अगदी लहान विमानतळावरही विमानाच्या संधारणाची, तेलपाणी देण्याची व एकूण विमान उड्डाणासाठी सुसज्ज करण्याची मोठी गरज असते व तशी सोय केलेली असते. मोठ्या विमानतळांवर जलद, कार्यक्षम, विनाविलंब स्वरूपाची अशी सेवा पुरविण्यासाठी परिपूर्ण, पक्की यंत्रणा उभारलेली असते. याशिवाय इंधन, वीज (संदेशवहन, प्रकाशन), पाणी, संपीडित (दाबयुक्त) हवा (विमानाच्या कक्षांमधील हवेचा दाब नियंत्रित करणे व ती थंड करणे), विमानतळावरील वाहितमलाची (सांडपाण्याची) विल्हेवाट यांकरिता भूमिगत प्रणालींची सोय केलेली असते. माल उच्चालक यंत्रणा, खाद्यपेय पुरवठा, साफसफाई, सामानाची हाताळणी, विमान ओढून नेण्याची सेवा इ. इतर सेवा पुरविण्याची सोय विमानतळावर असते.
विमान कंपन्या, तसेच विमानतळाचे प्रशासन व व्यवस्थापन यांची काही कामे असतात व त्यांच्याकडून काही सेवा पुरविल्या जातात (या आधी यांविषयीची काही माहिती आलेली आहे). विमानतळ वापरणाऱ्या विमानाचा प्रकार आणि वजन, प्रवाशांची संख्या व मालाचे वजन, तेथून होणारी एकूण आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत हवाई वाहतूक व तिची त्वरा आणि वाहतुकीचा भर असलेला काळ यांवर तेथील कामांचा आणि सेवांचा व्याप अवलंबून असतो. अनेक प्रकारच्या विमानतळांवर यांकरिता लागणाऱ्या सुविधांची मध्यम प्रमाणात गरज असते. मात्र मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळांवर इमारती व गुंतागुंतीच्या सुविधा यांची मोठ्या प्रमाणात गरज असते.
देशांतर्गत व परदेशी विमान कंपन्या व प्रवासी यांची संख्या वाढत आहे. यामुळे विमानतळावरील कामे व सोयीसुविधा यांतही भर पडत आहे. किमान कंपनीचे प्रशासन केंद्र, कार्यालय व तिकीट खिडकी यांसाठी प्रवासी स्थानकात सोय करावी लागते. प्रवाशांचे सामान तपासणे, त्याच्या वजनाचे नियमन करणे, ते योग्य विमानात चढविणे आणि इष्ट स्थळी पोहोचल्यावर ते स्वीकारायच्या जागेपर्यंत नेण्याची व्यवस्था करणे, विमानाच्या वेळा, द्वार व इतर इष्ट माहिती प्रवाशांना पुरविणे, खाद्यपेयांची व्यवस्था करणे, तिकिटे विकणे, तपासणे व आरक्षण करणे आणि सर्व कामांचे नियोजन करणे ही कामे विमान कंपन्या करतात.
हवाई वाहतूक हाताळण्याशिवाय विमानतळ प्रशासनाला इतर पुष्कळ कामे करावी लागतात व सेवा पुरव्यावा लागतात. विमानतळावरील रस्ते आणि वाहनतळ; सर्वांच्या माहितीसाठी विशिष्ट खुणा, घोषणा व माहितीसेवा, दूरध्वनी आणि तारायंत्र सोयी, प्रसाधनगृह, उपहारगृह इ. सार्वजनिक सुविधा, दुकाने, पारपत्र आणि आरोग्यविषयक नियंत्रण, सीमाशुल्क निपटारा, वातानुकूलन, तापन, प्रकाशन, वीज व पाणी पुरवठा इ. सेवासुविधा पुरविणे हे विमानतळ प्रशासनाचे काम असते.
संपूर्ण विमानतळावरील कामांवर लक्ष ठेवण्याचे काम व्यवस्थापन कर्मचारी करतात. विमानतळाची स्वतःची आगनिवारण व सुरक्षा व्यवस्था असते. इमारतींची देखभाल, दिवे तपासून बदलणे, हिम वा गवत काढून टाकण्यासाठीची यंत्रसामग्री सुव्यवस्थित ठेवणे व वापरणे वगैरे गोष्टींवर व्यवस्थापकाची देखरेख असते. शिवाय विमानतळावरील कर्मचारी व विमान कंपन्या यांच्या कामांमध्ये समन्वय साधून विमानतळावरील सर्व कारभार सुरळीतपणे, सुरक्षितपणे व कार्यक्षम रीतीने चालू ठेवण्याचे काम व्यवस्थापन कर्मचारी करतात.
चालू क्षणापर्यंतची हवामानविषयक माहिती वैमानिकाला मिळणे गरजेचे असते. पुष्कळ विमानतळांवर अशी माहिती तासातासाने उपलब्ध करून दिली जाते. ढगाच्या आवरणाचा व्याप, हिमवृष्टीचे वा पावसाचे मान, ढगाच्या तळसीमेची उंची वगैरे माहिती अशा तऱ्हेने उपलब्ध होते. आर्द्रता, तापमान, दाब, दृश्यमान वगैरेंची नोंदही दर तासाला करतात. खराब हवामानात धावपट्टीच्या टोकालगतची दृश्यमानता मोजण्यासाठी प्रकाशविद्युत् प्रयुक्ती वापरतात व ही माहिती विमानतळावर येणाऱ्या विमानाच्या वैमानिकाला पुरवितात.
मोठ्या विमानतळांवर वेळापत्रकानुसार जाणाऱ्या लहान विमानानाही पुष्कळ सेवा पुरवितात, उड्डाण नकाशे व उड्डाण विषयक इतर माहिती पुरविणे, तसेच इंधन भरणे, विमानघराची व संधारणाची सेवा पुरविणे वगैरे गोष्टींचा यात अंतर्भाव असतो.
दहशतवाद्यांकडून विमान पळविण्याच्या वा ते बाँबने उडवून देण्याच्या पुष्कळ घटना घडल्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला आहे. यामुळे मोठ्या विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था अतिउच्च दर्जाची ठेवतात. दडवून ठेवलेली हत्यारे व स्फोटके द्रव्ये शोधून काढण्यासाठी प्रवासी, त्यांच्या हातातील इतर साधने, तसेच माल या सर्वांची कडक तपासणी करतात. सामान न घेता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर करडी नजर ठेवतात. तपासणीसाठी इलेक्ट्रॉनीय क्रमवीक्षक व अन्य साधने वापरतात. यांमुळे दडवून ठेवलेली बंदूक, पिस्तुल, सुरे इ. धातवीय हत्यारे ओळखू येतात. सामान्यपणे त्यांत बाँब वा स्फोटके लपवून ठेवण्यात येतात ती रेडिओ ग्राही, खेळणी, व्यक्तिगत स्टिरिओ वगैरे सामानाची कसून तपासणी करतात. कधीकधी स्फोटकांच्या शोधासाठी प्रशिक्षित कुत्र्यांचा वापर करतात.
विमान कंपन्यांचे काही कर्मचारी विमानघरातही असतात. तेथे तंत्रज्ञ विमानाच्या दुरुस्तीचे काम करतात, तर दुरुस्तीसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचा पुरवठा करून त्यांची नोंद ठेवण्याचे काम अशा मालाच्या कोठीतील कर्मचारी करतात. काही कर्मचारी भरणतळावर असतात. यांपैकी काहीजण विमानाला थांबवावयाच्या ठिकाणाकडे वळविण्यासाठी मदत करतात, तर यंत्रज्ञ एंजिन व इतर यंत्रसामग्री तपासतात. यामुळे प्रत्येक विमानाचे काम सुरळीत चालू असल्याची व उड्डाणासाठी विमान सुस्थितीत असल्याची खातरजमा होते. काही कर्मचारी थांबलेल्या विमानाची साफसफाई करतात. तर काही कर्मचारी जेवण, खाद्यपदार्थ, पेये, विनाशुल्क वस्तू इ. उड्डाणासाठी सज्ज झालेल्या विमानात चढवितात. हे झाल्यावर विमान उड्डाणाला सज्ज असल्याचे नियंत्रण कक्षाला कळवितात.
विमानतळावरील विविध सेवासुविधांसाठी हवाई वाहतूक नियंत्रक कर्मचारी, टपाल कर्मचारी, पोलीस व शस्त्रधारी लष्करी जवान, सार्वजनिक आरोग्यसेवेतील, तसेच आप्रवास व सीमाशुल्क कर्मचारी इ. शासकीय कर्मचारी असतात.
जगात १,०५८ पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. विमानतळ हे शहर प्रशासन, सार्वजनिक कंपन्या, सरकार (भारत) व सरकारने चालविलेल्या संस्था (आयर्लंड) इत्यादींच्या मालकीचे असतात. संयुक्त राष्ट्रांच्या इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीएओ) या संघटनेचे जगातील १५० पेक्षा अधिक देश सदस्य आहेत. विमानतळाचा अभिकल्प, विमानतळ चालविणे व हवाई वाहतूक नियंत्रण या क्षेत्रांतील मानके या संस्थेतर्फे सदस्य देशांसाठी तयार केली जातात. हवाई सुरक्षितता, वैमानिकाची पात्रता ठरवून त्याला तसा परवाना देणे, विमानचे परीक्षण इ. कामे स्वतंत्र राष्ट्रीय संस्था करतात. उदा., सिव्हिल एव्हिएशन ऑथॉरिटी (ब्रिटन), सिव्हिल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशन (अमेरिका) आणि डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (भारत).
काही विमानतळांवर नियमित व भाडोत्री विमानेही उतरतात, तर काही विमानतळांवर केवळ खास प्रकारची वाहतूक होते; उदा., खाजगी, भाडोत्री, स्थानिक किंवा देशांतर्गत. काही विमानतळ आणीबाणीच्या वेळी वापरले जातात.
हीथरो व गॅटविक (लंडन) हे ब्रिटनमधील, तर डब्लितन हा आयर्लंडमधील मोठा विमानतळ आहे. शिकागो, टलांटा, लॉस अँजेल्स, न्यूयॉर्क इ. ठिकाणी अमेरिकेतील मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. पर्थ, मेलबर्न व सिडनी हे ऑस्ट्रेलियातील तर ऑक्लंड हा न्यूझीलंडमधील मोठे विमानतळ आहेत. ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड येथील हवाई वाहतूक जगातील सर्वात सुरक्षित हवाई वाहतूक मानली जाते. जाकार्ता, क्वालालंपूर, सिंगापूर, हाँगकाँग, बर्लिन, पॅरिस, टोकिओ, रोम,जिनीव्हा, मॉस्को, बीजिंग, जोहॅनिसबर्ग, केपटाउन, दरबान, जेद्दा, कैरो, तेहरान, लीमा, अल्जिअर्स, कराची, डाक्का, कोलंबो, काठमांडू इ. जगातील बहुतेक मोठ्या शहरांत मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
भारतातील आंतरराष्ट्रीय विमानतळांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून संसदेने १९७१ साली मंजूर केलेल्या विधेयकानुसार, भारत सरकारने १९७२ साली भारतीय आंतरराष्ट्रीय विमानपत्तन प्राधिकरण (इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया) या नावाची स्वायत्त संस्था निर्माण केली आणि तिच्याकडे मुंबई, दिल्ली, कलकत्ता आणि चेन्नई अशा चार विमानतळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सोपविली. या विमानतळांवरील विमान वाहतूक नियंत्रण मात्र नागरी विमानन महानिदेशालयाकडेच (डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन याकडेच) ठेवले. पुढे १९९१ मध्ये त्रिवेंद्रम विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा देण्यात आला. नागरी विमानन क्षेत्रांत आणखी मोठ्या प्रमाणावर स्वायत्तता यावी म्हणून, संसदेने १९८५ मध्ये मंजूर केलेल्या विधेयकानुसार, सरकारने १९८६ मध्ये राष्ट्रीय विमानपत्तन प्राधिकरण (नॅशनल एअरपोर्ट्स ऑथॉरिटी) ही संस्था स्थापन केली. लष्करासाठी राखीव क्षेत्र सोडून भारताच्या अखत्यारीतल्या सर्व आकाशक्षेत्रांत (यात भारताच्या सीमेबाहेरील, अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरातील भागही येतात.) विमान वाहतूक नियंत्रण सेवा (एअर ट्रॅफिक सर्व्हिसेस) पुरवण्याची जबाबदारी या नव्या संस्थेवर सोपविण्यात आली. याशिवाय अंतर्देशीय विमानतळांची व्यवस्थाही या संस्थेकडे देण्यात आली. पुढे काही वर्षांनी असा विचारप्रवाह वाहू लागला की, विमानतळ व्यवस्था व विमान वाहतूक नियंत्रण यांमध्ये एकसूत्रीपणा येण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय व अतर्देशीय अशा दोन्ही प्रकारच्या विमानतळांचा विकास समतोल व्हावा म्हणून दोन्ही प्राधीकरणांचे विलीनीकरण आवश्यक आहे. संसदेने यासंबंधी मंजूर केलेल्या विधेयकास अनुसरून, १ एप्रिल १९९५ रोजी सरकारने भारतीय विमानपत्तन प्राधिकरण (एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया) ही नवी संघटना स्थापन केली व दोन्ही जुनी प्राधिकरणे त्यात विलीन झाली.
भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाच्या अखत्यारीत पाच आंतरराष्ट्रीय व ९२ अंतर्देशीय विमानतळ आहेत. कित्येक लष्करी विमानतळांवरसुद्धा नागरी विमानांची वाहतूक असते. अशा ठिकाणी प्रवाशांची व मालाची सोय, विमाने उभी करण्याची व्यवस्था आणि नागरी विमानांना लागणारी काही मार्गनिर्देशन साधने यांची व्यवस्था प्राधिकरण करते. लष्करी विमानतळाच्या या भागाला नागरी उपनिवेष (सिव्हिल एन्क्लेव्ह) असे म्हणतात. भारतात असे २८ नागरी उपनिवेष आहेत.
इ. स. १९९२ पासून विमानतळ व विमान वाहतूक नियंत्रण व्यवस्था यांच्या कायाकल्पासाठी मोठ्या योजना कार्यान्वित झाल्या. अंतर्देशीय विमानतळांपैकी १२ विमानतळ निवडले गेले व त्यांचा सर्वांगीण विकास करून त्यांना आदर्श विमानतळ बनविण्याचे काम सुरू झाले. इंफाळ, गौहाती, भुवनेश्वर, पाटण, लखनौ, जयपूर, बडोदे, इंदूर, नागपूर, हैदराबाद, कोईमतूर व कालिकत हे ते १२ विमानतळ होत. यांच्याव्यतिरिक्त दिल्ली, मुंबई, कलकत्ता, गोवा, बंगलोर, जोधपूर, दिमापूर, सिलचर येथाल प्रवासी स्थानकांचा विस्तार किंवा नवी स्थानके बांधणे यासाठी प्रकल्प तयार केले गेले. अनेक विमानतळांवरील धावपट्टीची लांबी वाढविण्यात येत आहे. यामुळे उड्डाण सुरक्षेत भरीव सुधारणा होईल. जम्मू, जयपूर, उदयपूर, गौहाती, लीलाबारी, औरंगाबाद आणि त्रिवेंद्रम हे ते विमानतळ आहेत. यांतील काही धावपट्टींची लांबी वाढल्यामुळे मोठ्या विमानांसाठी उपयुक्त होतील.
इ. स. १९९१-९२ या काळात तमिळनाडूमधील सेलम व तुतिकोरिन येथे नवे कोरे विमानतळ (ग्रीनफील्ड एअरपोर्ट्स) बनविण्यात आले. मेघालयामध्ये तुरा मिझोराममध्ये लांगपुई येथे नवे कोरे विमानतळ बांधणे १९९७ मध्ये सुरू झाले. खाजगी क्षेत्रात, सहकारी पद्धतीने मिळविलेल्या भांडवलात केरळमध्ये कोचीनजवळ नेडुंबशेरी येथे एक नवा कोरा विमानतळ तयार होत आहे. बंगलोरजवळ देवणहळ्ळी येथे खाजगी क्षेत्रात एक नवा कोरा विमानतळ बनविण्याचा प्रस्ताव आहे.
विमान वाहतूक नियंत्रणाच्या क्षेत्रात दोन मोठे प्रकल्प मुंबई व दिल्ली येथे १९९३ मध्ये सुरू करण्यात आले. यात आधुनिक अवगम (सूचना) तंत्रविद्या व संगणक यांचा पुरेपूर उपयोग करून वाहतूक नियंत्रणाच्या सर्व महत्त्वाच्या पैलूंमध्ये स्वयंचालन आणण्यात येत आहे. अत्याधुनिक रडार व मार्गनिर्देशक साधने आणि दूरसंदेशवहन प्रणाली यात वापरलेली आहेत. दोन्ही ठिकाणचे हे प्रकल्प १९९८ मध्ये वापरात येतील. यांव्यतिरिक्त त्रिवेंद्रम, हैदराबाद, गौहाती व अहमदाबाद येथे आधुनिक प्राथमिक व समर्थक रडार यंत्रणा १९९३-९६ या काळात बसविण्यात आली, तर कलकत्ता व चेन्नई येथे ती १९९७-९८ या काळात बसविण्यात येतील.
विमान वाहतूक नियंत्रक व इलेक्ट्रॉनिकी अभियंते यांना शिक्षण देण्यासाठी अलाहाबाद येथे विमानपत्तन प्राधिकरणाचे नागरी विमानन प्रशिक्षण महाविद्यालय आहे. हे अद्ययावत शिक्षण सामग्रीयुक्त आहे आणि येथे विमान नियंत्रण कक्ष व रडार यांच्या सदृशीकरणाचीही सोय आहे. हे महाविद्यालय व दिल्ली येथे असणारी प्राधिकरणाची वैमानिकी व्यवस्थापन संस्था या दोन्ही संस्थांना आंतरराष्ट्रीय नागरी विमानन संघटनेची (इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशनेची) मान्यता मिळालेली आहे व या जागतिक पातळीवरील शिक्षण संस्था मानल्या जातात.
विमानतळाची व्यवस्था व विमान वाहतूक नियंत्रण ही कार्ये स्वायत्त संघटनांकडे सोपविली गेली असली, तरी नागरी विमानन क्षेत्राचे नियमन सरकारने आपल्याकडेच राखून ठेवले आहे आणि हे नियमन कार्य नागरी विमानन महानिदेशक पार पाडतो. विमानचालक व वैमानिकी अभियंते यांच्या परीक्षा घेणे, त्याना परवाने देणे, विमान उड्डाणक्षम असल्याचे शिफारस पत्र देणे, हवाई सुरक्षिततेच्या दृष्टीने विमानतळ, विमान आणि कर्मचाऱ्यांची कार्यपद्धती यांची तपासणी करणे आणि अपघातांची चौकशी करणे ही ती कार्ये होत.
जुहू येथील गवताळ धावपट्टी हा भारतातील पहिला विमानतळ (१९३२) आहे. मुंबईचा सहार विमानतळ हा भारतातील सर्वाधिक हवाई वाहतूक असलेला विमानतळ आहे, तसेच येथील धावपट्टीही देशातील नागरी विमानतळांमध्ये सर्वांत जास्त लांब (३,८४९ × ४६ मी.) धावपट्टी आहे. लष्करी विमानतळांमध्ये अर्कोणम येथील धावपट्टी याहीपेक्षा लांब आहे. लेह (लडाख) येथील विमानतळ हा जगातील सर्वांत उंच (समुद्रसपाटीपासूनची उंची ३,२५६ मी.) विमानतळ आहे, तर लडाखमधील दौलतबेग ओल्टी ही धावपट्टी जगातील सर्वांत उंचावरची (समुद्रसपाटीपासूनची उंची ५,१८२ मी.) धावपट्टी आहे.
मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशिवाय पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक (ओझर व देवताळी), औरंगाबाद, अकोला व नागपूर येथील विमानतळ केंद्र सरकारने, तर कराड, नांदेड, उस्मानाबाद, धुळे, चंद्रपूर, रत्नागिरी, जळगाव, फलटण, वाडा, भंडारा, किनवट येथील विमानतळ राज्य सरकारने बांधले आहेत. राज्यातील औद्योगिक वसाहतींमध्ये धावपट्ट्या बांधण्याचीही योजना आहे. धुळे, उस्मानाबाद, अमरावती, लातूर, शिर्डी, तारापूर (ठाणे) येथे नवीन धावपट्ट्या बांधण्याचीही योजना आहे.
हवाई वाहतुकीतील हॅलिकॉप्टरचे महत्त्व वाढत आहे.विमानतळापासून शहरे अथवा वाहतूक केंद्रे यांच्यामार्फत अथवा दोन विमानतळांदरम्यान हेलिकॉप्टरची हवाई सेवा पुरविली जाते. हवाई वाहतुकीतील गर्दी व कोंडी यांत वाढ झाल्याने हेलिकॉप्टरची सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांची संख्या जलदपणे वाढली. हेलिकॉप्टर उडविण्यासाठी व उतरविण्यासीठी हेलिपोर्टची (हेलिकॉप्टर तळाची) गरज असते. याची जागा निवडताना पुढील गोष्टी लक्षात घेतात: येथून विमानतळावरील स्थानकक्षेत्रापर्यंत सुरळीतपणे व जलदपणे पोहोचता येईल अशी जागा ठरवितात. विमानाच्या हालचालींस व उड्डाण कार्यात अडथळा येणार नाही अशा रीतीने हेलिकॉप्टरचे उड्डाण होईल, हे पाहतात. हेलिकॉप्टरच्या मार्गात उंच अडथळे, विशेषतः सहजी न दिसणाऱ्या विजेच्या तारा, पार करावे लागणार नाहीत याची काळजी घेतात. वाऱ्याची दिशा व वेग आणि त्याच्यातील संक्षोभ (खळबळ), खराब हवामान वा रात्रीचे उड्डाण यांमुळे दृश्यमानतेवर होणारे परिणाम इ. अडचणींचा विचार करतात. विमानतळाच्या स्थानक इमारतीच्या गच्चीवरही हेलिकॉप्टर उतरविता येते. खनिज तेल काढण्यासाठी समुद्रात उभारलेले फलाट, जहाज, इमारतीची गच्ची यांसारखे लहान क्षेत्रही हेलिकॉप्टरच्या तळासाठी चालतात.
वर उल्लेख केलेल्या भिन्नभिन्न घटकांच्या अंतर्भावामुळे विमानतळाची संपूर्ण वास्तू किंवा संकुल अतिशय भव्य होते. या संपूर्ण संकुलाचे वातावरण प्रवाशाला एका वेगळ्या गतिमान विश्वात घेऊन जाते. १९०४-९४ या काळात विमानतळाच्या वास्तुरचनेत आमूलाग्र बदल होत गेले व तीत झपाट्याने विकास होत गेला. प्रगत तंत्रविद्या, यांत्रिकीकरण, संगणकाचा वापर इत्यादींद्वारा प्रवाशांच्या सुखसोयींकरिता नवनवीन कार्यपद्धती व साधने यशस्वीपणे वापरण्यात येत आहेत. विमानतळाच्या अतिभव्य वास्तुविस्ताराला कलात्मकतेची जोड देण्याचे कार्य अनेक वास्तुतज्ञांनी जाणीवपूर्वक केलेले आढळून येते.
लंडनच्या गॅटविक विमानतळाची वास्तुरचना (१९५४-७२) ‘यॉर्क, रोझेनबर्ग अँड मार्डल’ या वास्तुकारांच्या व्यवसायसंस्थेने केली. सर बेसिल स्पेन्स (१९०७-७६) या ब्रिटिश वास्तुतज्ञाने ग्लांसगो विमानतळाची रचना अत्यंत आधुनिक रचनातंत्रे वापरून १९६५ च्या सुमारास केली. अमेरिकन अमेरिकन वास्तुतज्ञ एरो सारिनेन (१९१०-६३) याने वॉशिंग्टन, डी. सी. येथील डलेस विमानतळ (१९५८-६३) तसेच न्यूयॉर्क येथील केनेडी विमानतळावरील ‘ट्रान्सवर्ल्ड एअरलाइन्स’ (१९५६-६२) हे स्थानक या वास्तुरचना केल्या. या वास्तू त्यांच्या अंतर्बाह्य आकारसौंदर्यामुळे नेत्रदिपक ठरल्या आहेत. ट्रान्सवर्ल्ड एअरलाइन्सच्या वास्तुनिर्मितीत, काँक्रिटाच्या पातळ वक्रपृष्ठीय कवचरचनेचा (शेल स्ट्रक्चर) वापर केला असून, त्या प्रवाही वक्ररचनेमुळे त्याचा आकार आकाशात झेप घेणाऱ्या पक्ष्यासारखा दिसतो. प्येर लूईजी नेर्वी (१८९१-१९७९) या इटालियन वास्तुशिल्पज्ञाने १९३५ मध्ये विमानघराची वैशिष्ट्यपूर्ण वास्तुरचना केली व त्याच धर्तीवर लष्करासाठी १९३६ ते १९४१ या काळात वैविध्यपूर्ण विमानघर-रचना केल्या.
भारतातील दिल्ली, मुंबई, कलकत्ता व चेन्नई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळांचे पुनर्रचनेचे काम अमेरिकन वास्तुतज्ञ रिचर्ड बक्मिन्स्टर फुलर (१८९५-१९८३) याने केले आहे. यांशिवाय बंगलोर, मंगलोर, अहमदाबाद इ. शहरांतील विमानतळांचेही विस्तारीकरण केले जात आहे.
युद्धकाळात तसेच शांततेच्या काळात देशात लष्करी विमानतळ उभारले जातात. हे विमानतळ लष्करावरील खर्चातून बांधले जातात आणि त्यांची व्यवस्था लष्कराकडे असते. वेगळे असे लष्करी विमानतळ उभे करण्याची गरज गोपनीय सुरक्षिततेच्या दृष्टीने भासते. शत्रूला गुप्तहेरांकडून आपल्या हवाई दलाची व विमानतळांची माहिती मिळू नये म्हणून काळजी घ्यावी लागते. शिवाय लढाई सुरू होताच, किंबहुना एखाद-दुसरा दिवस आधीच, शत्रूची विमाने आकस्मित हल्ले करून लष्करी तळावर असलेली सर्व विमाने जागच्या जागी नष्ट करण्याचा प्रयत्नत करतात. त्यामुळे लष्करी विमानतळांवर विमाने विखरून ठेवतात व त्यांचे संरक्षण करण्याकरिता मातीचे जाड तट उभे करतात. कित्येक वेळा विमानांकरिता तळघरे अथवा भुयारेही बांधतात. शत्रूला आकाशातून विमानतळ ओळखता येऊ नयेत, म्हणून ते वेड्यावाकड्या रंगीत आकृत्यांनी झाकून नैसर्गिक पार्श्वभूमीचा एक भाग बनतील अशा तऱ्हेचे मायावरण साधले जाते. तसेच विमानांवर जाळी टाकून त्यात रंगीत कापडाच्या चिंध्या बांधून विमाने वरून शत्रूला ओळखता येऊ नयेत अशी व्यवस्था करतात. लष्करी विमानतळाजवळ मोठी नदी किंवा सरोवर असणे धोक्याचे ठरू शकते. कारण पाण्याच्या सपाट पृष्ठभागामुळे विमानतळाची जागा सहज ओळखता येते. तसेच तो मायावरणाच्या योजना वापरून दिसणार नाही, अशा रीतीने प्रभावीपणे झाकता येत नाही.
लष्करी विमानतळावर दारूगोळा ठेवण्याकरिता कोठारे बांधावी लागतात, तसेच विमानात बाँब आदी चढविण्याकरिता आवश्यक सोयी कराव्या लागतात. वैमानिकांना युद्धकाळी इशारा मिळताच तत्क्षणी उड्डाण करून लष्करी कारवाईत भाग घ्यावा लागतो. इतर वेळी त्यांच्याकरिता विश्रातींच्या जागा तेथेच असाव्या लागतात.
लष्करी विमानतळावरची धावपट्टी विमानांच्या गरजेप्रमाणे ठेवावी लागते. कधीकधी अनेक लष्करी विमाने एकाच वेळी अनेक समांतर धावपट्ट्यांवरून उडवावी लागतात आणि यासाठी धावपट्ट्या निराळ्या पद्धतीने बांधतात. पुष्कळदा असा विमानतळ सपाट मैदानासारखा असतो. त्यामुळे अडचणीच्या वेळी याच्या कोणत्याही भागावर विमान उतरविता येते. अशा विमानतळावर बाँब पडल्यास त्याचे फारसे नुकसान होत नाही, तो संपूर्णपणे निकामी न झाल्याने त्याच्या भोवतालच्या भागाचा उपयोग करता येतो. ठराविक धावपट्ट्या असलेला विमानतळ मात्र बाँब हल्ल्याने पूर्णपणे निकामी होऊ शकतो. शक्यतो असे विमानतळ नागरी वस्ती व विमानतळांपासून दूर ठेवले जातात. कारण नागरी वाहतुकीचा प्रश्न असल्यामुळे लष्करी विमानतळावर हल्ले झाल्यास नागरिकांचे जीवित व वित्त धोक्यात येण्याची शक्यता असते.
लष्करी विमानतळ बांधताना दोन गोष्टींचा विचार करावा लागतो :
(१) आपल्या विमानांचा हल्ला व शत्रूच्या केंद्रांचे व महत्त्वाच्या ठिकाणचे अंतर आणि
(२) शत्रूसुद्धा याचप्रकारे विमानांचा पल्ला व महत्त्वाच्या ठिकाणांची केंद्रे व अंतर यांचा विचार करून विमानतळ बांधतो.
त्यामुळे ह्या बाबी परस्परविरोधी ठरतात. जर आपले विमानतळ शत्रूपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीने आत दूर बांधले, तर आपली विमाने पुन्हा इंधन भरल्याशिवाय शत्रूच्या केंद्रांवर मारा करू शकत नाहीत. त्यामुळे आघाडीचे तळ किंवा धावपट्ट्या व पिछाडीचे तळ अशा दोन स्तरांवर लष्करी विमानतळांची रचना करावी लागते. पिछाडीच्या तळांवर दुसऱ्या अनेक सुविधा असतात.
शत्रूच्या विमानांच्या हल्ल्यांची लवकरात लवकर सूचना मिळावी म्हणून विमानतळावर रडार यंत्रणा बसवलेली असते; परंतु रडारच्या पडद्यावर विमानांची हालचाल दिसू नये म्हणून शत्रू शक्यतो खाली येऊन हल्ले करतो किंवा रडारला गोंधळवून टाकण्याकरिता विमानातून धातूचे बारीक तुकडे बाहेर फेकले जातात. बचावाचे उपाय योजण्यास शक्यतो कमी कालावधी मिळावा असा शत्रूचा प्रयत्नच असतो.
शत्रूच्या विमानहल्ल्यापासून संरक्षण करण्याकरिता विमानवेधी तोफा व क्षेपणास्त्रांचा उपयोग केला जातो; तसेच आपली विमाने हवेत उड्डाण करून शत्रूच्या विमानांवर हल्ले करतात.
दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीस जर्मनीने ब्रिटनचे हवाई दल व विमानतळ नष्ट करण्याच्या उद्देशाने हवाई हल्ले केले; पण ब्रिटिश हवाई दलाने अतुल पराक्रम गाजवून त्यांचे हल्ले परतवून लावले. या काळात ब्रिटनने आघाडीचे विमानतळ व पिछाडीचे विमानतळ बांधले; त्यांचे संरक्षण करणे, हवाई दलांची माडणी करणे व कार्यक्षेत्र ठरविणे, वेगवेगळ्या तळांवरून हवाई उड्डाण करून विमाने हवेत एकत्र येऊन शेकडोंनी जर्मनीवर हल्ले करणे, अथवा इंग्लंडवर येणारी जर्मन विमाने परतवून लावणे इ. तंत्रे विकसित केली. अशा प्रकारे ब्रिटनने १९४०-४१ मध्ये ही महत्त्वाची लढाई (बॅटल ऑफ ब्रिटन) जिंकली.
लष्करी विमानतळावर शत्रूचे हेर किंवा खास प्रशिक्षण घेतलेले कमांडो, सागरी सेना (मरीन्स) अथवा छत्रीधारी सैन्य हल्ले करतात. त्यांपासून संरक्षण करण्याकरिता इंग्लंतडमध्ये रॉयल एअर फोर्स रेजिमेंट्स (आर्. ए. एफ्. रेजिमेंट) उभारण्यात आल्या. भारतात हे काम प्रादेशिक सेनेच्या पलटणी करतात.
सागरातील विमानवाहू जहाज हा एक प्रकारचा तरता विमानतळ होय. सागरी हालचालींचे निरीक्षण करणे; तसेच समुद्रपार असलेली बंदरे, लोहमार्ग, तेलसाठे, महत्त्वाचे पूल, शत्रूचे आघाडीचे विमानतळ, मालवाहू जहाजे इत्यादींवर हल्ले करण्याची कामगिरी विमानवाहू जहीजीवरील विमानांवर सोपविली जाते. त्यांचा पल्ला कमी असल्यामुळे ही विमाने विमानवाहू जहाजापासून फार दूर जाऊ शकत नाहीत [विमानवाहू जहाज]. विद्यमान काळात फारसा धावपट्टीचा उपयोग न करता कमीत कमी अंतर कापून उड्डाण करणारी आणि थोड्या अंतरावर उतरणारी विमाने बनविली आहेत. उदा., ‘व्हर्टिकल टेक-ऑफ अँड लँडिंग’ (व्हीटीओएल) व ‘शॉर्ट टेक-ऑफ अँड लँडिंग’ (एसटीओएल), तसेच विमानवाहू व इतर काही जहाजांवर हेलिकॉप्टरे ठेवतात. लष्कराच्या सागरी विमानांसाठी समुद्रात, उपसागरात, सरोवरात अथवा नदीच्या मोठ्या व संथ पात्रात निराळ्या धावपट्ट्या न बनविता, ती क्षेत्रे राखून ठेवतात. [सागरी विमाने]. त्यामुळे पुढील काळात लष्करी विमानतळांचे स्वरूप पालटण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
भारतात लष्करी विमानतळ बांधणे, त्यांची दुरुस्ती व डागडुजी करणे ही जबाबदारी सैनिकी अभियांत्रिकी सेवेकडे (मिलिटरी एंजिनिअरिंग सर्व्हिसेस) असते. या कार्यावर देखरेख करण्याकरिता कमांडर वर्क्स एंजिनिअर (सी. डब्ल्यू. ई.), गॅरिसन एंजिनिअर (जी. ई.) इ. अधिकारी असतात. धावपट्ट्या, विमानघरे वगैरे मोठी बांधकामे खाजगी कंत्राटदार नेमून करून घेतली जातात. आघाडीवरील धावपट्ट्या किंवा विमानतळ ह्यांना जोडणारे रस्ते बांधण्याचे काम ‘बॉर्डर रोड्स टास्क फोर्स’ (बी. आर्.टी. एफ्.) करतात. जेथे विमानतळ उभारले जातात तेथील भौगोलिक परिस्थिती, जमीन, हवामान, वने वगैरेंचा विचार केला जातो. दुसऱ्या महायुद्धात जपानने जिंकून घेतलेल्या म्यान्मारवर (ब्रह्मदेशावर) हल्ले करण्याकरिता दिमापूर, मणिपूर, कोहीमा आदी ठिकाणी धावपट्ट्या बांधण्यात आल्या होत्या. या धावपट्ट्या पावसाळी दलदलीच्या भागांत असल्यामुळे तेथे त्या वेळी ताग व डांबर ह्यांच्या चटया लोखंडी जाळीवर अंथरण्यात आल्या; तर राजस्थानमध्ये वाळवंटात विमानतळ उभे करताना लोखंड व सिमेट वापरून धावपट्टी बांधावी लागली.
लढाईच्या वेळी शत्रूची धावपट्टी निकामी करण्याकरिता, धावपट्टीवर विमानांतून स्फोटक पदार्थ, बाँब वगैरे टाकून खड्डे निर्माण केले जातात. १९७१ च्या बांगला देशाच्या युद्धात डाक्का येथील विमानतळावरची धावपट्टी अशा तऱ्हेने निकामी केली होती.
लेखक : १) का. ग. पित्रे
२) नि. वि. बाळ
३) मा. ग. देवभक्त
४) शा. चिं. ओक
५) अ.ना. ठाकूर
६) गो. म. आपटे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/30/2020
विमानांचे आगमन व प्रस्थान यांसाठी असलेले ठिकाण.