आंरी मातीस (जन्म ३१ डिसेंबर १८६९–मृत्यू ३ नोव्हेंबर १९५४). प्रख्यात आधुनिक फ्रेंच चित्रकार. ल कातो येथे जन्म. सीं-कांर्तीं येथेशालेय शिक्षण (१८८२–१८८७). पुढे पॅरिसमध्ये वर्षभर कायद्याचा अभ्यास. नंतर पुन्हा सीं-कांर्ती येथे एका वकिलाच्या कचेरीत कारकुनाची नोकरी. वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत त्याला कलेमध्ये फारशी रुची नव्हती. पण पुढे एका दीर्घ आजारात त्याने सहज वेळ घालविण्यासाठी म्हणून चित्रे रंगविण्यास सुरुवात केली. त्याची आई हौशी चित्रकर्त्री होती, तिने त्याला प्रोत्साहन दिले. ह्याच काळात <हाउ टू पेंट हे पुस्तकी त्याच्या वाचण्यात आले. परिणामतः १८९१ मध्ये त्याने कायद्याचे क्षेत्र सोडून, पॅरिसला जाऊन चित्रकार होण्याचा निश्चत केला.
पॅरिसमध्ये प्रथम त्याने बूग्रो या चित्रकाराकडे व नंतर ‘एकोल दी बोजार्त’या कलाशिक्षणसंस्थेत ग्यूस्ताव्ह मॉरो या चित्रकाराच्या स्टुडिओत चित्रकलेचे धडे घेतले. तसेच ‘लूव्ह्र’ मध्ये उत्तमोत्तम कलाकृतींचा, त्यांच्या प्रतिकृती करून, अभ्यास केला. तो उत्कृष्ट शिल्पकार व आरेख्यक कलावंतही होता. १८९९ च्या सुमारास त्याने शिल्प घडवण्यास सुरुवात केली. त्याच्या चित्रांचे पहिले स्वतंत्र व्यक्तिगत प्रदर्शन (वन मॅन शो) १९०४ मध्ये आंब्र्वाझ व्होलारच्या कलावीथी मध्ये भरविण्यात आले. त्याची सुरुवातीची चित्रे रूढ वास्तववादी पद्धतीची होती; पण पुढे मॉनेसारख्या दृक्प्रत्ययवादी चित्रकारांच्या प्रत्यक्ष संपर्कात आल्यामुळे त्याच्या चित्रांच्या रंगांकनात उजळपणा व विविधता आली, तसेच नव-दृक्प्रत्ययवादी (नीओ-इंप्रेशनिस्ट) पद्धतीच्या प्रभावातून चित्रांतर्गत आकारांत सुलभता व स्पष्टता आली.
विसाव्या शतकाच्या प्रारंभी चित्रकलेच्या रंग या प्रमुख घटकात अनेक क्रांतिकारक बदल घडत गेले. हे बदल घडवून आणणाऱ्यांत मातीस हा प्रमुख चित्रकार होता. रंगांवर विशेष भर देणाऱ्यारंगभारवाद (फॉविझम) या आधुनिक चित्रसंप्रदायाचा तो प्रवर्तक मानला जातो. आक्रमक व झगमगीत रंगसंगती वापरून पाहणाऱ्याच्या मनात भावनिक खळबळ माजवणे, हा रंगभारवादाचा प्रमुख उद्देश होय. द ओपन विंडो (१९०५), स्टिल लाइफ विथ रेड कार्पेट (१९०६), द जॉय ऑफ लाइफ(१९०६) ही त्याची काही उत्कृष्ट रंगभारवादी चित्रे होत. १९०६ मध्ये तो प्रथमच उत्तर आफ्रिकेत गेला. त्याचे ब्ल्यू न्यूड (१९०७) हे या प्रवासाचे जणू स्मृतिचित्रच होय. त्याने ला ग्रांदे रेव्ह्यू या नियतकालिकात ‘नोट्स ऑफ अ पेंटर’ हा लेख लिहिला (१९०८). त्यात कलेतील सहजप्रेरणांचे महत्त्व विशद केले आहे. १९०८ ते १९१३ या काळात मातीसने स्पेन, जर्मनी, रशिया, आफ्रिका इ. देशांत प्रवास केला. या प्रवासात इस्लामी कला, रशियन आयकॉन चित्रे इत्यादींचा प्रभाव त्याच्यावर पडला. मोरोक्कोच्या प्रवासात त्याने जी चित्रे काढली, त्यांत सेझानच्या प्रभावातून आलेली तीव्र रंग, कणखर आकार यांसारखी घनवादी वैशिष्ट्ये दिसून येतात. उदा., थ्री सिस्टर्स (१९१६), द पियानो लेसन (१९१७) इत्यादी. आफ्रिकन शिल्पांच्या व मुखवट्यांच्या धर्तीवर त्याने स्वतःही काही शिल्पे घडवली. या सर्व प्रभावांना आत्मसात करून त्याने स्वतःची अशी खास स्वतंत्र शैली घडवली. शिवाय वस्तुजाताकडे पाहण्याची एक निरागस, बालसुलभ वृत्ती त्याच्या ठायी होती. त्यामुळे त्याच्या चित्रांमध्ये एक प्रकारचा ताजेपणा व चैतन्य दिसून येते. त्याच्या चित्रशैलीत विशुद्ध रंगांच्या सुसंवादी व विरोधाभासात्मक रचनांची एक आंतरक्रीडा दिसून येते. त्यातून साधेसुधे व अमूर्त आकार साधलेले दिसून येतात. द्विमितीय चित्रपृष्ठास विविध प्रकारच्या आलंकारिक रचनाबंधांनी समृद्ध केले जाते. त्यांत भित्तिपत्रे, पौर्वात्य गालिचे व वस्त्रप्रावरणे आदींवरील आकृतिबंधांसारखे अलंकरण आढळते. मानवी आकृत्यांचा वापर एक अलंकरण-घटक म्हणून केलेला दिसून येतो; तर कधी त्यांच्या लयबद्ध हालचालींच्या चित्रणातून नृत्याच्या गतिमानतेचा आभास साधलेला दिसून येतो. मानवी आकृत्यांप्रमाणेच स्थिरवस्तुचित्रणातही मातीसला खास रुची होती. तथापि वास्तवाचे केवळ यथातथ्य प्रतिबिंब म्हणजे चित्र नव्हे; तर एक स्वायत्त कलावस्तू म्हणून त्यास अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्याचे मत होते. त्याच्या चित्रांतून ऐंद्रिय संवेदना व भावनिक आवाहकता यांचा प्रभावी प्रत्यय येतो.
यांत्रिक युगातली ताणतणावांच्या विरोधात जीवन जगण्यातील आनंद चित्रित करणे. हे मातीसच्या कलेचे मर्म म्हणून सांगता येईल. त्याच्या चित्रांतील झगमगीत, आकर्षक रंगसंगती ही ह्याचीच निदर्शक आहे. १९२० ते २५ या काळात त्याने ओदलिस्क(गुलाम स्त्री वा वारांगना) नामक चित्रांची मालिका रंगवली. पिट्सबर्ग येथील कार्नेगी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात त्याला प्रथम पारितोषिक मिळाले. मेरिअन (पेनसिल्व्हेनिया) मधील ‘बार्न्झ फाउंडेशन’ च्या दालनात त्याने द डान्स (१९३२–३३) हे भित्तिचित्र रंगविले. चित्रे, रेखने, ग्रंथसजावट (अम्लरेखने व शिलामुद्रिते), शिल्पे (५४ ब्राँझशिल्पे), बॅले-नेपथ्य, वस्त्रे व काचपात्रे यांवरील आकृतिबंध अशा नानाविध प्रकारांत त्याने विपुल व दर्जेदार निर्मिती केली. व्हेनिस येथील ‘चॅपेल ऑफ रोझरी’ मधील आकृतिबंध व अलंकरण ही त्याच्या स्वतःच्या मते त्याची उत्कृष्ट निर्मिती होय (१९४८–५१). अपार्य जलरंगांत रंगवलेले कागदांचे विविध आकारांचे कपटे एकत्र डकवून त्यातून साधलेले अमूर्त आकृतिबंध-उदा., निग्रो बॉक्सर, जॅझइ. –ही त्याची शेवटच्या पर्वातील, १९४५ च्या दरम्यानची, ‘Papiers des Coupes’नावाने ओळखली जाणारी निर्मितीही नावीन्यपूर्ण आहे. आधुनिक पण फ्रेंच परंपरेचे भान जोपासणारी, नवीन प्रयोग व पुरातन संस्कृती यांचा समन्वय साधाणारी मातीसची कला ही विसाव्या शतकातील एक प्रमुख अभिव्यक्ती मानली जाते. नीस येथे त्याचे निधन झाले.
लेखक : १) श्री. दे.इनामदार
२) वा. व्यं.करंजकर
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
फ्रेंच चित्रकार. आधुनिक चित्रकलेचा तो आद्य प्रवर्त...
झाक ल्वी दाव्हीद विषयी माहिती
अझेअन आंरी पॉल गोगँ प्रख्यात आधुनिक फ्रेंच चित्रका...