आहे. भूमध्य व एड्रिअॅटिक यांमधील ऑट्रँटो सामुद्रधुनी फक्त ७० किमी. रुंद आहे. अॅपेनाइन्स, आल्प्स व दिनारिक संहतींच्या तृतीययुगकालीन अधोवलींमध्ये साचलेला हा जलाशय आहे.
एड्रिया बंदरावरून समुद्राला हे नाव पडले. ऑट्रँटो सामुद्रधुनीजवळ याची क्षारता ३५% आहे; परंतु पर्वतप्रवाहांमुळे उत्तरेकडे ती १८% आहे. एड्रिअॅटिकचे हवामान एकंदरीत भूमध्यसागरी असले, तरी उत्तरेकडे ते काहीसे विषम आहे.
हिवाळ्यात बोरा हे थंड वारे वाहतात. त्यावेळच्या चक्रीवादळांमुळे नौकानयन कष्टप्रद असते. बाल्कन किनारा निमज्जन किनारा आहे, तर इटालियन किनारा उन्मज्जन किनारा आहे. उत्तरेकडे व्हेनिसच्या आखातापासून जवळजवळ ट्रीएस्टपर्यंत दलदली, खारकच्छ व वालुकादंड आढळतात.
बाल्कन किनार्यावर बेटांची रांग किनार्याला समांतर आहे; तेथे वलीपर्वतांच्या दर्यात निमज्जनामुळे समुद्र घुसून बेटांमागे लांबट आखाते तयार झालेली आहेत.
चांगल्या बंदरांचा व अंतर्भागात जाणार्या सुगम रस्त्यांचा अभाव असूनही मध्य यूरोपला जवळचा म्हणून एड्रिअॅटिकला पूर्वीपासून व्यापारी मार्गाचे महत्त्व आहे.
ब्रेनर व झेमेरिंग खिंडींमुळे, तसेच व्हेनिसच्या उत्कर्षामुळे त्याला विशेष महत्त्व आले. इटालियन किनार्यावरील अँकोना हे एड्रिअॅटिकमधील नैसर्गिक बंदर असले, तरी लाँबर्डीच्या मैदानाचे प्रवेशद्वार व्हेनिस, इटलीचे बारी, खुले बंदर ट्रीएस्ट, अल्बेनियाची डुर्रेस व व्ह्लोना, यूगोस्लाव्हियाची डूब्रॉव्हनिक व स्प्लिट ही बंदरेही महत्त्वाची आहेत.
डाल्मेशियन किनार्याची निसर्गशोभा, सौम्य हवा आणि स्वच्छ निळे पाणी यांमुळे हौशी प्रवाशांचे एड्रिअॅटिक हे एक आकर्षण आहे.
कुमठेकर, ज. व.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020