काळ्या समुद्राचा उत्तरेकडील रशियांतर्गत उथळ फाटा. प्राचीन नाव ‘पेलस मीओटिस’. याच्या आग्नेयेस क्रिमिया, उत्तरेस युक्रेन आणि पूर्वेस रशियाच्या उत्तर कॉकेशस भागातील रॉस्टॉव्ह व क्रॅस्नोदार हे प्रांत आहेत.
सु. ३ ते १२ किमी. रुंद व ४० किमी. लांब केर्च सामुद्रधुनीने हा काळ्या समुद्रास जोडलेला आहे. याचे क्षेत्रफळ सु. ३७,५५५ चौ. किमी., लांबी ३२० किमी., रुंदी १२८ किमी. व खोली १५ मी. आहे. अॅझॉव्हच्याच ईशान्येकडील टगनरॉग आखाताला डॉन नदी मिळते; उत्तरेकडून अॅझॉव्हला मीऊस, कालमीऊस आणि पूर्वेकडून माया, कूबान या नद्या मिळतात. नद्यांमुळे समुद्राचा खारटपणा कमी आहे. डॉनचा गाळ मोठ्या प्रमाणात येतो. वारे आणि प्रवाह यांमुळे वाळूचे बांध निर्माण झाले आहेत.
पश्चिमेकडील ११२ किमी. लांब अरबात द्वीपकल्प हे असेच वाळूचे बनलेले आहे. अरबातच्या पश्चिमेकडे सिव्हॅश अथवा प्यूट्रड हे क्षारयुक्त, दुर्गंधी दलदलीचे खारकच्छ आहे. हिवाळ्यात अॅझॉव्हचे पाणी गोठते; परंतु काळ्या समुद्रापेक्षा चौपटीने येथे मासे मिळतात. टगनरॉग, इदानफ, ओसिपेंको ही यावरील महत्त्वाची बंदरे आहेत.
शाह, र. रू.; जोशी, चंद्रहास
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/28/2019