अफगाणिस्तानातील महत्त्वाची नदी. एकूण लांबी सु. ६९६ किमी.; जलवाहन क्षेत्र ५१,८०० चौ. किमी.;कोफेसा, कुहू, कुभा ह्या प्राचीन नावांनी ही प्रसिद्ध होती. काबूल शहराच्या ९६ किमी. पश्चिमेकडील हिंदुकुशच्या संगलाख पर्वतश्रेणीमध्ये ३,२९१ मी. उंचीवर ही उगम पावते. काबूल प्रांताचे खोर हिच्यामुळे समृद्ध बनले आहे.
ही नदी, काबूल, जलालाबाद या शहरांवरून जाते व खैबर खिंडीच्या उत्तरेकडील मोहंमद टेकड्यांमधील खेल निदऱ्यांमधून पश्चिम पाकिस्तानात शिरते; पेशावरच्या मैदानी मुलखातून आग्नेयीकडे वाहत पुढे ती अटकजवळ सिंधू नदीस मिळते. पाकिस्तानातील हिचा प्रवाह सु. १३६ किमी. आहे. काबूल शहर सोडल्यानंतर हिला दक्षिणेकडून लोगर नदी मिळते.
लोगर गझनीपलीकडील गुलकोह या ४,२६४ मी. उंचीच्या पर्वतातून व निसर्गरम्य प्रदेशातून वाहत येते. लोगरनंतर काबूल नदीला उत्तरेकडून पंजशीर, सुरखाब या नद्या मिळतात. जलालाबादजवळ तिला कुनार नदी मिळते.
पाकिस्तानमध्ये हिला उत्तरेकडून स्वात आणि दक्षिणेकडून बारा नदी मिळते. अफगाणिस्तानमध्ये हिच्यावर बांध आणि जलविद्युत् केंद्रे उभारली आहेत. जलालाबादनंतर नदी जलवाहतुकीस उपयुक्त असल्याने ती व्यापारासाठी महत्वाची आहे. अलेक्झांडरने काबूल नदीमार्गेच हिंदुस्थानात प्रवेश केल्याने काबूल नदीला तेव्हापासून लष्करी महत्त्व प्राप्त झाले आहे.
दिवाकर, प्र. वि.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/7/2020