपूर्ण आकारांची सहेतुक जोडणी (अ‍ॅसेंब्लेज) ही शिल्पाविष्काराची सर्वांत प्राचीन शक्यता असू शकेल. लाकडाचे तुकडे, पिसे, दोऱ्या , हाडे, प्राण्यांचे दात-नखे इ. अनेकविध वस्तूंच्या जोडणीतून शिल्पाविष्कार साधणे, ही त्रिमितीय आविष्काराची पहिली पायरी असावी. आदिमानवाची गूढ रंगरूपातील दैवते यांतूनच आकारास आली असावीत. दगडावर शेंदूर चढवून, त्याला डोळे लावून स्थापिली जाणारी स्थानिक दैवते, वाळूच्या हरितालिका अशा अनेक प्रकारांतून असा सुगम शिल्पाविष्कार आपल्याला पदोपदी दिसून येतो. त्याच्या सुगमतेमुळे कदाचित अभिजन शिल्पपरंपरेने त्याची गंभीरपणे क्वचितच दखल घेतली. पाब्लो पिकासो या जगप्रसिद्ध कलावंताने या आविष्काराची ताकद ओळखून त्याचा नव्या संदर्भात उपयोग केला आणि आधुनिक (मॉर्डन) कलेच्या अभिव्यक्तीसाठी अनेक नव्या शक्यता सुचविल्या. पिकासोची ‘असेंब्लेजीस’ (जोडणीशिल्पे) आणि आजकालची कलावीथीतील कलात्मक संरचना (मांडणीशिल्पे) किंवा आरास हे, खरे तर, शिल्पाविष्काराच्या एका विस्मृतीत गेलेल्या शिल्पकलेच्या पुनरुज्जीवनाचे प्रयत्न आहेत.

शिल्पनिर्मितीच्या या विविध प्रकारांचा व शक्यतांचा शिल्पाच्या एकूण रूपबंधावर थेट प्रभाव असतो. शिल्पाची संरचना, पृष्ठभागाचा पोत, रंग, त्याचा दृश्य भार इ. दृश्य आणि स्पर्श घटक शिल्पाच्या माध्यमावर आधारित असतात. अपेक्षित परिणाम साधण्यासाठी योग्य ते माध्यम आणि तंत्र यांची निवड करावी लागते. पुन्हा तो विशिष्ट दृक् स्पर्श परिणाम साधण्यामागेही काही प्रयोजन असते आणि बदलत्या प्रयोजनांबरोबर शिल्पाचे रूप बदलत जाते.

प्राचीन अभिजात कलापरंपरा

जगातील प्रमुख शिल्पपरंपरांचा विचार करता पाश्चात्त्य म्हणजे प्रामुख्याने युरोपीय परंपरा सुरुवातीपासून अनुकरणात्मक आहे, हे दिसून येते. अगदी आदिम संस्कृतीपासूनच युरोपीय कलेत निसर्गाचे प्रामाणिक अनुकरण करण्याचे प्रयत्न दिसून येतात; परंतु ते प्रत्येक वेळी यशस्वी ठरले असे नाही. अनेकदा पुरेशा तांत्रिक कौशल्याअभावी ते फसलेलेही आढळतात; परंतु त्यामागील यथातथ्य चित्रणाचे प्रयास लपत नाहीत. फ्रान्समधील दॉरदॉन्यू, आरेज इ. ठिकाणच्या आदिमानवाच्या गुंफेतील शिल्पांमधील काही भाग अगदी निसर्गसदृश आहेत, तर काही ठिकाणी प्रमाणबद्धता, नेमकेपणा यांबाबत तडजोड केलेल्या आढळतात. याउलट भीमबेटकासारख्या भारतीय प्रागैतिहासिक चित्रपरंपरांमध्ये अनुकरणाऐवजी चिह्नीकरणाची (स्कीमेटायझेशन) प्रवृत्ती दिसून येते. अनुकृतीपेक्षा आत्मनिष्ठ आकलनाला येथे प्राधान्य दिलेले दिसून येते. थोडासा अतिव्याप्तीचा दोष पत्करून, पाश्चात्त्य कलापरंपरा स्वभावतः बुद्धिगम्य (कन्सीव्हेबल) आहे, तर पौर्वात्य परंपरा उपजत (इन्ट्यूइटिव्ह) आहे, असे म्हणायला प्रत्यवाय नसावा; अपवाद अर्थातच गृहीत धरून. उदा., प्राचीन ईजिप्तमधील कलावंतांना निसर्गाचे अनुकरण अशक्य होते, असे त्यांच्या शिल्पांतील प्रमाणबद्ध, सुडौल मानवी आकार पाहता म्हणता येणार नाही. परंतु मानवी शरीराला जोडलेली पशुपक्ष्यांची शिरे, चित्रघटकांची-आकृतींची अनैसर्गिक सापेक्ष प्रमाणे, परिप्रेक्ष्याच्या नियमांपासून स्वेच्छापूर्वक घेतलेली फारकत आणि एकूणच त्या शिल्पाकृतींभोवती असलेले अद्भुततेचे वलय इ. गोष्टी पाहता त्या कलावंतांनी अनुकरण ही शक्यता जाणीवपूर्वक नाकारल्याचे आणि कल्पनाशक्तीचा उपयोग करून बौद्धिकतेच्या मर्यादा ओलांडण्याचे प्रयत्न केलेले स्पष्ट दिसून येते. ही कलापरंपरा जगातील सर्वांत प्राचीन अभिजात कलापरंपरा आहे. भव्यतेचे वेड असलेल्या आणि स्वतःला प्रत्यक्ष परमेश्वराचे अंश समजणाऱ्या ईजिप्तच्या राज्यकर्त्यांनी (फेअरोंनी) प्रेक्षकाची छाती दडपून जावी, अशा परिमाणांमध्ये वास्तू आणि शिल्पांची निर्मिती केली. भव्यतेचा परिणाम अधिक गडद करण्यासाठी त्यांनी शिल्पाविष्कारांतील अनावश्यक बारकावे काढून टाकले आणि अतिशय साधी, भावनारहित परंतु भव्योदात्त अशी शैली विकसित केली. गीझाच्या पिरॅमिडजवळील स्फिंक्स किंवा अबू सिंबेलच्या महाकाय प्रतिमा पाहताना भोवतालच्या सृष्टीशी त्यांचे काही नाते आहे, असे वाटतच नाही. कुठल्यातरी अज्ञात जगातून अवतरल्या अशा भासणाऱ्या या प्रतिमा मानवी आकारात असूनही अमानवी वाटतात. किंबहुना त्या तशा वाटाव्यात अशी योजनाच त्या शैलीत अनुस्यूत आहे. अगदी वीतभर उंचीच्या प्रतिमेतूनही ईजिप्तचे शिल्पी अशाच भव्योदात्ततेची अनुभूती घडवू शकतात.

याउलट टायग्रिस आणि युफ्रेटीस या नद्यांच्या खोऱ्यात उदयाला आलेल्या सुमेर, बॅबिलोनिया इ. प्राचीन मेसोपोटेमियन संस्कृतींच्या कला परंपरेत दृश्यानुभूतीशी इमान राखण्याचा प्रयत्न दिसतो. हे चित्रणही यथातथ्य नसले, तरी दृश्यानुभूतीचे निसर्गनियम जाणीवपूर्वक नाकारण्याचे प्रयत्न तेथे दिसत नाहीत. निसर्गाच्या मर्यादा सांभाळूनही ते चित्रण शैलीदार आणि पर्यायाने अधिक डौलदार व प्रभावी करण्याची क्लृप्ती या शिल्पकारांनी वापरलेली दिसते. दृश्यानुभूतीशी चलाखीने थोडेसे स्वातंत्र्य घेऊन एक ऐटदार नाट्यात्मकता या आविष्कारांत आणण्यात हे शिल्पकार यशस्वी ठरले आहेत. असुरबनिपाल, हम्मुराबी यांसारखे त्यांच्या मिथ्यकातील किंवा इतिहासातील महानायक, या शिल्पपटात मानवी प्रवृत्तींमध्ये रत असलेले दिसतात. मानवी शीर्ष आणि पंख असलेले सिंहसदृश शार्दूल या शिल्पपरंपरेत आढळतात. परंतु एकतर एकूण शिल्पसमृद्धीतील त्यांचे स्थान दुय्यम आहे आणि त्यांतून अद्भुतापेक्षा रूपकात्मकता जास्त प्रतीत होते. त्यामुळे शैलीबद्ध का होईना पण अनुकरण हाच या परंपरेचा स्वभाव ठरतो.

सॉक्रेटीस आणि प्लेटोच्या प्रखर बुद्धिवादाचे अनुकरण करणाऱ्या ग्रीक संस्कृतीनेही सृष्टीच्या ऐंद्रिय आकलनावरच आपली भिस्त ठेवल्याचे दिसून येते. कला म्हणजे गोचर सृष्टीचे अनुकरण, हा प्लेटोचा सिद्धांत तत्कालीन कलाविष्कारांच्या निरीक्षणातूनच स्फुरला असणे शक्य आहे; कारण तत्पूर्वीच ग्रीक कलावंत मानवी देहरचनेचा मागोवा घेऊ लागले होते. त्याची प्रचीती नग्न देहाच्या क्रीडापटूंच्या प्रतिमाशिल्पांतून दृग्गोचर होते. ग्रीक संस्कृतीचा आदर्श शतकानुशतके डोळ्यांसमोर ठेवणाऱ्या युरोपीय संस्कृतींनी ग्रीक कलामूल्ये थोड्याफार फरकाने अठराव्या शतकापर्यंत कसोशीने जपली.

लेखक : दीपक कन्नल

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate