आर्क्टिक महासागर : उत्तर ध्रुवापासून सुमारे ७०० उ. पर्यंत पसरलेला बहुतांशी भूवेष्टित जलाशय. क्षेत्रफळ सुमारे १,४२,४४,९३६ चौ. किमी.; त्याशिवाय हडसन उपसागराचे व सामुद्रधुनीचे १२,९४,९९४ चौ. किमी.; व बेरिंग समुद्राचे २,२६६ चौ. किमी. वेगळेच.
उत्खातभूमि : (बॅडलँइस). अगदी कमी पावसाच्या प्रदेशात पठारी भागापासून मैदानातील एखाद्या नदीकडे उतरत जाणाऱ्या भूप्रदेशाचे स्वरूप काही ठिकाणी मोठे विलक्षण दिसते. टेकड्यांच्या रांगा आणि सपाट माथ्याच्या लहान मोठ्या एकाकी टेकड्या (मेसा आणि बुट्टे) जिकडे तिकडे उभ्या असलेल्या दिसतात.
एव्हरेस्ट : जगातील सर्वोच्च पर्वतशिखर. हे हिमालयाच्या हिमाद्री - ग्रेटर हिमालय - रांगेत नेपाळ - तिबेट सीमेवर २७० ५९' १५·९'' उ. व ८६० ५५' ३९·५'' पू. येथे असून त्याची उंची ८,८४७·६ मी. आहे. ब्रिटिश हिंदुस्थानच्या सर्वेक्षण खात्यात १८५६ पर्यंत हे पीक - १५ क्रमांकाचे शिखर म्हणून ओळखले जात होते.
कार्स्ट भूमिस्वरुप : यूगोस्लाव्हियाच्या `कार्स्ट' विभागात आढळणा.या भूमिस्वरुपाला व फ्रान्ंस, इंग्लडं,अमेरिका,क्यूबा, फिलिपीन्स, इंडोनिशिया इ. देशांच्या काही भांगात आढळणा-या तशाच भूमिस्वरुपाला कार्स्ट भूमिस्वरुप म्हणतात.
कालाहारी : दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध वाळवंट. २०० द. ते २८० द. आणि १९० पू. ते २४० पू. क्षेत्रफळ २, ५९, ००० चौ. किमी. बोट्स्वाना, नैऋत्य आफ्रिका आणि दक्षिण आफ्रिका संघराज्य या देशांमध्ये हे वाळवंट पसरले असून, त्याची समुद्रसपाटीपासून सरासरी उंची ९०० मी. आहे.
ड्रमलिन : हिमनदांच्या संचयन कार्याने तयार झालेले टेकडीसारखे भूस्वरूप. याचा आकार चहाच्या उपड्या चमच्यासारखा लांबटगोल एका बाजूला निमुळता असतो. ड्रमलिन हिमनदांनी वाहून आणलेल्या रेताड गाळाने निर्माण झालेल्या असतात व त्यांचा मोठा आस हिमनदांच्या वाहण्याच्या दिशेत असतो.
तराई : हिमालयाच्या पायथ्याशी दगडगोटे व भरडरेती यांच्या जाड्या गाळाने तयार झालेल्या भाबर या भागाच्या पुढे असलेला मातीच्या बारीक गाळाने तयार झालेला पट्टा. भाबरमध्ये भूमिगत झालेले जलप्रवाह तराईत भूपृष्ठावर येतात; त्यामुळे हा भाग दलदलयुक्त आहे. या पट्ट्याची रुंदी पूर्वी ८०–९० किमी. होती; परंतु आता बऱ्याच भागात वस्ती झाल्यामुळे त्याच्या मूळ स्वरूपात बरेच परिवर्तन झाले आहे.
तलाव : सामान्यतः जमिनीच्या खोलगट भागात नैसर्गिक वा कृत्रिम रीत्या झालेल्या जलसंचयास काठ, पाळ, शिल्पे इत्यादींच्या बांधकामाने वास्तुदृष्ट्या जे आकर्षक स्वरूप दिले जाते, त्यास तलाव म्हणतात. तलाव हे आकारमानाने सामान्यतः सरोवरापेक्षा लहान व विहिरीपेक्षा मोठे असतात. तलावाला, ताल, तालाब, तडाग, पुष्करणी, वापी, वापिका अशी भिन्नभिन्न नावे आहेत.
पठार : उंचावरील मैदाने असे पठारांचे वर्णन करता येईल. ही उंचावरील मैदाने एका किंवा अनेक बाजूंनी तीव्र उतारांची असतात. पठारी प्रदेशांत मैदानांसारखे सपाट भाग व उंचसखल भागही थोडेसे असतात.
बनेश्वर:महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्यातील (ता. भोर) निसर्गरम्य सहलस्थान. हे पुण्याच्या दक्षिणेस पुणे-सातारा महामार्गवरील नसरापूराच्या उत्तरेला सु. १.५ किमी. अंतरावर शिवगंगा ओढ्या काठी दाट वनात वसले आहे.
मरकारा : कर्नाटक राज्यातील कूर्ग जिल्ह्याचे मुख्यालय व थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण. लोकसंख्या २४,७२४ (१९८१). हे म्हैसूरच्या पश्चिमेस १२० किमी. वर असून रस्त्यांनी मंगलोर, म्हैसूर इ. शहरांशी जोडलेले आहे.
वाऱ्याच्या क्रियेने बनलेली सुट्या वाळूची लहान टेकडी किंवा कटक. समुद्राच्या उथळ किनारी भागात, वाळवंटात व सरोवराच्या सखल किनाऱ्यालगत सामान्यपणे वालुकागिरी आढळतात.
सागरी किनाऱ्याच्या सीमेवर आढळणारा वाळूचा व भरड द्रव्याचा बुटका कटक वा दांडा. हा जवळजवळ पाण्याच्या पातळीइतका उंच असतो. सागरी लाटांच्या क्रियेने हा निर्माण होतो. लाटांचे भोवरे फुटून अपवटी भागातील तळावरच्या वाळूत खळगा खणला जातो