स्पॅनिश पास्क्वा व तद्देशीय रापा नूई या नावांनी प्रसिद्ध असलेले दक्षिण पॅसिफिकमधील चिलीचे बेट. २७० ०५’ द. १०९० २०’ प.; क्षेत्रफळ ११९ चौ. किमी. लोकसंख्या १,५९८ (१९७०). चिली किनाऱ्यापासून हे सु. ३,२०० किमी. वर पश्चिमेस असून नवाश्मयुगीन अवशेषांसाठी प्रसिद्ध आहे.
सु. १८ किमी. लांब, २४ किमी. रुंद, त्रिकोणी आकाराचे आणि लाव्हाचे बनलेले हे बेट १७२२ मधील ईस्टरच्या रविवारी राग्वाँन या डच नाविकाने शोधले. १८८८ मध्ये चिलीने हे घेईपर्यंत येथील बहुतेक आदिवासी नामशेष झाले होते. चिलीने पश्चिमेकडील भागात हांगो रोआ खेडे स्थापून राहिलेल्यांची वसाहत केली. ऊस, याम, बटाटे, तंबाखू, तारो, कंदमुळे, उष्णकटिबंधातील फळे आणि मासे ही येथील प्रमुख उत्पादने असून, गवताळ प्रदेशावर शेळ्यामेंढ्या, गुरे पाळली जातात.
पुरातत्त्वीय दृष्ट्या ईस्टर बेट महत्त्वाचे आहे. आतापर्यंत झालेल्या संशोधनानुसार या बेटावर इसवी सनाच्या सुरुवातीस समुद्रमार्गे बाहेरून आलेल्या नवाश्मयुगीन संस्कृतीच्या लोकांनी वस्ती केली. हे लोक दगडी कोरड्या बांधकामात प्रवीण असून त्यांनी इसवी सनाच्या चौथ्या शतकाच्या शेवटी बेटाभोवती खडकात कोरून मोठी तटबंदी, खंदक व बंदरासाठी धक्के तयार केले. घडीव दगडी बांधकामाव्यतिरिक्त या लोकांनी प्रचंड आकाराचे परंतु वास्तव रूपाचे मानवी पुतळेही विपुल प्रमाणावर बनविल्याचे आढळून आले. संपूर्ण व अचूक सांस्कृतिक उत्क्रम सांगता येत नसला, तरी दुसऱ्या कालखंडात सांस्कृतिक विभिन्नता दिसून येते. या काळातील बांधकाम निकृष्ट दर्जाचे वाटते.
या संस्कृतीचे लोक ‘अहू’ नावाचे चौथरे बांधून त्याखाली एक किंवा अनेक प्रेते पुरत. चौथऱ्यावर कित्येक टन वजनाचे व प्रचंड आकाराचे मानवी पुतळे उभारीत. यांतील काही पुतळे ९—१० मी. उंचीचे आहेत. याशिवाय पहाडावर कोरलेली चित्रे, एका अज्ञात लिपीत आशय व्यक्त करणाऱ्या लाकडी पट्ट्या, दगडी कुर्हाडी व गळ, हाडांच्या सुया, शंखांची कर्णभूषणे इ. अवशेषही सापडले आहेत. १६८० मध्ये झालेल्या अंतर्गत यादवीत या संस्कृतीचा नाश झाला.
डिसूझा, आ.रे. ; देव, शां. भा.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020