दुहेरी तरफेचा वापर असलेले, सुपारी कातरण्याचे वा फोडण्याचे हत्यार. ‘अडकोत्तु’ या कानडी शब्दाचे अडकित्ता हे मराठी रूप असावे. अडकित्ता या शब्दाचा प्रथम उल्लेख राजव्यवहारकोशात (१६७६) सापडतो. त्यापूर्वी
किंकणी अडकित्ताकिंकणी अडकित्तामहानुभावांच्या लीळाचरित्रात (१३ वे शतक) ‘पोफळफोडणा’ हा समानार्थी शब्द आढळतो. पतंजलीच्या महाभाष्यातील (इ.स.पू. २ रे शतक) ‘शङ्कुला’ शब्दही याच अर्थी असावा, असे काही विद्वानांचे मत आहे. अडकित्याची निर्मिती इतर उपयुक्त साधनांसारखीच मानवी गरजेतून झाली व अशा साधनांना सौंदर्याची जोड देण्याच्या प्रवृत्तीमधून त्यावरील अलंकरण व त्याचे आकारभेद आले. कारागिरांनी अडकित्याच्या सपाट पृष्ठावर सोन्याचांदीचा मुलामा चढवून वेलबुट्या व चित्राकृत्री कोरल्या. त्यावर आरसे, रंगीबेरंगी काचांचे तुकडे बसविले. त्यास किंकिणी जोडून नादमयता आणली. तसेच अडकित्याच्या प्रत्यक्ष आकारामध्ये बदल करून त्यास देवदेवतांच्या व पशुपक्ष्यांच्या आकृत्यांची रूपे दिली. अडकित्याच्या पात्याशिवाय बाकी भागासाठी सोने, चांदी, पितळ, ब्राँझ इत्यादींचा वापर करण्यात आला. विविध प्रकारांचे अडकित्ते वेगवेगळ्या काळांत दिसून येतात. भारतात करनाळे, जामनगर वगैरे अनेक ठिकाणी कलाकुसरींचे सुबक अडकित्ते तयार होतात.
लेखक : श्री. दे इनामदार
माहिती स्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 8/24/2020