केरळचा प्राचीन इतिहास चेर, चोल इ. वंशांच्या कारकार्दींनी भरला आहे.
पैकी नवव्या शतकातील चेरमान पेरुमाल या राजाने मुसलमान धर्म अंगिकारला आणि आपले राज्य नातेवाईकांच्या हाती सुपूर्त केले व आपण अरबस्तानात तीर्थयात्रेस प्रयाण केले. तेव्हापासून कोचीनचे स्वतंत्र संस्थान (राज्य) अस्तित्वात आले. या राजवंशास पेरुमपाटण्णु स्वरूपम् असे नाव त्यावेळेपासून रूढ झाले. त्यांची राजधानी प्रथम महोदयपुरम् नंतर त्रिचूर व पुढे एर्नाकुलम् येथे होती. दक्षिणेस पुरक्कडपासून उत्तरेस चेटवडपर्यंत हे राज्य त्या वेळी पसरले होते. नायर सरदार व नंबुद्री ब्राह्मण यांच्या वर्चस्वामुळे राजाचे अधिकार मर्यादित होते. तथापि या वंशामधील राजांनी कोचीन संस्थानावर संस्थान विलीन होईपर्यंत म्हणजे १९४९ पर्यंत स्वामित्व गाजविले. येथे काही दिवस थोरल्या मुलाऐवजी धाकट्या मुलास गादीवर बसविण्याची पद्धत होती. तीमधून पुढे अंत:कलह माजले व कालांतराने ही प्रथा संपुष्टात आली. तेराव्या शतकाच्या अखेरीस कालिकतच्या सामुरीने कोचीनवर स्वाऱ्या केल्या व काही दिवस कोचीनला त्याचे मांडलिकत्व पतकरावे लागले. १५०२ मध्ये पोर्तुगीज व्यापाऱ्यांनी कोचीनला येऊन आपले बस्तान बसविले. पोर्तुगीजांनी गोव्यात आपले वास्तव्य करण्यापूर्वी हेच आपले राजधानीचे ठिकाण केले. आल्मैद व आफांसो अल्बुकर्क ह्या पहिल्या दोन पोर्तुगीज गव्हर्नरांनी सामुरीविरुद्ध कोचीनला मदत केली, त्यामुळे साहजिकच कोचीन हे पोर्तुगीजांचे मांडलिक बनले.
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात पोर्तुगीजांची जागा डचांनी घेतली, परंतु सामुरीविरुद्ध किंवा पुढे त्रावणकोरच्या मार्तंडवर्म्याने केलेल्या स्वारीविरुद्ध डचांचा ह्या संस्थानाला फारसा उपयोग झाला नाही. यामुळे कोचीनाला त्रावणकोरच्या राजाबरोबर १७६२ मध्ये मैत्रीचा तह करावा लागला. ह्या सुमारास दक्षिणेत म्हैसूरच्या प्रदेशावर हैदर अलीचा अंमल चालू झाला. त्याने झपाट्याने दक्षिण हिंदुस्थान पादाक्रांत केला. त्यात डचांचा टिकाव लागणे शक्य नव्हते. त्याने १७७६ मध्ये हे संस्थान आपल्याकडे घेतले. पुढे टिपूच्या इंग्रज, मराठे व निजाम या त्रिवर्गाने केलेल्या पराभवानंतर ते इंग्रजांचे मांडलिक संस्थान बनले. इंग्रजांनी संस्थानाचा कारभार मन्रो नावाच्या दिवाणाकडे दिला आणि त्या वेळेपासून दिवाणांची परंपरा सुरू झाली. काही दिवाण बेताल निघाले, तर काहींचे राजांशी मतभेद होते, परंतु सर्वसाधारणतः नंजप्पय्य, वेंकट सुब्बय्य, शंकर वारियर, संकुनी मेनन वगैरे काही दिवाणांनी सर्व क्षेत्रांत सुधारणा घडवून शासनात आमूलाग्र बदले केले.
मध्यंतरी इंग्रजांविरुद्ध बंड उद्भवले, पण इंग्रजांनी ते मोडून १८०९ मध्ये पुन्हा तह केला, संस्थानाची संरक्षणाची सर्व हमी घेतली आणि त्याबद्दल सालिना दोन लाख रु. खंडणी घेण्याचे ठरविले. इंग्रजांनी डचांचा राहिलेला किल्लाही घेतला. इंग्रजांच्या वर्चस्वामुळे वाहतूक, कालवे, धरणे, रुग्णालये, शिक्षण इ. विविध सुधारणा झपाट्याने झाल्या. नवीन युगाबरोबर नगरपालिका व ग्रामपंचायती कोचीन संस्थानात आल्या आणि त्याबरोबरच १९२५ मध्ये विधिमंडळाची स्थापना झाली. विधिमंडळाचे अधिकार १९३८ मध्ये वाढविण्यात आले. तथापि ते प्रजामंडळाला अपुरे वाटले. त्यामुळे लोकशाही तत्त्वांची वारंवार वाढ होतच होती. दरम्यान संस्थानात केरळच्या ऐक्यासाठीही चळवळ चालली होती.
१९४३ साली महाराज श्री. केरळवर्मा मृत्यू पावले व श्री. रविवर्मा गादीवर आले. ते १९४८ साली मृत्यू पावल्यावर एलेय राजा केरळवर्मा तक्तनशील झाले. ते त्याच साली मरण पावल्यावर त्यांचे बंधू श्री. रामवर्मा गादीवर आले. जुलै १९४९ मध्ये त्रावणकोर-कोचीनचे एक जोडराज्य करण्यात येऊन ते भारतात विलीन करण्यात आले व पुढे १९५६ मध्ये ते केरळ राज्यात समाविष्ट झाले.
कोचीन संस्थानच्या इतिहासात कोणाही राजपुरुषाने नेत्रदीपक असा पराक्रम केला नाही; तथापि कोचीन संस्थानाधिपतींनी कार्यक्षम प्रशासनाद्वारे व मातब्बर दिवाणांच्या साहाय्याने संस्थानात अनेक लोकोपयोगी योजना अंमलात आणल्या. त्याचे श्रेय म्हणजेच सरकारच्या मालकीची आगगाडी व ट्रॅम्वे, ६ महाविद्यालये, ५० माध्यमिक शाळा, ५७ रुग्णालये व दवाखाने आणि ६ नगरपालिका व ८७ ग्रामपंचायती होत. याशिवाय संस्थानने कालवे खणले व धरणे बांधली; रस्ते तयार केले आणि कोचीन बंदराची सुधारणा करून शेतीस उत्तेजन दिले. लोकसत्ताक राज्याच्या धर्तीवर राज्यशासनात विधिमंडळ स्थापून प्रजामंडळास चालना देणारे कदाचित हे पहिले संस्थान असेल. त्याबरोबरच कायदेमंडळाची स्थापना आणि वरिष्ठ न्यायालय ह्याही गोष्टी संस्थानात सुरू झाल्या. एक सुधारलेले संस्थान म्हणून कोचीन संस्थानाला भारतीय संस्थानांच्या इतिहासात वेगळे स्थान आहे.
कुलकर्णी, ना. ह.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 7/6/2020
शहरातील सांडपाणी, प्लॅस्टिक कचरा, औद्योगिक रसायने ...
संयुक्त राष्ट्रांच्या कायमस्वरूपी प्रातिनिधिक सं...