यूरोपची खंडभूमी व ग्रेट ब्रिटन यांमधील समुद्र. याला पूर्वी जर्मन महासागर म्हणत. दक्षिणेस डोव्हरच्या सामुद्रधुनीपासून उत्तरेस शेटलंड बेटांच्या उत्तरेकडील समुद्रबूड जमिनीच्या सीमेपर्यंत याची लांबी १,१२५ किमी. आणि स्कॉटलंडपासून डेन्मार्कपर्यंत रुंदी ६७५ किमी. आहे. ५१० ते ६१० उ. आणि २०३० प. ते ७०३० पू. यांच्या दरम्यान याचा विस्तार ५,७०,००० चौ. किमी. आहे. याच्या पश्चिमेस ग्रेट ब्रिटन, ऑर्केनी व शेटलंड बेटे, पूर्वेस नॉर्वे व डेन्मार्क, दक्षिणेस डोव्हरची सामुद्रधुनी आणि फ्रान्स, बेल्जियम, नेदर्लंड्स व जर्मनी यांचे प्रदेश आणि उत्तरेस आर्क्टिक महासागर आहे.
नॉर्वे व डेन्मार्क यांमधील याचा स्कॅगरॅक हा भाग स्वीडन व डेन्मार्क यांमधील कॅटेगॅट या समुद्रविभागाने बाल्टिक समुद्राशी जोडलेला आहे. जर्मनीचा कील कालवाही उत्तर समुद्र व बाल्टिक समुद्र यांस जोडतो. उत्तर समुद्र दक्षिणेकडे उथळ असून उत्तरेकडे हळूहळू खोल होत गेला आहे. त्याची सरासरी खोली ५६.५ मी. असून हंबरच्या मुखाजवळील ‘सिल्व्हर पिट’ ही पूर्व-पश्चिम सागरी गर्ता (ट्रेंच) ९० मी. खोल आहे.
नॉर्वेच्या किनाऱ्याला समांतर असलेला ‘नॉर्वे डीप’ स्कॅगरॅकजवळ ६६० मी. खोल आहे. डॉगरबँक हा उत्तर समुद्राचा सर्वांत उथळ तळभाग काही ठिकाणी फक्त १५ ते ३६ मी. खोल असून त्याने या समुद्राच्या तळाचा सु. तिसरा हिस्सा व्यापलेला आहे. स्कॅगरॅकच्या दक्षिणेकडील किनारा सखल, सपाट व दलदलींनी भरलेला आहे. नॉर्वे, स्कॉटलंड व इंग्लंडचा बराच भाग यांच्या किनाऱ्यांवर खडकांचे उभे कडे आहेत.
या समुद्राच्या दंतुर किनाऱ्यावर अनेक आखाते, खाड्या व फ्योर्ड आहेत. उत्तर समुद्राला मिळणाऱ्या प्रमुख नद्या म्हणजे एल्ब, वेझर, एम्स, ऱ्हाईन-म्यूज, स्केल्ट, टेम्स, हंबर, टीझ, टाईन, ट्वीड व फोर्थ या होत. त्यांच्या मुखांजवळ याची क्षारता ३४%० व इतरत्र ३५%० असते. उत्तरेकडून व दक्षिणेकडून ३५%० क्षारतेचे व बाल्टिकमधून ३०%० क्षारतेचे पाणी उत्तर समुद्रात येते. हिवाळ्यात याच्या पृष्ठपाण्याचे तपमान ६.५० से. असते.
डेन्मार्कजवळ काही भागांतील पाणी गोठते, परंतु उत्तर अटलांटिक प्रवाहाचा एक फाटा या समुद्रात शिरतो; त्यामुळे बंदरे हिवाळ्यातही खुली राहतात. उन्हाळ्यात डच व डॅनिश किनाऱ्यांजवळ तपमान १७.५० से. तर स्कॉटलंडजवळ १२० से. असते. दक्षिणेकडील ‘सदर्न बाइट’ च्या मध्यभागात, डेन्मार्कच्या पश्चिमेस व नॉर्वेच्या नैर्ऋत्येस उधानाच्या वेळीसुद्धा भरती-ओहोटीतील फरक जवळजवळ शून्य असतो.
उत्तरेकडून व दक्षिणेकडून येणारी भरतीची लाट या तीन ठिकाणांभोवती घड्याळकाट्याच्या विरुद्ध दिशेने फिरते. उत्तरेकडे भरती-ओहोटीतील फरक फक्त १.५ मी., इंग्लंडच्या किनाऱ्यावर ६ मी., दक्षिणेस ५ मी., तर यार्मथ व नेदर्लंड्समधील डेन हेल्डर येथे तो २ मी. असतो. नद्यांनी आणलेले पदार्थ, वारे, भरतीप्रवाह, ऋतुपरत्वे होणारा तपमानांतील फरक यांमुळे येथील पाण्याची पुष्कळच हालचाल होते. सूर्यप्रकाश मिळणाऱ्या पृष्ठथरांना यामुळे वनस्पतिपोषक द्रव्ये भरपूर मिळतात. प्लँक्टन हे माशांचे खाद्य विपुल वाढते व माशांच्या अनेक जातींचे उत्पादन चांगले होते.
डॉगरबँक व इतरत्र मिळून येथे दरवर्षी सु. १६,२५,००० मे. टन मासे मिळतात. त्यांपैकी ५०% हेरिंग असतात. शिवाय कॉड, मॅकेरल, हॅडॉक, प्लेस इ. मासे मिळतात. ग्रेट ब्रिटन, पश्चिम जर्मनी, डेन्मार्क, नेदर्लंड्स व नॉर्वे या देशांतील लोक येथे मासे धरतात. पूर्वीपासून हा समुद्र उत्तर यूरोपचा मुख्य व्यापारी मार्ग आहे. लंडन, हँबर्ग, ब्रेमेन, अॅम्स्टरडॅम, रॉटरडॅम, अॅंटवर्प ही येथील प्रमुख बंदरे होत.
या समुद्राच्या नॉर्वे, ब्रिटन व डेन्मार्क यांच्यापासून सारख्या अंतरावरील एकोफिस्क येथील भागात अलीकडे खनिज तेल सापडले आहे. यापूर्वी या समुद्रात नैसर्गिक वायूही सापडला आहे. तेलाच्या बाबतीत परावलंबी असलेले ब्रिटन १९८० पर्यंत पूर्णपणे स्वावलंबी होऊन तेल उत्पादक देशांत बरेच वरचे स्थान मिळवील असा संभव आहे. नॉर्वे व तेल सापडलेली जागा यांमध्ये समुद्रतळावर एक खोल गर्ता असल्यामुळे तेल ब्रिटनलाच नेले जाईल.
कुमठेकर, ज. ब.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/14/2020
सेंद्रिय शेतीची वाटचाल जगभरातील विविध देशांमध्ये स...
ग्लासगो : स्कॉटलंडमधील सर्वात मोठे शहर. लोकसंख्या ...