विमानांचे आगमन व प्रस्थान यांसाठी असलेले ठिकाण. विमानाचे आरोहण, अवतरण व जमिनीवरील हालचाल यांसाठी मुख्यतः विमानतळाचा उपयोग होतो. शिवाय येथे बहुधा विमानात इंधन भरणे, त्याची देखभाल व दुरुस्ती करणे, प्रवाशांच्या सोयीसुविधा, माल साठविणे, आगनिवारण, वैद्यकीय सेवा, सुरक्षाव्यवस्था इ. पूरक सोयीही विमानतळावर असतात. यांकरिता विमानतळावर इमारती, अधिष्ठापने, सुविधा वगैरे उभारतात. विमानाच्या उड्डाणाचे स्वरूप व व्याप, हवाई वाहतुकीचा प्रकार (उदा., प्रवासी, माल, टपाल इ.) व प्रमाण, वापर करणाऱ्या विमानांची संख्या व प्रकार आणि पोहोचमार्ग, धावपट्टी व प्रभाव क्षेत्र यांचे संरक्षण वगैरे गोष्टींवर विमानतळाचे आकारमान व तेथील विविध सुविधांचे प्रमाण ही अवलंबून असतात.
वजनाला हलक्या, एक एंजिनाच्या छोट्या विमानासाठी असलेल्या विमानतळावर गवत असलेली कमी लांबीची धावपट्टी, विमान थांबविण्यासाठी जागा (उघडी), माल ठेवण्यासाठी जागा व एकाच प्रकारचे इंधन भरण्याची सोय, एवढ्याच गोष्टींची गरज भासते. विमान कंपन्यांमार्फत हवाई वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या महानगरी क्षेत्रातील मोठ्या विमानतळावर पुढील गोष्टी असणे गरजेचे असते: सुमारे ३.२ किमी. पेक्षा अधिक लांबीच्या अनेक फरसबंद धावपट्ट्या; सर्व प्रकारची विमाने ठेवण्यासाठी, तसेच त्यांची देखभाल, दुरूस्ती व सर्वथा परीक्षण करण्यासाठी लहानमोठी विमान घरे; विमान ते वाहनतळ येथपर्यंत प्रवासी व त्यांचे सामान यांची हाताळणी (देखभाल) करणारी संबंधित सुखसोयी असलेली प्रवासी स्थानके, अशाच तऱहेची माल, टपाल इ. हाताळणारी खास स्थानके; अवतरण, आरोहण , पोहोचमार्ग, भरणतळ, टॅक्सीपथ यांना साहाय्यक सुविधा; शोधदीप, शलाकादीप व संकेतदीप यांद्वारे केलेले प्रकाशन वगैरे.
गर्दीच्या मोठ्या विमानतळांवरमार्गनिर्देशन व सुविकसित दर्जाच्या विविध अवतरण-साहाय्यक सुविधा यांची सोय असते. वाहतुकीचे प्रमाण व दृश्यमानतेची परिस्थिती यांनुसार मार्गनिर्देशनाच्या सोयी करतात. हवाई वाहतूक नियंत्रणासाठी नियंत्रक मनोरा, तसेच रेडिओ, दूरध्वनी, बिनतारी इ. संदेशवहनाच्या सोयी असतात. शिवाय मार्गनिर्देशनासाठी प्रगत रडार यंत्रणा असतात. यांद्वारे नियंत्रक जवळपास उडत असलेली व विमानतळावरील विमाने पडद्यावर पाहू शकतात. दृश्यमानता खराब असताना या सामग्रीचा सुव्यवस्थित नियंत्रणासाठी विशेष उपयोग होतो. या सामग्रीत अलीकडे झालेल्या सुधारणांमुळे विमान अधिक चांगल्या प्रकारे ओळखता येऊ लागले. यात संगणकांचाही वापर करण्यात येत आहे. त्यामुळे विमानांच्या विमानतळावरील अवतरणांचा व आरोहणांचा क्रम ठरविण्यास मदत होते.
हवाई वाहतुकीचा उपयोग मुख्यतः लांब अंतराच्या व जलदप्रवासासाठी होतो. यामुळे विमानतळ वाहतुकीची महत्त्वाची केंद्रे झाली आहेत. जगातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळांवर दररोज १,२०० पर्यंत विमाने, ९०,००० पर्यंत प्रवासी आणि शेकडो टन मालाची चढ-उतार होते. प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अमेरिकेतील शिकागोचा ‘ओहारे’ विमानतळ सर्वांत अधिक वर्दळीचा असून त्यानंतर हार्ट्सफील्ड (ॲटलांटा), लॉस अँजेल्स आणि डलास-फोर्ट वर्थ आणि ब्रिटनमधील लंडनच्या हीथरो या आंतरराष्ट्रीय विमानतळांचा क्रम लागतो. मालवाहतुकीच्या बाबतीत अमेरिकेतील मेंफिस (टेनेसी) विमानतळाचा प्रथम क्रमांक आहे. गर्दीच्या विमानतळावर अनेक विमाने आरोहणासाठी सज्ज असतात; तर अवतरणासाठीही विमानांना हवेत घिरट्या घालीत वाट पहावी लागते. विमानतळावर मुख्यतः प्रवासी येतात; शिवाय विमान व विमानतळ कर्मचारी, प्रवाशांना पोहोचवायला येणारे नातलग, मित्र तसेच उद्योजक, पर्यटक आणि विमानतळ पहायला येणारे लोकही तेथे येतात. यांमुळे हे लोक ज्या वाहनांमधून ये-जा करतात त्या प्रवासी मोटारगाड्या, बस, भाड्याच्या व खाजगी मोटारगाड्या, स्कूटर, मोटारसायकली इ. वाहनांसाठी विमानतळाच्या परिसरात वाहनतळ असावा लागतो.
अशा प्रकारे मोठे विमानतळ हे छोट्या शहरांसारखे असतात. त्यामुळे तेथे दुकाने, उपहारगृहे, प्रतीक्षालये, पोलीस दल, आगनिवारण दल, वैद्यकीय सेवा, सिनेमाघर, सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे संयंत्र इत्यादींची व्यवस्था केलेली असते. यांपैकी काही सुविधांचा दैनंदिन वाहतुकीला उपयोग होतोच, शिवाय विमानतळावर थांबावे लागते तेव्हा अथवा आणीबाणीच्या वेळी या सुविधा विशेष महत्त्वाच्या ठरतात.
बस वा रेल्वे स्थानकांशी तुलना केल्यास विमानतळाला पुष्कळ अधिक जागा लागते. अशी मोठी मोकळी जागा शहरांपासून दूरच्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते; यामुळे विशेषतः नवीन विमानतळ शहरांपासून दूर असतात. मध्यम आकारमानाच्या विमानतळाला २०० ते ६०० हे. जमीन लागते. सौदी अरेबियातील रियादजवळच्या किंग खलीद या आंतरराष्ट्रीय विमानतळाने २२,४६४ हे. (२२१ चौ.किमी.) क्षेत्र व्यापले आहे. विमानतळ शहरांपासून दूर असल्याने तेथपर्यंत प्रवासी व मालवाहतुकीची चांगली व्यवस्था असावी लागते, नाही तर हवाई वाहतुकीच्या जलदपणाचा लाभ होत नाही.
नागरी विमानतळांचे आंतरराष्ट्रीय, देशांतर्गत किंवा स्थानिक आणि सर्वसाधारण वैमानिकीय असे प्रमुख प्रकार आहेत. लष्करी विमानतळांचे वर्गीकरण वेगळ्या प्रकारे करतात.आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून निरनिराळ्या देशांमधील हवाई वाहतूक होते. अनेक देशांमधील विमान कंपन्या यांचा वापर करतात. कधीकधी देशांतर्गत वाहतूक व जवळच्या विमानतळांबरोबरची जा-ये (शटल) विमान सेवा यांसाठीही आंतरराष्ट्रीय विमानतळ वापरतात. लंडनच्या हीथरो विमानतळाचा वापर विविध देशांतील ६० हून जास्त विमान कंपन्या करतात व तेथे रोज १,०८० पर्यंत उड्डाणे होतात.देशांतर्गत स्थानिक विमानतळांचे मोठे जाळे असते. प्रादेशिक देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत (खंडपार) जाणारी जा-ये सेवा पुरविणारी विमाने हे विमानतळ वापरतात.
सर्वसाधारण वैमानिकीय विमानतळांचा वापर वेळापत्रकानुसार नसलेली सर्व प्रकारची नागरी विमाने करतात. उद्योग व्यावसायिक व व्यापारी यांची, तसेच खाजगी, भाडोत्री उड्डाणमंडळांची आणि हौशी वैमानिकांच्या प्रशिक्षणाची इ. विमाने हे विमानतळ वापरतात. पिकांवर करायची रसायनांची फवारणी किंवा धुरळणी, हवाई छायाचित्रण, मनोरंजन, सहल, वाहिन्यांची देखभाल आणि गस्त इ. कामांसाठी वापरली जाणारी विमाने यांत येतात. असे पुष्कळ विमानतळ छोटे असून त्यांपैकी काही विमानतळांचा वापर फक्त प्रचालकचालित हलकी विमाने व हेलिकॉप्टरच करू शकतात, तर काही विमानतळांवरील धावपट्ट्या झोत विमानांना वापरता येण्याएवढ्या मोठ्या असतात. विमानवाहू जहाजावरील धावपट्टी हा तरंगता विमानतळ होय. सागरी विमाने सरळ पाण्याच्या पृष्ठभागावर (उदा., सरोवर, जलाशय, उपसागर वा नदीचे संथ पात्र) उतरू शकतात, तर उभयचर विमाने जमिनीवर अथवा पाण्यावर उतरू शकतात. ग्लायडरसाठी लहान, साधा विमानतळ चालतो. वातनौकेसाठी लहान विमानतळ आणि बांधण्यासाठी (नांगरण्यासाठी) बंधमनोरा असतो.
लष्करी विमानतळ सर्वसाधारणपणे संरक्षित क्षेत्रात बांधतात व त्या त्या देशातील हवाई दलामार्फत ते चालविले जातात. सामान्यपणे खाजगी अथवा व्यापारी विमानांना ते वापरता येत नाहीत. या विमानतळांची अधिक माहिती या लेखाच्या शेवची ‘लष्करी विमानतळ’ या उपशीर्षकाखाली दिली आहे.
सध्याच्या काही मोठ्या विमानतळांची सुरूवात छोटे व कमी वर्दळीचे विमानतळ या रूपात झाली होती. हळूहळू त्यांचा विस्तार होत जाऊन त्यांना आजचे स्वरूप प्राप्त झाले. म्हणजे विमाने अधिक मोठी वा वेगवान (उदा., झोत विमाने) झाल्याने त्यांना मोठ्या विमानतळांची गरज भासू लागली. जेथे शक्य होते तेथे धावपट्ट्यांची लांबी वाढवून, स्थानक इमारतींचा विस्तार करून व पर्यायी इमारती बांधून विमानतळाचा विस्तार करण्यात आला. मात्र जेथे विस्तार करणे शक्य नव्हते असे विमानतळ बंद करून ते इतरत्र सुरू करण्यात आले. या विमानतळांसाठी अधिक दूरवरची जागाच उपलब्ध असल्याने तेथे ते उभारले गेले.
विमान कंपन्या, प्रवासी, वैमानिक, माल पाठवू इच्छिणारे इ. विमानतळ वापरणाऱ्यांना शक्य तेवढी सोयीस्कर जागा नागरी विमानतळासाठी निवडतात. मात्र टर्बोजेट अवस्वनी (ध्वनीच्या वेगाच्या जवळपासच्या वेग असणारी) आणि नंतर स्वनातीत (ध्वनींच्या वेगापेक्षा जास्त वेगाची) विमाने पुढे आली व या विमानांना अधिक जागा लागते व त्यांच्या आवाजाचा जवळपासच्या लोकांना त्रास होतो आणि वाढत्या हवाई वाहतुकीने यात भर पडते. यामुळे विमानतळाची जागा लोकांच्या वस्तीपासून दूर निवडावी लागते. अर्थात अशा अनेक विमानतळांभोवती नागरी व औद्योगिक वसाहती उभ्या राहिल्या आहेत. कारण विमानतळामुळे रोजगार उपलब्ध होईल या अपेक्षेने लोक विमानतळाजवळ राहू लागतात, तर वाहतुकीच्या सोयीमुळे उद्योग विमानतळाजवळ उभारले जातात.
पुरेशी लांब धावपट्टी, प्रवासी स्थानके, विमानघरे, टॅक्सीपथ, भरणतळ, वाहनतळ, पूरक सुविधा इत्यादींसाठी पुरेशी मोठी जमीन लागते, तसेच भावी काळात विमानतळाचा विस्तार करावा लागेल व भोवतींच्या लोकांना त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन सुरुवातीलाच मोठी जागा घेऊन ठेवावी लागते. कारण नंतर जमीन उपलब्ध असेलच असे नाही. जागेचा प्राथमिक खर्च यामुळे जास्त होत असला, तरी विमानतळाभोवतीच्या जमिनीचे भाव वाढतात म्हणून चालू व भावी काळासाठी लागणारी सर्व जमीन सुरुवातीलाच खरेदी करणे शेवटी फायदेशीर ठरते. शहरालगतची जमीन महाग असते व फार दूरची जमीन गैरसोयीची ठरते. म्हणून शहराची वाढ कशी होणार आहे, हे त्याच्या आराखड्यावरून पाहतात अथवा त्याचा अंदाज घेतात. शहरांची लोकसंख्या, तेथील व्यापार, व्यवसाय, कारखाने व तेथील उत्पादने, प्रवासाची इतर साधने आणि हवाई वाहतुकीसाठी पूरक असलेल्या सर्व बाबींचा विचार करावा लागतो. जमिनीच्या किंमती प्रमाणेच जमीन संपादनाचे कायदेही विचारात घेतात.
विमानतळाच्या उभारणीस सभोवतालच्या लोकांचा विरोध होऊ शकतो हे लक्षात घेऊन विमानतळामुळे होणारे आर्थिक लाभ, वाहतुकीची सोय आणि रोजगाराच्या संभाव्य संधी या मुद्यांवर भर देऊन समाजशिक्षण केल्यास सभोवतालचे सामाजिक वातावरण चांगले रहाण्यास मदत होते, तसेच विमानतळाची जागा निवडताना पर्यावरणाचा किमान ऱ्हास होईल, हे पाहतात.
जमिनीची निवड करताना तिच्याभोवतीच्या क्षेत्रात टेकड्या, उंच मनोरे, इमारती, कारखान्यांची धुराडी इ. अडथळे कमीत कमी असतील हे पहावे लागते. यांकरिता जागेच्या हवाई छायाचित्रांचा चांगला उपयोग होतो. स्थानिक हवामानाची दोन प्रकारे दखल विमानतळाची जागा निवडताना घेतात. जवळ असणारे जलाशय, धूर बाहेर टाकणारे उद्योग, धुके, वादळे, वाऱ्यांची दिशा यांचा दृश्यमानतेवर होणारा परिणाम विचारात घेतात. तसेच तेथील प्रचलित वाऱ्यांची दिशा व वेग यांचा धावपट्टी बांधताना विचार करावा लागतो. शिवाय तेथील भूमिस्वरूपेही या दृष्टीने महत्त्वाची ठरू शकतात. जवळपास खाटीकखाना असल्यास तेथे गिधाडे, घारी वगैरे पक्ष्यांचा वावर वाढून विमानांना धोका पोहोचू शकतो हे लक्षात धरावे लागते. तसेच पक्ष्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून विमानतळाच्या संपूर्ण परिसरात झाडे लावत नाहीत.
विमानतळाची जागा ठरविताना तेथील मृदा व अधोमृदा (तळजमीन) यांचे स्वरूप, संघटन व पाणी असतानाचे वर्तन हे महत्त्वाचे घटक ठरतात. कारण धावपट्टी, टॅक्सीपथ, भरणतळ इत्यादींचा टिकाऊपणा व पर्यायाने आयुर्मर्यादा यांच्या दृष्टीने तेथील पाण्याचा मृदेतून व अधोमृदेतून चांगला निचरा होणे आवश्यक असते. असा निचरा चांगला होत नसल्यास अधोमृदा अस्थिर होऊन धावपट्टीची सर्वाधिक हानी होते. यामुळे मऊ, पाणथळ नसलेली माळरानाची जमीन चांगली ठरते. अशी जमीन सर्वसाधारणपणे सपाट, उलट्या तव्यासारखी फुगीर असल्यास सोयीची ठरते. वापरात नसलेली मोकळी जमीन अथवा कमी खर्चात सहजपणे समतल करता येईल अशी जमीनही विमानतळासाठी चांगली मानतात.
विमानतळ बांधण्यासाठी लागणारे बांधकाम साहित्य (उदा., दगड, खडी, लोखंड इ.) तसेच कामगार जवळपास उपलब्ध असणे हाही मुद्दा विमानतळाची जागा ठरविताना विचारात घेतात. इतर विमानतळांपासून ही जागा पुरेशी दूर असावी लागते, यामुळे प्रचलित हवाई वाहतुकीत अडथळे येत नाहीत. शिवाय विमानतळापर्यंतच्या व एकूण सभोवतालचा रस्ता व अन्य वाहतुकीचाही विचार करतात. म्हणजे विमानतळापर्यंत अशी वेगवान वाहतूक उपलब्ध असावी अथवा निर्माण करता येण्यासारखी परिस्थिती असावी लागते.
भावी काळात हवाई वाहतुकीत मोठी वाढ होईल अशी चिन्हे आहेत. त्यामुळे संपूर्ण देशाचा विचार करून विमानतळाच्या संभाव्य जागा ठरवून त्या योग्य वेळी संपादन करता येतील अशा तऱ्हेने मोकळ्या ठेवाव्यात. तसेच प्रत्येक शहराच्या सुधारणेच्या आराखड्यात विमानतळासाठी जागा ठरवून ठेवावी, असे मत मांडले जाते.
विमानतळाचा आराखडा हा इतर वाहतूक स्थानकांपेक्षा वेगळा असतो. कारण विमानाच्या रचनेत सतत बदल व सुधारणा होत असतात. कोणताही विमानतळ ठरीव साच्याचा नसतो. स्थलकालानुरूप त्यात केवळ अद्ययावत तरतूद करून चालत नाही, तर भावी कालातील संभाव्य गरजा लक्षात घेऊन विमानतळाची रचना करावी लागते. एखाद्या चांगल्या विमानतळाची नक्कल सर्वस्वी योग्यच ठरेल असेही नाही. प्रत्येक ठिकाणच्या विमानतळाचा काही प्रमाणात स्वतंत्रपणे विचार करावा लागतो. विमानतळाचा आराखडा लवचिक असावा लागतो, त्यामुळे विमानतळाची रचना पूर्ण होईपर्यंत त्यात आवश्यक ते फेरबदल करता येतात. शिवाय भविष्य काळातील हवाई वाहतुकीलाही तो पुरेसा ठरेल या दृष्टीने त्याचे आकारमान ठरवावे लागते.
इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन ऑर्गनायझेशन (आयसीएओ) या संयुक्त राष्ट्राच्या संघटनेने विमानतळ व धावपट्ट्या यांचा अभिकल्प व मांडणी यांविषयीची अनुभवसिद्ध मानके तयार केली आहेत. उदा., धावपट्टी व टॅक्सीपथ यांची लांबी, रुंदी व बल; सीमावर्ती अडथळ्यांची स्थिती, प्रकाशन, मार्गनिर्देशन, संदेशवहन इत्यादींविषयी अशी मानके आहेत.
विमानतळाची आखणी व आराखडा तयार करण्याआधी पुढील गोष्टी विचारात घेतात
त्या क्षेत्रात होत असलेली हवाई वाहतूक व भावी काळात तिच्यात होणारी संभाव्य वाढ; विमानतळ वापरणाऱ्या विमानांची संख्या व प्रकार, विमानतळाचा कमाल वापर होण्याच्या काळातील वाहतुकीचे सरासरी प्रमाण आणि प्रस्तावित विमानतळाचे जवळच्या विमानतळांच्या संदर्भातील स्थान. यांमुळे योग्य प्रकारचा विमानतळ उभारण्याचा निर्णय घेण्यास मदत होते.
दुसऱ्या महायुद्धानंतर विमान वाहतूक उद्योग झपाट्याने वाढला. प्रवासी व त्यांचे सामान, टपाल, माल यांची विमानांद्वारे होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली. तसेच उच्च वेगाची व मोठी विमाने पुढे आली. यांतून अनेक प्रश्न उभे राहिले. उदा., हवाई व रस्ता वाहतुकीतील गर्दी व तीमुळे होणारी कोंडी, सुटीच्या काळात वाढणारी विमानांच्या अवतरणांची आणि आरोहणांची संख्या व यामुळे होणारा प्रवाशांचा खोळंबा, विमानतळांजवळ राहणाऱ्यांच्या आवाज व प्रदूषण यांविषयीच्या तक्रारी व त्यामुळे विमानतळाच्या विस्ताराला व नवीन विमानतळ उभारण्यास होणारा विरोध वगैरे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विमानतळाच्या व तेथील इमारती, सोयीसुविधा इत्यादींच्या अभिकल्पांत (आराखड्यांत) बदल करावे लागले. त्यांत नवनवीन संकल्पना सतत पुढे येत आहेत. यांमुळे हे अभिकल्प भावी काळातील विस्तार व बदल लक्षात घेऊन लवचिक आणि वाढत्या व्यापाचे असावे लागतात. विमानतळाच्या नियोजनकाराने अशी दूरदृष्टी दाखविल्याने विमानतळ दीर्घकाळ वापरण्यायोग्य राहतो.
नियोजनकार बृहत् योजना तयार करतात. पूर्ण विकसित विमानतळ भावी २०-३० वर्षांकरिता असेल, हे या योजनेत दाखविलेले असते. विमानतळाची उभारणी टप्प्याटप्प्याने करतात (आ.१) व त्यासाठी ही योजना मार्गदर्शक असते. मात्र एखादी सुविधा पूर्ण झाली की, तिचा वापर शक्य तितक्या लवकर सुरू करतात.
सुरुवातीला हवाई वाहतूक हे नावीन्य अथवा चैनीची बाब होती. मात्र आता हे उद्योगव्यापाराचे एक आवश्यक अंग झाले आहे. एखाद्या कारखान्याची जागा ठरविताना हवाई सेवा विचारात घेतात. अशा विमानतळालगतच्या उद्योगांना ‘विमानतळ आधारित उद्योग’ म्हणतात. असे उद्योग व हवाई वाहतुकीशी निगडित रोजगारांच्या संधी यांमुळे काही भागांत विमानतळ हे रोजगार निर्मितीचे केंद्र झाले आहे. मोठ्या प्रमाणावर वाहतूक असलेल्या रस्त्यालगतचा विमानतळ हे व्यापारी केंद्रही होते. याची विमानतळावरील व सभोवतालच्या क्षेत्रातील बाजारपेठांना मदत होते. यातून विमानतळाला महसूल मिळतो आणि त्याचा आर्थिक भार कमी होऊ शकतो. यामुळे आधुनिक विमानतळ उभारताना हवाई वाहतुकीचे केंद्र म्हणून असलेल्या विमानतळाच्या किमान गरजांच्या पलीकडे जाऊन विमानतळाचा आराखडा बनवावा लागतो. या इतर कामांसाठी जमीन व सुविधा पुरविण्याचा विचार नियोजनात करावा लागतो. विमानतळालगतची काही जमीन त्यावर आधारित उद्योगांसाठी राखून ठेवतात किंवा काही ठिकाणी ते औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित करतात. त्यामुळे औद्योगिक जमिनीची वाढती मागणी पुरी करता येते तसेच प्रत्यक्ष विमानतळ व त्याभोवतीची नागरी वस्ती याच्यांत एक अडसर प्रदेश निर्माण होऊन आवाज व प्रदूषणविषयक समस्यांचे काही प्रमाणात निराकरण होते. विमानतळाजवळ आणि आजूबाजूस उद्याने व क्रीडांगणे तयार केल्यास विमानतळाच्या उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध होऊ शकते.
वेळापत्रकानुसार होणारी हवाई वाहतुकीची व सर्वसाधारणपणे वैमानिकीय विमाने ठेवणे, त्यांची दुरुस्ती, देखभाल, सर्वथा परीक्षण इत्यादींसाठी जागा ठेवावी लागते. धावपट्टी, प्रवासी तसेच टपाल व माल स्थानके, नियंत्रण मनोरा, विमानघरे, टॅक्सीपथ व भरणतळ, वाहनतळ, हवामान केंद्र, इंधन भरण्याची व साठविण्याची सोय, प्रेक्षक सज्जा वगैरेंसाठी विमानतळावर जागा ठेवून अभिकल्प तयार करावा लागतो. आंतरराष्ट्रीय विमानतळांवर विलग्नवास (वनस्पती व प्राण्यांसाठी), सीमाशुल्क, आप्रवास (स्थायिक होण्यासाठी येणाऱ्यांची व्यवस्था), सार्वजनिक आरोग्य, परदेशी चलनाचे व्यवहार इत्यादींसाठीही व्यवस्था करावी लागते व त्यानुसार विमानतळाच्या अभिकल्पात तरतूद करतात.
विमानतळांचे आकारमान व प्रकार तसेच त्याचा वापर करणाऱ्या विमानांचे आकारमान व प्रकार यांनुसार तेथील सोयीसुविधा व कामे करतात. यांपैकी काही प्रमुख सोयीसुविधांची माहिती थोडक्यात पुढे दिली आहे.
विमानतळाचा पृष्ठभाग सर्व प्रकारच्या हवामानांत सर्व प्रकारची कामे करता येतील असा घट्ट व कठीण असावा लागतो, तसेच विमानाचे अवतरण, आरोहण व विमानतळावरील हालचाल यांसाठी लागणारा पृष्ठभागही असा टणक असावा लागतो. सुरुवातीच्या धावपट्ट्या या गवत असलेले वा नसलेले जमिनीचे सपाट तुकडे असत. १९०४-२० या काळात टेकडीच्या उतारावर लाकडी फळ्या टाकून धावपट्टी बनवीत. तिच्यावरून विमान घसरत जाऊन प्रवेगाद्वारे त्याला आरोहणाला लागणारी गती प्राप्त होई. म्हणजे या गतीमुळे विमानाला पंख्यांमार्फत त्याच्या वजनाएवढी उच्चालक प्रेरणा लाभत असे. कारण विशिष्ट आकाराचा पंख हवेतून पुढे जाताना त्या दिशेला जवळजवळ काटकोनात अशी उच्चालक प्रेरणा निर्माण होऊन विमान उचलले जाते. अवतरणाच्या वेळी याच्या उलट कार्य घडते. ही गती हवेच्या (जमिनीच्या नव्हे) सापेक्ष असते. यामुळे विमान वाऱ्यात घुसते म्हणजे वाऱ्याच्या दिशेच्या विरुद्ध जाते तेव्हा त्याला आरोहणाला आवश्यक असलेली उच्चालक प्रेरणा कमी अंतरात प्राप्त होते, उलट वाऱ्याच्या दिशेत वा तिला छेदून जाताना यासाठी विमानाला अधिक अंतर कापावे लागते. त्यामुळे वाऱ्याची गती व दिशा यांचा अभ्यास करून धावपट्टीची लांबी व दिक्स्थिती ठरविली जाते. अशी रीतीने वाऱ्याला संवेदनशील असणाऱ्या विमानांसाठी वाऱ्याचा लाभ मिळावा म्हणून दोन दिशांतील धावपट्ट्या असतात. प्रचलित वाऱ्यांची दिशा विशेष बदलत नसेल अशा ठिकाणी अशा अनेक धावपट्ट्यांची गरज नसते. उदा., लॉस अँजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बहुसंख्य आरोहणे पूर्व-पश्चिम दिशेतील धावपट्टीवरून होतात, तेथील दक्षिणोत्तर धावपट्टी क्वचितच वापरली जाते.
सुरुवातीला विमाने लहान व वजनाला हलकी होती. त्यामुळे आरोहणयोग्य गती मिळविण्यासाठी त्यांना सापेक्षतः कमी अंतर कापावे लागे. पंखाचे क्षेत्रफळ व एंजिनाची शक्ती यांच्या संदर्भात विमानाचे वजन जसजसे वाढत गेले, तसतसे आरोहणयोग्य गती मिळविण्यासाठी त्यांना अधिकाधिक अंतर कापणे गरजेचे झाले. यामुळे धावपट्टीची लांबी वाढवावी लागली, तसेच या विमानांना अधिक कठीण पृष्ठभागाची गरज भासू लागली. यातून धावपट्टीची लांबी ४.६ किमी.पर्यंत (दोन्हीकडील मुक्त क्षेत्रे धरून) वाढली आणि काँक्रिट किंवा अस्फाल्ट आवरणाने फरसबंद केलेल्या धावपट्ट्या वापरतात आल्या.
अशा तऱ्हेने धावपट्टीची लांबी विमानाचे आकारमान, वजन व वेग, हवेचा दाब व तापमान यांवर अवलंबून असते. अधिक तापमानाला व अधिक उंचीवर हवेची घनता कमी असल्याने अशा ठिकाणी अधिक लांब धावपट्टीची गरज असते. उदा., समुद्रसपाटीपासून सु. १,८०० मी. उंचीवर धावपट्टीची लांबी ४२ टक्क्यांनी जास्त लागते.
विमानाच्या अभिकल्पात सुधारणा होऊन ती अधिक मोठी, जड व वेगवान झाली. अशा विमानांवर वाऱ्याचा विशेष परिणाम होत नाही. त्यामुळे आधुनिक वाहतूक विमानासाठी अनेक दिशांतील धावपट्ट्यांची गरज कमी झाली. तथापि हवाई वाहतूक वाढल्याने अनेक धावपट्ट्यांची गरज असतेच. काही ठिकाणी दुहेरी धावपट्ट्या बनविण्यात आल्या. यामुळे एकाच वेळी दोन विमानांना ती वापरता येते. काही ठिकाणी मध्यभागी स्थानक इमारती व त्यांच्याभोवती अरीय (त्रिज्यीय) मांडणीच्या धावपट्ट्या अशी रचना करण्यात आली. प्रत्येक प्रकारच्या विमानासाठी धावपट्टीची एक किमान लांबी आणि रुंदी असते. त्यामुळे विमानतळाचा वापर करणाऱ्या सर्वांत मोठ्या विमानाला पुरेशी एवढी धावपट्टीची लांबी-रुंदी असावी लागते.
लहान विमानतळावरील धावपट्ट्या साध्या जमिनीच्या पण विमानाचे वजन पेलू शकणाऱ्या असतात. ही जमीन घट्ट व एकसारख्या गुणधर्मांची असावी लागते. यामुळे तिच्यावर खड्डे पडत नाहीत. पावसाच्या पाण्याने व सांडपाण्याने ती खराब होऊ नये म्हणून पाण्याच्या चांगल्या निचऱ्याची सोय करतात. जमीन योग्य गुणधर्मांची नसल्यास वाळू, चिकणमाती, चुना, सिमेट, दगडाची भुकटी, अस्फाल्ट, बिट्युमेन, मीठ, कॅल्शियम क्लोराइड इ. द्रव्ये योग्य प्रमाणात मिसळून तिच्या गुणधर्मांत सुधारणा करतात. या मिश्रणाआधी मातीचे शास्त्रीय परीक्षण करतात. नांगरलेल्या जमिनीत आवश्यक ती द्रव्ये योग्य प्रमाणात मिसळून व योग्य उतार देऊन जमिनीवरून रूळ फिरवितात. अशा घट्ट केलेल्या धावपट्टीची निगा काळजीपूर्वक ठेवावी लागते. हरळीसारख्या गवताचे आच्छादन ठेवून जमिनीचा घट्टपणा राखता येतो. अशा धावपट्टीचा वापर कमी वजनाची विमाने करतात.
मोठ्या विमांनासाठी धावपट्टी घट्ट, स्थिर, कठीण व पाण्याने खराब न होणारी असावी लागते. अशा धावपट्टीचा अभिकल्प तयार करताना अधोमृदेचे गुणधर्म, तिच्यावर पडणारा भार, अपेक्षित टिकाऊपणा (आयुर्मर्यादा), आवश्यक सामाग्रीची उपलब्धता, तिच्यावरील वर्दळ, हवामानांतील बदल, खर्चाची मर्यादा व इतर स्थानिक गरजा यांचा विचार करतात. तसेच विमानतळाचा भावी काळात वापर करणाऱ्या सर्वाधिक वजनाच्या संभाव्य विमानाने पडणाऱ्या भाराला अनुरूप असा या पृष्ठभागाचा अभिकल्प करणे गरजेचे असते.
धावपट्टीची रचना हमरस्त्यासारखी असते, मात्र धावपट्टीवर पडणारा एकूण भार अधिक असतो. यामुळे धावपट्टीवरील आवरण अधिक जाड असते. जमिनीची दृढता योग्य प्रमाणात वाढविल्यास वरील आवरणाची जाडी कमीही चालते.
धावपट्टीवरील आवरण दृढ व लवचिक या दोन प्रकारचे असते. दृढ आवरणासाठी काँक्रीट, खडी किंवा अस्फाल्ट यांचा, तर लवचिक आवरणासाठी बिट्युमेन, पायस, जड व हलक्या तेलांची मिश्रणे वगैरेंचा वापर करतात. धावपट्ट्यांना परिस्थितीनुसार एकाच दिशेत उतार न देता जागेच्या सोयीनुसार तो उलट वा सुलट असा देतात. मात्र सु. ३ मी. उंचीवरून संपूर्ण धावपट्टी दिसेल एवढाच हा उतार असतो. खालील जमिनीची धारणाशक्ती, वापरावयाच्या द्रव्यांचे गुणधर्म, विमानाच्या चाकांचा भार व त्यांवरील धावेची लवचिकता इत्यादींचा विचार करून धावपट्टीच्या आवरणाची जाडी ठरवितात. आवरणाचा अभिकल्प तयार करताना प्रत्यक्ष प्रयोगांतून मिळालेल्या माहितीचाही उपयोग करतात.
धावपट्टी फरसबंद करण्यासाठी काँक्रीट किंवा अस्फाल्ट वापरतात. काँक्रीटचा पृष्ठभाग रात्रीच्या वेळी अधिक स्पष्ट दिसतो, तर अस्फाल्टच्या पृष्ठभागावरचे हिम लवकर वितळते. काँक्रीटची धावपट्टी दीर्घकाळ टिकते व तिची देखभाल करणेही अधिक सोपे असते, मात्र तिला अधिक खर्च येतो. काँक्रीटच्या धावपट्टीत जोड असतात. जोडाच्या ठिकाणी तडे जाण्याची वा पाणी झिरपून खालील जमीन मऊ होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी जोडांमध्ये अस्फाल्टयुक्त नमद्याचे पट्टे बसवितात.
लवचिक आवरण त्यामानाने कमी जाड असून त्यात जोड नसतात. मध्यम स्वरूपाचा भार सहन करण्याच्या दृष्टीने लवचिक आवरण योग्य असून ते दोन टप्प्यांत तयार करतात. खालील जमीन हवी तेवढी घट्ट करून व तिला आवश्यक तेवढा उतार देऊन त्यावर लवचिक द्रव्याचा एक थर देतात. मग त्यावर आणखी एक थर देतात. वरचा थर वापराने झिजतो व गरजेप्रमाणे तो पुनःपुन्हा नव्याने तयार करतात. यामुळे धावपट्टी नेहमी कार्यक्षम राहते व खर्चही कमी येतो.
युद्धाच्या वेळी तातडीने धावपट्टी करावी लागते. यासाठी प्रथम जमीन समतल करून घेतात. तिच्यावर योग्य प्रमाणातील सिमेंट व वाळूचे मिश्रण पसरून त्याचा हव्या त्या जाडीचा थर तयार करतात. मग त्यावर पाणी टाकून त्यावरून रूळ फिरवितात. कधीकधी पोलादी जाड तारांच्या (गजांच्या) वा पट्ट्यांच्या जाळ्या वा चटया जमिनीवर अंथरून त्यांवरून रूळ फिरवितात. यामुळे चटया जमिनीत रूतून पृष्ठभाग सपाट आणि अपेक्षेप्रमाणे कठीण व घट्ट होतो.
काही विमानतळांवर धावपट्टीच्या टोकाशी अटक यंत्रणा असते. आणीबाणीच्या प्रसंगी आरोहण शक्य न झाल्यास विमान धावपट्टीवर रोखण्यास या यंत्रणेचा उपयोग होतो. वापर बंद केलेली धावपट्टी विमाने उभी करण्यासाठी वापरतात.
ही प्रवाशांच्या सेवेकरिता असलेली प्रमुख इमारत होय. कधीकधी हे स्थानक अनेक इमारतींचे बनलेले असते. प्रवाशाच्या उड्डाणाची सुरूवात व सांगता येथे होते. विविध विमान कंपन्यांच्या तिकीट खिडक्या या इमारतीत असतात. तेथे तिकिटांच्या विक्रीची व आरक्षणाची व खरेदी केलेली तिकिटे तपासून घेण्याची सोय असते. प्रवाशांचे सामान येथेच ताब्यात घेतात व सुरक्षेच्या दृष्टीने त्याची तपासणी करून त्यांवर नामांकन करतात व ते वाहक पट्ट्यांमार्फत विमानात पोहोचवितात. प्रवाशांच्या सोयीसाठी विमान येण्याच्या व सुटण्याच्या वेळा व त्याचा मार्ग ध्वनिवर्धकावरून घोषित करतात, तसेच ही माहिती बंदिस्त मंडलयुक्त दूरचित्रवाणीवरून व प्रकाशमान फलकांवर दाखवितात. स्वागतकक्ष, विश्रामकक्ष, प्रतीक्षालय, उपहारगृह, दुकाने, औषधांचे दुकान, परदेशी चलन बदलून देण्याची सोय असलेल्या बँका, निरोप देण्यासाठी वा स्वागतासाठी आलेल्या आप्तस्वकीयांसाठीचे कक्ष, विमानतळ व विमाने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी प्रेक्षक सज्जे, आलेल्या प्रवाशांना आपले सामान घेण्यासाठी असलेली वाहक पट्ट्याची यंत्रणा, दूरध्वनी, करमुक्त वस्तूंचे दुकान इत्यादींची सोय या स्थानकात केलेली असते.
परदेशी जाताना प्रवाशांचे पारपत्र (पासपोर्ट) व प्रवेशपत्र (व्हीसा) यांची तपासणी करतात. तसेच आरोग्य व सीमाशुल्क या दृष्टिंनीही तपासणी करतात. विमानात चढण्याआधी व इष्ट स्थळी पोहोचल्यानंतर विमानातून उतरल्यावर प्रवासी व त्याच्या हातातील सामान यांची सुरक्षिततेच्या दृष्टीने तपासणी करतात. परदेशातून आलेल्या प्रवाशांची अशीच तपासणी होते, मात्र त्यासाठी स्वतंत्र कक्ष असतो.
जेथून प्रवासी विमानाकडे जातात आणि त्यात चढतात किंवा उतरतात व परत येतात त्या मार्गाला द्वार म्हणतात. प्रत्येक विमान कंपनीला असे द्वार नेमून दिलेले असते, बहुतेक मोठ्या विमानतळांवर हा मार्ग बंदिस्त असतो. त्यामुळे प्रवाशांना हवामानाचा त्रास होत नाही. अशा मार्गाला ‘हवाई सेतू’ म्हणतात. या मार्गावर काही ठिकाणी बस, यांत्रिक जिने, सरकते पट्टे, पार्श्वपथ वा आरामकक्ष, हलकी कडवाट किंवा घडीचे बोगदे यांसारखी स्वयंचलित यंत्रणा वापरतात. विमानाच्या एंजिनातून बाहेर पडणाऱ्या वायूंमुळे उच्च तापमान, हवेचा स्फोटक (उच्च वेगाचा) झोत, वाफा आणि आवाज यांचा उपद्रव होतो. या उपद्रवाची तीव्रता कमी करण्यासाठी इमारती व प्रवाशांचे पदपथ बंदिस्त असतात. आधुनिक विमानतळांवरील प्रवासी स्थानकांच्या सुधारित अभिकल्पांमुळे विमानात पाऊल ठेवीपर्यंत प्रवाशांना वातानुकूलित, बंदिस्त वाटेने जाता येते.
हवामानविषयक पूर्वकथन करणारी सेवा येथे असते व ती विमान कंपन्या व खाजगी वैमानिकांना हवामानविषयक माहिती पुरविते. बहुतेक विमान कंपन्यांचा स्वतःचा हवामानविषयक विभाग असतो. प्रत्येक विमान कंपनीचा एक कक्ष असतो व तेथे कंपनीचे जावक कार्यालय असते. तेथे प्रवाशांना थोडक्यात माहिती देण्याची सोय असते. तसेच हे कार्यालय त्या कंपनीची तिकीट खिडकी व विमान यांच्याशीही संपर्क ठेवते.
विमानतळ व्यवस्थापकाचे कार्यालयही या स्थानकात असते. तेथून तो विमानतळावर लक्ष ठेवतो. अशा प्रकारे प्रत्येक विमानामागे २०० पर्यंत प्रवाशांच्या गटाची हाताळणी सुरक्षितपणे, जलदपणे व योग्य रीतीने करणे हा विमानतळ कर्मचारी व विमान कंपनी यांच्यापुढील मोठा प्रश्न असतो. १९७० नंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने हा प्रश्न अधिक महत्त्वाचा झाला आहे. यांत्रिकीकरण व आधुनिकीकरण यांद्वारे तो सुकर करण्याचे प्रयत्न करण्यात येतात.
हवाई वाहतुकीच्या जलदपणाचा लाभ मिळण्यासाठी प्रवाशांच्या सामानाची हाताळणी झटपट होणे गरजेचे असते. यांसाठी यांत्रिक प्रणाली व खास प्रकारची वाहने वापरतात. त्यामुळे प्रवाशांच्या ओघात अडथळा न येता व सामानाचे नुकसान न होता ते जलदपणे एकत्रित केले जाऊन विमानात पोहोचविले जाते आणि विमानातून उतरून घेऊन त्याचे झटपट वाटप होईल हे पाहिले जाते. शक्य असेल तेथे प्रवाशांच्या सामानासाठी पेटारे वापरतात. पेटाऱ्यांत सामान भरून एक नग या रूपात हा पेटारा विमानाच्या मालवाहू कक्षात ठेवतात व उतरवितात. यामुळे सामानाचा प्रत्येक डाग अनेक वेळा स्वतंत्रपणे हाताळावा लागत नाही. अशा तऱ्हेने वेळेची बचत होते.
प्रवासी सामानाशिवाय वाहणावळीने नेण्यात येणाऱ्या सर्व सामानाला ‘माल’ (कार्गो) म्हणतात. हवाई वाहतुकीत अशा मालाची राशी वाढत आहे. लहान विमानतळांवर प्रवासी सामनाबरोबरच मालही हाताळला जातो. मोठ्या विमानतळांवर एक वा अनेक वेगळी मालाची स्थानके असतात. विमानतळावर निरनिराळ्या ठिकाणांहून माल येतो व तो विविध ठिकाणी पाठवावयाचा असतो. यामुळे तो वेगवेगळ्या वेळी व निरनिराळ्या विमानांत चढवावा लागतो. त्यासाठी मालाचे तसे प्रकारीकरण प्रथम करतात. टपाल कर्मचारी टपालाचे असे वर्गीकरण करतात. माल हलविण्यासाठी ओढगाड्या, फोर्क-लिफ्ट ट्रक, मालडब्यांची मालिका, पॅलेट, वाहक पट्टे, माल चढविणारी यंत्रणा इत्यादींचा वापर करतात. मालाच्या वितरणासाठी मुख्यतः मालवाहू मोटारगाड्या वापरतात. पेटाऱ्यांचाही माल भरण्यासाठी वापर करतात.
पुष्कळ प्रवासी विमानांतही मोठा मालवाहू कक्ष असतो. अर्थात काही विमानांत केलळ प्रवाशांची तर काहींत केवळ मालाची वाहतूक होते. अशा विमानांच्या वेळा भिन्न असतात. काही विमान कंपन्या केवळ मालाची वाहतूक करतात. इलेक्ट्रॉनीय वस्तू, यंत्रसामग्रीचे सुटे भाग, बँका व वित्तीय संस्थांची कागदपत्रे, टपाल, वर्तमानपत्रे, पुस्तके, नियतकालिके, पशुधन, फळे, फुले, भाजीपाला यांसारखा लवकर खराब होणारा माल इत्यादींची विमानातून वाहतूक होते. यांमुळे काही ठिकाणी कोंडवाडा, विलग्नहवास, पशुखाद्य, पशुवैद्यकीय सेवा, शीतगृह, वजन करावयाचे मोठे काटे, सुरक्षित कक्ष इत्यादींची सोय केलेली असते.
विमाने ठेवण्यासाठी मुख्यतः या इमारतीचा उपयोग होतो. येथे विमानाची देखभाल व काही प्रमाणात दुरुस्तीही करतात. उड्डाणाआधी मुख्यत्वे विमानाची एंजिने व इतर यंत्रसामग्री चांगल्या प्रकारे कार्य करते आहे की नाही, याची खात्री करून तशी पूर्तता येथे केली जाते. विमानघरे बहुतकरून स्थानकांच्या इमारतींपासून पुरेशी दूर व एका बाजूला असतात. यामुळे विमानांच्या जमिनीवरील (विमानतळावरील) हालचालींच अडथळे वा अडचणी येत नाहीत. काही विमानघरे मोठी असून त्यांत अनेक मोठी झोत विमाने एकाच वेळी ठेवता येतात. पुष्कळ विमान कंपन्यांची स्वतःची विमानघरे असतात. विमानघरांचे काही प्रकार आ. २ मध्ये दाखविले आहेत.
हा विमानतळावरील सर्वांत महत्त्वाचा भाग असून येथून विमानतळाच्या पृष्ठभागावरील व त्यासभोवतीच्या हवाई वाहतुकीचे नियंत्रण करतात. त्यासाठी निरनिराळ्या रडार प्रणाली, रेडिओ संदेशवहन, संकेत (खुणांचे) दिवे, दूरध्वनी, वातदर्शक, हवामानदर्शक उपकरणे इत्यादींचा वापर करतात. बहुतेक विमानतळांवर नियंत्रण मनोरा स्थानक इमारतीच्या सर्वांत वरच्या भागात असतो, तर काही ठिकाणी नियंत्रण मनोऱ्याची स्वतंत्र इमारत असते. याच्या खिडक्या मोठ्या असून त्यांना अखंड निळसर काचा बसविलेल्या असतात. यामुळे उजेडाचा प्रखरपणा कमी होतो. कधीकधी छतही काचेचे असते. त्यामुळे तेथून विमानतळावर सर्वत्र व विमानांवर लक्ष ठेवता येते. तसेच विमानाचे अवतरण व आरोहण स्पष्ट दिसू शकते. विमानतळावरील वाहतूक सुरळीतपणे, जलदपणे व सुरक्षितपणे चालू ठेवण्याचे काम येथून नियंत्रक करतात. गर्दीच्या वेळी नियंत्रकांना शांत चित्ताने व संयमाने काम करावे लागते. सुटीच्या दिवसात वाहतुकीचे प्रमाण वाढते तेव्हा आणि धुक्यासारख्या वातावरणवैज्ञानिक घटकांमुळे अथवा अन्य कारणाने दृश्यमानता कमी झालेली असते तेव्हा नियंत्रकांचे काम अवघड होते. अशा वेळी अनेक स्वयंचलित इलेक्ट्रॉनीय प्रयुक्ती व सुविधांचा वापर करून विमानतळाची क्षमता जास्तीत जास्त वापरतात. यांमुळे उडणाऱ्या विमानाचे स्थान ठरवून त्याला मार्गदर्शन करणे शक्य होते. या रीतीने मोठ्या प्रमुख विमानतळावरील नियंत्रक गर्दीच्या वेळातही तासाला सु. ६० पर्यंत अवतरणे व आरोहणे हाताळू शकतात.
विमानाचे अवतरण (व आरोहण) सुरक्षितपणे होण्यास साहाय्यभूत ठरणारी व सर्व प्रकारच्या हवामानांत चालू शकणारी इलेक्ट्रॉनीय सामग्री येथे असते. बहुतेक व्यापारी विमानतळांवर अवतरणास मदत करणारी इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम (आयएलएस; उपकरणाद्वारे अवतरण प्रणाली) वापरतात. हिच्यामार्फत धावपट्टी व विमानातील रेडिओग्राही यांत रेडिओ संकेतांचे प्रेषण होते. यामुळे वैमानिकाला विमानतळाकडील पोहोचमार्गाच्या संदर्भात आपण कोठे आहोत (उदा., वर, खाली, थेट वर, उजवीकडे, डावीकडे) ते समजते व त्याची त्याला अवतरणासाठी मदत होते. मायक्रोवेव्ह लँडिंग सिस्टिम (एमएलएस; सूक्ष्मतरंग अवतरण प्रणाली) ही अशीच अचूक अवतरणला साहाय्यक ठरणारी प्रणाली आहे. हिच्याद्वारे मिळालेल्या माहितीचा उपयोग करू वैमानिक सर्वांत योग्य पोहोचमार्ग निवडू शकतो. प्रिसिजन ॲप्रोच रडार (पीएआर; अचूक पोहोचमार्ग रडार) रात्री किंवा धुक्यात व पावसात दृश्यमानता कमी असताना उपयुक्त असते, तर एअरपोर्ट सर्व्हिलन्स रडारमुळे (एएसआर; विमानतळ संनिरीक्षण रडार) विमानतळाभोवतीच्या सु. ८० किमी. परिसरातील सर्व विमानांचे दृश्य चित्र उपलब्ध होऊ शकते. यामुळे वैमानिकाला सर्वांत सुरक्षित मार्ग निवडण्यास मदत करता येते व विमानांची हवेतील टक्कर टाळता येते. यांशिवाय व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी (व्हीएचएफ; अचिउच्च कंप्रता) व अल्ट्राहाय फ्रिक्वेन्सी (यूएचएफ; परा-उच्च कंप्रता) संदेशवहन इ. इलेक्ट्रॉनीय प्रयुक्तींचा विमानाच्या मार्गनिर्देशनास उपयोग होतो. या साधनांच्या मदतीने मिळालेल्या माहितीच्या आधारे नियंत्रक संकेत दिवे व योग्य परिवाहाच्या रेडिओ संदेशवहनाद्वारे वैमानिकांना सूचना करतात व त्या भागातील विमानांची नेमकी स्थाने व इतर माहिती कळवितात. तसेच रडारच्या क्रमवीक्षक पडद्यावरील विमानांची प्रगत हालचाल पाहून एकाहून जास्त विमानांची अवतरणे अथवा आरोहणे होत असताना नियंत्रक वैमानिकांना अवतरणांचा क्रम व स्थिती यांची कल्पना देतात. जादा वाहतूक असणाऱ्या विमानतळांवर एअरपोर्ट सरफेस डिटेक्शन इक्विपमेंट (एएसडीई; विमानतळ भूपृष्ठ अभिज्ञान सामग्री) यंत्रणेची मदत घेतात.
उडणाऱ्या विमानांप्रमाणेच विमानतळावरील विमानांनाही नियंत्रक मार्गदर्शक करतात. जास्त गर्दीच्या वेळी हवाई व जमिनीवरील वाहतूक यांच्या मार्गदर्शनासाठी नियंत्रक कर्मचाऱ्यांचे दोन स्वतंत्र गट काम करतात.
विमानतळावरील वाहतूक सुरळीतपणे व कार्यक्षम रीतीने चालू राहण्यासाठी संदेशवहनाची सोय गरजेची व महत्त्वाची असते. असे संदेशवहन विमानतळावरील विविध विभागांमध्ये वा बाहेरील जनतेशी होत असते. स्वयंचलित दूरध्वनी प्रणाली, तारायंत्रविद्या, ध्वनीवर्धक, प्रकशित फलक, वातशक्तिचलित वाहिन्या, चल रेडिओ, बंदिस्त मंडलयुक्त दूरचित्रवाणी प्रणाली, संगणक इत्यादींचा या संदेशवहनासाठी उपयोग करतात. यामुळे विमानतळावर येणाऱ्या व तेथून जाणाऱ्या सर्वांना योग्य माहिती त्वरित मिळते व विविध विभागात सुसूत्रता रागून हवाई वाहतूक कार्यक्षन रीतीने चालते.
हवाई वाहतूक नियंत्रणामार्फत विमानांची वाहतूक व्यवस्थित व निर्वेधपणे होत असते. धावपट्टीवरून विमान नियमित वेळेला सुरक्षितपणे सुटणे गरजेचे असते. अशा वेळी विमान पुरेशा उंचीवर जाईपर्यंत मध्ये कोणताही अडथळा येणार नाही, अशी खबरदारी विमानतळ नियंत्रक व्यवस्था घेते. बाहेरून येणाऱ्या विमानाला अवतरणासाठी बिनतारी संदेश देणे व तशी सुसज्ज ठेवणे, तसेच अवतरण केलेल्या व निघण्याच्या तयारीत असलेल्या विमानाला मार्गदर्शन करणे याला अभिगम नियंत्रण म्हणतात. उडत असलेल्या विमानांना व त्यांच्याशी निगडित व्यक्तींना वातावरणवैज्ञानिक माहिती बिनतारी संदेशवहनाने देणे व त्यासाठीची सर्व उपकरणे कार्यक्षम ठेवणे याला हवाईमार्ग संदेशवहन नियंत्रण म्हणतात. दोन किंवा अधिक विमानतळांमधील विमानांच्या हालचाली लक्षात घेऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम क्षेत्रीय नियंत्रणात येते.
लाँग रेंज नेव्हिगेशन (लोरान; एलओआरएएन; दीर्घ पल्ल्याचे मार्गनिर्देशन) याद्वारे ५०० किमी.पर्यंत दूरच्या विमानाला सूचना देता येतात. शॉर्ट रेंज नेव्हिगेशन (शोरान; एसएचओआरएएन; कमी पल्ल्याचे मार्गनिर्देशन) याद्वारे विमानतळाच्या आसपासच्या क्षेत्रातील विमानांना संदेश देता येतात. लॅमिनर, एअर नेव्हिगेशन अँड कोलिजन (लॅनॅक; एलएएनएसी) याच्या मदतीने विमानाला विवक्षित उंचीवर राहण्याचा इशारा देतात व त्यामुळे संभाव्य टक्कर टाळता येते. टेलिव्हिजन अँड रडार एअर नेव्हिगेशन (टेलेरान; टीईएलईआरएएन; दूरचित्रवाणी रडार हवाई मार्गदर्शन) जमिनीवरील या प्रणालीचे संदेश विमानातील दूरचित्रवाणी संचाच्या पडद्यावर दिसतात व त्यांचा मार्गनिर्देशनासाठी उपयोग करतात [मार्गनिर्देशन; रडार; वाहतूक नियंत्रण; हवाई वाहतूक].
धावपट्टी, विमानघर, भरणतळ इत्यादींच्या दरम्यान विमान जमिनीवरून चालवीत नेण्यासाठी खास बनविलेला फरसबंद रस्ता म्हणजे टॅक्सीपथ होय. आरोहण बिंदूपर्यंत किंवा विमान थांबवण्याच्या क्षेत्रापर्यंत जाण्यासाठी असलेल्या अशा रस्त्याला टॅक्सीपथ म्हणतात. स्थानकाभोवतीच्या प्रवाशांकरिता विमान उभे करण्यासाठी असलेल्या फरसबंद क्षेत्राला भरणतळ म्हणतात. येथे विमानांचे संधारण, किरकोळ दुरुस्ती, तेलपाणी देणे इ. सेवापूर्तींची कामे करतात. येथे प्रवासी व विमान कर्मचारी विमानात चढतात आणि उतरतात. तसेच प्रवाशांचे सामान व माल यांची चढ-उतार येथे होते. येथे इंधन भरण्याची व्यवस्थाही असते. प्रवाशांचे जेवण, खाद्यपेये इ. येथे विमानात चढवितात. भरणस्थानांची संख्या व विमानाची सुरळीत हालचाल यांनुसार भरणतळाचे क्षेत्रफळ ठरवितात. या क्षेत्रात तीव्र वळणे, थांबून राहणे व विरुद्ध दिशेतील वाहतूक या गोष्टी कमीत कमी असाव्या लागतात, तसेच या क्षेत्रात विमानाची हालचाल संथपणे चालू असताना त्याच्या जवळपास इतर वाहनांची वाहतूक होणार नाही, अशी दक्षता घेतात. विमानाच्या अशा संचलनाला (जमिनीवरील हालचालीला) भरणतळावरील मार्गदर्शक रेघा व आकृतिबंध यांची मदत होते. लहान विमानतळावरच्या भरणतळावर एका वेळी एक वा दोन विमानांना सेवा मिळते. मोठ्या विमानतळांवरील भरणतळांवर एका वेळी शंभरपर्यंत विमानांची सोय होऊ शकते.
प्रवाशांची ने-आण करणारी विमान कंपन्यांची वाहने, तसेच बस, खाजगी व भाड्याची वाहने, मालवाहतूक करणारी वाहने अल्पकाळ वा दीर्घकाळ थांबण्यासाठी विमानतळालगत बाहेरच्या बाजूस वाहनतळाची सोय करावी लागते.
नागरी विमानतळ सामान्यपणे शहरांपासून दूर असतात. यामुळे विमानतळ व लगतची वाहतुकीची केंद्रे यांच्या दरम्यान पुरेशा प्रमाणात सुरळीत रस्ता (वा अन्य) वाहतुकीची सोय असावी लागते. हवाई वाहतुकीच्या जलद गतींचा लाभ मिळण्यासाठी हे आवश्यक असते. हवाई वाहतुकीच्या गतीत मोठी वाढ झाली आहे. मात्र त्या प्रमाणात रस्ता वाहतुकीची गती वाढली नाही. यामुळे हवाई वाहतुकीला लागणारा वेळ हा रस्ता वाहतुकीच्या वेळेच्या तुलनेत अत्यल्प वाटू लागला आहे. यामुळे वरीलसारखी वाहने विमानतळावर लवकर पोहोचण्यासाठी चांगले रस्ते असावे लागतात. तसेच या वाहनांतील प्रवासी, माल यांची चढ-उतार जलदपणे होण्यासाठी पुरेशी वेगळी जागा व सुविधा असेणे आवश्यक असते. यामुळे हवाई वाहतूकीचा ओघ चांगला राहतो व तिच्या जलद गतीचा उपयोग होतो. हे वाहनतळ व रस्ते स्थापत्य अभियांत्रिकीच्या मान्यताप्राप्त मानकांनुसार आणि बांधकामाच्या स्थानिक नियमांनुसार तयार करतात.
रात्रीच्या वेळी अथवा दृश्यमानता कमी असताना विमानतळ, धावपट्टी, टॅक्सीपथ इ. ओळखू येण्यासाठी संकेत (खुणेच्या) दिव्यांची सोय केलेली असते. यामुळे वैमानिकाला अवतरण व आरोहण सुरक्षितपणे करण्यास मदत होते. दिव्यांचा रंग, त्यांची मांडणी व इतर वैशिष्ट्यांवरून वैमानिकाला आवश्यक ती माहिती मिळते. कारण दिव्यांचा रंग, मांडणी व इतर वैशिष्ट्ये यांचे प्रमाणीकरण झालेले असून त्यानुसारच त्यांचा जगात सर्वत्र वापर होतो. यांनुसार सर्व विमानतळांना यामागील मूलभूत तत्त्व लागू असते. तथापि स्थानिक परिस्थितीनुसार प्रकाशयोजनेचा स्वतंत्रपणे विचार करून त्यानुसार काही फेरबदल करण्यास हरकत नसते. अशा रीतीने विमानतळाचा आकार, आकारमान व पृष्ठभागाचे स्वरूप आणि हवामानविषयक परिस्थिती यांच्यानुसार प्रकाशयोजनेचा प्रकार व विस्तार ठरवितात.
इ. स. १९४०-६० दरम्यान झालेल्या विमानतळाच्या प्रकाशयोजनविषयक विकास कार्याचा भर मुख्यतः पोहोचमार्ग प्रकाशनावर होता आणि त्याच्या अनेक पद्धती विकसित झाल्या होत्या. फिरता विमानतळ संकेतदीप हा दीर्घ काळापासून चालू असणाऱ्या विमानतळाची खूण ठरलेला आहे. त्याच्या एका बाजूने पांढरा व दुसऱ्या बाजूने हिरवा प्रकाश बाहेर पडतो. तो उंचावर उभारलेला असल्याने अनेक किमी.वरून स्पष्टपणे दिसू शकतो. त्याच्या एका मिनिटात सहा फेऱ्या होतात. पाण्यावर उतरणाऱ्या विमानांसाठी हिरव्याऐवजी पिवळा दिवा वापरतात. विमानतळाची सीमा दर्शविणारे दिवे त्याच्या कुंपणापासून सु. ३ मी. आत, सु. १.५ मी. उंचीवर आणि एकमेकांपासून सु. ९० मी. अंतरावर असतात. प्रखर पोहोचमार्ग दिवे हे वैमानिकांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असतात. हे प्रमाणभूत दिवे १९४०-५० च्या दरम्यान वापरात आले. हे सर्व विमानतळ सामान्यतः धावपट्टीच्या रोखाने तिच्या रेषेत उभारलेले असतात. त्यांच्यामुळे चालू असलेली धावपट्टी वैमानिकांच्या लक्षात येते. ते विमानतळाच्या बाहेरपर्यंतही असू शकतात. विमानतळांवरील निरनिराळ्या धावपट्ट्यांत स्पष्ट दिसतील असे दिवे त्यांच्या भोवती बसविलेले असतात. हे दिवे उघडमीट होणारे असतात. त्यांचा प्रकाश विमानाच्या अवतरणाच्या दिशेप्रमाणे सोडतात. प्रत्येक धावपट्टीच्या दिव्यांचे स्वतंत्रपणे नियंत्रण करता येते. एका वेळी एकाच धावपट्टीचे दिवे चालू ठेवतात. त्यामुळे अवतरण सुरक्षितपणे होते. धावपट्टीच्या दोन्ही बाजूंचे दिवे पांढरे, जमिनीच्या किंचित वर एकमेकांपासून सु. १८० मी. अंतरावर असतात. विमान धावपट्टीला जेथे स्पर्श करते त्या तिच्या टोकाजवळील सुरुवातीच्या सु. ९०० मी. स्पर्श क्षेत्रात बाणाच्या आकारात बसविलेले हिरवे दिवे असतात. त्यांच्याद्वारे अवतरणास हरकत नसल्याचा संकेत मिळतो. उलट काही धोका असल्यास फुलीच्या आकारातील तांबडे दिवे लागतात. धावपट्टीच्या प्रकाशयोजनेविषयी संशोधन व विकास कार्य चालू आहे. स्पर्शक्षेत्र सर्वोत्कृष्ट प्रकाशित करणे व त्या पलीकडील क्षेत्रात मार्गदर्शनाची सोय करणे या उद्देशांची हे काम होत आहे. त्यासाठी दोन वेगळ्या पद्धती वापरण्याचे प्रयत्नद करण्यात येत आहेत. सागरी विमाने व उडणाऱ्या नौका यांच्यासाठी पाण्यावर राखून ठेवलेल्या धावपट्टीच्या सर्व सीमा तरंगणारे व विजेचे पिवळे संकेतदीप लावलेल्या साधनांनी दर्शवितात.
टॅक्सीपथ लक्षात येण्यासाठी त्यांच्या कडेला निळे दिवे लावलेले असतात. विमानतळावरील स्थानकाच्या इमारती व भरणतळ यांवर अनेक झोत दिवे बसवितात. त्यामुळे वैमानिकाला प्रखर प्रकाश न दिसता बाकीचे सर्व स्पष्ट दिसते. धोक्याची सूचना देणारे लाल दिवे टेकड्या, धुरांडी, विजेच्या तारांचे व संदेशवहनांचे उंच मनोरे इ. अडथळ्यांवर लावतात. असे दिवे मनोऱ्यासारख्या सु. २० मी.पेक्षा उंच खांबांच्या माथ्यावर, तसेच त्यांच्या १/३ व २/३ उंचीवर बसविलेले असतात. वाऱ्याची दिशा समजण्यासाठी १० ते १५ मी. उंचीच्या डोलकाठीवर बांधलेल्या कापडी फुग्यावरही प्रकाश टाकण्याची सोय केलेली असते. त्यामुळे रात्री तो स्पष्टपणे दिसू शकतो. इंग्रजी टी (T) आकाराचे ७ × ४ मी. मापाचे व १० सेंमी. रुंदीचे दिवे बसविलेले एक साधन १४ मी. व्यासाच्या पांढऱ्या वर्तुळाच्या पार्श्वभूमीवर बसविलेले असते. ते वाऱ्याच्या दिशेप्रमाणे फिरणारे असते.
ऐनवेळी कामात व्यत्यय येऊ नये म्हणून विमानतळावरील विजेचा पुरवठा किमान दोन भिन्न केंद्रांमधून घेतात. याशिवाय त्वरित कार्यान्वित होणारे विमानतळाचे स्वतःचे खास डीझेल वा पेट्रोलवर चालणारे विद्युत्निर्मिती केंद्र असते. त्याद्वारे निकडीची गरज भागविता येते. सर्व दिव्यांना विजेचा पुरवठा असा करतात की, त्यांपैकी एखादा दिवा फुटून अथवा जळून निकामी झाल्यास बाकीच्या दिव्यांचा वीज पुरवठा चालू रहावा.
विमानतळांवरील इमारतींना आग लागू शकते, तसेच विमान दुर्घटनेतही आग लागू शकते. म्हणून आगीचे निवारण व बचाव कार्य यांसाठी लागणारी पुरेशी सामग्री विमानतळावर ठेवतात. बऱ्याच विमानतळांवर इंधनाच्या मोठ्या आगीचे निवारण करण्यासाठी खास प्रकारची सामग्री असते, तसेच विमानतळाच्या दूरच्या दुर्गम भागात नेता येणारी आगनिवारक सामग्रीही असते. धावपट्टी वा भरणतळापर्यंत पोचताना किमान अडथळे येतील अशा रीतीने विमानतळावरच्या आगनिवारण केंद्राचे स्थान ठरवितात. विमानात इंधन भरताना बाहेर पडणाऱ्या त्याच्या ज्वालाग्राही वाफा व अशाच तऱ्हेचे ज्वलनशील द्रव्य झोत एंजिनाच्या झोताच्या संपर्कात येऊन स्फोट होऊ शकतो वा आग लागू शकते. या धोक्यापासून रक्षण करण्यासाठी आगप्रतिबंधक व संरक्षक उपाय योजतात. [आगनिवारण].
लेखक : १) का. ग. पित्रे
२) नि. वि. बाळ
३)मा. ग. देवभक्त
४) शा. चिं. ओक
५) अ.ना. ठाकूर
६) गो. म. आपटे
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/15/2020
सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता आणि शुद्ध हवा आपल्या आर...
सांगली जिल्ह्यातील प्रेक्षणीय व पवित्र ठिकाणांची स...
मांडूच्या स्थानेविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही....
दुसऱ्या महायुद्धानंतर विमान वाहतूक उद्योग झपाट्यान...