मुंबईच्या दमट हवामानापासून मुक्ती मिळवण्यासाठी व हवा पालट करण्यासाठी मुंबईच्या पर्यटकांसाठी तसेच जगभरातील पर्यटकासाठी 'हिरवा निसर्ग' म्हणजेच माथेरान... महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगा मध्ये वसलेले गाव म्हणजेच माथेरान. मुंबई पासून 83 किमी अंतरावर मध्य रेल्वेचे नेरळ हे स्टेशन येते, तेथून माथेरानला जाता येतं. नेरळ पासून जवळच हे थंड हवेचं ठिकाण आहे. माथेरानला टॅक्सी किंवा खाजगी वाहनेने सुद्धा जाता येते.
भारतातील वातावरण हे इंग्रजासाठी खूप दमट व गरम असल्याने 1850 साली ठाण्याचे तत्कालीन कलेक्टर ह्युज मॅलेट यांनी माथेरान या स्थळाचा शोध लावला. माथेरानची राणी म्हणून ओळख असणाऱ्या मिनी ट्रेनची सर आदमजी यांनी 1907 साली स्वखर्चातून सुरुवात केली.
नेरळ माथेरान या 22 किमीचा प्रवास करण्यासाठी 2 तास लागतात. पण हा दोन तासाचा प्रवास हा अत्यंत अविस्मरणीय असतो. हा प्रवास करताना विविध वृक्ष, प्राणी याचे दर्शन घडते. त्यामुळे येणारा अनुभव हा अलौकिक असतो. घनदाट जंगल आणि विविध वनस्पतीने वेढलेल्या माथेरानमध्ये 38 प्रेक्षणीय पॉइंट आहेत. हे पॉइंट तुम्ही घोड्या वरून अथवा पायी पाहू शकता. पावसाळ्यात माथेरान हे काही औरच असते. पावसाळ्यात माथेरानमध्ये 26 जिवंत झरे पाहायला मिळतात. त्यापैकी मॅलेट स्प्रिंग, हौरिसन स्प्रिंग हे झरे प्रसिद्ध आहेत.
माथेरानला जसे नैसर्गिक वैभव लाभलेय तसेच त्याला ऐतिहासिक वारसाही आहे. टूर पेटीट, रेडीमनी, गुलिस्थन, क्रागीबन, एल्फिसरून, रोबिन्सन, बार हाऊस या वस्तू व शंभर वर्ष जुने वाचनालय, पोस्ट ऑफीस, दूरध्वनी केंद्र आहे. या वास्तू माथेरानच्या सौंदर्यात भर घालतात. येथील खास वैशिष्ट्ये म्हणजे येथील निसर्ग प्रदूषणापासून कोसो दूर आहे. येथील जंगल, वृक्षवल्ली अगदी वेगळी असून दुर्मीळ वनस्पती, पक्षी आणि प्राण्यांचे हे माहेरघर आहे. दुर्मीळ होत चाललेला शेकरु प्राणीसुध्दा येथे पाहावयास मिळतो. मोर, ससे, हरिण, निलगाय यासारख्या प्राण्यांचा देखील येथे वावर आढळतो.
माथेरानच्या बाजारपेठेत चमड्याच्या वस्तू, लाकडी खेळणी या वस्तूच्या खरेदीसाठी पर्यटकांची झुंबड उडालेली असते. माथेरान हे लाल मातीतील एक सुंदर 'स्वर्ग' आहे. त्याला एकदा तरी आवर्जून भेट द्या.
लेखक - प्रशांत भालेराव
स्त्रोत : महान्युज
अंतिम सुधारित : 7/23/2020