करवीर माहात्म्य व लक्ष्मीविजय या ग्रंथात शेषनारायण विष्णूच्या करवीरच्या सीमेच्या आतील चार म्हणजे अंतर्गृही शेषशायी रूपातील स्थानांची वर्णने आहेत. यातील एक विष्णू मूर्ती महालक्ष्मी मंदिरात पूर्वबाजूस आहे. त्यास न्यग्रोधतीर्थ म्हणतात. पालाशतीर्थ म्हणून ओळखली जाणारी दुसरी मूर्ती महालक्ष्मी मंदिराच्या प्रांगणातील अतिबलेश्वर महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणातील अतिबलेश्वर महादेवाच्या मंदिरात उजव्या कोपर्यात आहे. पूर्वी ही मूर्ती प्रांगणातील राम मंदिरासमोरील पिंपळाच्या पारावर होती. तिसरी शेषशायी विष्णूची मूर्ती गंगावेश पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या मारूती मंदिरात आहे. याला अश्वत्थतीर्थ म्हणतात.
चौथी औदुंबर तीर्थ म्हणून ओळखली जाणारी शेषशायी विष्णूची मूर्ती मिरजकर तिकटीत सुभाष चौकातील रिक्षा स्थानकाच्या समोर एका साध्या छोटय़ा मंदिरात आहे. ही प्राचीन मूर्ती पूर्वी रविवार पेठेतील बिंदू चौक जेलजवळील बुरूजावर होती. ही मूर्ती शेषशायी विष्णूच्या अंतर्गृही चार व बहिगृही असलेल्या चार मूर्तीच्यापेक्षा सर्वात मोठी आहे. भूदेवी, लक्ष्मी (श्री) देवी, नारद, ब्रह्म यांच्यासह ही मूर्ती साधारणपणे 5 फुट रूंदीची आहे. विष्णूच्या चेहर्यावरील शांत भाव मनोहर आहेत. मूर्ती काळ्य़ा पाषाणात कोरलेली असून तिची घडण अतिशय सुबक व चित्तवेधक आहे. ओंकारेश्वर, विठोबा मंदिराच्या दर्शनाबरोबरच मिरजकर तिकटीवरील या शेषशायी विष्णूचे दर्शन करता येते.
लेखन: ज्ञानदीप
माहिती स्रोत: myKolhapur.net
अंतिम सुधारित : 8/17/2020