मॉने, क्लोद: (१४ नोव्हेंबर १८४०–५ डिसेंबर १९२६). फ्रेंच चित्रकार. दृक्प्रत्ययवादीशैलीतील प्रमुख व अग्रगण्य कलावंत. पॅरिस येथे जन्म. त्याने वयाच्या पंधराव्या वर्षांपासून व्यंगचित्रे रंगविली व १८५८ मध्ये त्यांचे प्रदर्शन भरवले. तिथेच त्याचा अझेअन बूदँ ह्या चित्रकाराशी परिचय झाला. त्याने मॉनेला निसर्गरम्य बाह्य परिसरात चित्रे रंगवण्यास प्रोत्साहन दिले. १८५९ मध्ये मॉनेने पॅरिसमधील ‘स्वीस अकॅडमी’ मध्ये प्रवेश मिळवला;पण मध्येच त्याला २ वर्षे अल्जीरियात लष्करी नोकरी करावी लागली. १८६२ मध्ये पॅरिसला परत आल्यावर त्याने बाझिले, सीस्ले, रन्वार प्रभृती मित्रांसमवेत निसर्गाच्या सान्निध्यात चित्रे काढण्यास पुन्हा सुरुवात केली. १८६७ मध्ये सालाँमध्ये त्याचे चित्र प्रदर्शित झाले. मात्र ह्या काळात त्याची आर्थिक स्थिती फारच हलाखीची होती व निराशेच्या भरात त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला;पण मित्रांच्या मदतीने त्यातून तो सावरला.१८७० मध्ये फ्रँको-प्रशियन (जर्मन) युद्ध सुरू झाल्याने तो लंडनला गेला. तेथील धूसर दृश्ये, धुक्याने अवगुंठित असा टेम्स नदीचा परिसर, झाकळलेली सूर्यकिरणे, शांत व रमणीय शेते या नैसर्गिक सौंदर्याचा त्याच्या मनावर दाट प्रभाव पडला. तसेच कलासंग्रहालयातील जॉन कॉन्स्टेबल, जे. एम्. डब्ल्यू. टर्नर ह्यांची चित्र यांनीही तो प्रभावित झाला. त्यातूनच त्याला प्रकाशाच्या नवीनतम गुणांची जाणीव झाली व या जाणिवेतूनच त्याने दृक्प्रत्ययवादी चित्रे काढण्यास सुरुवात केली. वेस्टमिन्स्टर ब्रिज(१८७१) व इंप्रेशन, सनराइझ (१८७२) ही त्याची या काळातील प्रमुख चित्रे होत.१८७२–७६ ह्या काळात त्याचे वास्तव्य आर्झंतई येथे होते. तिथे एका नौकेमध्ये कलागृह (बोट स्टुडिओ) थाटून त्याने नदीच्या पात्रातून विहार करीत नदीवरील पूल व नौका शर्यती ह्या विषयांवर अनेक चित्रे रंगवली. या उत्कृष्ट चित्रमालिकेत नदीच्या पाण्यावरील चमकदार, प्रकाशमान रंगच्छटांचे प्रभाव पहायला मिळतात. आपल्या भावसामर्थ्याने व प्रकाशाच्या तीव्र ओढीने निसर्गातील क्षणिक, चंचल व निसटत्या दृश्य प्रभावांना त्याने आपल्या चित्रांतून चिरस्थायी स्वरूप देण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच त्याची दृकप्रत्ययवादी शैली घडत गेली. भावनांना उत्कट आवाहन करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाची क्षणोक्षणी पालटती भिन्नभिन्न रूपे साकार करण्यासाठी त्याने नैसर्गिक रंगांचा व आकारांना ठाशीव रूप देणाऱ्या रेषांचा अव्हेर केला व रंगांचे प्रकाशाच्या सात रंगांत विभाजन करून व उठावांचे (टोन्स) विलगीकरण करून प्रत्येक उठाव त्याने अलग अलग रंगवला. १८७४ मध्ये रंगविलेली द ब्रिज ट आर्झंतई, बोट्स ट आर्झंतई (पहा : मराठी विश्वकोश : खंड ७, चित्रपत्र ४७) वरिगाटा ऑन अ ग्रे डे ही उल्लेखनीय आहेत. ही चित्रे लोकांच्या टीकेचा व टिंगलीचा विषय ठरली; पण निराश न होता, त्याने व अन्य दृक्प्रत्ययवादी पंथाच्या चित्रकारांनी आपल्या चित्रांचे प्रदर्शन नादर या छायाचित्रकाराच्या स्टुडिओत भरविले. त्यात मॉनेचे इंप्रेशन, सनराइझ (पहा : मराठी विश्वकोश : खंड १, चित्रपत्र ६६) हे उत्कृष्ट व वादग्रस्त चित्र होते व ह्या चित्राच्या नावावरूनच ह्या पंथाला उपहासने का होईना, ‘इंप्रेशनिझम’ (दृक्प्रत्ययवाद) हे नाव मिळाले. १८७८ मध्ये चित्रकार एद्वार मानेच्या मदतीने मॉनेने व्हेथेनिल येथे घर विकत घेतले. तथापि हा त्याच्या जीवनातील फार खडतर काळ होता. १८८० मध्ये भरलेले त्याच्या चित्रांचे व्यक्तिगत प्रदर्शन फारच निराशाजनक ठरले व त्यानंतर कालांतराने दृक्प्रत्ययवादी गटाचेही विघटन झाले. नंतरच्या काळात त्याने नॉर्मंडी, हॉलंड, नॉर्वे, व्हेनिस इ. ठिकाणी प्रवास केला. १८८३ मध्ये आर्थिक सुस्थिती आल्यावर त्याने गिव्हर्नी येथे घर घेतले. तेथील परिसरातील फुलबाग, तलाव ही त्याची स्फूर्तिस्थाने ठरली व त्याचाच आविष्कार म्हणजे त्याची जगप्रसिद्ध वॉटरलिलीज ही चित्रमालिका होय. मॉनेने वस्तुमात्राच्या अंतरंगाचे केलेले आकलन व त्याद्वारे त्यांना दिलेले आल्हाददायक, दिव्य व सजीव रूप यांचा प्रत्यय या चित्रांतून येतो. हे गुण दृक्प्रत्ययवादी शैलीत अभावानेच आढळून येतात. ह्या चित्रमालेत त्याने आपल्या कलेचे अत्युच्च शिखर गाठले. त्याची ही चित्रे नंतरच्या अप्रतिरूप चित्रकारांना स्फूर्तिप्रद ठरली. निसर्गाशी तादात्म्य पावण्याच्या मानवाच्या सामर्थ्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे या कलाकृती होत. ह्याचवॉटरलिलीज मालिकेत शेवटी त्याने ४·२६ मी. (१४ फुट) रुंदीची अशी बारा भित्तिचित्रे रंगवली व त्याकरिता वयाच्या ऐंशीव्या वर्षी त्याने भित्तिचित्रणाचा खास अभ्यास केला. गिव्हर्नी येथे त्याचे निधन झाले.
संदर्भ : 1. Cogniat, Raymond; Trans. Dynes, Wayne, Monet and his World, London, 1966.
2. Spitz, William, C. Claude Monet, London, 1960.
लेखक : वा. व्यं.करंजकर
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020