विषुववृत्ताच्या दक्षिणेस, झाईरेच्या पूर्व सरहद्दीजवळील सरोवर. मध्य आफ्रिकेत निर्माण झालेल्या अंत:कृत दरीमधील हे अंडाकृती सरोवर ७६ किमी. लांब व ५० किमी. रुंद असून ईशान्येकडे असलेल्या ३२ किमी. लांबीच्या काझिंगा खाडीने ते जॉर्ज सरोवराशी जोडलेले आहे. दोघांचे मिळून क्षेत्रफळ २,५१२ चौ. किमी. असून त्यापैकी एक तृतीयांश भाग युगांडामध्ये जातो. एडवर्डला दक्षिणेकडून रूचूरू नदी मिळते. एडवर्डमधून उत्तरेकडे निघणारी सेमलिकी नदी अॅल्बर्ट सरोवराला मिळते; हीच पुढे श्वेत नाईलचा उगमप्रवाह बनते. एडवर्ड सरोवरात मासे, पाणकोंबड्या, सुसरी, हिप्पोपोटॅमस इ. विपुल प्रमाणात आढळतात. १८७५ मध्ये हेन्री स्टॅन्ली याने या सरोवराचा शोध लावला.
लेखक : र.रू.शाह
स्त्रोत : मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/25/2023