অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अब्दुस समद ख्वाजा

अब्दुस समद ख्वाजा

(सोळावे शतक). अकबराच्या दरबारी असलेला सुलेखनकार व चित्रकार. मूळचा इराणमधील शीराझचा. अबुल फज्लच्या ðआईन-इ-अकबरीतून ह्याच्या जीवनाविषयी बरीच माहिती मिळते. त्याच्या सुलेखन-कौशल्यामुळे 'शीरीन-कलम' (मधुर लेखणी) असे त्याला मानाभिधान मिळाल्याचा उल्लेख त्यात सापडतो. नोकरीसाठी त्याने त्या वेळी इराणमध्ये वास्तव्य असलेल्या पराभूत हुमायूनची ताब्रीझ येथे गाठ घेतली व नंतर तो काबूलला त्याच्या दरबारी आला. हुमायून व अकबर ह्यांनी त्याच्यापुढे कलेचे धडे घेतल्याचा उल्लेख, तैमुरनामा ह्या ग्रंथात आला आहे. पुढे अकबरानेही त्याला प्रथम लहानशी मनसबदारी देऊन, फतेपुर सीक्रीच्या टाकसाळीचा प्रमुख अधिकारी व शेवटी मुलतानाचा दिवाण करून त्याच्या कलेची व इतर गुणांची कदर केली. अब्दुस् समदने'दीन-ए-इलाही' धर्मपंथाचा स्वीकार केला होता. खसखशीच्या दाण्यावर कुराणातील सुरा लिहिण्याच्या त्याच्या कौशल्याची अबुल फज्लने तारीफ केली आहे.

ह्याच्या चित्रपद्धतीवर ताब्रीझी-इराणी पद्धतीचा प्रभाव दिसतो. ह्याची चित्ररचना बव्हंशी गुंतागुंतीची आहे. भारतीय व इराणी संस्कृतींचा मिलाफ ह्याच्या अनेक चित्रांतून दिसतो. त्याने दसवंतसारखे अनेक चित्रकार तयार केले. भारतात मोगल चित्रकलेचा पाया घालणार्‍यांत ह्याचे महत्त्वाचे स्थान आहे.

लेखक :प्र. वि. दिवाकर

माहिती स्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 1/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate