অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पीटर पॉल रूबेन्स

पीटर पॉल रूबेन्स

(२८ जून १५७७–३० मे १६४०). प्रख्यात फ्लेमिश चित्रकार. उत्तर यूरोपातील प्रगत असा फ्लँडर्सचा परगणा स्पॅनिश राज्यकर्त्यांनी उद्ध्वस्त केल्यामुळे अँटवर्पमधील अर्धीअधिक कुटुंबे इतर ठिकाणी परागंदा झाली. अशा परिस्थितीत झीगन (वेस्टफेलिया) येथे रूबेन्सचा जन्म झाला. त्यामुळे रूबेन्सच्या प्राथमिक शिक्षणाचे तसे हालच झाले. पुढे पित्याच्या मृत्यूनंतर व केवळ आईच्या दूरदर्शीपणामुळे त्याचे कुटुंब पुन्हा अँटवर्पमध्ये स्थायिक झाले. रूबेन्सच्या अंगी असलेल्या अलौकिक गुणांची जाणीव झाल्याने त्याच्या आईनेच त्याच्या शिक्षणाची योग्य ती सोय केली.

रूबेन्सच्या कलाशिक्षणाची सुरूवात व्हेऱ्हाचइख्त ह्या रीतीलाघववादी निसर्गचित्रकाराकडे झाली. त्यानंतर चार वर्ष आडाम व्हान नोर्ट ह्या चित्रकाराकडे व नंतर अँटवर्प येथील आटो व्हॅनियस (व्हॅन व्हील) ह्या चित्रकारांच्या स्टुडिओत तो होता. आटो व्हॅन व्हीन हा कट्टर रोमन परंपरेचा पुरस्कर्ता होता. ह्या काळात रूबेन्सने धातूवरील खोदकाम काष्ठठसे इ. तंत्रेदेखील आत्मसात केली.

कलेच्या इतिहासात रूबेन्सइतका विविध गुणांनी संपन्न असा दुसरा चित्रकार सापडत नाही. कोणतीही गोष्ट त्वरित शिकणारा एकपाठी, स्पष्ट विचार करणारा, महत्वाकांक्षी, उद्योगप्रिय, धोरणी, वक्तशीर, व आत्मीयतेने काम करणारा, अनेक भाषा जाणणारा, राजशिष्टाचार सहजतेने आत्मसात करणारा इ. अनेक गुण रूबेन्स मध्ये एकवटलेले होते. राजकारण व कला या परस्पर भिन्न वाटणाऱ्या गोष्टी रूबेन्स मोठ्या कौशल्याने हाताळी. तो ज्या वकिलातीत काम करी, तिला यूरोपातील राजेरजवाड्यांकडून अनेक कामे मिळत व खूप मेहनत घेऊन तो ती पुरी करी.

रूबेन्स १६०० साली इटलीत गेला. तेथील सु. आठ वर्षांच्या वास्तव्यात खऱ्या अर्थाने त्याच्या चित्रकलेचा पाया तयार झाला, असे म्हणता येईल, इटलीत गेल्यावर एक महिन्याच्या आतच मांचुआचा सरदार व्हिचेन्सो गोंझागा याच्या दरबारी रूबेन्सची चित्रकार म्हणून नियुक्ती झाली. इथे त्याला बरीच व्यक्तीचित्रे व पूर्वकालीन इटालियन चित्रकारांच्या चित्रांच्या अनुकृती (कॉपी) तयार करण्याचे काम मिळाले. १६०३ मध्ये त्याला मांचुआ सरकारने माद्रिद येथे राजकीय कामगिरीवर पाठविले. स्पॅनिश राजघराण्याच्या (रॉयल) कलासंग्रहात त्याला तिशन व रॅफेएल ह्या सुप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती पहावयास मिळाल्या. तिशनच्या चित्रांनी तो अक्षरशः भारावून गेला. आईच्या प्रकृति अस्वास्स्थामुळे तो अँटवर्पला १६०८ मध्ये परत आला. नंतर तो तेथेच स्थायिक झाला. त्याने अँटवर्प येथे भव्य वाडा बांधला, मोठी कार्यशाळा उभारली व अनेक कलावंतांना हाताशी घेऊन मोठमोठी कामे करण्यास सुरूवात केली. पुढे नेदर्लंड्सच्या स्पॅनिश सरकारकडेच त्याची नेमणूक झाली. १६०९ मध्ये तो ईझाबेला ब्रांटशी विवाहबद्ध झाला. १६१० पासून रूबेन्सच्या खऱ्या कारकीर्दीला सुरूवात झाली. विवाहोत्तर केलेल्या रूबेन्स अँड ईझाबेला ब्रांट इन द हनिसकल बौअर ह्या चित्राकृतीत इटालियन प्रबोधनकालीन व्यक्तीचित्रकारांची छाप जाणवते. रेझिंग ऑफ द क्रॉस, डिसेंट फ्रॉम द क्रॉस ही चित्रे अँटवर्प कॅथीड्रलकरिता त्याने ह्याच काळात केली. १६०० ते १६२० च्या सुमारास त्याने अनेक धार्मिक विषयांवरील चित्रे, चर्चच्या सजावटीची कामे, व्यक्तिचित्रे, युद्धचित्रे केली. ह्याच काळात त्याची शैली विकसित होत गेली. १६२० मध्ये त्याला अँटवर्प येथील जेझुइट चर्चच्या सजावटीचे काम मिळाले. ह्याकरिता त्याने जवळजवळ ३९ रचना केल्या होत्या. ह्या कामात त्याचा सहकारी व्हॅन डाइक हा चित्रकार होता. १६२२ मध्ये त्याने लक्सेंबर्ग प्रासादातील मेदीची कलावीथीच्या चित्रसजावटीचे काम सुरू केले. मारी दी मेदीची ह्या तेराव्या लूईच्या आईच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित ही चित्रमाला होती. तत्कालीन राजकीय संदर्भामुळे ह्या चित्राकृतींना एक वेगळेच महत्व प्राप्त झाले होते, असे जाणकारांचे म्हणणे आहे. ही चित्रे म्हणजे रूबेन्सच्या पूर्णपणे विकसित झालेल्या शैलीचे एक मनोज्ञ दर्शनच होय. रूबेन्सची कल्पकता व जोशपूर्ण शैली ह्यांचा नाट्यपूर्ण प्रत्यय ही चित्रे देतात. १६२८ ते १६३० ह्या दरम्यान अल्बर्ट आर्कड्युकच्या मृत्यूनंतर त्याच्या पश्चात सत्तेवर आलेल्या इन्फन्टा ईझाबेलाकडे रूबेन्सची खास सल्लागार म्हणून नेमणूक झाली. या काळात पुन्हा एकदा त्याला राजकीय कामगिरीकरिता इंग्लंड, हॉलंड, स्पेन या ठिकाणी जावे लागले. इंग्लंड व स्पेन ह्या दोन राष्ट्रांत शांतता प्रस्थापित करण्याचा हेतू ह्या कामगिरीमागे होता. रूबेन्स इथेही पूर्णपणे यशस्वी झाला. पहिल्या चार्ल्सने त्याला ‘सर’ हा किताब बहाल केला; तर केंब्रिज विद्यापीठातर्फे त्याला सन्मान्य पदवी देण्यात आली. १६२६ मध्ये त्याच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले, त्यानंतर चार वर्षांनी (१६३०) हेलेन फूर्मा ह्या सतरा वर्षीय तरूणीशी त्याने पुन्हा विवाह केला. हेलेन फूर्मा अँड टू ऑफ हर चिल्ड्रेन (१६३५) हे त्याचे व्यक्तिचित्र प्रसिद्ध आहे.

त्याने १६३४ मध्ये व्हाइटहॉल मधील बँक्किटिंग हॉलच्या छताच्या सजावटीचे त्याच्यावर सोपविण्यात आलेले काम पूर्ण करून लंडन येथे रवाना केले. चौथ्या फिलिपने त्याच्यावर सोपवलेले ‘तोर्रे द ला पॅरादा’ हे सजावटीचे कामही जवळजवळ त्याच्या मृत्यूपर्यंत चालू होते.

रूबेन्सच्या कामाचे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे, त्याने रंगविलेली निसर्ग चित्रे. उबदार सूर्यप्रकाशाचा प्रभाव परिणामकारकतेने चित्रित करणे, हे त्याच्या निसर्गचित्रांचे खास वैशिष्ट्य. लंडनच्या ‘नॅशनल गॅलरी’ तील शातो दी स्टीन हे त्याच्या स्वतःच्या निवास्थानाचे निसर्गरम्य चित्र खास उल्लेखनीय आहे. हे व लँडस्केप विथ रेन्बो ही काहीशी स्वच्छंदतावादी धाटणीची चित्रे ह्याच काळातील आहेत. ह्याच दरम्यान त्याच्या उजव्या हाताला संधिशोथाचा विकार जडला. त्यातून पूर्ण बरा झाल्यानंतरदेखील त्याने द मिटिंग ऑफ रोमन्स अँड सॅबिन्स द रेप ऑफ द सॅबिन्स, हर्क्यूलीझ व अँड्रोमेडा यांसारखी मोठमोठी चित्रे चौथ्या फिलिपकरिता केली. फेब्रुवारी १६४० मध्येत्याला रोममधील ‘आकादेमिया दि एस. ल्यूका’ चे सन्माननीय सदस्यत्व देण्यात आले. अँटवर्प येथे त्याचे निधन झाले.

रूबेन्सच्या कलाजीवनाचा एकंदर आढावा घेता त्याच्या कामगिरीने व कामाच्या झपाट्याने डोळे दिपून जातात. अतिचोख प्रशासन व्यवस्था व उदंड उत्साह यामुळे रूबेन्स व त्याची कार्यशाळा यांमधून जवळजवळ ३,००० कलाकृती निर्माण झाल्या. मृत्यूच्या अखेरच्या क्षणापर्यंत तो काम करत होता. व्यक्तिचित्रे, युद्धचित्रे, धार्मिक व पौराणिक विषयांवरील चित्रे, निसर्गचित्रे, चर्चमधील चित्रसजावट, पुस्तकांच्या मुखपृष्ठांकरिता सुनिदर्शने; विजयरथाचे आकृतिबंध इ. विविध प्रकारांत त्याने निर्मिती केली. रूबेन्सच्या चित्रशैलीचा किती कलावंतावर प्रभाव पडला, हे शोधून काढणे तसे कठीणच; पंरतु व्हेलात्थकेथ, वॉत्तो व दलाक्र्वा यांच्या चित्रावर त्याच्या शैलीचा प्रभाव आढळतो, शिवाय या कॉप यॉर्डान्स, लूका जोरदानो, व्हॅन डाइक, मॅथ्यू स्मिथ इ. चित्रकारांवरही त्याचा प्रभाव दिसतो. रेम्ब्रँट हा श्रेष्ठ चित्रकारदेखील त्याचा चाहता होता.

इटालियन उच्च प्रबोधनकाळातील तिशन, तिंतोरेत्तो, रॅफेएल, काराव्हाद्‌जो इ. चित्रकारांचा रूबेन्सच्या शैलीच्या जडणघडणीत विशेषत्वाने प्रभाव दिसतो. तिंतोरेत्तोचे नाट्यपूर्ण संयोजन, उबदार संगसंगती, जोशपूर्णता तसेच काराव्हाद्जोच्या चित्रांतील मानवाकृतींचे संयोजन रूबेन्सच्या चित्रांत दिसते. तिशन व रॅफेएल यांच्या चित्रांच्या अभ्यासातून त्याने व्यक्तीचित्रणाचे कसब आत्मसात केले. त्याच्या चित्रांतील नग्न स्त्रिया काहीशा स्थूल व मध्यवयीन वाटतात आणि त्यांची अंगकांती विशेष कौशल्याने रंगविलेली आहे. रंगलेपनाच्या तांत्रिक बाबतीत त्याने घेतलेले शोध तितकेच महत्वाचे वाटतात. विशेषतः चित्रातील छायाक्षेत्रातील भाग पातळ पारदर्शक रंगांनी-गुलाबी किंवा निळसर रंगांतील करड्या रंगछटांनी–रंगवून त्यावर उच्च प्रकाशाचा भाग जाडसर रंगलेपनाने पूर्ण करणे, हे रूबेन्सचे खास तंत्र कौशल्य होते. शिवाय उबदार रंगसंगती, विविध विषयांची कौशल्यपूर्ण हाताळणी आणि चित्ररचनेतील गतिमानता ही तीन प्रमुख वैशिष्ट्ये रूबेन्सच्या शैलीत आढळतात. रूबेन्सची चित्रे म्हणजे उत्तर व दक्षिण यूरोपच्या कलाप्रवाहांचा एक अपूर्व संगम मानला जातो. रूबेन्स हा बरोक शैलीतील एक महत्वाचा कलावंत मानला जातो. [बरोक कला]. आदर्शवाद व वास्तवता या दोहोंचा नाट्यपूर्ण आविष्कार म्हणजे रूबेन्सची शैली म्हणता येईल .त्याच्या चित्रांचे विषयही अनेकविध असत. उदा.,ली चाप्यू दी पेली (द स्ट्रॉ हॅट) ड्यूक ऑफ लर्मा ह्यांसारखी व्यक्तिचित्रे; रेझिंग ऑफ द क्रॉस, अँडोरेशन ऑफ द मॅगी इ. धार्मिक विषयांवरील चित्रे; बॅटल ऑफ मेझॉन्ससारखी युद्धचित्रे; लँडस्केप विथ रेन्बो, द गार्डन ऑफ लव्ह इ. स्वच्छंदतावादी धाटणीची चित्रे त्याच्या चतुरस्त्र प्रतिभेची साक्ष देतात

संदर्भ : 1. Burck Hardt, Jacob; Trans. Hottinger, M. The Recollections of Rubens, New York, 1950.

2. Wedgwood, C. V. The World of Rubens, New York, 1967.

लेखक : माधव इमारते

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate