वेशीवरच्या पाऊलखुणा : आनंदीबाईची आनंदवल्ली !
आनंदवल्लीभोवती आनंदीबाईंचा पिंगा!
एखाद्या नावाभवती अनेक वलये असतात ती तेथील ऐतिहासिक घटना व घडामोडींमुळे. ही वलये शेकडो वर्षांनंतरही आपल्या पाऊलखुणांतून अस्तित्वाची साक्ष देताना दिसतात. मात्र नाशिक शहराचे एक उपनगर झालेले आनंदवल्ली हे गाव लक्षात राहते ते आनंदीबाई पेशव्यांच्या मुत्सद्दी आठवणींमुळे. आनंदीबाईंच्या आठवणी अजूनही आनंदवल्लीभोवती पिंगा घालताना दिसतात.
आनंदवल्ली हे गाव नाशिकच्या पश्चिमेस चार किलोमीटरवर आहे. शहरातून गंगापूररोडने धरणाच्या दिशेने निघाले की, उजव्या हाताला मोठमोठाल्या इमारतींच्या गर्दीत आनंदवल्ली हरवल्याचे पहायला मिळते. हे गाव आता नाशिक शहराचे एक उपनगर होऊ पाहत असल्याने गावाच्या खाणाखुणा स्वत:लाच शोधत राहतात.
गोदावरीचा रमणीय प्रवाह आनंदवल्लीला खेटून गेल्याने हा परिसर रमणीय वाटतो. पूर्वी आनंदवल्ली हे एक लहानसे खेडे होते. त्याचे पूर्वीचे नाव मौजे चावंडस किंवा चौंधस असे म्हटले जाई. रघुनाथराव ऊर्फ राघोबादादा पेशवे हे इ.स. १७६४ मध्ये पुतणे थोरले माधवराव साहेब पेशवे यांच्यावर नाराज होऊन आनंदवल्लीत येऊन राहिले. दरम्यान, राघो महादेव ओक-मळणकर यांची कन्या आनंदीबाई यांचा राघोबादादा उर्फ रघुनाथराव पेशवे यांच्याशी विवाह झाला. त्या रघुनाथरावांच्या दुसऱ्या पत्नी. १७६४ च्या डिसेंबर महिन्यात केसो गोविंद यांची चावंडस येथील कारभारावर नेमणूक झाली. तेव्हापासून गावच्या विकासाला चालना मिळाली. तेव्हा चावंडसचे नाव ‘आनंदवल्ली’ असे नव्हते. केसो गोविंद यांना व्यवस्थति कारभार करता यावा यासाठी पन्नास स्वार व पन्नास शिपाई देण्यात आल्याचा उल्लेख पेशव्यांच्या कागदपत्रात मिळतो. रघुनाथरावांनी चावंडस येथे पत्नी आनंदीबाई यांच्यासाठी मोठा तटबंदी वाडा बांधला. त्याला आनंदीबाईंची गढी असेही म्हटले जाऊ लागले. २ ऑगस्ट १७६४ रोजी आनंदीबाईंना विनायक हा प्रथम पुत्ररत्न झाल्याने त्या आनंदात त्यांनी गावाचे नाव बदलून ‘आनंदवल्ली’ असे ठेवले, असे म्हटले जाते. मात्र तान्ह्या विनायकाला हातात खेळवताना रघुनाथरावांच्या हातातून पडल्याने विनायकचा मृत्यू झाला, अशीही अख्यायिका सांगितली जाते. पण आनंदवल्ली म्हटले की, आठवण होते ते आनंदीबाई पेशव्यांची अन् डोळ्यांसमोर येते ते ‘ध’ चा ‘मा’ करून केलेले कुटील कारस्थान. मराठ्यांच्या इतिहासात कारस्थानी स्त्री म्हणून आनंदीबाई प्रसिद्ध होत्या. त्यामुळे नारायणरावांनी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवली होती. नागपूरकर भोसल्यांच्या बखरीत तर असे म्हटले आहे की, ‘नारायणरावाने तिची लुगड्यांत फंदाचे कागद लपविले म्हणून लुगडे फेडून छळणा करावी.’ ‘ध’ चा ‘मा’ करून नारायणरावाचा वध आनंदीबाईंनीच केल्याचा समज तेव्हा सर्वांना होता. आनंदीबाईही आपल्यावरील हा आरोप जाणून होती, असे इतिहाससंग्रहांत छापलेल्या मेणवली दफ्तरांतील एका पत्रावरून कळते. मात्र, नाना फडणीसांसारख्या मुत्सद्द्यालाही आनंदीबाईंना अपराधी ठरवावे इतके पुरावे मिळाले नाहीत. नारायणरावांबाबतचे राघोबादादांचे अस्सल पत्र रामशास्त्र्यांच्या हाती पडले त्यावरून ‘ध’ चा ‘मा’ झाला होता हे जरी स्पष्ट झाले असले तरी ते कोणी केले हे गूढ अजूनही उलगडलेले नाही. नाना फडणीसांनी हे गूढ उलगडण्यासाठी बरीच खटाटोप करूनही आनंदीबाईंचे नाव पुढे आले नाही. यावरूनही आनंदीबाईंचा मुत्सद्दीपणा दिसून येतो.
रघुनाथराव पेशवे आनंदवल्ली येथे १७६५ पासून १७६८ पर्यंत राहिले व येथूनच त्यांनी आनंदीबाईंच्या सल्ल्याने पेशवाईची गादी घेण्याकरिता बरेच राजकारण केले. एकदा त्यांनी १५००० सैन्य जमवून धोडपपर्यंत चाल केली. परंतु थोरले माधवराव पेशवे यांनी धोडपवर स्वारी करून त्यांच्या सैन्याचा पराभव केला व त्यांना कैद करून पुण्यात नेले. पण १७६८ मध्ये पेशव्यांनी आनंदवल्ली रघुनाथदादांच्या हवाली केली. आनंदीबाईंनी १७७४ मध्ये फाल्गुन महिन्यात नवशा गणपती मंदिराची स्थापना केली. नवसाला पावणारा गणपती म्हणून हे मंदिर आजही ओळखले जाते. हे मंदिर आनंदीबाईंच्या गढीच्या पश्चिमेस असल्याने तेव्हा गढीवरून गणपतीचे दर्शन घेत असावेत. नवशा मंदिराशेजारी हसन सय्यद रांझेशाह शहीद यांचा दर्गा आहे. हसनबाबा नारोशंकरांचे सरदार असल्याचेही म्हटले जाते. मात्र याबाबत पुरेशी माहिती मिळत नाही.
रघुनाथदादा व आनंदीबाई कटकारस्थाने करू लागल्याने त्यांना कोपरगावात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. राघोबादादांचा मृत्यू झाल्यावर आनंदीबाईंच्या अंगावरील सौभाग्यालंकार काढून आणण्यासाठी नाना फडणीसांनी आपला हस्तक कोपरगावी पाठविला होता. यावरून तत्कालीन राजकारणाची तीव्रता लक्षात येते. पुढे आनंदीबाईंच्या आजारपणात तिने नाना फडणीस यांच्याकडे आनंवल्लीस हवाबदल करण्यासाठी पाठवावे म्हणून लक्ष्मणभट उपाध्ये यांच्या मार्फत पुष्कळ खटपट केला. नाना फडणीस यांनी आनंदीबाईंच्या विनंतीस मान देऊन, तिला सर्व खटल्यासह १७९२ मध्ये कोपरगावाहून आनंदवल्ली येथे पाठविले. पुढे दोन वर्षांनी म्हणजे २७ मार्च १७९४ मध्ये आनंदीबाईंचा आनंदवल्ली येथे मृत्यू झाला. मृत्यूसमयीही माधवरावांचा हेर गढीत उपस्थित होता आणि त्याने माधवरावांना गढीवर घडणाऱ्या सर्व घडामोडी कळविल्याची पत्रे मिळतात. आनंदीबाईंच्या मृत्यूच्या वार्तेबाबतच्या पत्रात आनंदीबाईंच्या मृत्यूक्षणांचे वर्णनही करण्यात आले आहे. मृत्यूच्या क्षणापर्यंत आनंदीबाई ‘सावध’ असल्याचेही पत्रात उल्लेख आहेत. आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर त्यांची व रघुनाथरावांची समाधी आनंदवल्ली बंधाऱ्याजवळ रामेश्वर मंदिरासमोर बांधण्यात आली आहे. रामेश्वर मंदिरही पेशवेकालीन आणि आकर्षक आहे. या मंदिराबाहेरील मंडपात असलेला संगमरवरी नंदी नंतरच्या काळात बसविण्यात आला आहे. मात्र मंदिरातील पिंडीशेजारीच नंदीची आकर्षक मूर्ती आहे. शंकराच्या मंदिरात नंदी मंदिराबाहेर दिसतो मात्र येथे अगदी पिंडीजवळ व शालिनतेने पिंडीकडे पाहत असलेला नंदी पाहायला मिळतो. हे वेगळेपण इतरत्र पाहायला मिळत नाही.
आनंदीबाईंच्या मृत्यूनंतर बाजीराव, चिमणाजीआपा ही दोन मुले व अमृतराव १७९५ पर्यंत आनंदवल्ली येथेच बंदीवासात होते. परंतु त्यांनी गुप्त राजकारणे सुरू केल्याने त्यांना नाना फडणीसांनी १७९५ मध्ये जुन्नरच्या किल्ल्यात नेऊन कैदेत ठेवले. आनंदीबाईंना दुर्गाबाई ऊर्फ गोदूबाई नावाची कन्याही होती. मात्र तिच्याबाबतही माहिती उपलब्ध होत नाही. आनंदीबाईंनंतर आनंदवल्लीचे सर्व वैभव व महत्त्व संपुष्टात आले. १८१८ साली इंग्रजांनी पेशवाई बुडवली. त्यानंतर इंग्रजांनी आनंदीबाईंच्या गढीला आग लावल्याचेही म्हटले जाते. त्याचे उरले सुरले अवशेष आता जमीनदोस्त झाले असून गढीचे कोसळलेले दोन बुरूज आजही तग धरून उभे आहेत. पण नाशिककरांना आनंदीबाईंची गढी आठवते ती चार वर्षांपूर्वी गढीच्या जागेवरून झालेल्या वादादरम्यान गोळीबारात मृत्यूमुखी पडलेल्या सुरक्षारक्षकामुळे. तेव्हा ही गढी एकदम प्रकाशात आली. मात्र आनंदीबाईंच्या आठवणी मात्र अजूनही आनंदवल्लीभवती पिंगा घालतात. आनंदीबाईंची आनंदवल्लीतील पेशवाई संपली असली तर नवश्या गणपती व रामेश्वर मंदिर हे पेशव्यांच्या कारकिर्दीची साक्ष देत आजही दिमाखाने उभे आहे.
लेखक : रमेश पडवळ
rameshpadwal@gmail.com
contact no : 8380098107
अंतिम सुधारित : 5/27/2020