অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

इंग्रजी साहित्य

इंग्रजी साहित्य

इंग्रजी ही इंडो-यूरोपियन भाषाकुलाच्या जर्मानिक गटाची भाषा. सु. सातव्या शतकापासूनचे इंग्रजी साहित्य उपलब्ध आहे. अँम्‍लो-सॅक्सन किंवा ‘ओल्ड इंग्‍लिश’ ह्या नावाने ते ओळखले जाते. पैकी ओल्ड इंग्‍लिश हे नाव अधिक मान्य आणि रूढ आहे. त्याचा कालखंड सातव्या शतकापासून ११०० पर्यंतचा आहे. व्याकरण आणि शब्दसंपत्ती ह्या दोन्ही दृष्टींनी ह्या ओल्ड इंग्‍लिश साहित्याची भाषा, नंतरच्या इंग्रजी भाषेपेक्षा इतकी वेगळी आहे, की ती भाषा प्रयत्‍नपूर्वक शिकल्याखेरीज तिच्यातील साहित्य आजच्या वाचकाला कळत नाही.

१०६६च्या नॉर्मन विजयानंतर इंग्‍लंडमध्ये राज्यकारभारात, न्यायसंस्थांत, शिक्षणसंस्थांत फ्रेंच भाषाच सर्रास वापरली जाऊ लागली. ती प्रतिष्ठितांची भाषा झाली व ओल्ड इंग्‍लिश भाषा मागे पडली. त्या भाषेत साहित्यनिर्मिती जवळजवळ होईनाशी झाली. ती फ्रेंच आणि लॅटिन भाषांत होऊ लागली. इंग्रजी भाषेला पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त होण्याला जवळजवळ तीनशे वर्षे जावी लागली. १३६२ मध्ये ती न्यायालयाची भाषा झाली. १३९९ मध्ये चौथ्या हेन्‍रीने पार्लमेंटमध्ये पहिल्यांदा इंग्रजीत भाषण केले. नॉर्मन विजयानंतर इंग्रजी मातृभाषा असणारा तोच इंग्‍लंडचा पहिला राजा.

अकराव्या शतकाच्या मध्यापासून चौदाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ओल्ड इंग्‍लिशमध्ये पुष्कळच फरक पडला. जेते फ्रेंच असल्यामुळे तिचा राजाश्रय नाहीसा झाला होता; पण खेड्यापाड्यातील आणि खालच्या थरांतील लोक इंग्रजीच बोलत. हळूहळू शब्दांच्या रूपांत व वाक्यरचनेत बदल झाला. बरेच जुने शब्द वापरातून गेले आणि काहींच्या जोडीला फ्रेंच भाषेतील आणि फ्रेंचमार्फत लॅटिन आणि ग्रीक भाषांतील शब्द आले. इंग्‍लंडच्या वेगवेगळ्या भागांतल्या भाषांत साहित्य निर्माण होतच होते. ह्या कालखंडातले साहित्य मध्यकालीन इंग्‍लिश साहित्य (मिड्ल इंग्‍लिश) म्हणून ओळखले जाते. वेगवेगळ्या प्रादेशिक भाषांपैकी ईस्ट मिडलँडमध्ये म्हणजे लंडनच्या आसपासच्या भागांत बोलल्या जाणाऱ्या भाषेत निर्माण झालेल्या साहित्याला अधिक प्रतिष्ठा लाभली. आपण ज्याला इंग्रजी साहित्य म्हणून ओळखतो, ते ह्या कालखंडातील साहित्याचा पुढला विकास आहे.

इंग्रजी साहित्याचे मूळ क्षेत्र म्हणजे ब्रिटिश बेटांतील इंग्‍लंडचा प्रदेश. पण वेल्श, आयरिश आणि स्कॉटिश लेखकांनीही इंग्रजी भाषेत साहित्य निर्माण केले आहे. ब्रिटिशांच्या व्यापाराचा व्याप जसजसा वाढत चालला, तसतसे त्यांच्या राजकीय सत्तेचे क्षेत्र विस्तृत होत गेले. ब्रिटिशांनी पृथ्वीवरच्या इतर खंडांत वसाहती केल्या आणि साम्राज्य स्थापन केले. त्या त्या वसाहतीत स्थायिक झालेल्या ब्रिटिशांनी आणि त्यांच्या वंशजांनी, त्याचप्रमाणे तेथील स्थानिक लोकांपैकी ज्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केली, त्यांनीही इंग्रजी भाषेत साहित्य निर्माण केले. ह्याची उदाहरणे म्हणजे अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत, पाकिस्तान आणि मध्य पूर्वेतले काही देश. परंतु ह्या लेखात ह्या इतर देशांत निर्माण झालेल्या इंग्रजी साहित्याचा अंतर्भाव केलेला नाही. ह्या लेखातील साहित्यविचाराचा काळ ओल्ड इंग्‍लिश साहित्याच्या काळापासून (सु. सातवे शतक) साधारणपणे १९५० पर्यंतचा आहे.

आदियुग (आरंभापासून १०६६ पर्यंत) : इंग्‍लंडचे पहिले रहिवासी आयबेरियन व केल्टिक. त्यांचा रोमन लोकांनी पाडाव केला. ४१० मध्ये ब्रिटनमधील रोमन साम्राज्य संपुष्टात आले व मध्य यूरोपातील जर्मेनीयामधील अँगल, ज्यूट व सॅक्सन जमातींच्या टोळ्या इंग्‍लंडमध्ये येण्यास सुरुवात झाली. त्यांनी ब्रिटनमधील मूळ रहिवाशांना मागे रेटून आपले वर्चस्व प्रस्थापित केले व इंग्रजी संस्कृतीचा पाया घातला. ह्या लोकांचे वाङ्‍मय अँग्‍लो-सॅक्सन वाङ्‍मय म्हणून ओळखले जाई. त्यांच्या भाषेला ओल्ड इंग्‍लिश असे संबोधिले जाते. अर्थात ओल्ड इंग्‍लिश हे इंग्रजी भाषेचेच आद्यरूप होय. आजच्या इंग्रजी वाङ्‍मयाच्या अनेक प्रवृत्ती बीजरूपाने ह्या काळातील वाङ्‍मयात दिसतात.

पाचव्या शतकापासून राजदरबारातील भाटांनी रचलेली काव्ये अलिखित असल्याने आज उपलब्ध नाहीत. ओल्ड इंग्‍लिश साहित्याच्या सु. तीस हजार ओळी उपलब्ध आहेत. पेगन महाकाव्यसदृश रचना, शोकरसात्मक भावकाव्याच्या जवळपास येणारे काव्य व ख्रिस्ती धर्मप्रेरित काव्य असे त्याचे तीन भाग आहेत. पेगन वाङ्‍मय ख्रिस्ती धर्मप्रभावापासून अलिप्त असून वीरवृत्तीची जोपासना करणारे आहे [→ पेगन]. ते भटक्या शाहिरांनी रचलेले असून कधी श्रीमंतांच्या पुढे, तर कधी बाजारात जनसामान्यांसाठी गाइलेले आहे. त्या वाङ्‍मयातून यूरोपातील जर्मन, नॉर्वेजियन इ. जर्मानिक गटातील भाषा बोलणाऱ्या लोकांची संस्कृती कशी होती, ह्याची अल्पशी कल्पना येते. विडसिथ  ह्या अशा प्रकारच्या एका काव्यात राजदरबारातील एका भाटाचे आत्मवृत्त आढळते. ह्या काळातील सर्वोत्कृष्ट काव्य वेवूल्फ (सु. ३,२०० ओळी) हे इंग्रजीतील पहिले महाकाव्य. दक्षिण स्वीडनमधील गीट जमातीच्या हायगेलॅक राजाचा पुतण्या बेवूल्फ याने ग्रेंडेल हा राक्षस व त्याची आई यांचा वध कसा केला, याची हकीकत याच्या पहिल्या भागात आहे. दुसऱ्या भागात ५० वर्षांनंतर एका पंखधारी नरभक्षक सर्पाला मारताना बेवूल्फ स्वतः मरतो, असे दाखविले आहे. हा कथाभाग पेगन लोकगीतांतून आला असला, तरी त्यात ख्रिस्ती धर्मकल्पनांचे मिश्रण झालेले दिसते. या महाकाव्यातील आवेश, पराक्रम, स्वाभिमान, सौजन्य, शिष्टाचार ह्या गोष्टी पेगन वाङ्‍मयातील व लोककथांतील आहेत; तर सृष्टीची उत्पत्ती व पापपुण्य ह्यांसंबंधीच्या कल्पना ख्रिस्ती दिसतात.द बॅटल ऑफ फिन्सबर्ग  व वाल्डेर  ही अपुरी महाकाव्ये बेवूल्फच्या परंपरेतीलच आहेत. द बॅटल ऑफ ब्रनॅनबर्ग  व द बॅटल ऑफ माल्डन  या काव्यांत वीर व करुण या रसांचा आविष्कार दिसतो. द वाँडरर  या काव्यात राजाश्रय सुटल्यावर रानोमाळ भटकणाऱ्या एका चाकराचा विलाप दिसतो; तर द सीफेअरर मध्ये एका वृद्ध खलाशाची कहाणी सांगितलेली आहे. डिओर  ह्या काव्यात एका भटक्या कवीचे आत्मकथन आढळते व ह्या दृष्टीने ते काव्य महत्त्वाचे ठरते.

सातव्या शतकात अँग्‍लो-सॅक्सनांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यावर त्यांच्या काव्यात धार्मिक विषय येऊ लागले. जुन्या वीर व करुण रसांतील काव्यांना आता धार्मिक डूब मिळाली. शिवाय ख्रिस्तपुराणातील कथा जुन्या वीरकाव्यशैलीत सांगितल्या गेल्या. कॅडमन (सु. ६७०) हा इंग्रजीचा आद्य कवी. निश्चितपणे कॅडमनचे म्हणता येईल असे नऊ ओळींचे एक ईशस्तोत्रच आज उपलब्ध आहे. त्याच्या नावावर मोडणारी जेनेसिस, एक्झोडस, डॅन्यल, ख्राइस्ट व सेटन  ही दीर्घकाव्ये त्याची नसून त्याच्या परंपरेतील असावीत, असा तर्क आहे. आठव्या शतकाच्या उत्तरार्धात किनेवुल्फ हा कवी होऊन गेला. आपल्या काव्यावर आपली सही अँग्‍लो-सॅक्सन रूनिक लिपीत करणारा हा पहिला इंग्रजी कवी. ख्राइस्ट, जूलिआना, एलेन व द फेट्स ऑफ अ‍ॅपॉसल्स  ही त्याची काव्ये. उत्कट भक्ती व रचनासौष्ठव हे त्याच्या काव्याचे मुख्य विशेष. अँड्रिअस, द फीनिक्स  वगैरे काव्ये त्याच्याच संप्रदायातील. नवी धार्मिक भावना व जुनी वीरकाव्यशैली यांचा सुंदर मेळ जूडिथमध्ये दिसतो. द ड्रीम ऑफ द रूडमध्ये उत्कट भक्तिभावना आहे. कल्पनाशक्तीचा फुलोरा द रिडल्स  या काव्यात सापडतो. अनुप्रासयुक्त छंदोरचना व रूपकात्मक भाषा हे प्राचीन इंग्रजी काव्यशैलीचे विशेष.

प्राचीन इंग्रजी गद्याचा उदय अ‍ॅल्फ्रेड (८४९–९०१) राजाच्या काळात झाला. हा स्वतः उत्कृष्ट लेखक होता. त्याने विद्वानांच्या मदतीने लॅटीन ग्रंथांची इंग्रजी भाषांतरे केली व यूरोपीय संस्कृतीचे लोण सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविले. उदा., पोप ग्रेगरीचा क्यूरा पास्तोरालिस हा धार्मिक ग्रंथ, पॉलस ओरोझिअसचा हिस्टोरिया अ‍ॅडव्हरसुम पागोनास हा इतिहास व बोईथिअसचा दे कॉन्सोलासिओने फिलॉसफी हा तात्त्विक ग्रंथ. बीड (६७३-७३५) ह्या इतिहासकाराच्या हिस्टोरिया इक्‍लिझिअ‍ॅस्तिकाचे भाषांतर अ‍ॅल्फ्रेडच्या प्रेरणेनेच झाले. त्याची सर्वांत महत्त्वाची वाङ्‍मयीन कामगिरी म्हणजे द अँग्‍लो-सॅक्सन क्रॉनिकल हा इतिहास. सीझरच्या इंग्‍लड विजयापासूनचा‌ इंग्‍लंडचा इतिहास सांगणारे हे इतिवृत्तलेखन पुढे ११५४ पर्यंत चालू राहिले. इतिहास व साहित्य या दोन्ही दृष्टींनी हा ग्रंथ महत्त्वाचा ठरतो. अ‍ॅल्फ्रेडची मातृभाषा वेसेक्स असल्यामुळे तिला साहित्यात प्रतिष्ठा प्राप्त झाली. अ‍ॅल्फ्रिक (मृ. सु. १०२०) या धर्मोपदेशकाने अ‍ॅल्फ्रेडचेच कार्य पुढे चालू ठेवले. सु. ऐंशी नीतिबोध, एक संतचरित्रमाला, कॉलक्‍वी हा लॅटिन शिकविण्याच्या हेतूने लिहिलेला संभाषणग्रंथ व बायबलच्या जुन्या कराराचे भाषांतर (पहिले ७ भाग) हे त्याचे मुख्य ग्रंथ. अ‍ॅल्फ्रिकची वक्‍तृत्वपूर्ण व नागर भाषाशैली अ‍ॅल्फ्रेडच्या खडबडीत शैलीच्या तुलनेने उठून दिसते. त्याचा समकालीन वुल्फ्‌‌स्टन (मृ. १०२३) या धर्मगुरूच्या प्रवचनांपैकी सर्मन टू द इंग्‍लिश  हे डॅनिश आक्रमणाने हतबल झालेल्या इंग्रजांना केलेले आवाहन बरेच गाजले. तीव्र भावना, ओज व आलंकारिक भाषा ही त्याच्या शैलीची वैशिष्ट्ये. गद्यापेक्षा पद्यातच ओल्ड इंग्‍लिश साहित्याची वैशिष्ट्ये अधिक ठसठशीतपणे दिसून येतात.

फ्रान्समधील नॉर्मंडीचा ड्यूक विल्यम ह्याने १०६६ मध्ये इंग्‍लंडचा राजा दुसरा हॅरल्ड ह्याच्यावर हेस्टिंग्जच्या लढाईत विजय मिळविला आणि तो इंग्‍लंडचा राजा झाला. हा नॉर्मन विजय ही इंग्‍लंडच्या आणि इंग्रजी साहित्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. हॅरल्ड हा इंग्‍लंडचा शेवटचा सॅक्सन राजा. तोपर्यंत इंग्‍लंड हे यूरोपच्या उत्तर भागातल्या स्कँडिनेव्हियन देशांशी निगडित होते. तो संबंध ह्या विजयानंतर तुटला आणि ते दक्षिणेकडील फ्रान्सशी जखडले गेले. ह्या घटनेमुळे इंग्‍लंडच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात फार मोठा फरक पडला.

नॉर्मन लोकांच्या विजयानंतर लॅटिन व फ्रेंच भाषांचा पगडा वरिष्ठ वर्गावर व दरबारी लोकांवर पडला; परंतु कथाकथन व काव्य इंग्रजीतील निरनिराळ्या बोलीभाषांतून होत होते. ह्या वेगवेगळ्या बोलीभाषांपैकी तेराव्या शतकाच्या अखेरीस ईस्ट मिडलँड परगण्यातील बोलीभाषा प्रमाण ठरली आणि तिची प्रतिष्ठा पुढे चौदाव्या शतकात ⇨चॉसरने कायम राखली. या बोलीभाषेला ‘किंग्ज इंग्‍लिश’ (प्रमाणभूत इंग्रजी भाषा) हे नाव मिळाले.

मध्ययुग (१०६६–१४८५) : १०६६च्या नॉर्मन विजयामुळे विजेत्यांची फ्रेंच भाषा राजदरबारी आली व अँग्‍लो-सॅक्सन भाषा बहुतांशी समाजातील खालच्या वर्गांपुरती मर्यादित राहिली. तिच्यातील ग्रंथरचना थांबली व शंभराहून अधिक वर्षे ती केवळ बोलभाषा होऊन बसली. कालांतराने नॉर्मन व सॅक्सन ह्यांच्यातील अंतर कमी होऊन प्राचीन इंग्रजी भाषेचे पुनरुज्‍जीवन होत गेले. तेराव्या शतकात तिला पुन्हा ग्रांथिक भाषा म्हणून प्रतिष्ठा मिळाली; मात्र दरम्यानच्या काळात तिचा कायाकल्प झाला. तिचे व्याकरण अधिक सोपे झाले व फ्रेंच भाषेतील हजारो शब्द तिने स्वीकारले. फ्रान्सकडून तिने नव्या वाङ्‍मयीन प्रेरणा घेतल्या. उदा., ⇨रोमान्स. अनुप्रासयुक्त छंदोरचनेऐवजी नवा यमकबद्ध छंद तिने स्वीकारला. नव्या राजवटीत प्राचीन इंग्रजी बोलीभाषांतून आलेल्या उत्तर, दक्षिण, केंटिश व मिडलँड इंग्रजी या साऱ्याच ‘मिड्ल इंग्‍लिश’ बोलभाषांतून साहित्य निर्माण होऊ लागले.

मिड्ल इंग्‍लिश साहित्यात धार्मिक व उपदेशपर पद्य विपुल आहे. उदा., ऑरम्युलम, करसोर मुंडी आणि हॅडलिंग स्युन. मध्ययुगातील आणखी एक लोकप्रिय पद्यप्रकार म्हणजे रूपककाव्य. द औल अँड द नाइटिंगेल  (सु. १२००) हे त्याचे उत्तम उदाहरण. हे काव्य तत्कालीन लॅटिन व फ्रेंच साहित्यात लोकप्रिय झालेल्या वादकाव्याचेही (डिबेट व्हर्स) प्रतिनिधी ठरते. फ्रेंच वीरकाव्यावर आधारलेल्या रोमान्सचाही बराच प्रसार झाला. शूर, दिलदार नायक आणि सद्‌गुणी, सौंदर्यसंपन्न नायिका त्यांत रंगविलेल्या असत. जादू व चमत्कार यांनी भरलेल्या या काव्यांची कथानके ग्रीक, रोमन, फ्रेंच व पौर्वात्य कथा, तसेच वेल्समधील आर्थर राजाच्या आख्यायिका यांतून घेतलेली दिसतात. रोलँड अँड व्हर्नग्यु, सर ऑर्फिओ, मॉर्ट आर्थर  व बारलाम अँड जोसाफट (बुद्धकथेचे ख्रिस्ती रूपांतर) ही यांची उदाहरणे. तत्कालीन इतिहासलेखनही पद्यातच असून इतिहासलेखन व रोमान्स यांतील सीमारेषा धूसर असल्याचे जाणवते. उदा., लायामन या इंग्रज कवीने फ्रेंचमधून अनुवादिलेला ब्रूट हा इंग्‍लंडचा इतिहास. इंग्रजी काव्याने फ्रेंच काव्याकडून नवा यमकबद्ध छंद स्वीकारल्यानंतर सु. सव्वाशे वर्षांनी चौदाव्या शतकाच्या मध्यास ओल्ड इंग्‍लिशमधील अनुप्रासयुक्त छंदोरचनेचे पुनरुज्‍जीवन झाले. उदा., सर गावेन अँड द ग्रीन नाइट  हे वीरकाव्य, पर्ल हे रूपकात्मक शोककाव्य आणि पेशन्स व प्युरिटी  ही भक्तिपर काव्ये.

ह्या युगात निर्माण झालेल्या ⇨ बॅलड ह्या दुसऱ्या नव्या काव्यप्रकारात शौर्यापासून शोकापर्यंत व भुतांपासून भक्तीपर्यंत अनेक विषय हाताळलेले दिसतात. काव्य, कथा व नाट्य यांचा मिलाफ बॅलडमध्ये दिसतो. चौदाव्या शतकाच्या उत्तरार्धात ⇨ विल्यम लँग्‍लंड (१३३० ?–१४०० ?), ⇨ जॉन गॉवर (१३३० ?–१४०८) आणि जेफ्री चॉसर (१३४०?–१४००) हे महत्त्वाचे कवी होऊन गेले. धार्मिक सत्ताधाऱ्यांविरुद्ध असलेल्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया लँग्‍लंडने पद्यामध्ये व जॉन विक्लिफने (सु. १३२०–१३८४) गद्यामध्ये अत्यंत परखडपणे व्यक्त केल्या. ज्या ख्रिस्ती संन्याशांनी (फ्रायर) यूरोपियन संस्कृतीशी इंग्‍लंडची ओळख करून दिली होती, ते आता कर्तव्यच्युत झाले होते. त्यांच्यावर सडेतोड टीका लँग्‍लंडने पिअर्स प्‍लाउमन  ह्या काव्यात केली. विक्लिफने सामान्य लोकांना समजेल, असे बायबलचे भाषांतर करण्यास सुरुवात केली. चर्चमधील अधिकाऱ्यांच्या सर्व पापांचा पाढा विक्लिफने मोठ्या आवेशयुक्त, वक्रोक्तिपूर्ण व विनोदी शैलीत वाचला.

चॉसर हा मध्ययुगातील सर्वश्रेष्ठ इंग्रज कवी. त्याच्या कँटरबरी टेल्समधील कथांनी इंग्रजी वाङ्‍मयाला नवे वळण दिले. नर्मविनोद, सूक्ष्म, मार्मिक, मिस्कील निरीक्षण आणि शालीन, संयमित कलादृष्टी हे त्याचे प्रधान गुण. चॉसरने काव्यशैलीला सफाई आणली, शब्दसंगीताचे नवे सामर्थ्य दाखविले आणि ह्या सर्वांतून मानवी स्वभावाचे सखोल, मार्मिक दर्शन घडविले. चॉसरचे अनुकरण करणाऱ्यांत जॉन लिडगेट (१३७० ?–१४५१ ?) व टॉमस हॉक्लीव्ह (१३७० ?–१४५०?) हे इंग्रज कवी आणि स्कॉटलंडचा राजा पहिला जेम्स (१३९४–१४३७) व ⇨ रॉबर्ट हेन्‍रिसन (१४३० ?–१५०६) हे स्कॉटिश कवी यांचा समावेश होतो. लिडगेटचे द फॉल ऑफ प्रिन्सेस व हॉक्लीव्हचे द रेजिमेंट ऑफ प्रिन्सेस ही उपदेशपर काव्ये आहेत. पहिल्या जेम्सने द किंगिज क्वेअर हे उपदेशपर काव्य लिहिले. हेन्‍रिसन हा चॉसरमुळे प्रभावित झालेला सर्वांत कर्तबगार कवी. त्याचे टेस्टमेंट ऑफ क्रिसेड  हे काव्य विशेष उल्लेखनीय आहे.

इतर यूरोपीय भाषांतील गद्यापेक्षा प्राचीन इंग्रजी गद्याचा अधिक विकास झाला होता. नॉर्मन विजयानंतरचे इंग्रजी गद्य मात्र सुरुवातीस खुरटले; त्यामुळे मध्यकालीन इंग्रजीत नवी गद्यपरंपरा उभी होण्यास उशीर लागला. काव्याप्रमाणे या गद्याचाही भक्तिबोध हाच स्थायीभाव दिसतो. या प्रकारच्या गद्यलेखनात अँक्रेने रिव्‍ले (लेखक अज्ञात) हा तीन जोगिणींना केलेला उपदेश अग्रेसर ठरतो. बाह्य यमनियमांपेक्षा आंतरिक संयम श्रेष्ठ आहे, असे उपदेशक सांगतो. त्याची शैली म्हणी व घरगुती दृष्टांत यांनी युक्त आहे. उत्तम गद्याचे हे लक्षणीय उदाहरण. चौदाव्या शतकातील इंग्रजी संतांच्या ईशप्रेमाचा साक्षात्कार त्यांच्या गद्यलेखनात आढळतो. उदा., रिचर्ड रोल (सु. १३००–१३४९) याचाफॉर्म ऑफ लिव्हिंग, वॉल्टर हिल्टनचा (मृ. १३९६) द स्केल ऑफ पर्फेक्शन, मार्जरी केंपचा (सु. १३७३—?) द बुक ऑफ मार्जरी केंप हे ग्रंथ. द ट्रॅव्हल्स ऑफ सर जॉन मँडेव्हिल  हे फ्रेंचवरून अनुवादिलेले लोकप्रिय प्रवासवर्णन याच काळातले. जॉन ट्रेव्हीसाने (१३२६–१४१२) पॉलिक्रॉनिकॉनसारखे लॅटिन ग्रंथ अनुवादिले (पॉलिक्रॉनिकॉनचा अनुवाद १३८७). तत्कालीन भाषेचा जिवंत परिचय पॅस्टन लेटर्स (१४२२–१५०९) या नॉर्फकमधील एक सुखवस्तू कुटुंबातील मंडळींनी परस्परांना लिहिलेल्या पत्रांच्या संग्रहात दिसतो. पंधराव्या शतकातील सर्वांत बहुप्रसू गद्यकार रेजिनल्ड पीकॉक (१३९५ ?–१४६० ?) याने आपल्या रिप्रेसर ऑफ ओव्हरमच ब्‍लेंमिंग ऑफ द क्‍लर्जी (१४५५) यासारख्या ग्रंथांत विक्लिफचे विचार खोडून काढण्याचा प्रयत्‍न केला. मॉर्ट द आर्थर (१४८५) या सुप्रसिद्ध ग्रंथाचा लेखक ⇨ टॉमस मॅलरी (मृ. १४७१) हा या शतकातील गाजलेला गद्यलेखक. या ग्रंथाचा मुद्रक व प्रकाशक विल्यम कॅक्स्टन (१४२२ ?–१४९१) हा इंग्‍लंडमधील पहिला मुद्रक असून तो भाषांतरकारही होता.

इंग्‍लंडमध्ये नाटक हा साहित्यप्रकार प्रथम मध्यकालीन इंग्रजीत हाताळला गेला. चर्चमधील प्रार्थनांनी संभाषणरूप घेतल्यावर त्यांतून ख्रिस्तचरित्रावर व संतचरित्रांवर आधारित नाट्य निर्माण झाले. शिवाय प्राचीन इंग्रजीत नाटक नसले, तरी भाटांचे नाट्यमय वीरकाव्य व नाट्याची बीजे असलेले खड्‍गनृत्य, सोंगाड्यांचे खेळ, वसंतोत्सवातील खेळ इ. अनेक खेळ प्रचलित होते. नाट्यविकासाला त्यांचाही हातभार लागला. अद्‌भुत नाटकांची (मिरॅकल प्ले) सुरुवात तेराव्या शतकाच्या अखेरीस ‌झाली. मे महिन्याच्या शेवटी येणारा ‘कॉर्पस क्रिस्टी’ हा सण साजरा होऊ लागल्यावर त्यात अनेक व्यवसायांचे लोक ख्रिस्तचरित्र व संतचरित्रे यांवर आधारलेले छोटे छोटे नाट्यप्रयोग करू लागले. हीच अद्‌भुत नाटके. ह्या नाटकांतील नाट्यविषय त्या त्या व्यवसायाशी निगडित असे. उदा., नोआ व त्याची नाव हा सुतारांच्या नाटकाचा विषय. शहरांतील चौकांत फिरत्या गाड्यांवर हे नाट्यप्रयोग केले जात. कालांतराने या नाटकांच्या माला गुंफिल्या गेल्या. त्यांत यॉर्क (४८ उपलब्ध नाटके), वेकफील्ड किंवा टौनली (३२ नाटके), चेस्टर (२५ नाटके) व ‘लुड्‍झ कॉव्हेंट्री’ म्हणून प्रसिद्ध असलेली ईस्ट अँग्‍लियात रचिली गेलेली नाट्यमाला (४२ नाटके) या प्रमुख होत. साहित्यगुणांच्या दृष्टीने वेकफील्डची नाट्यमाला सर्वश्रेष्ठ गणली जाते. या मालेत ग्रामीण जीवनाचे सार्थ चित्रण, उपरोध व विनोद, नाट्यमूल्यांची समज व काव्यमय शैली हे गुण दिसतात. उदा., सेकंड शेपर्ड्‌स प्‍ले  या नाटकात ख्रिस्तजन्माच्या वेळी मॅक नावाचा गुराखी चोरलेली शेळी पाळण्यात घालून ती नवजात अर्भक आहे, हे दाखविण्याची युक्ती करतो. ह्या प्रसंगात इंग्रजीतील वास्तववादी सुखात्मिकेचे आद्यरूप जाणवते. पंधराव्या शतकाच्या मध्यावर सदाचार नाटकांचा (मोरॅलिटी प्ले) उदय झाला. यात मानवी स्वभावातील सुष्टदुष्ट प्रवृत्ती मनुष्यरूप घेऊन रंगमंचावर अवतरतात. सदाचार नाटकांचा उगम अद्‌‌भुत नाटकांतील बोधवादात असावा. मध्ययुगात विषय, वाङ्‍‌मयप्रकार व तंत्र या सर्व दृष्टींनी इंग्रजी साहित्य समृद्ध झाले. परंतु त्या मानाने चॉसर, लँग्‍लंड इत्यादींसारखे पहिल्या दर्जाचे साहित्यिक त्यांत थोडेच आढळतात.

प्रबोधनपूर्व युग (१४८५–१५५७) : ‘वॉर्स ऑफ द रोझेस’ (१४५५–१४८५) ह्या नावाने संबोधिलेल्या, यॉर्क व लँकेस्टर या दोन घराण्यांमध्ये झालेल्या यादवी युद्धानंतर ट्यूडर घराणे गादीवर आले. थोड्याच काळात यूरोपीय प्रबोधनाचे वारे वाहू लागले व त्यांनी  अनेक नव्या प्रेरणा आणल्या. सातव्या हेन्‍रीच्या (१४५७–१५०९) दरबारात व इंग्रजी विद्यापीठांत ग्रोसिन, लिनाकर, कॉलिट, मोर, इरॅस्मस इ. मानवतावादी विद्वानांचे स्वागत झाले. मध्ययुगीन निवृत्तिवादी तत्त्वज्ञानाऐवजी नवे प्रवृत्तिवादी तत्त्वज्ञान प्रसृत होऊ लागले. १४५३ मध्ये तुर्कांनी कान्स्टँटिनोपल जिंकल्यावर तेथील विद्वान यूरोपात पांगले. त्यामुळे जुन्या ग्रीक व रोमन वाङ्‍मयाचा पुन्हा परिचय झाला. कोलंबसादी दर्यावर्दी वीरांनी लावलेले नव्या देशांचे शोध, पोपप्रणीत धर्मव्यवस्थेविरुद्ध ल्यूथर, कॅल्व्हिन इत्यादींनी उभारलेले बंड, कोपर्निकसचे नवे खगोलविषयक सिद्धांत, यूरोपीय देशांत राष्ट्रभावनेची झालेली वाढ, व्यक्तिवादाचा उदय अशा अनेक घटनांमुळे मध्ययुगीन यूरोपीय जीवनाची बैठक विस्कटली आणि नव्या मनूचा पाया घातला गेला.

नव्या व्यापारी व उदीमी लोकांचा शहरांतून होत असलेला उदय व त्याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुद्रणकलेचा शोध, या दोन्ही गोष्टी गद्याला पोषक ठरल्या. इंग्‍लंडमध्ये पहिले मुद्रणयंत्र विल्यम कॅक्स्टनने १४७६ मध्ये आणले व त्यावर आर्थर राजासंबंधीच्या गद्यकथा छापल्या. टॉमस मॅलरीचे मॉर्ट द आर्थर, स्वत कॅक्स्टनने केलेली भाषांतरे, रेजिनल्ड पीकॉक याने केलेली लॅटिन ग्रंथांची भाषांतरे यांनी इंग्रजी गद्याचा पाया घातला व लोकांत वाचनाची आवड उत्पन्न केली.

पद्य : सोळाव्या शतकाच्या प्रथमार्धातील इंग्रजी काव्यात मात्र जुन्या परंपराच चालू होत्या. स्कॉच कवी विल्यम डनबारच्या (१४६५ ?–१५३० ?) द गोल्डन टार्ज (सु. १५०८) व गॅव्हिन डग्‍लसच्या (१४७४ ?–१५२२) द पॅलेस ऑफ ऑनर (१५५३ ?) या काव्यांत व इंग्रज कवी स्टीव्हेन हॉझच्या (मृ. १५२३ ?) द पास्टाइम ऑफ प्‍लेझर (१५०९) यांत चॉसरादी कवींचेच वळण गिरविलेले दिसते. फक्त डेव्हिड लिंझीच्या (१४९०–१५५५) काही उपहासात्मक काव्यांवर जॉन नॉक्स ह्या स्कॉटिश धर्मसुधारकाच्या नव्या बंडखोर विचारांची छाप दिसते. ⇨जॉन स्केल्टन (१४६० ?–१५२९) हा या काळातील सर्वांत प्रभावी उपरोधकार. अलेक्झांडर बार्क्लीचे (१४७५ ?–१५५२) द शिप ऑफ फूल्स (१५०९) हे भाषांतरित उपरोधकाव्य पारंपरिक थाटाचे आहे; पण आपल्या द एक्‌लॉग्ज(१५१५–१५२१) या ग्रामीण काव्यात त्याने पुढे स्पेन्सरादींनी विकसित केलेला जानपद गीताचा एक्‌लॉग हा प्रकार प्रथम हाताळला. ⇨ जॉन हेवुडची (१४९७ ?–१५८० ?) उपरोधकाव्ये व गीते लक्षणीय आहेत. या युगात नवे विषय व छंद आणले ते ⇨ टॉमस वायट (१५०३ ?–१५४२) व ⇨ हेन्‍री हॉवर्ड सरी (१५१७ ?–१५४७) यांनीच. १५५७ मध्ये ⇨ टॉटल (मृ. १५९४) या प्रकाशकाने टॉटल्स मिसेलनी  हा गीतसंग्रह प्रसिद्ध केल्यावर इंग्‍लंडमध्ये गीतरचनेती लाट उसळली. ती पुढील पन्नास वर्षे टिकली. या युगातील मुख्य गीतकार म्हणजे बार्नाबी गूज (१५०४–१५९४), जॉर्ज टर्बरव्हिल (१५४० ?–१६१० ?), जॉर्ज गॅस्कॉइन (१५२५?–१५७७ ?), व टॉमस टसर (१५२५ ?–१५८०). फेरर्झ व बॉल्डविन यांनी संपादिलेला द मिरर फॉर मॅजिस्ट्रेट्स हा लोकप्रिय कथाकाव्यसंग्रह १५५९ मध्ये प्रकाशित झाला व १६१० पर्यंत त्याच्या अनेक सुधारित आवृत्त्या निघाल्या. या काव्यातील महत्त्वाचा भाग उपोद्‌घात. तो ⇨ सॅक्‌व्हिलने (१५३६–१६०८) लिहिला.

या ग्रंथरूपाने उपलब्ध असलेल्या काव्यापेक्षा या काळातील बॅलड हे लोककाव्य जोमदार व चैतन्यपूर्ण दिसते. बॅलडमध्ये मानवाच्या मूलभूत प्रेरणा व निसर्गप्रेम निर्व्याज, साध्या जोमदार पद्धतीने व्यक्त झाले. बॅलड ऑफ नट्‌ब्राउन मेड (सु. १५०२), क्‍लार्क साँडर्स, फेअर अ‍ॅन  किंवा बिनोरी ह्या बॅलडरचना महत्त्वाच्या आहेत. बॅलडने पुढील भावकवितेचा पाया घातला.

गद्य : गद्याच्या क्षेत्रात प्रथम नजरेत भरते ती मानवतावादी विद्वानांची कामगिरी. टॉमस एलियटचे (१४९९ ?–१५४६) द गव्हर्नर (१५३१) व रॉजर अ‍ॅस्कमचे (१५१५–१५६८) द स्कूलमास्टर (१५७०) हे शिक्षणविषयक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. एडवर्ड हॉल (मृ. १५४७) व ⇨ रॅफेएल हॉलिनशेड (मृ. १५८० ?) यांची इतिवृत्ते तसेच ⇨टॉमस मोर (१४७८—१५३५) याचे हिस्टरी ऑफ रिचर्ड द थर्ड (१५५७) हे प्रमुख इतिहासग्रंथ होत. धार्मिक गद्यात विल्यम टिन्डल (मृ. १५३६) व माइल्स कव्हरडेल (१४८८–१५६८) यांची बायबलची भाषांतरे सोप्या व प्रासादिक शैलीत आहेत. द बुक ऑफ कॉमन प्रेअरचा (१५४९) निर्माता टॉमस क्रॅन्मर (१४८९ –१५५६) याच्या गद्यशैलीत प्रगल्भता दिसते;तर ह्यू लॅटिमरच्या (१४८५ ?–१५५५) प्रवचनांत घरगुती पण वक्रोक्तिपूर्ण भाषा आढळते. सोळाव्या शतकातील भाषांतरकारांची कामगिरी मोलाची आहे. त्यांपैकी लॉर्ड बर्नर्झने (१४६७–१५३३) फ्रेंच लेखक फ्र्‌‌वासार याच्या इतिहासाचे केलेले भाषांतर, विल्यम पेंटरचे (१५४० ?–१५९४) द पॅलेस ऑफ प्‍लेझर (१५६६ –१५६७) हे काही इटालियन कथांचे भाषांतर व ऑव्हिडच्या मेटॅमॉर्फसिस या लॅटिन ग्रंथाचे आर्थर गोल्डिंगकृत (१५३६ ?–१६०५ ?) पद्य भाषांतर (१५६५–१५६७) हे ग्रंथ या कालखंडात येतात. जॉर्ज गॅस्कॉइनची द अ‍ॅडव्हेंचर्स ऑफ मास्टर एफ्. जे. ही दीर्घकथा स्वतंत्र वास्तववादी लेखनाची चुणूक दाखविते.

या युगात ‘इंटरल्यूड’ किंवा लघुनाट्य हा नाट्यप्रकार उदयास आला. त्यात सदाचार नाटकातील रूपकात्मक पात्रचित्रणाची वास्तववादी पार्श्वभूमी आणि विनोद व उपरोध यांची सांगड घालण्यात आली. अद्‌भुत नाटकांचे लेखक अज्ञात होते; परंतु लघुनाट्यांचे बरेचसे लेखक ज्ञात आहेत. हेन्‍री मेडवॉल (सु. १४८६) हा पहिला इंग्रज ज्ञात नाटककार. त्याचे फल्गेन्स अँड ल्यूक्रीझ  हे प्रीतिनाट्य लघुनाट्याचा उत्तम नमुना आहे. जॉन हेवुडने हा नाट्यप्रकार कळसाला पोहोचविला. जॉन बेल (१४९५–१५६३) हा त्याच्या खालोखाल महत्त्वाचा लघुनाट्यकार. त्याचे किंग जॉन व डेव्हिड लिंझीचे सटायर ऑफ थ्री एस्टेट्स  हे नीतिबोधपर नाटक ही दोन्ही १५४० च्या आसपासची. सोळाव्या शतकाच्या मध्यावर लघुनाट्याचे लॅटिन धर्तीच्या पाच अंकी सुखात्मिकेत रूपांतर झाले. उदा., निकोलस यूडलचे (१५०५–१५५६) राल्फ रॉयस्टर डॉयस्टर (सु. १५६७) व विल्यम स्टीव्हन्सनचे गमर गर्टन्स नीड्ल (१५७५). दोहोंतले तंत्र लॅटिन वळणाचे असले, तरी पहिल्यात मध्यमवर्गीय शहरी जीवन व दुसऱ्यात ग्रामीण स्वभावाचे नमुने यांचे जिवंत चित्रण आहे. जॉर्ज गॅस्कॉइनच्या द सपोझेस (१५६६) या आरिऑस्तोच्या I suppositi नामक इटालियन सुखात्मिकेच्या भाषांतराने इंग्रजी नाट्यलेखनात आणखी एक प्रवाह आणून सोडला. याच सुमारास सेनीकाच्या लॅटिन शोकात्मिकांची भाषांतरे होऊन या नव्या नाट्यप्रकाराबद्दलच्या कुतूहलाची परिणती टॉमस नॉर्टन (१५३२–१५८४) व टॉमस सॅक्‌व्हिल यांनी रचिलेल्या पहिल्या इंग्रजी शोकात्मिकेत– द ट्रॅजेडी ऑफ गॉरबडक (१५६१)– झाली. इंग्रजी नाट्यक्षेत्रातील पहिले महत्त्वाचे सुखात्मिकाकार व शोकात्मिकाकार अनुक्रमे ⇨लिली (१५५४ ?–१६०६) व ⇨ किड (१५५८–१५९४) यांचा उदय त्यानंतर काही वर्षांतच झाला. अशा तऱ्हेने या कालखंडातील वाङ्‍मयीन प्रबोधनास सुरुवात झाली.

१५७८–१७०० : इंग्रजी वाङ्‍मयेतिहासात हा काळ अत्यंत वैभवशाली असून त्याचे तीन प्रमुख कालखंड पडतात. पहिला 'रेनेसान्स' अथवा प्रबोधनाचा कालखंड (१५७८—१६२५). ह्या काळात ⇨ शेक्सपिअर (१५६४—१६१६) व ⇨ एडमंड स्पेन्सर (१५५२ ?–१५९९) यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. दुसरा कालखंड (१६२५–१६६०) ⇨ जॉन मिल्टन (१६०८–१६७४) या कवीचा. तिसरा कालखंड (१६६०–१७००) 'रेस्टोरेशन'चा अथवा राजसत्तेचा पुन:स्थापनेचा. ⇨ जॉन ड्रायडन (१६३१–१७००) हा ह्या कालखंडातील प्रमुख साहित्यिक.

ह्यांपैकी पहिले दोन कालखंड समान प्रवृत्ती व प्रेरणा घेऊन आलेले असून त्यांतील मिल्टनचा काळ ही प्रबोधनाच्या आंदोलनाची परिणती म्हणता येईल. तिसऱ्या कालखंडात मात्र स्वच्छंदतावादापेक्षा नव-अभिजाततावाद बळावलेला दिसतो आणि कल्पनेपेक्षा बौद्धिकतेकडे, पद्यापेक्षा गद्याकडे, अनिर्बंधतेपेक्षा नियंत्रणाकडे साहित्याने लक्ष पुरविलेले दिसते.

प्रबोधनाच्या प्रेरणा शोधण्यासाठी सु. १५० वर्षे मागे जावे लागेल व त्यात पुढील गोष्टींचा प्रामुख्याने निर्देश करावा लागेल: यूरोपियन पंडितांनी मानवतावादी भूमिकेवरून केलेला शिक्षणाचा प्रसार, ख्रिस्ती– ग्रीक संस्कृतिसंगम, त्यात मिसळलेला प्रांतिक, प्रादेशिक लोकवाङ्‍मयाचा प्रवाह, बायबलचे देशी भाषांतील अनुवाद, पोपच्या वर्चस्वाविरुद्ध झालेले बंड व त्यातून घडून आलेली धर्मसुधारणा; विज्ञानाला, प्रयोगनिष्ठेला, ऐहिकतेला आलेले महत्त्व; इंद्रियगोचर अनुभूती व त्यांवर आधारलेल्या शिल्प, चित्रकला यांसारख्या कलांना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती; व्यापारी व साहसी लोकांचे समाजातील वर्चस्व व व्यक्तिवादाचा उदय.

प्रबोधनाचे आंदोलन यूरोपव्यापी होते व त्याने यूरोपीय जीवनाची सर्व अंगे व्यापून टाकली. त्याचा प्रादुर्भाव फ्रान्स, इटली, जर्मनी यांपेक्षा इंग्‍लंडमध्ये उशिरा व हळूहळू झाला व तो रूपण कलांपेक्षा काव्य-नाटक ह्या वाङ्‍मयप्रकारांत प्रामुख्याने झाला. नव्या युगाला पोषक अशा घटना जवळजवळ दोन शतकांपासून घडत होत्या; परंतु त्यांचा विस्मयचकित करणारा उद्रेक पहिल्या एलिझाबेथ राणीच्या कारकीर्दीत (१५५८–१६०३) झाला. आठवा हेन्‍री (१५०९–१५४७) व एलिझाबेथ ह्या राज्यकर्त्यांच्या कारकीर्दींत राजाकडून व त्याच्या भोवतालच्या सरदारवर्गाकडून कलेला व कलावंतांना उत्तेजन आणि आश्रय मिळू लागला. पोपच्या धार्मिक अधिसत्तेचा राजसत्तेकडून पाडाव झाला व व्यक्तीच्या आत्मिक शक्तीवर आधारलेली धर्मसुधारणा घडून आली. युद्धक्षेत्रात स्पॅनिश आरमाराचा इंग्‍लंडकडून निःपात झाला (१५८८). ह्या साऱ्याचा परिणाम म्हणजे राष्ट्रीय अस्मितेची व त्याबरोबरच व्यक्तीच्या प्रतिष्ठेची जाणीव. एक नवा जोम, नवी अशा, चैतन्य व्यक्तिमनात संचारले व त्यामुळे कवी, कथाकार, नाटककार व निबंधलेखक यांच्या साहित्यनिर्मितीला बहर आला.

मानवी मनाच्या, विचारभावनांच्या, कल्पनांच्या कक्षा रुंदावण्यास फ्रान्सिस ड्रेक, फ्रॉबिशर, रॅली, हॅक्‌लूट यांच्या सागरी साहसांची व नव्या भूभागांच्या शोधांची मदत झाली. मानवी जिज्ञासेला पुरेसे खाद्य मिळू लागले. स्वसामर्थ्याने व नव्या ज्ञानाने मानव विस्मयचकित झाला. त्याची प्रयोगशीलता आणि उपक्रमशीलता वाढली. वैचारिक क्षेत्रात विज्ञानाची कास फ्रान्सिस बेकनसारख्यांनी (१५६१–१६२६) धरली. कोपर्निकस, गॅलिलीओ यांच्या ज्योतिषशास्त्रातील शोधांनी विश्वासंबंधीच्या जुन्या समजुतींना धक्का दिला. राजकारणात राजसत्तेला आणि धर्मकारणात कॅथलिक धर्मसत्तेला हादरे बसले व अखेर प्यूरिटन काळात लोकसत्ता स्थापन करण्याचा प्रयोग करण्यात आला. ह्या सर्व घडामोडींना साहित्याची फार मोठ्या प्रमाणात मदत झाली. साहित्याने समाजपरिवर्तनास मदत केली व समाजिक परिवर्तनामुळे साहित्यासही नवनवी दालने उघडता आली.

ह्या काळातील विपुल व विविध साहित्यनिर्मितीला पांडित्यपरंपरा व लोककला ह्यांचे मनोहर मिश्रण कारणीभूत झालेले दिसते. पंडितांनी ग्रीक व लॅटिन ग्रंथांच्या केलेल्या भाषांतरांनी कवी व लेखक यांनी स्फूर्ती मिळाली. ह्यात फिलीमन हॉलंडने (१५५२–१६३७) केलेली लिव्ही, प्लिनी व प्‍लूटार्क या ग्रंथकारांच्या ग्रंथांची व सर टॉमस नॉर्थने केलेली प्‍लूटार्कच्या ग्रंथांची भाषांतरे प्रमुख आहेत. अ‍ॅरिस्टॉटलच्या पॉलिटिक्सचेही भाषांतर झाले. फ्रेंच व इटालियनमधून बानदेल्लो, मॅकिआव्हेली व माँतेन यांच्या साहित्याचे अनुवाद केले गेले.  जॉर्ज चॅपमनने (१५५९ –१६३४ ) होमरच्या महाकाव्यांचे भाषांतर केले. ह्या भाषांतरांतून गद्य-पद्य शैलींना नवे वळण मिळाले.

प्रबोधनाच्या पहिल्या कालखंडात राजाच्या आश्रयाने त्याच्या अवतीभोवती वावरणारा नवा खानदानी उमराव वर्ग महत्त्वाचा ठरला. त्याची सभ्यता आणि सुसंस्कृतता मोलाची ठरली. ह्या ‘जंटलमन’ची समाजमनातील प्रतिमा सुस्पष्ट झाली. हा धीरोदात्त, सुसंस्कृत, शालीन, कृतिशील नायक जसा विद्याभ्यासात व कलांत पारंगत; तसाच तो युद्धक्षेत्रातही प्रवीण. प्रियाराधनात तो जसा निष्णात; तसाच तो अमोघ वक्‍तृत्वाने जनमानस जिंकून घेणारा. एका बाजूने राजाशी व राजदरबाराशी त्याचे सख्य, तर दुसऱ्या बाजूने सामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी त्याचे जिव्हाळ्याचे नाते. लोकजीवनाशी निगडित असल्याने ह्या काळातील वाङ्‍मयाचे नाते परंपरागत लोककलेशी अतूट राहिले. लोकांसाठी असलेल्या नाटकासारख्या साहित्यप्रकाराला भिन्नरुचींच्या प्रेक्षकांचे एकाच वेळी समाराधन करणे सहज शक्य झाले. नाटकांतून व्यक्तिगत संघर्ष व सामाजिक दर्जाची जाणीव ह्यांवर आधारलेल्या विषयांना महत्त्व आले. शहरी व दरबारी नागरिकतेला प्रतिष्ठा आली. तिचा सामान्यांच्या प्रबळ, दुर्दमनीय, बेबंद आशाआकांक्षांशी आलेला संघर्ष समाजात व साहित्यात महत्त्वाचा ठरला. जनसंमर्द व त्याचा नायकाशी संघर्ष अथवा सहकार्य यांवर श्रेष्ठ नाट्यकृती आधारल्या गेल्या. ह्या सर्व प्रेरणा स्वच्छंदतावादाला पोषक असल्या, तरी त्या बेबंद होऊ नयेत म्हणून त्यांना विवेकाचे नियंत्रण असावे, अशी जाणीवही दिसू लागली; म्हणून ह्या काळातील वाङ्‍मयात उत्स्फूर्ततेच्या जोडीला शिस्त व संयम असावा, असे प्रयत्‍न दिसतात व त्यांतून काही अंतर्विरोधही निर्माण झालेले दिसतात. मानवी बुद्धी ही निसर्गाची एक विकसित अवस्था. तिने परमेश्वरी सूत्राची परिपूर्ती करायची; पण ह्याबरोबरच निसर्गावर ताबा मिळविण्याची ईर्ष्याही धरायची, असा परस्परविरोध विचारक्षेत्रात व कलेत दिसू लागला. उदा., ⇨ क्रिस्टोफर मार्लोची (१५६४–१५९३) नाटके.

ह्या काळात काव्याला मोठी प्रतिष्ठा लाभली. कवीसंबंधी परमादराची भावना निर्माण झाली. नवनव्या आशा व उर्मी प्रफुल्लित झाल्या. सर्वच क्षेत्रांत प्रयोगशीलता दिसत असल्याने ती भाषेच्या बाबतीतही दिसू लागली. तिचा आवेशपूर्ण आलंकारिक वक्‍तृत्वासाठी उपयोग झाला; तसेच तिची विविध अलंकृत-अनलंकृत, कृत्रिम वा अकृत्रिम, सरळ, सोपी अथवा अत्यंत क्लिष्ट अशी नाना रूपे गद्य-पद्यात दिसू लागली. भाषेचे स्वरूप निश्चित होऊ लागले; तिला नवनवे शब्द मिळाले. ह्या कालखंडातील साहित्यिक शब्दांच्या विलक्षण मोहिनीने भारावलेले दिसून येतात.

एलिझाबेथकालीन गद्य : एलिझाबेथकालीन गद्याची सुरुवात झाली ती जॉन लिली व ⇨ फिलिप सिडनी (१५५४–१५८६) यांच्या स्वच्छंदतावादी, अद्‌भुतरम्य ग्रंथांतून व अत्यंत आलंकारिक व कृत्रिम भाषेची आतषबाजी करणाऱ्या गद्यशैलीतून. हे गद्य पांडित्यप्रदर्शन करणारे, एका विशिष्ट दर्जाच्या ‘सभ्य’ नागरिकांची-विशेषत: उच्चवर्गीय, स्त्रियांची-करमणूक करण्यासाठी अवतीर्ण झाले. सिडनीच्या द आर्केडिया (१५९०) व लिलीच्या युफूस (२ भाग, १५७८, १५८०) ह्या स्वच्छंदतावादी, सुरस व चमत्कारिक कथांतून हे नादमय, तालबद्ध, चमत्कृतिपूर्ण गद्य वापरण्यात आले. युफूसमध्ये मायभूमीचे गोडवे अत्यंत आलंकारिक भाषेत गायले गेले असून त्यातील गद्यशैलीमुळे 'यूफिझम'( अतिरंजितशैली ) ही संज्ञा रूढ झाली. सिडनीच्या द आर्केडियामध्ये गोपकाव्याचा प्रभाव दिसतो. ह्यात अत्यंत गुंतागुंतीचे काव्यमय कथानक आहे. ह्या ग्रंथातील गद्यात भाषेचा मुक्त विलास आढळतो. तीत कृत्रिमता असली, तरी त्यामुळे भाषेचे सामर्थ्य अजमावता आले हे निश्चित.

सिडनी व लिली यांच्याप्रमाणेच ⇨ टॉमस लॉज (१५५८ ?–१६२५), ⇨ रॉबर्ट ग्रीन (१५६० ?–१५९२), ⇨ टॉमस नॅश (१५६७–१६०१) ह्या नाटककारांनीही कथात्मक वाङ्‍मय लिहिले. त्यांचे आज महत्त्व ऐवढेच, की त्यांच्या कथांनी शेक्सपिअरला नाट्यविषय व कथानके पुरविली. नॅशने एक तऱ्हेचा सरळसोट वास्तववाद वाङ्‍मयता आणला व ठकसेनी पद्धतीची ‘पिकरेस्क’ कादंबरी स्पॅनिश वाङ्‍मयाच्या अनुकरणाने आणली.

प्रबोधनाच्या चळवळीतील विचारसंपदेत बेकनच्या अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ लर्निंग (१६०५) व नोव्हम ऑर्गनम (१६२०) ह्या ग्रंथांनी भर घातली. ह्या ग्रंथांतून त्याने निसर्गाचा अभ्यास करण्याची नवी विगमनपद्धती संशोधिली व आधुनिक विगमनदृष्टीचा पाया घातला. गद्यवाङ्‍मयप्रकारात त्याने एसेज (१६२५) लिहून नव्या स्फुट गद्यलेखनप्रकाराची भर घातली. बेकनचे हे निबंध व्यवहारात उपयोगी पडणारे उपदेश आहेत. त्यांना सुभाषितांचे स्वरूप असून व्यवहारकौशल्य व धूर्तता यांचा तो पाठपुरावा करतात. ह्या बाबतीत बेकनवर मॅकिआव्हेलीच्या कुटिल नातीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. बेकनच्या नीती व मूल्य यांविषयीच्या कल्पना व्यवहारवादी आहेत. त्याला अलंकारांची, प्रासांची व तालबद्धतेची हौस असली, तरी त्यांतून त्याची अर्थवाही सघनता लोपलेली नाही. बेकनच्या निबंधांमुळे इंग्रजी गद्यशैलीने एक मोठा पल्ला गाठला.

बेकनप्रमाणेच वॉल्टर रॅलीचा (१५५२ ?–१६१८) हिस्टरी ऑफ द वर्ल्ड (१६१४), ⇨ रिचर्ड हॅक्‍लूटचे(१५५२ ?–१६१६) प्रिन्सिपल नॅव्हिगेशन्स (१५८९) ह्या ग्रंथांनी विविध स्वरूपाच्या अर्थवाही गद्यशैली रूढ केल्या. त्यांतून प्रबोधनातील इतिहासाभिमान, साहसप्रियता हे गुण वाढीला लागले. ⇨ रिचर्ड हूकरच्या (१५५४ ?–१६००) द लॉज ऑफ इक्‍लीझिअ‍ॅस्टिकल पॉलिटी  (५ खंड, १५९४–१५९७) ह्या ग्रंथात धार्मिक विषयांवरील प्रवचनवजा भाष्य आढळते. हे गद्य अधिक सोपे व सरल आहे. १६११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या बायबलच्या नव्या कराराच्या अधिकृत भाषांतरामध्ये हेच गुणविशेष आढळतात. ह्या भाषांतराचा व विशेषत: त्यातील काव्यमय, परंतु अकृत्रिम, अर्थवाही, रसपूर्ण शैलीचा इंग्रजी गद्यशैलीवर दीर्घकाळापर्यंत प्रभाव पडला.

ह्याशिवाय टीकावाङ्‍मयात सिडनीच्या द अपॉलजी फॉर पोएट्री (१५९५), विल्यम वेबच्या डिस्कोर्स ऑफ इंग्‍लिश पोएट्री (१५८६), जॉर्ज पटनअ‍ॅमच्याआर्ट ऑफ इंग्‍लिश पोएझी (१५८९) ह्या ग्रंथांनी मोलाची भर घातली व टीकाशास्त्रातील परिभाषा रूढ करण्यास मदत केली. ऑर्ट ऑफ इंग्‍लिश पोएझी  हा ग्रंथ काहींच्या मते जॉर्जचा भाऊ रिचर्ड पटनअ‍ॅम ह्याने रचिला.

एलिझाबेथकालीन काव्य : एलिझाबेथकालीन काव्य व नाटक ह्या इंग्रजी वाङ्‍मयाला लाभलेल्या अजोड देणग्या आहेत. दोन्हींची विविधता, विपुलता, सूक्ष्मता, प्रयोगनिष्ठा व निर्भेळ कलागुण विस्मयकारी आहेत. जगातील बहुतेक सर्व प्रमुख भाषांवर व साहित्यावर त्यांचा प्रभाव पडला आहे. अगदी आधुनिक काळातही त्यांतील कोठली तरी प्रवृत्ती, प्रवाह वा कलाप्रकार अनुकरणीय वाटत आहेत.

टॉमस वायट आणि हेन्‍री हॉवर्ड सरी यांनी इटलीमधून प्रबोधनपूर्व काळातच आणलेला सुनीत हा काव्यप्रकार फिलिप सिडनी याने समर्थपणे अस्ट्रोफेल अँड स्टेला (१५९१) ह्या सुनीतमालेत वापरला. सिडनी हा भाषेचे व काव्यरचनेचे नवनवे प्रयोग करणारा ह्या काळातील पहिला प्रभावी कवी. त्याला भाषेच्या आतषबाजीची फार हौस. स्पेन्सरप्रमाणेच इटलीतील चित्रकला, मूर्तिकला व वास्तुशिल्प यांतील सौंदर्यकल्पनांचा त्याच्या काव्यावर परिणाम झालेला दिसून येतो. त्यामुळे त्याला एक तऱ्हेची सर्वसमावेशक सौंदर्यदृष्टी आलेली दिसते. पारंपरिक रूपकपद्धती व नीतिकल्पना, बोधवादी वृत्ती, उच्च महत्त्वाकांक्षा, लोकरंजनप्रकारांपासून घेतलेली स्फूर्ती आणि अभिजात परंपरेतील तंत्र व काव्यपद्धती ह्या गोष्टी सॅम्युएल डॅन्यल (१५६२–१६१९) व मायकेल ड्रेटन (१५६३–१६३१) ह्या कवींप्रमाणेच एडमंड स्पेन्सर ह्या प्रातिनिधिक कवीमध्ये अधिक प्रकर्षाने दिसतात.

स्पेन्सरने साध्या गोपकाव्यापासून (शेपर्ड्‌स कॅलेंडर, १५७९) रूपकात्मक महाकाव्यसदृश रचनेपर्यंत (फेअरी क्‍वीन, ६ खंड-१५९०; १५९६) अनेक काव्यप्रकार हाताळले. त्याने भाषेला समर्थ व अर्थवाही केले. सौंदर्योपासना, इंद्रियगोचर अनुभूतींचे यथार्थ वा प्रतीकात्मक वर्णन, नैतिक भूमिकेवरून हाताळलेले काव्यविषय ह्यांमुळे स्पेन्सरला मोठी मान्यता मिळाली व कवींचा कवी म्हणून त्याची कीर्ती झाली. त्याने वापरलेली ९ ओळींची छंदोरचना, तीतील शब्दसंगीतामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरली असून तिला ‘स्पेन्सरियन स्टँझा’ हे नाव प्राप्त झाले आहे. फेअरी क्‍वीनमधील मध्ययुगीन नैतिक भूमिका (१२ नैतिक गुणांची प्रतीके असलेली १२ सरदारांची पात्रे इ.) व विषय आज रुचण्यासारखे नसले, तरी सौंदर्यदृष्टी व शब्दसंगीत हे स्पेन्सरचे गुण लक्षणीय आहेत.

एलिझाबेथकालीन काव्यात उत्तान प्रणयाला महत्त्व देणारे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध झाले. त्यात क्रिस्टोफर मार्लोचा हीरो अँड लिअँडर (१५९३) व शेक्सपिअरचे व्हीनस अँड अडोनिस (१५९३) आणि रेप ऑफ ल्यूक्रीझ (१५९४) हे महत्त्वाचे आहेत. ह्या काव्यविषयांना इटलीमध्ये प्रतिष्ठा मिळाली होती. तथापि मार्लो व शेक्सपिअर यांनी त्यात सुगम रचना, नादमाधुर्य व विशुद्ध सौंदर्यभावना यांची भर टाकली.

ह्या कालखंडातील उत्कृष्ट प्रेमकाव्यात शेक्सपिअरची सुनीते प्रामुख्याने उल्लेखनीय  आहेत. त्यांतील आत्मचरित्रात्मक ध्वनी आणि आशयाभिव्यक्तीची एकात्मता वैशिष्ट्यपूर्ण आहे.

ह्या काळातील गीतेही उल्लेखनीय  आहेत. ती प्रामुख्याने प्रणयभावनेवर आधारलेली असून ह्या भावनेच्या अनेकविध छटा त्यांत आढळतात. भावनेची उत्कटता व नादमाधुर्य ह्यांमुळे ह्या गीतांची अवीट गोडी व ताजेपणा आजही टिकून आहे. शेक्सपिअर,  बेन जॉन्सन (१५७२–१६३७) ह्यांच्याबरोबर अनेक लहानमोठ्या कवींनी व नाटककारांनी ती नाटकात वा स्वतंत्रपणे रचली व ‘गाणाऱ्या पक्ष्यांचे घरटे’ हा इंग्‍लंडचा लौकिक सार्थ केला.

स्पेन्सरच्या संप्रदायातील काव्यात आढळून येणारा नादमाधुर्याचा सोस, काव्यरचनेत व कल्पनांत आलेला तोचतोपणा ह्यांविरुद्ध ⇨ जॉन डन (१५७२–१६३१) ह्या कवीने केलेले बंड उल्लेखनीय आहे. डन हा प्रखर बुद्धिवादी. भावनांच्या हळुवारपणापेक्षा त्यांतील चमत्कृती त्याला अधिक मोहित करते. एका बेडर वृत्तीने तो परस्परविरोधी आणि विस्मयजनक चमत्कृती निर्माण करतो. भौतिक वर्णनांपासून अतिभौतिक सूक्ष्मतेकडे ह्या कवीने टाकलेली झेप मोठी आहे. ह्या काव्याला ‘मेटॅफिजिकल’ (मीमांसक काव्य) हे नाव प्राप्त झाले. त्यातील वक्रोक्ती; परस्परविरोधी भावना, कल्पना आणि रूपके एकत्र आणण्याची पद्धती व एक तऱ्हेची अर्थवाही चमत्कृती टी. एस्. एलियटसारख्या आधुनिक कवींनाही प्रभावित करू शकली. अत्यंत वेगळ्या, अनन्यसाधारण अनुभूती हा कवी संक्रमित करू पाहतो. त्यामुळे त्याची कविता काही वेळेस क्लिष्ट, अनाकलनीय ठरत असली, तरीही तीत एक आगळे माधुर्य जाणवते.

एलिझाबेथकालीन नाट्यवाङ्‍मय : एलिझाबेथकालीन नाट्यवाङ्‍मय वैपुल्य, विविधता, प्रयोगशीलता व निखळ कलागुण ह्यांनी समृद्ध आहे. ह्या काळातील काव्य वैभवशाली असले आणि गद्यशैली वैविध्यपूर्ण व तत्त्वचिंतनपर असली, तरी ह्या सर्वांचा मुक्त विलास नाट्यात आढळतो. नाट्य हेच ह्या काळाचे माध्यम होते, असे म्हणावे लागेल. नाट्याची सुरुवात रोमन नाटककार सेनीका याच्या अभिजात, रक्तपाताला व भीषणतेला महत्त्व देणाऱ्या, वक्‍तृत्व आणि ओज हे गुण प्रामुख्याने असणाऱ्या नाटकांनी प्रभावित झाली असली, तरी अखेर शेक्सपिअरच्या स्वच्छंदतावादी नाट्याने वैभवाचे शिखर गाठले. नव-अभिजाततावादी नाटककारांत बेन जॉन्सन ह्या प्रभावी नाटककाराचा समावेश करावा लागेल.

नाट्यकृतींचा पाया विद्यापीठातील अभिजातविद्याविभूषित अशा तरुण नाटककारांच्या एका समूहाने घातला. ‘युनिव्हर्सिटी विट्स’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ह्या नाटककारांमध्ये टॉमस किड, जॉर्ज पील (१५५८ ?–१५९७ ?), टॉमस लॉज, रॉबर्ट ग्रीन, क्रिस्टोफर मार्लो आणि टॉमस नॅश हे नाटककार आहेत. १५८० पासून १६६२ पर्यंत अनेक नाटके निर्माण झाली. त्यांची विपुलता व विविधता विस्मयकारक आहे.  टॉमस हेवुडसारख्या (मृ. १६५० ?) नाटककाराने २२० नाटके लिहिली. ह्यांपैकी फारच थोडी आज उपलब्ध आहेत. नाट्यकलेचा पाया धंदेवाईक नाटकमंडळ्या स्थापन झाल्यावर अधिक मजबूत झाला. १५७६ मध्ये लंडनमध्ये पहिले नाट्यगृह स्थापन झाले व १६०० पर्यंत एकूण आठ नाट्यगृहे निर्माण झाली. ही आकाराने लहान असून ह्यांत नेपथ्य फारसे नसे व त्याची जागा प्रतीकात्मक वर्णनाने व अभिनयाने भरून काढली जाई. स्त्रियांची कामे पुरुष करीत.

अत्यंत साध्या रंगमंचावर इतर कोठलीही रंगसाधने नसल्याने नटाचा अभिनय व त्याची भाषणे यांना महत्त्व आले. अनेक भाषणे स्वगतपर व्याख्यानांच्या स्वरूपाची असत. नट लोकप्रिय असले, तरी समाजात प्रतिष्ठित मानले जात नसत. आरंभी त्यांना राजदरबारचा, सरदारांचा आश्रय होता; परंतु पुढे त्यांनी स्वत: आपल्या व्यावसायिक नाटकमंडळ्या स्थापन केल्या, स्वत: नाटके लिहिली व उत्तरकाळात नाट्यव्यवसायाला मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

नाटकांचा प्रेक्षकवर्ग अत्यंत संमिश्र व विविध थरांतील होता. नाटक हे त्याच्या बुद्धीला, विचाराला, भावनेला व कल्पनेला खाद्य पुरविणारे एकमेव साधन होते. त्यामुळे त्यात एका बाजूला कमालीची सूक्ष्मता, भावनाभिव्यक्तीचे बारकावे, विचारांची भव्य झेप असे; तर दुसऱ्या बाजूला अत्यंत भडकपणा, ओबडधोबडपणा, ढोबळपणा आणि ग्राम्यता असे. ह्या दोन्ही टोकांचा तोल साधण्यात शेक्सपिअरसारख्या श्रेष्ठ नाटककारांनी यश मिळविले, ही गोष्ट उल्लेखनीय आहे.

‘युनिव्हर्सिटी विट्स’ ह्या समूहातील नाटककारांची नाटके आज केवळ इतिहासजमा झाली असली, तरी त्यांपैकी प्रत्येकाकडून शेक्सपिअरने नाट्य-भाषा-काव्य-कलागुण ह्यांपैकी काहीना काही स्वीकारले आहे. क्रिस्टोफर मार्लोच्या नाटकांतून प्रबोधनाच्या काळात मानवाला झालेली स्वसामर्थ्याची जाणीव व्यक्त होते. धर्मकल्पना, रूढ नीतिनियम, बंधने ह्यांना त्याने आपल्या नाट्यकृतींच्या द्वारे दिलेली आव्हाने त्याच्या टॅम्बरलेन, ज्यू ऑफ माल्टा, एडवर्ड द सेकंड, डॉ. फॉस्टस ह्या प्रभावी पात्रांच्या द्वारा प्रकट होतात. त्याच्या नाटकांत कल्पनांच्या भरारीबरोबरच भावनेची सूक्ष्मताही आढळते. मार्लोच्या नाट्यकृतींचा शेक्सपिअरवर मोठा प्रभाव होता.

एलिझाबेथकालीन नाट्यक्षेत्रातील एक वैभवशाली घटना म्हणजे विल्यम शेक्सपिअरची नाटके. जगात अशी एकही प्रगत भाषा नाही, की ज्या भाषेच्या नाट्यसृष्टीवर शेक्सपिअरच्या नाटकांचा प्रभाव पडलेला नाही. शेक्सपिअरच्या नाट्यलेखनाचे १५९२ ते १६०१, १६०१ ते १६०८ आणि १६०८ ते १६१६ असे तीन कालखंड पडतात. ह्या तीन कालखंडांत त्याच्या मनोवस्थेची काही वैशिष्ट्ये दिसून येतात. स्थूलमानाने पाहता पहिल्या कालखंडात त्याची वृत्ती आनंदी आणि खेळकर दिसते, तर दुसऱ्या कालखंडात ती गंभीर झाल्याचे जाणवते आणि जीवनातल्या दुःखाची आणि अपेक्षाभंगाची त्याला तीव्र जाणीव झालेली दिसते. त्याच्या चारही श्रेष्ठ शोकात्मिका ह्याच कालखडातील आहेत. तिसऱ्या कालखंडात चिंतनशीलता आणि गूढ अद्‌भुतरम्यता ह्यांचा प्रभाव दिसतो. ह्या तीन कालखंडांतील नाटकांत काही सुखात्मिका आणि काही शोकात्मिका असून काही शोक-सुखात्मिका आहेत. त्या नाटकांत भावनांचा, भावावस्थांचा, तात्त्विक विचारांचा व चिंतनाचा परिपाक आहे. शेक्सपिअरने प्रचलित नाट्यप्रकारात वापरले व रूढ कथानके हाताळली. तथापि प्रचलिताला आणि अल्पजीवी व आकस्मिक घटिताला चिरस्थायी, मनोज्ञ कलारूप देण्यात यश मिळविले. त्याच्या नाटकांत मानवी जीवनातील सौंदर्य, गूढता, रम्य-भीषणता आणि त्यातील अतर्क्य कोडी मांडण्याचे सामर्थ्य दिसते; तसेच विनोद, काव्यात्मता व कारुण्य ह्यांचा आविष्कारही तो आपल्या नाटकांतून प्रभावीपणे करतो. समकालीनांच्या दोषांपासून, आलंकारिक भाषेच्या हव्यासापासून ही नाटके अलिप्त नाहीत; परंतु त्याच्या काही नाटकांत– विशेषत: हॅम्‍लेट, मॅक्‌बेथ, किंग लीअर, ऑथेल्लो  ह्या शोकात्मिकांत– इतके श्रेष्ठ वाङ्‍मयीन गुण एकवटलेले आहेत, की त्यांना जोड नाही.

शेक्सपिअरच्या समकालीनांपैकी बेन जॉन्सनने नव-अभिजाततावादी, तंत्रबद्ध, रेखीव रचना असणारी नाटके लिहिली. त्याची एव्हरी मॅन इन हिज ह्यूमर (१५९८), व्हॉलोपन ऑर द फॉक्स (१६०७), एपिसीन  किंवा द सायलेंट वूमन (१६०९), बार्‌थॉलोम्यू फेअर (१६१४), द अल्केमिस्ट (१६१२) ही नाटके मुख्यतः स्वभावातील तऱ्हेवाईकपणावर आणि एकांगीपणावर भर देणारी आहेत. 'कॉमेडी ऑफ मॅनर्स' किंवा आचारविनोदिनी ह्या नाट्यप्रकाराचा प्रणेता म्हणून जॉन्सनला नाट्येतिहासात अढळ स्थान आहे.

बेन जॉन्सननंतर जॉन वेब्स्टरसारख्या (१५८० ?–१६२५ ?) नाटककाराने द व्हाइट डेव्हिल (१६१२), द डचेस ऑफ माल्फी (१६२३) ही नाट्यगुणांनी श्रेष्ठ, परंतु खून व रक्तपात यांनी रंगलेली नाटके लिहिली, तर फ्रान्सिस बोमंट (१५८४–१६१६), जॉन फ्‍लेचर (१५७९–१६२५), फिलिप मॅसिंजर (१५८३–१६४०), जॉन फोर्ड (१५८६–१६४० ?), जेम्स शर्ली (१५९६–१६६६) यांच्या नाटकांतही काही कलागुण आढळतात. तथापि ह्या पुढल्या काळात एकंदरीने नाट्यनिर्मितीचा बहर ओसरून नाट्यकलेला उतरती कळा लागलेली दिसते.

मिल्टनचे युग (१६२५–१६६०) : शेक्सपिअर काळातून मिल्टनच्या काळाकडे येताना इंग्‍लंडच्या समाजजीवनात व विचारप्रणालीत अनेक बदल घडून आलेले दिसून येतात. हे बदल मुख्यतः धार्मिक व राजकीय असून काही प्रमाणात सामाजिक स्वरूपाचे आहेत; मात्र त्यांना सामाजिक क्रांतीचे स्वरूप नाही. पहिला जेम्स व पहिला चार्ल्स यांच्या कडव्या, अनुदार व असहिष्णू धोरणामूळे राजसत्तेविरुद्ध तीव्र प्रतिक्रिया निर्माण झाली. आर्चबिशप लॉर्डसारख्या अधिकाऱ्यांच्या संकुचित वृत्तीमुळे धार्मिक क्षेत्रात विरोधी वृत्ती बळावली. ह्या सर्वांचा परिणाम म्हणजे प्रस्थापिताला विरोध करण्याची एक तऱ्हेची कडवी प्रवृत्ती. ह्या प्रवृत्तीमुळे धर्माचे विशुद्ध स्वरूप शोधण्याचा प्रयत्‍न सुरू झाला. ही प्रक्रिया ‘धर्मसुधारणे’पासूनचे (रेफॉर्मेशन) चालू झालेली होती. बायबलच्या इंग्रजी भाषांतराने ते लोण आता सामान्यांपर्यंत जाऊन पोचवले होते. सामान्यांना आपल्या धार्मिक व ऐहिक आशा-आकांक्षांचे आणि नीतिमूल्यांचे प्रत्यंतर बायबलच्या साध्या, सोप्या परंतु प्रवाही व आवेशपूर्ण भाषेत, प्रतिपादनात व मूल्यकल्पनांत येत होते. ह्यांतून धर्माच्या विशुद्धीकरणाचा पाठपुरावा करणारा ‘प्यूरिटन पंथ’ निर्माण झाला. त्याने एलिझाबेथनंतरच्या काळातील नीतिमूल्यांबद्दलची शिथिलता, लैंगिक बाबतीतील स्वातंत्र्य आणि धार्मिक बाबींतील औदासिन्य यांवर कडाडून हल्ला चढविला. सामाजिक व आर्थिक परिवर्तनांनुळे सामान्य मध्यम वर्ग, व्यापारी यांना महत्त्व आले होते. जुनी प्रतिष्ठित घराणी व व्यक्ती यांची जागा ह्या नव्याने श्रीमंत होणाऱ्या शहरी मंडळींनी व ग्रामीण भागातील नव्या सधन वर्गाने (जेंट्री) घेतली. पृथ्वीवरील राजांच्या जुलमी अधिसत्तेपेक्षा सर्वशक्तिमान परमेश्वराची स्वर्गीय अधिसत्ता अधिक महत्त्वाची व तिचे प्रतिबिंब व्यक्तीच्या सदसद्‌विवेकबुद्धीमध्ये दिसले पाहिजे, अशा विचारांचा व्यक्तिवाद धार्मिक क्षेत्रात प्रभावी ठरला. त्यामुळे प्यूरिटन क्रांती घडून आली. लोकसत्ताकाचा प्रयोग झाला. पूर्वीच्या शिथिलतेविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून इंग्‍लंडमधील नाट्यगृहे अनीतिप्रवर्तक मानून बंद करण्यात आली (१६४२). नटांना हद्दपार करण्यात आले.

प्यूरिटनांच्या ह्या कडवेपणामुळे ते सर्व बाबतींत असहिष्णू असून त्यांना कोणत्याही प्रकारच्या कलांचे व करमणुकींचे वावडे आहे अशी समजूत पसरली; परंतु वस्तुस्थिती तशी नव्हती. इंग्‍लंडच्या लोकसत्ताकाचा सर्वाधिकारी क्रॉमवेल हा संगीतप्रेमी होता आणि मिल्टनसारख्या श्रेष्ठ प्यूरिटन कवीमध्ये प्रबोधनातील सौंदर्यपूजा आणि प्यूरिटनांचा शुद्धतेचा आग्रह ह्यांचे मिश्रण आढळते.

ह्या काळातील सर्व प्रवृत्तींचा परिपाक म्हणजे जॉन मिल्टनची कविता. ह्या काव्याने प्रबोधनातील काव्यगुणांवर व संस्कृतीवर कळस चढविला. मिल्टन हा पंडित कवींमध्ये अग्रगण्य मानावा लागेल. पांडित्यावर त्याने आपल्या सौंदर्यासक्तीचे अलंकार चढविले व श्रेष्ठ काव्यगुणांनी काव्याला एक वेगळे तेज आणले. प्यूरिटनांची विशुद्धीकरणाची तळमळ, व्यक्तिगत सदसद्‌विवेकबुद्धीवर मदार, तीवर आधारलेली स्वातंत्र्यलालसा, दुर्दम्य महत्त्वाकांक्षा, राष्ट्रगौरव ह्यांसारख्या गुणांचा समुच्चय त्याच्या पॅरडाइस लॉस्ट (१६६७) ह्या महाकाव्यात दिसून येतो. पूर्ववयात मिल्टनने लॅटिन व इटालियन भाषांत रचना केली. नंतरच्या काळातील धर्मपर काव्यात भक्ती व नादमाधुर्य यांचे मिश्रण (‘ऑन द मॉर्निंग ऑफ ख्राइस्ट्स नेटिव्हिटी’, १६२९) आढळते. कोमस (१६३४), लिसिडास (१६३७), ल'ओलेग्रो (१६३२), आणि इल् पेन्सरोझो (१६३२) ह्यांसारख्या काव्यरचनांत सौंदर्यपूजा, मानवता, धर्मनिष्ठा व निसर्गप्रेम यांचे मिश्रण दिसते. तात्कालिक विषयांवर लिहिलेल्या त्याच्या गद्य पुस्तिकांमध्ये व प्रचारकी निबंधांमध्ये स्वातंत्र्याबद्दलची तळमळ दिसते. परमेश्वरी आज्ञेचे उल्लंघन करण्याच्या मानवाच्या आद्य पतनावर आधारलेले पॅरडाइस लॉस्ट  हे महाकाव्य त्याने लिहिले. आदाम आणि ईव्ह सैतानाच्या मोहाला बळी पडले (पॅरडाइस लॉस्ट ); तथापि त्याच सैतानाच्या मोहाचा प्रतिकार करून ईश्वराच्या पुत्राने परमेश्वराची कृपा मानवासाठी परत संपादन केल्याचे कथानक पॅरडाइस रीगेन्ड (१६७१) ह्या काव्यात आहे. ते अधिक सरळ व साध्या शैलीत आहे. त्याने उत्तरकाळात लिहिलेली सॅमसन अ‍ॅगनिस्टीस (१६७१) ही ग्रीक नाट्यतंत्रावर आधारलेली शोकात्मिका कवीच्या व्यक्तिगत विकलावस्थेवर प्रकाश टाकते. महाकाव्य अथवा नाटक ह्या वस्तुनिष्ठ वाङ्‍मयप्रकारांत मिल्टनने गुंफलेला आत्मचरित्राचा व आत्माविष्काराचा धागा अत्यंत आकर्षक वाटतो.

मिल्टनच्या काळात व नंतरही ‘कॅव्हलिअर कवी’ म्हणून संबोधिलेले दरबारी कवी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण काव्याने महत्त्वाचे ठरतात. रॉबर्ट हेरिक (१५९१–१६७४), टॉमस कारू (१५९५ ?–१६४० ?), जॉन सक्‌लिंग (१६०९–१६४२), रिचर्ड लव्हलेस (१६१८–१६५८) ह्यांच्या काव्यात एक तर्‍हेची मृदुता, सरलता व तरल सौंदर्यदृष्टी आढळते. चिंतनशीलतेने त्याला वेगळे परिमाण लाभले आहे.

जॉर्ज हर्बर्ट (१५९३–१६३३), रिचर्ड क्रॅशॉ (१६१२ ?–१६४९), हेन्‍री व्हॉन (१६२२–१६९५) ह्या कॅव्हलिअर कवींच्या काव्यात धार्मिक चिंतनाचा धागा बेमालूम मिसळला आहे. त्यांच्या काव्यात भावकाव्याच्या उत्कटतेबरोबरच धर्मभावनेचा कडवेपणा जाणवतो. ह्यांशिवाय जॉन डनच्या मीमांसक काव्यसंप्रदायातील अब्राहम काउली (१६१८–१६६७), टॉमस ट्राहर्न (१६३७ ?–१६७४) ह्या कवींची चिंतनपर कविता, डनच्या सर्व गुणदोषांसह प्रकट झालेली दिसते. ट्राहर्नच्या काव्यात सौंदर्य, ओज ह्यांबरोबर उत्कटता आणि चिंतनशीलता साधलेली दिसते.

मिल्टनच्या काळापर्यंत गद्यशैलीने फार मोठा प्रगतीचा पल्ला गाठला होता. भाषेचे स्वरूप आता अधिक स्थिर झाले होते. बेकनसारख्यांनी गद्यशैलीत नव्या जाणिवा, नवा अर्थवाहीपणा निर्माण केला होता. बायबलच्या भाषांतरांच्या द्वारा मूळ हिब्रू भाषेतील प्रवाह, ओज व काव्यात्मकता ह्यांचा प्रभाव इंग्रजी भाषेवर पडलेला दिसतो. प्यूरिटन धर्मप्रचारकांनी आपल्या प्रवचनांतून ह्या शैलीला व्यवहाराची जोड दिली व सामान्यांच्या दैनंदिन व्यवहाराला व विचारभावनांना वाट देणारे सामर्थ्य तीत आणले.

रॉबर्ट बर्टन (१५७७–१६४०) व  टॉमस ब्राउन (१६०५–१६८२), आयझाक वॉल्टन (१५९३–१६८३), टॉमस फुलर (१६०८–१६६१) ह्या लेखकांनी गद्यशैली मुक्त स्वरूपात वापरली. बर्टनच्या अनॅटमी ऑफ मेलँकलीमध्ये (१६२१) किंवा ब्राउनच्या रिलीजिओमेडिसीमध्ये (१६४२) सामान्य व्यवहारातील भाषा व पांडित्यपूर्ण लॅटिन शैली ह्यांचे मिश्रण दिसते. विज्ञाननिष्ठा व पारंपरिक कल्पना ह्यांचाही संगम दिसतो. एकोणिसाव्या शतकातील चार्ल्स लँबसारख्या (१७७५–१८३४) निबंधकारांनी ह्यांतील शैलीच्या वैशिष्ट्यांचे अनुकरण केलेले दिसते. चरित्रे व आत्मचरित्रे लिहिण्यासाठीही गद्याचा उपयोग आता केला जाऊ लागला. फुल्क ग्रेव्हिलचे (१५५४–१६२८) फिलिप सिडनीचे चरित्र, आयझाक वॉल्टनची जॉर्ज हर्बर्ट व जॉन डन यांची चरित्रे, लॉर्ड हर्बर्ट ऑफ चेरबरी (१५८३–१६४८) व मार्गारेट डचेस ऑफ न्यूकॅसल यांची हृद्य आत्मचरित्रे पुढील रेस्टोरेशन काळातील गद्याची पूर्वसूचक आहेत.

रेस्टोरेशन काळ (१६६०-१७००) : १६६० च्या सुमारास इंग्‍लंडच्या राजकीय व सामाजिक जीवनामध्ये क्रांतिकारक बदल घडून आले. ह्या बदलांमुळे वाङ्‍मयाच्या प्रेरणा व स्वरूप यांतही स्थित्यंतर घडून आले. एलिझाबेथकालीन काव्य व नाटक ह्यांत जो भडकपणा व अतिरेकी उत्साह दिसत होता तो मिल्टन काळात ओसरला होता; पण त्याची जागा नैतिक व धार्मिक पुनरुत्थानाच्या ध्येयवेडाने घेतली होती. समाजजीवन नियंत्रित असावे, नाट्यादी करमणुकीसुद्धा त्याज्य ठरवाव्या, ह्या प्यूरिटनकाळातील अतिरेकी आग्रहाने व समाजात वरचेवर झालेल्या बदलांमुळे एक नवी स्थिर घडी असावी, अशी विचारप्रक्रिया सुरू झाली. प्यूरिटन लोकसत्ताकाचा शेवट घडून आला व फ्रान्समध्ये परागंदा जीवन कंठणारा दुसरा चार्ल्स परत इंग्‍लंडच्या राजसत्तेवर आला (१६६०). त्याच्याबरोबर सर्व निर्बंध झुगारून देण्याची व केवळ प्यूरिटनांच्या सोवळेपणाचीच नव्हे, तर सर्वच नीतिनियमांची चेष्टा करण्याची प्रवृत्ती बळावली. ह्यांचे प्रत्यंतर ह्या काळातील नाट्यवाङ्‍मयात विशेषतः दिसून येते.

राजसत्तेबरोबरच राजदरबाराचे व लंडन शहराचे महत्त्व वाढले. व्यक्तिगत भावनांची जागा सामाजिक प्रेरणा, सभ्यता, नागरिकत्वाची जाणीव यांनी घेतली. नागरी रीतीरिवाज व त्यांतून येणारी अभिजातता ह्यांना महत्त्व आले. कल्पनेची जागा बुद्धीने घेतली आणि वैचारिक चिकित्सेची आणि विश्लेषणाची प्रवृत्ती वाढीला लागली. ही प्रवृत्ती गद्याला पोषक होती; म्हणून हा काळ मुख्यत: गद्याचा आहे. स्फुट सुभाषितवजा अशी गद्याभिव्यक्ती ह्या काळात रूढ होऊ लागली. स्वच्छंदतेची जागा अभिजातता घेऊ लागली. रोजच्या व्यवहारातील प्रसंग, विचार व भावना यांच्या अभिव्यक्तीचे भाषा एक समर्थ साधन बनली.

समाजजीवनात मध्यमवर्गीयांचा प्रभाव अधिकाधिक प्रमाणात दिसू लागला. लेखकवर्ग हा अजून आश्रयदात्यांवर व राजदरबारावर अवलंबून असला, तरी वाङ्‍मयात सामान्यांच्या विचारभावनांचे आणि आशाआकांक्षांचे प्रतिबिंब अधिकांशाने पडू लागले. कॉफी हाऊसमध्ये बसणाऱ्या लेखकमंडळींत राजकीय, वाङ्‍मयीन, धार्मिक इ. विषयांवर चर्चा होऊ लागल्या. वृत्तपत्रांच्या प्रसाराने त्यांना वाङ्‍‍मयरूप मिळाले. पंडितांना व विद्वानांनादेखील साध्या व सोप्या भाषेत आपला आशय व्यक्त करावा, असे तीव्रतेने वाटू लागले.

१६६५ मधील प्लेगच्या साथीनंतर व १६६६ साली लागलेल्या मोठ्या आगीनंतर लंडन शहराची पुनर्रचना झाली. राजसत्ता परत आली असली, तरी तिच्यावर नियंत्रण ठेवण्यात मध्यम वर्ग यशस्वी ठरला.

आधुनिक गद्यशैलीची निश्चिती ही ह्या युगाची इंग्रजी वाङ्‍मयाला प्रमुख देणगी. जॉन ड्रायडनच्या गद्यलेखनावरून हे स्पष्टपणे दिसून येते. त्याच्या गद्यलेखनात समकालीन वाङ्‍मयीन अभिरुची नियमबद्ध करण्याचा व अभिजात प्रवृत्तींना प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्‍न दिसतो. त्याच्या एसे ऑन ड्रॅमॅटिक पोएझीत (१६६८) त्याने अभिजात नाट्यकृतींतील नियमबद्धता पुरस्कारिलेली दिसते. ह्या त्याच्या निबंधाने आणि त्याने लिहिलेल्या प्रस्तावनांनी इंग्रजीमधील पद्धतशीर साहित्यसमीक्षेचा पाया घातला, असे मानले जाते.  जॉन बन्यन (१६२८–१६८८) हा ह्या काळचा श्रेष्ठ गद्यलेखक. ह्याच्या गद्य-लेखनात बायबलच्या गद्यपद्यशैलीचे सुपरिणाम दिसतात. ग्रेस अबाउंडिंग...(१६६६), द होली वॉर (१६८२), द लाइफ अँड डेथ ऑफ मिस्टर बॅडमन (१६८०) ह्या बन्यनच्या कथात्मक ग्रंथांत मानवी स्वभावाचा परिणामकारक आविष्कार घडवून आणणारी वर्णनशैली, विनोद व काहीसा विस्मयजनक विक्षिप्तपणा ह्या गुणांचा प्रत्यय येतो. ह्या सर्व गुणांचा प्रकर्ष त्याच्या द पिलग्रिम्स प्रोग्रेस (१६७८) ह्या रूपकात्मक कथेत दिसतो. बायबलवरील परमश्रद्धेने प्रेरित होऊन ख्रिस्ती धर्ममूल्यांचा गौरव करण्यासाठी बन्यनने ही कथा लिहिली; परंतु तिच्यातील धर्मतत्त्वे कोरडी नाहीत. ती सामान्यांच्या भाषेत त्यांच्या विचारभावनांशी एकरूप होऊन ललित स्वरूपात प्रकट झाली आहेत. ही रूपककथा अत्यंत जिवंत, वास्तववादी आणि नाट्यमय झाली आहे. या ग्रंथाने सामान्यांच्या जीवनाशी जवळचे नाते जोडले. वरील गुणांमुळे ही रूपककथा एक प्रकारे अठराव्या शतकात बहराला आलेल्या कादंबरीची पूर्वसूचक ठरते. बन्यनची वृत्ती प्यूरिटन काळाला जवळची असली, तरी त्याचे लेखन रेस्टोरेशन काळात झाले. त्याच्या लेखनात सत्यान्वेषी ऋजुता, नीतिमूल्यांबाबत पराकाष्ठेची तळमळ इ. ह्या काळात उठून दिसणारे गुण दिसतात.

गद्याचा उपयोग रोजनिशा लिहिण्यासाठीही करण्यात आला सॅम्युएल पेपिस (१६३३–१७०३) व जॉन ईव्हलिन (१६२०–१७०६) ह्यांच्या रोजनिशांचा उपयोग गद्यशैलीला स्थिर, सुगम, सरळ रूप देण्यासाठी झाला.

गद्यशैलीत जे गुण ठरले, त्यांचाच उपयोग काव्यात करण्यात आला. परंतु त्यामुळे काव्याला एख प्रकारची मर्यादा पडली. ठराविक काव्यात्म शब्दयोजनेला महत्त्व आले. टीकात्मक, विडंबनपर व उपहासपर काव्याला ह्या काळात उधाण आले. व्यक्तिगत दोषांवर, शारीरिक व्यंगांवर अथवा खाजगी कुलंगड्यांवर काव्यमाध्यमाच्या द्वारा प्रच्छन्न वा उघड टीका करण्याची वृत्ती बळावली. तरल, सूक्ष्म भावनाविष्कारापेक्षा रोखठोकपणा व व्यवहारवाद काव्यात येऊ लागला. गद्याप्रमाणे काव्यशैली सफाईदार होऊन अभिजात स्वरूपात प्रकट होऊ लागली. तीत सूक्ष्मतेचा अभाव असला, तरी बुद्धीची चमक आहे. काव्यार्थ स्पष्टपणे मांडण्याची प्रवृत्ती आहे. ड्रायडनच्या रिलिजिओ लेसी (१६८२), द मेडल (१६८२), द हाइंड अँड द पँथर (१६८७) आणि विशेषत: अँब्सलम अँड अ‍ॅचिटोफेल (१६८१) ह्या रूपकात्मक राजकीय विडंबनकाव्यांत हे सर्व गुण प्रामुख्याने दिसतात. सॅम्युएल बटलरच्या (१६१२–१६८०) ह्यूडिब्रॅस (३ भाग; १६६३, १६६४, १६७८) ह्या काव्यात प्यूरिटन काळातील सोवळेपणा व कर्मठपणा ह्यांचे विदारक विडंबन दिसते. कवीची विनोदबुद्धी अत्यंत तीव्र असून त्याची शैली धारदार व मर्मभेदी आहे. ह्या काळात भावकाव्याला ओहोटी लागली व उपहास विडंबनपर बौद्धिक काव्याला महत्त्व आले, ते प्रामुख्याने ह्या दोन प्रमुख कवींच्या उपहास विडंबनपर काव्यामुळे.

रेस्टोरेशन काळातील नाट्यवाङ्‍‍मयात तीन प्रकार आढळतात. धीरोदात्त नायक आणि त्यांची वीरवृत्ती यांवर आधरलेली ‘हिरोइक’ नाटके हा एक, स्वभावातील तर्‍हेवाईकपणावरील नाटके (कॉमेडी ऑफ मॅनर्स किंवा आचारविनोदिनी ) हा दुसरा आणि सामाजिक रीतिरिवाजांवर अधिष्ठित असलेली नाटके हा तिसरा. जो संयम गद्यपद्यात दिसतो, तो हिरोइक नाटकांत दिसून येत नाही. उलट अत्यंत भडक, अतिरेकी अशा प्रसंगांची रेलचेल दिसते. भावना आत्यंतिक टोकाला नेऊन भिडवण्याचा प्रयत्‍न दिसतो. संवादामध्ये दर्पोक्ती व अतिशयोक्ती यांचा सुकाळ आढळतो. ह्यांतील ‘हिरोइक कप्लेट’ ही यमकबद्ध रचना ड्रायडनने टिरॅनिक लव्ह (१६६९), काँक्‍वेस्ट ऑफ ग्रानाडा (१६७०) व औरंगजेब (१६७६) ह्या नाटकांतून रूढ केली. ही शैली पुढे अँटनी आणि क्लीओपात्रा ह्यांच्या कथेवर आधारेलल्या ऑल फॉर लव्ह (१६७८) ह्या नाटकात ड्रायडनने सोडली व पुन्हा निर्यमक छंदाचा आश्रय घेतला.

आचारविनोदिनी म्हणजे सामाजिक चालीरीतींवर व आचारांवर आधारलेली विनोदप्रधान नाटके. ह्या काळातील हा एक वैशिष्ट्यपूर्ण नाट्यप्रकार होय. प्यूरिटनांनी बंद केलेली नाट्यगृहे ह्या काळात पुन्हा उघडण्यात आली. तसेच स्त्रियांचा रंगभूमीवर प्रवेश झाला. परिणामतः नाट्य निर्बंधमुक्त स्वरूपात अवतरू लागले. आचारविनोदिनीचे प्रगत स्वरूप दर्शविणारी नाटके पुढीलप्रमाणे होत: जॉर्ज एथारिजची (१६३५ ?–१६९२ ? ) द कॉमिकल रिव्हेंज किंवा लव्ह इन अ टब (१६६४), शी वुड इफ शी कुड (१६६८), सर फॉप्‍लिंग फ्‍लटर  किंवा द मॅन ऑफ मोड (१६७६). टॉमस शॅडवेलची (१६४२ ?–१६९२)एप्सम वेल्स (१६७३), द स्क्‍वायर ऑफ अ‍ॅल्सेशिया (१६८८) आणि बेरी फेअर (१६८९). विल्यम विचर्लीची (१६४०–१७१६) लव्ह इन अ वुड (१६७२), द जंटलमन डान्सिंग मास्टर (१६७३), द कंट्री वाइफ (१६७५),द प्‍लेन डीलर (१६७७).  विल्यम काँग्रीव्हची (१६७०–१७२९) द ओल्ड बॅचलर (१६९३), लव्ह फॉर लव्ह (१६९५) आणि द वे ऑफ द वर्ल्ड (१७००). आचारविनोदिनीच्या संदर्भात विचर्ली आणि काँग्रीव्ह ह्यांची कामगिरी विशेष मोलाची आहे.

वरील नाटकांतून स्त्रीपुरुषसंबंधांबाबत मोकळेपणा आढळतो. खटकेबाज संवादांना, बुद्धिगम्य विनोदाला, कोटिबाजपणाला महत्त्व आलेले आढळते. ह्यांतील काही नाटकांतील हीन अभिरुची जमेस धरूनही सुखात्मिकेला त्यांनी प्राप्त करून दिलेली लोकप्रियता व प्रतिष्ठा महत्त्वाची मानावी लागेल.

अठरावे शतक : ह्या शतकातील इंग्रजी वाङ्‍‍मयेतिहासाचे स्थूलमानाने तीन कालखंड पडतात. १७०० ते १७४० हा अलेक्झांडर पोप (१६८८–१७४४) ह्या कवीचा कालखंड, १७४० ते १७७० हा साहित्यिक आणि टीकाकार सॅम्युएल जॉन्सन (१७०९–१७८४) ह्याच्या प्रभावाचा कालखंड आणि तिसरा १७७० ते १७९८ हा संक्रमणाचा कालखंड. ह्या शेवटल्या कालखंडातील इंग्रजी वाङ्‍मयात आगामी काळातील स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचे दर्शन होऊ लागते.

पोपच्या कालखंडाला ‘ऑगस्टन युग’असेही म्हणतात. ऑगस्टस ह्या रोमन बादशाहाच्या कारकीर्दीचा काळ (इ. स. पू. २७–इ. स. १४) हा लॅटिन वाङ्‍मयाचा सुवर्णकाळ मानला जातो. ह्या काळातील व्हर्जिल ( ७०–१९ इ. स. पू.), हॉरिस (६५–८ इ. स. पू.), ऑव्हिड (इ. स. पू. ४३–इ. स. १८) इ. व त्या अगोदरच्या होमर, सिसेरो (१०६–४३ इ. स. पू.) ह्यांसारख्या प्राचीन साहित्यिकांचा आदर्श पोपच्या कालखंडातील साहित्यिकांपुढे होता. त्या कालखंडातील साहित्यिक दृष्टिकोण, परंपरा व व्यवहार ह्यांना जॉन्सनच्या कालखंडात बळकटी आणि स्थैर्य प्राप्त झाले. प्राचीन अभिजात वाङ्‍‍मयातील संयम, रचनेचा रेखीवपणा, शब्दांचा नेटका उपयोग, शब्दालंकार आणि अर्थालंकार ह्यांचा उपयोग नियमबद्धता आणि सांकेतिकता तसेच उपरोध, उपहास आणि विडंबन ह्यांचा खंडनमंडनासाठी उपयोग ह्यांचा प्रभाव पडून त्याच नमुन्यावर वाङ्‍‍मय निर्माण होऊ लागले. ह्या प्रवृत्तीला नव-अभिजाततावाद असे नाव पडले.

इंग्‍लंडात १६८८ साली जी राज्यक्रांती झाली ती केवळ राजकीय क्रांती नव्हती, तर तो एका सामाजिक आणि वैचारिक क्रांतीचा आरंभ होता. सतराव्या शतकाच्या शेवटच्या कालखंडात ज्या साहित्यिक आणि वैचारिक प्रवृत्तींचा उगम झालेला होता, त्यांनाच पुढल्या शतकात अधिक गती अली आणि त्या निरनिराळ्या रूपांनी प्रकट झाल्या; म्हणून ह्या शतकातील सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक आणि वैचारिक घडामोडी समजून घेणे वाङ्‍मयीन प्रवृत्तींच्या आकलनाला उपकारक ठरेल.

स्ट्यूअर्ट राजा दुसरा जेम्स ह्याला १६८८ साली इंग्‍लंडच्या सिंहासनावरून काढून विल्यम ऑफ ऑरेंजला तिथे बसविण्याची जी राज्यक्रांती झाली, ती जुना सरंजामदार-जमीनदार वर्ग (टोरी) आणि व्यापार-उद्योग ह्यांमुळे संपन्न झालेला नवा धनिक वर्ग (व्हिग) ह्या दोन वर्गांच्या सहकार्याने झाली. ह्या राज्यक्रांतीमुळे राजसत्ता ईश्वरदत्त असते, ह्या कल्पनेला तडा गेला. पार्लमेंट सार्वभौम झाले. इंग्‍लंड हे लोकशाहीनिष्ठ राष्ट्र झाले. राजकारणात द्विपक्षीय पद्धतीला महत्त्व आले. ह्या नव्या धनिक वर्गाने राज्यक्रांतीत जुन्या सरंजामदार वर्गाशी सहकार्य केले असले, तरी सत्तेच्या राजकारणात तो जुन्या सरंजामदार-जमीनदार वर्गाचा प्रतिस्पर्धी होता. हा वर्ग मुख्यतः शहरी आणि व्यापारी होता, पण आपल्या संपत्तीच्या बळावर तो जमीनदारही होऊ लागला होता. समाजव्यवस्थेत त्याला मानाचे आणि अधिकाराचे स्थान मिळू लागले होते. त्यामुळे खानदानी चालीरीती शिकण्याची आणि आपली अभिरुची सूक्ष्म व सुसंस्कृत करण्याची गरज त्याला वाटू लागली होती. हा वर्ग धार्मिक बाबतीत प्यूरिटन होता, बंडखोर होता, स्वातंत्र्यवादी होता. आपल्या विचारांचा प्रसार करण्याची त्याला आवश्यकता वाटत होती. त्यासाठी शिक्षणाचा प्रसार, सामाजिक तसेच आर्थिक संघर्ष करण्याची व वाङ्‍मय निर्माण करण्याची आवश्यकता होती. ह्या साऱ्या आकांक्षा पुऱ्या करण्याचा प्रयत्‍न ह्या शतकाच्या वाङ्‍मयात दिसतो. नव्याजुन्या राजकीय, सामाजिक, धार्मिक विचारांचा संघर्ष, ग्रामीण भागातील जमीनदारीनिष्ठ आर्थिक हितसंबंध आणि शहरी भागातील व्यापार उद्योगनिष्ठ आर्थिक हितसंबंध ह्यांतील संघर्ष, व्यक्तिव्यक्तींत सभ्यता आणण्याचे प्रयत्‍न इ. विशेष ह्या काळातील साहित्यात दिसतात.

ग्रामीण भागातील जमीनदार वर्ग नवीन शास्त्रीय शोधांच्या साहाय्याने आपली शेती सुधारू लागला. खुल्या शेताऐवजी त्यात कुंपण घालून नव्या पद्धतीने तो शेती करू लागल्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढले. वरकस जमीन लागवडीखाली आली आणि पिढीजाद जमीनदार वर्ग अधिक संपन्न झाला. त्याबरोबरच नवीन व्यापारी भांडवलदार वर्गही जमीन खरेदी करून जमीनदार होऊ लागला. मात्र अशा रीतीने जुना सरंजामी जमीनदार आणि नवा भांडवलदार जमीनदार हे वर्ग एकमेकांत मिसळले आणि एक प्रकारच्या संयमाची, सामंजस्याची सामाजिक गरज निर्माण झाली. ह्या शतकातील वाङ्‍मयात ह्या बाबींवरही भर दिलेला दिसून येतो.

शेतीच्या नव्या पद्धतीमुळे अनेक शेतमजूर जमिनीवरून हाकलले गेले. खेड्यातील परंपरागत जीवन उद्‍‍ध्वस्त झाले. हजारो भूमिहीन मजुरांची शहराकडे रीघ लागली. शहरात नवे कारखाने निघत होते. त्यांना कामगारांची मोठ्या प्रमाणात गरज होती. त्यांना हे भूमिहीन लोक कामगार म्हणून मिळाले; पण ह्या कामगारांना अत्यंत निर्घृणपणे वागवले जात असे. त्यांना चरितार्थाचे साधन मिळाले; पण जीवनातला रस गेला. शिवाय सगळ्यांनाच कामे मिळाली नाहीत. ज्यांना मिळाली नाहीत, त्यांपैकी कोणी भटक्याचे जीवन जगू लागले, कोणी चोरी, दरोडेखोरी करू लागले. ह्या सामाजिक उलथापालथीचे प्रतिबिंबही ह्या शतकातील वाङ्‍मयात पडले आहे.

अमेरिकेतील वसाहतीतून आणि हिंदुस्थानातून संपत्तीचे ओघ इंग्‍लंडकडे वाहत होते. इंग्‍लंडच्या इतिहासात हे शतक समृद्धीचे व उत्कर्षाचे होते. ह्याचाच परिणाम म्हणून ज्यांना रिकामपण आहे, असा एक वर्ग समाजात अस्तित्वात आला होता. विशेषतः संपन्न स्थितीतील स्त्रिया त्यात होत्या. शिवाय शिक्षणाच्या प्रसारामुळे सामान्यजनातही वाचकवर्गाची वाढ होत होती. ह्या वाचकांत विविध थरांतील लोक होते आणि त्यांना विविध प्रकारचा वाचनीय मजकूर हवा होता. कोणाला करमणूक हवी होती, कोणाला माहिती, कोणाला धर्मपरनीतिपर उपदेश, कोणाला धार्मिक, राजकीय, सामाजिक मतांची चर्चा, कोणाला कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनाप्रधान गोष्टी, तर कोणाला धाडसाच्या. थोडक्यात, नाना प्रकारच्या गद्यलेखनाला अनुकूल अशी परिस्थिती ह्या शतकात निर्माण झाली होती. एक नाटक सोडले, तर इतर बहुतेक सर्व गद्य साहित्यप्रकारांना ह्या शतकात बहर आला. कादंबरी आणि ललित तसेच सामान्य विषयांवरील चर्चात्मक निबंधाचा पाया ह्या शतकात घातला गेला. साहित्यसमीक्षा अधिक पद्धतशीरपणे आणि काही महत्त्वांच्या अनुरोधाने होऊ लागली. रेस्टोरेशन काळात ड्रायडनने तिचा पाया घातला होताच. ह्या शतकात डॉ. जॉन्सनच्या विद्वत्तापूर्ण टीकालेखनाने समीक्षेला विशेष प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. प्राचीन ग्रीक आणि लॅटिन साहित्यकृतींची भाषांतरे झाली. शेक्सपिअरच्या नाटकांच्या आवृत्त्या निघाल्या. त्यांचे नव्याने मूल्यमापन होऊ लागले. असे सर्वांगांनी साहित्य बहरले.

लेखकांना इतरही मार्गांनी प्रोत्साहन मिळाले. टोरी आणि व्हिग अशा दोन्ही पक्षांच्या संपन्न पुढाऱ्यांना आपापल्या मतांचा आणि विचारसरणींचा प्रसार करण्यासाठी समर्थ लेखकांची आवश्यकता जाणवू लागली. ते आपापल्या मतांच्या आणि विचारसरणीच्या लेखकांना आश्रय देऊन त्यांच्याकडून वाङ्‍मयनिर्मिती करून घेऊ लागले. अठराव्या शतकाच्या प्रथमार्धात अनेक प्रमुख लेखकांनी अशा आश्रयाखाली लेखन केले.

जसजशी वाचकवर्गाच्या संख्येत वाढ होत गेली, तसतसा पुस्तक प्रकाशनाचा धंदा फायदेशीर होऊ लागला. त्यांच्याकडून प्रतिष्ठित, प्रभावी आणि लोकप्रिय लेखकांना पैसा मिळू लागला आणि एखाद्या धनिकाचा आश्रय घेण्याची लेखकांना गरज उरली नाही. लेखनाचा व्यवसाय भरभराटीला आला, तशी लेखकांच्या संख्येत वाढ झाली आणि परिणामी कधीकधी चांगल्या लेखकांनादेखील पैसा मिळेनासा झाला. डॉ. जॉन्सन आणि ऑलिव्हर गोल्डस्मिथ ह्यांच्यासारख्या लेखकांनासुद्धा कर्जबाजारी आणि अकिंचन स्थितीत दिवस काढावे लागले.

उद्योगधंदे आणि व्यापार ह्यांच्या भरभराटीमुळे शहरांची वाढ झाली. लंडन हे नुसते राजकीय उलाढालींचेच केंद्र राहिले नाही, तर ते साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळींचे केंद्र बनले. लंडनमधल्या कॉफीगृहांना लंडनच्या बौद्धिक जीवनात महत्त्वाचे स्थान मिळाले. सुशिक्षित, सुखवस्तू लोक, मोठमोठे साहित्यिक आणि कलावंत कॉफीगृहांत जमून गंभीर विषयांवर चर्चा करीत. लेखक-कलावंतांचा आणि सामान्य जनतेचा साक्षात संबंध येत असे. त्यामुळे ह्या शतकातील वाङ्‍‍मयात तात्त्विक चर्चेप्रमाणे सामान्य माणसाच्या गरजा, त्याच्या आशाआकांक्षा आणि त्याचे जीवन ह्यांचेही चित्रण झालेले दिसते.

सतराव्या शतकात फ्रान्सिस बेकनने विगमनवादी तर्कपद्धतीचा अवलंब करून शास्त्रशुद्ध विचारसरणीचा पाया घातला. पुढील काळात शास्त्रीय शोधांमुळे आणि सिद्धांतांमुळे भौतिक विश्वासंबंधी नवा दृष्टिकोण प्राप्त झाला होता. सबंध सृष्टीचा व्यवहार काही निश्चित नियमांनुसार चालला आहे; ह्या नियमांचे अधिष्ठान नैतिक स्वरूपाचे आहे; हे नियम ओळखून आपले वैयक्तिक आणि सामाजिक जीवन त्यांनुसार आखणे हे मानवी बुद्धीचे कार्य आहे; ही विचारसरणी प्रभावी झाली. त्यामुळे ईश्वरा-वरील श्रद्धा आणि शास्त्रीय बुद्धिवादी विचारसरणी ह्यांची सांगड घातली गेली. श्रद्धा आणि बुद्धी ह्यांच्या सरहद्दी कुठे मिळतात आणि त्यांच्यात विरोध कुठे येतो, ह्यांचा शोध तत्त्वज्ञानात्मक वाङ्‍‍मयात घेतला गेला.

नवा मध्यम वर्ग कडक धर्मनिष्ठ होता; पण धार्मिक बाबतींत वैयक्तिक स्वातंत्र्यवादी होता. १६८८ च्या राज्यक्रांतीला साहाय्य करण्यात त्याचा उद्देश इंग्‍लंडच्या राजकारणात कॅथलिक पंथाचे आणि पर्यायाने पोपचे वर्चस्व पुन्हा येण्याची शक्यताच नाहीशी करावी, हा होता. म्हणूनच इंग्‍लंडच्या सिंहासनावर येणारी व्यक्ती प्रॉटेस्टंटच असावी, असा कायदाच करण्यात आला. हा नवा मध्यम वर्ग व्यापार-उद्योगात गुंतलेला होता. व्यापारउद्योग यशस्वीपणे करण्यासाठी एक प्रकारची व्यावहारिक नीतिमत्ता, परस्परविश्वास, प्रामाणिकपणा, सभ्यता असावी लागते. ती नीतिमत्ता ज्यामुळे अंगी बाणेल असे व्यवहारवादी शिक्षण आणि वाङ्‍मय ह्या समाजाला हवे होते व तसे ते निर्माण होत होते.

परंतु ही व्यापारी-व्यवहारवादी नीती, सज्‍जनता, सभ्यता पुष्कळदा ढोंगाला कारण होते आणि तसे तेथेही होत होते. सभ्यता, सुसंस्कृतता ह्यांना महत्त्व देणारा हा वर्ग आपल्या कारखान्यांत, उद्योगधंद्यांत कामगारांना फार वाईट रीतीने वागवी. त्यांच्याशी वागताना नीतीची चाड बाळगीत नसे. हा दुटप्पीपणाही ह्या शतकातील साहित्यात व्यक्त झाला आणि हे ढोंग उघडे केले गेले.

बुद्धिवादी शास्त्रशुद्ध दृष्टिकोणाला कितीही महत्त्व असले, तरी मानवी संबंध आणि सामाजिक व्यवहार निव्वळ बुद्धिवादावर चालत नाहीत. अंत:प्रेरणा, जिव्हाळा, सहानुभूती, माणुसकीचा ओलावा ह्यांमुळेही मानवाचे कौटुंबिक आणि सामाजिक जीवन प्रेरित होते. सामान्य वाचकाला बुद्धिवादी विचारप्रधान वाङ्‍‍मयाप्रमाणेच, किंबहुना अधिकच, उत्कट भावनांचे दर्शन घडविणारे वाङ्‍‍मय हवे असते. साहजिकच भावनाप्रधान साहित्यही लिहिले गेले. अर्थात भावनोत्कटतेचे पर्यवसान पुष्कळदा भावाकुलतेत, भावनाविवशतेत आणि खोट्या भावनाप्रदर्शनात होते, तसेही झाले.

एकीकडे निर्जीव, संकेतबद्ध नव-अभिजाततावाद आणि दुसरीकडे भावनातिरेक ह्यांमुळे जीवनातील साध्या साध्या घटनांकडे मुक्तपणे पाहणे, कल्पनाशक्तीने त्यांचे अंतरंग जाणणे अशक्य होते. पण लेडी विंचिल्सी (१६६१–१७२०) हिच्या काही कवितांत ही मुक्त, सहज प्रवृत्ती दिसते. तसेच राबर्ट बर्न्सच्या (१७५९–१७९६) कवितेत आत्माभिमुखता, संवेदनक्षमता, निसर्गप्रेम आणि उत्कट कल्पनाशक्ती ही स्वच्छंदतावादाची वैशिष्ट्ये दिसून येतात आणि विल्यम ब्‍लेकच्या काव्यात तर ती अधिक प्रकर्षाने दिसून येतात.

ह्या शतकाच्या शेवटच्या तीस वर्षांत पूर्वोक्त वाङ्‍मयीन प्रवृत्ती मागे पडून स्वच्छंदतावादाकडे जाणाऱ्या नवीन प्रवृत्ती दिसून येऊ लागल्या. ह्या सबंध शतकातील वाङ्‍‍मयीन प्रवृत्तीच्या आतापर्यंत केलेल्या स्थूल विवेचनाच्या आधारे आता अठराव्या शतकातील नियतकालिके, पुस्तपत्रे, इतिहासलेखन, पत्रलेखन, चरित्र, काव्य, नाटक, कादंबरी, समीक्षा इत्यादींचा परामर्श घेता येईल.

नियतकालिके : १६९५ साली ‘लायसेन्सिंग अ‍ॅक्ट’ नावाचा वृत्तपत्रे व इतर लेखन ह्यांवर जाचक निर्बंध घालणारा कायदा रद्द झाला व इंग्‍लंडमध्ये मुद्रणस्वातंत्र्याची व लेखनस्वातंत्र्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. जीवनाच्या विविध पैलूंवर निर्भयपणे व चिकित्सकपणे भाष्य करण्याचा मार्ग खुला झाला. १७०९ साली लेखाधिकाराचा कायदा किंवा ‘कॉपी राइट अ‍ॅक्ट’ मंजूर झाला. त्यामुळे लेखकाचे त्याच्या लेखनावरचे हक्क प्रस्थापित झाले. ग्रंथलेखन आणि ग्रंथप्रकाशन ह्यांना उत्तेजन मिळाले. ह्या शतकात नवनवीन नियतकालिके निघत गेली. डीफोचे द रिव्ह्यू (१७०४), स्टीलचे द टॅटलर (१७०९), स्टील आणि अ‍ॅडिसन ह्यांनी चालविलेले द स्पेक्टेटर (१७११), जॉन्सनचे द रँब्‍लर (१७५०-१७५२), गोल्डस्मिथचे द बी (१७५९) इत्यादींनी सामान्य वाचकांपर्यंत विविध विचार नेऊन पोचविण्याचे कार्य चोखपण केले. केवळ वाङ्‍मयीन समीक्षेला वाहिलेली द मंथली रिव्ह्यू (१७४९–१८४५) व द क्रिटिकल रिव्ह्यू (१७५६–१८१७) ह्यांसारखीही नियतकालिके होती. नियतकालिकांनी जोपासलेला महत्त्वाचा वाङ्‍मयप्रकार म्हणजे ‘पिरिऑडिकल एसे’ किंवा नियतकालिक निबंध. जोसेफ अ‍ॅडिसन (१६७२–१७१९) आणि रिचर्ड स्टील (१६७२–१७२९) हे ह्या शतकाच्या सुरुवातीचे प्रमुख निबंधकार.

इंग्‍लंडमधला सरदार-जमीनदार वर्ग हा सुसंस्कृत, अभिरुचिसंपन्न आणि नौतिक दृष्ट्या शिक्षित झालेला होता. सत्ता आणि संपत्ती ह्या दोन्ही बाबतींत ग्रामीण भागातील गर्भश्रीमंत जमीनदारांच्या बरोबरीला येत चाललेला नवा व्यापारी मध्यम वर्ग नैतिक दृष्ट्या कठोर होता; पण खानदानी चालीरीती, वागण्याबोलण्याची सभ्यता, कला, साहित्य इत्यादींची अभिरुची ह्यांचा त्याच्यामध्ये अभाव होता. ह्या दोन वर्गांत समन्वय घडवून आणणे हा अ‍ॅडिसन आणि स्टील ह्या दोघांचाही उद्देश होता; तसेच झपाट्याने वाढत चाललेल्या सामान्य वाचकवर्गाला बहुश्रुत करणे आणि त्यांच्या अभिरुचीला वळण लावणेही आवश्यक होते. अ‍ॅडिसन आणि स्टील ह्या दोघांच्या मन:प्रवृत्ती भिन्न, पण परस्परांना पूरक होत्या. स्टीलच्या लेखनात अधिक उत्स्फूर्तता, कल्पकता, संवेदनशीलता असे. कौटुंबिक जिव्हाळा, भावनात्मकता आणि सहानुभूती ह्यांवर त्याचा भर असे; पण त्याच्या लेखनात त्यामुळेच शैथिल्य येत असे आणि भावनात्मक अतिरेक होत असे. ह्याच्या उलट अ‍ॅडिसनमध्ये शिस्त, संयम, समतोलपणा, रेखीवपणा आणि गांभीर्य असे. प्राचीन अभिजात साहित्यात तो मुरलेला होता. सूक्ष्म अवलोकन, विश्लेषण, समजूतदारपणातून आलेली सहानुभूती त्याच्या निबंधांत दिसते. पण ह्या दोघांच्याही लेखनाने इंग्रजी गद्यलेखनशैलीचा पाया तर घातलाच, पण ‘सभ्य गृहस्था’चा आदर्श निर्माण करून मध्यमवर्गीय इंग्रजांच्या अभिरुचीला जवळजवळ कायमचे वळण लावले. सत्प्रवृत्त, सधन, जमीनदार वर्गाचा प्रतिनिधी सर रॉजर डी. कॉवुर्ली आणि धनिक व्यापारी वर्गाचा प्रतिनिधी सर अँड्रू फ्रीपोर्ट हे स्पेक्टेटरमधले दोन सद्‍गृहस्थ इंग्रजी साहित्यात चिरंजीव झाले आहेत.

ऑलिव्हर गोल्डस्मिथच्या (१७३०–१७७४) शैलीत प्रसन्नता व टवटवीतपणा आहे. त्याची विनोदबुद्धी अव्वल दर्जाची व सूक्ष्म आहे. द सिटिझन ऑफ द वर्ल्डमध्ये गोल्डस्मिथने इंग्‍लंडच्या जीवनावर एका चिनी प्रवाशाच्या दृष्टिकोणातून भाष्य केले आहे (१७६२). गोल्डस्मिथने व ह्या शतकाच्या उत्तरार्धातील इतर निबंधकारांनी नियतकालिक निबंधाला ललित स्वरूप प्राप्त करून दिले. त्याच प्रवृत्तीतून पुढे स्वच्छंदतावादी युगात आजच्या ललित निबंधाचा अवतार झाला.

पुस्तपत्रे : नियतकालिकांत प्रसिद्ध होणाऱ्या विविध लेखांखेरीज पुस्तपत्रांतून (पँफ्लेट्स) काही तात्कालिक महत्त्वाच्या विषयांवर प्रसंगोपात्त लिखाणही मोठ्या प्रमाणावर झाले. राजकारणात सबंध शतकभर व्हिग व टोरी या दोन प्रमुख राजकीय पक्षांचा अविरत झगडा चालू होता. व्हिग पक्ष हा पार्लमेंटचा व नियंत्रत राजसत्तेचा पुरस्कर्ता, तर टोरी पक्ष हा जुन्या स्ट्यूअर्ट घराण्याचा पक्षपाती. धार्मिक व सामाजिक क्षेत्रांतही निरनिराळे वाद अटीतटीने व हिरिरीने खेळले गेले. त्यांत उपहास, उपरोध, विडंबन वगैरे सर्व अस्त्रे कौशल्याने वापरण्यात येत. राजद्रोहाच्या आरोपाचे किंवा अन्य रोषाचे बळी व्हावे लागू नये म्हणून प्रतीककथा, रूपके, कृत्रिम परंतु स्वभावदर्शक व आचारनिदर्शक नावे प्रतिस्पर्ध्यांना देणे यांसारखे उपाय उपयोगात आणले गेले. हे वाद पुस्तपत्रांच्या रूपात प्रसिद्ध होत. त्यांचे लेखक पुष्कळदा टोपणनावे घेत.

या संदर्भात जॉनाथन स्विफ्टचे (१६६७–१७४५) नाव प्रामुख्याने घ्यावे लागते. त्याने आलटून पालटून दोन्ही राजकीय पक्षांच्या वतीने लेखणी चालविली.

काव्य : अठराव्या शतकाची प्रमुख प्रवृत्ती बुद्धिवादी होती. प्राचीन अभिजात वाङ्‍मय हा साहित्याचा आदर्श होता. ही गोष्ट काव्याच्या क्षेत्रातही दिसून येते. कवीच्या स्वत:च्या भावभावनांना त्यात महत्त्व नव्हते, तर सर्वसामान्यपणे माणूस आणि त्याचे व्यवहार ह्यांना होते. सर्जनशील भावना, कल्पनाशक्ती किंवा उन्मेषशालिनी प्रतिभा ही ह्या शतकातील काव्याची प्रेरणा नसून एखाद्या विचाराची वा कल्पनेची रेखीव मांडणी करणे, ही होती. ह्या शतकातले काव्य म्हणजे प्रामुख्याने अभिजात साहित्यातल्या आदर्शांनुसार किंवा अभिजात साहित्यातील संकेतांनुसार शब्द, अलंकार, वृत्ते ह्यांची योजना करून केलेली पद्यरचना आहे. गद्याप्रमाणेच पद्याचाही उपयोग राजकीय आणि धार्मिक मतांच्या खंडनमंडनासाठी; तसेच नैतिक, सामाजिक किंवा वैश्विक विचारांच्या प्रतिपादनासाठी केला गेला. गद्याप्रमाणेच काव्यातही उपहास, उपरोध, विडंबन इ. शस्त्रांचा उपयोग करण्यात आला. साहजिकच भावनांचा विलास किंवा काव्यप्रतिभेची झेप त्यात क्वचितच दिसते आणि कृत्रिमपणा अधिक जाणवतो; पण विचारविलास, शब्दयोजनेचे चातुर्य, रचनेची सफाई, घाटाचा बांधेसूदपणा आणि सुभाषितवजा वचने इ. गुणांमुळे उच्च दर्जाचा काव्यगुण नसूनही हे काव्य मनावर छाप पाडते. नवअभिजाततावादाच्या प्रभावामुळे ह्या शतकात प्राचीन ग्रीकलॅटिन महाकाव्यांची भाषांतरे झाली. त्या काव्यांच्या धर्तीवर काही स्फुट काव्ये व दीर्घकाव्ये रचिली गेली. १७६० पर्यंतच्या काळात प्राचीन श्रेष्ठ वाङ्‍मयीन कृतींची बरीच भाषांतरे झाली. त्यांना लोकप्रियता लाभली आणि भाषांतरकारांना प्रतिष्ठा आणि पैसा मिळाला.

ह्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वांत मोठा आणि प्रभावी कवी अलेक्झांडर पोप हा होय. हे युग पोपचे युग म्हणूनच ओळखले जाते. स्फुट काव्य, दीर्घकाव्य, खंडकाव्य, विडंबनकाव्य, तत्त्वचिंतनपर काव्य अशी अनेक प्रकारची काव्यरचना त्याने केली. होमरच्या महाकाव्यांची भाषांतरे केली आणि हॉरिसच्या धर्तीवर उपरोधपर काव्य लिहिले. श्रुतयोजन, रचनेची सफाई, सूक्ष्म आणि टोकदार उपरोध, सुभाषितवजा वचने, प्रवचनकाराची आणि निर्णयकाराची भूमिका ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. पास्टोरल्समध्ये (१७०९) त्याने मेंढपाळांचे जीवन चित्रित करण्याच्या निमित्ताने तत्कालीन जीवनावर भाष्य केले आहे. व्हर्जिलच्या धर्तीवर रचिलेल्या ह्या कवितांत सहजता आणि कृत्रिमता ह्यांचा परिणामकारक मिलाफ झाला आहे. एसे ऑन क्रिटिसिझममध्ये (१७११) त्याने काव्यरचना आणि काव्यसमीक्षा ह्यांसंबंधींचे अभिजात आदर्श आणि संकेत ह्यांवर आधारलेले विचार मांडले आहेत. विंडसर फॉरेस्टमध्ये (१७१३) वातावरणाचा ताजेपणा आणि निसर्गाविषयी प्रेम दिसून येते. रेप ऑफ द लॉकमध्ये (१७१४) महाकाव्याच्या तंत्राचे विडंबन केलेले आहे. एसे ऑन मॅनमध्ये (१७३३–३४) त्याने आपले ईश्वरविषयक विचार मांडले. खरेखुरे तत्त्वचिंतनपर काव्य कसे असू शकेल, ह्याचे हे काव्य नमुना आहे. त्या काळातील धार्मिकराजकीय वाद आणि पोपचा स्वभाव ह्यांमुळे त्याचे अनेकांशी वाङ्‍मयीन खटके उडाले. अनेकांशी शत्रुत्व आले. त्याच्या डन्सियड (४ खंड, १७२८–१७४३) ह्या काव्यात अनेक समकालीनांवर हल्ले आहेत.

ह्या काळात छोट्याछोट्या भावकविताही लिहिल्या गेल्या; पण त्यांचे स्वरूप एकंदरीने गद्यच आहे. त्यांत भावनांची उत्कटता बेताचीच आहे; पण त्या वाचनीय वाटाव्यात इतपत भाषासौष्ठव आणि रचनागुण त्यांत आहेत.

अनेक फुटकळ वाङ्‍मयप्रकारही ह्या काळात लोकप्रिय होते. उदा., जॉन गेची (१६८५–१७३२) बेगर्स ऑपेरा (१७२८) ही संगीतिका, जेम्स टॉमसनच्या (१७००–१७४८) ‘रूल ब्रिटानिया’सारखी देशभक्तिपर गीते, गोल्डस्मिथचे विनोदी 'एलेजी ऑन ए मॅड डॉग' इत्यादी.

टीकात्मक व उपरोधपूर्ण काव्यही विपुल लिहिले गेले. पोपच्या द रेप ऑफ द लॉकचा उल्लेख वर आलेलाच आहे. काँग्रीव्ह, पोप, स्विफ्ट, गे वगैरेंनी ‘स्क्राय्‌ब्‍लेरस क्लब’ नावाचे मंडळ स्थापन केले होते (सु. १७१३). ह्या मंडळाच्या सभासदांनी विद्वत्तेच्या बडेजावावर उपरोधपूर्ण काव्ये व गद्य लिहिले. ‘स्क्राय्‌ब्‍लेरस’ ही काल्पनिक व्यक्ती त्यासाठी निर्माण केली गेली व वरीलपैकी काहींनी त्या नावाने लिहिले. मिसेलेनी (३ भाग) हे ह्या टीकात्मक कवितांच्या संग्रहाचे नाव. स्विफ्टच्या ‘ऑन द डेथ ऑफ डॉ. स्विफ्ट’ (१७३१) व ‘मिसेस हॅरिएट्स पिटिशन’ ह्या दोन कवितांत उपहास, कडवटपणा, संताप, जीवनाचे सूक्ष्म ज्ञान इत्यादींचे एक चमत्कारिक मिश्रण झाले आहे.

पोप-जॉन्सन युगातील आणखी एक लोकप्रिय काव्यप्रकार चिंतनपर व चर्चात्मक काव्याचा. यात कवी स्वताची मते, विचार, अनुभव, निरीक्षण इत्यादींवर भाष्य करतो. तसेच उपरोधपर काव्यापेक्षा हा प्रकार वेगळा आहे. त्याचप्रमाणे आत्मलक्षी असूनही तो भावकवितेपासून अलग पडतो. ह्या प्रकाराचा जनक प्राचीन कवी हॉरिस. त्याच्या काव्यातील सुवर्णमध्यवादी दृष्टिकोण, जीवनासंबंधीचा परिपक्व नैतिक दृष्टिकोण स्‍नेहभावाचे महत्त्व, सुसंस्कृत व सभ्य माणसाच्या जीवनातील निर्व्याज सुखाची भलावण इ. विशेषांमुळे त्याला ह्या शतकात अनेक अनुयायी व भाषांतरकार मिळाले : विल्यम कूपर (१७३१–१८००, द टास्क १७८५), जॉन डायर (१६९९–१७५८, ग्रोंजर हिल १७२६ व द फ्लीस १७५७), गोल्डस्मिथ (द ट्रॅव्हलर १७६४ व द डेझर्टेड व्हिलेज १७७०), जेम्स टॉमसन (१७००–१७४८, द सीझन्स १७२६–१७३०),  विल्यम ब्‍लेक (१७५७–१८२७, साँग्ज ऑफ एक्स्पिरिअन्स १७९४ व साँग्ज ऑफ इनोसन्स १७८९), टॉमस ग्रे (१७१६–१७७१, एलिजी इन अ कंट्री चर्चयार्ड १७५०), सॅम्युएल जॉन्सन (लंडन १७३८ व द व्हॅनिटी ऑफ ह्यूमन विशेस १७४९).

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात वाङ्‍‍मयात नवीन जाणिवा व्यक्त होऊ लागल्या. सांकेतिकतेकडून स्वाभाविकतेकडे होणारे संक्रमण ह्यात सूचित आहे. नव-अभिजाततावादी काव्यातील सांकेतिककेमुळे कवितांना साचेबंदपणा येत चालला होता. नकलेची नक्कल होऊन निर्जीवपणा आला होता. ह्या सांकेतिकतेमुळे जीवनाच्या फार मोठ्या भागाच्या आकलनाला आणि अनुभवाला आपण मुकत आहो, हे जाणवू लागले. सामान्य जीवनात आणि सामान्यांच्या जीवनातील नित्याच्या अनुभवांतदेखील नावीन्य, अद्‍‍भुतता ह्यांचा प्रत्यय येऊ शकतो, ह्याची जाणीव होऊ लागली. एका नव्या प्रवृत्तीची ही चाहूल होती. निसर्गवर्णनांतून नीतिमूल्ये जोपासणारे व निसर्गात निर्भेळ आनंद अनुभवणारे टॉमसनचे ‘द सीझन्स’ हे काव्य ह्या शतकाच्या पूर्वार्धातच लिहिले गेले होते. निसर्ग व मानव ह्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, ही जाणीव त्यातून दिसते.

कवितांच्या वृत्तांमध्ये व विषयांमध्ये आता विविधता येऊ लागली. जेम्स मॅक्फर्सनने (१७३६–१७९६) ओसियन ह्या मध्ययुगीन कवीच्या एका महाकाव्याचे इंग्रजी भाषांतर म्हणून ८ खंड प्रसिद्ध केले (१७६३). त्यात मॅक्फर्सनचे स्वत:चेच कवित्व जास्त होते आणि मूळ कवीच्या कवितांचा भाग थोडा होता. मात्र ह्या कविता लोकप्रिय झाल्या. टॉमस चॅटरटननेही (१७५२–१७७०) स्वत:च्याच काव्याला मध्ययुगीन डूब देऊन ते अस्सल भासविण्याचा प्रयत्‍न केला.

पण ह्या कालखंडातील सर्वांत प्रभावी कवी म्हणजे रॉबर्ट बर्न्स आणि विल्यम ब्‍लेक. बर्न्स हा स्कॉटिश कवी होता. त्याची पुष्कळशी कविता स्कॉटिश भाषेत आहे. त्याच्या इंग्रजी कवितांत शब्दांचा नेमकेपणा, रचनेचा रेखीवपणा आणि संयम ह्यांबरोबरच साध्या साध्या घटनांसंबंधी एक उत्कट भावनाशील जाणीव दिसते. त्यातून दृष्टिकोणाचे, अनुभूतीचे, नाजूक सहानुभूतीचे नावीन्य प्रत्ययाला येते. त्याची काही कविता गेयही आहे.

ब्‍लेकच्या प्रतिभेची आणि कल्पनाशक्तीची झेप विलक्षण उंच आहे. जीवनाकडे आणि जगाकडे बालकाच्या सहज-सरल दृष्टीने पाहणे, त्याच वृत्तीने त्याचा अनुभव घेणे आणि त्याला प्रतिसाद देणे हे त्याच्या कवितेचे एक अंग आहे. त्याचबरोबर गूढ, आध्यात्मिक तत्त्वांचेही त्यात प्रतिबिंब आहे. प्रभावी प्रतिमा, अंत:करणाची पकड घेणारी भाषा, यथायोग्य वृत्तांची योजना आणि विलक्षण आत्मनिष्ठ वृत्ती ह्यांमुळे त्याचे काव्य खोल जाऊन मनाचा ठाव घेते. म्हणूनच बर्न्स आणि ब्‍लेक हे पुढे येणाऱ्या स्वच्छंदतावादी युगाचे अग्रदूत ठरतात. ह्या शतकातील एक महत्त्वाचा काव्यप्रकार म्हणजे ओड किंवा उद्देशिका. पिंडर आणि हॉरिस ह्यांसारख्या प्राचीन ग्रीक-रोमन कवींनी पूर्णत्वास नेलेला हा काव्यप्रकार इंग्रज कवींनी हाताळला. टॉमस ग्रे (ऑन स्प्रिंग, ईटन कॉलेज, द बार्ड, प्रोग्रेस ऑफ पोएझी) आणि  विल्यम कॉलिंझ (१७२१–१७५९) हे प्रमुख उद्देशिकाकार. त्याच्या उद्देशिका रचना, अर्थ, विचारांचे गांभीर्य, समर्पक शब्दयोजना ह्या गुणांनी नटल्या आहेत. कॉलिंझची प्रतिभा फार तरल आहे. तो वर्ण्यविषयाच्या अंतरंगात फार खोलवर पाहू शकतो. उदा., ओड टू सिंप्लिसिटी, ओड टू ईव्हनिंग इत्यादी.

एकंदरीने अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात प्राचीन अभिजात वाङ्‍मयातील संकेतांच्या चौकटीत राहून काव्यनिर्मिती झाली, तर शेवटच्या चाळीस वर्षांत ही चौकट मोडून इंग्रजी काव्य स्वच्छंदतावादी युगाकडे वाटचाल करू लागले.

नाटक : सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजी नाट्यवाङ्‍मयात ‘कॉमेडी ऑफ मॅनर्स’ किंवा आचारविनोदिनी व हिरोइक ट्रॅजेडी ह्या दोन प्रकारांचे वर्चस्व होते. पहिला नाट्यप्रकार सुखान्त असून त्यात मध्यमवर्गीय लोक आणि ग्रामीण चालीरीती व संस्कृती यांची भरपूर थट्टा करून प्रेक्षकांना हसविण्यात येई. हिरोईक ट्रॅजेडी हा दु:खान्त नाट्यप्रकार. ह्यात एक भव्य कथावस्तू घेऊन प्रेम व प्रतिष्ठा ह्याची प्रमाणाबाहेर महती गायलेली असे. ह्या प्रकारातील काव्य व भाषा ओढून ताणून ओजस्वी केलेली असे व तिच्यात कृत्रिम व भडक शब्दालंकारांची रेलचेल असे.

परंतु सतराव्या शतकाच्या शेवटी मध्यम वर्ग व्यापार-उदीम करून आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला व त्याच्याकडे इंग्रजी समाजाचे नेतृत्व आले. हा समाज जीवनाकडे अत्यंत गंभीरपणे पाहणाऱ्या प्यूरिटन पंथाचा अनुयायी होता. ह्यामुळे वर उल्लेखिलेल्या दोन नाट्यप्रकारांविरुद्ध ह्या वर्गातून जोराची प्रतिक्रिया उमटली. तिचे प्रत्यंतर जेरेमी कॉलिअर (१६५०–१७२६) ह्या प्यूरिटन धर्मोपदेशकाच्या १६९८ मध्ये प्रसिद्ध झालेल्या शॉर्ट व्ह्यू ऑफ द इम्मोरॅलिटी अँड प्रोफेननेस ऑफ द इंग्‍लिश स्टेज ह्या पुस्तिकेत मिळते. यात त्याने वरील दोन नाट्यप्रकारांविरुद्ध कडाडून टीका केली. त्याचा विशेष रोष काँग्रीव्ह आणि व्हॅनब्रू (१६६४–१७२६) ह्या नाटककारांवर होता. ह्या नाटकांतील अनैतिकतेला उत्तेजन देणाऱ्या कथावस्तू व पात्रचित्रण या दोषांवर त्याने बोट ठेवले. मध्यम वर्गाची जीवनदृष्टी या पुस्तिकेत उत्तम तऱ्हेने स्पष्ट झाली आहे. ही टीका खूप गाजली. अशा तऱ्हेची टीका व त्या टीकेतल्यासारखीच मते बाळगणारा, झपाट्याने बदलणारा इंग्रजी समाज नाटकाच्या उत्कर्षाला बाधक ठरला. या सामाजिक स्थित्यंतराशी नाटककारांनाही जुळवून घेता आले नाही. जुन्या नाटकांतली नव्या मध्यमवर्गीय नागरी समाजाची थट्टा आता खपण्यासारखी नव्हती. तद्वतच त्यांतील अवास्तवतेलाही आता वाव राहिला नव्हता.

ह्यामुळे जवळजवळ शतकभर चांगल्या नाट्यकृतींचे दुर्भिक्ष्यच जाणविले. मात्र रंगभूमी ओस पडली असे नाही. नाट्यव्यवसाय चालू होता. ह्या शतकात फार विख्यात नट आणि नट्या होऊन गेल्या. कॉली सिबर, जेम्स क्विन, चार्ल्स मॅक्लिन, डेव्हिड गॅरिक, अ‍ॅन ओल्डफील्ड, सेअरा सिडन्झ ही काही प्रख्यात नावे. ह्या नटनट्यांनी नव्या, त्याचप्रमाणे जुन्याही नाटकांत भूमिका केल्या. त्यांच्या अभिनयकौशल्यामुळे अत्यंत सामान्य नाटकांनीही या वेळची रंगभूमी गाजविली. शेक्सपिअरच्या नाटकांची लोकप्रियता या नटांमुळे वाढली.

ह्या कालखंडातील नाटकांना नटांच्या अभिनयकौशल्याला वाव देण्यापुरतेच महत्त्व आहे. काही ओजस्वी भाषणे व सनसनाटी प्रसंग रंगभूमीवर दाखवायला ह्या नाटकांनी संधी दिली. वाङ्‍मयीन मूल्यांच्या दृष्टीने ही नाटके टाकाऊच ठरली. त्यांत ओढूनताणून केलेल्या शाब्दिक कसरती व कृत्रिम संवाद आहेत. त्यांतील मनुष्यस्वभावाचे दिग्दर्शन बेताचेच असून रचना उगाचच गुंतागुंतीची केल्यासारखी वाटते. ह्या काळात करण्यात अलेल्या शेक्सपिअरच्या नाटकांवरही प्रथम ह्या वेळेच्या अभिरुचीला साजेसे संस्कार करण्यात आले. उदा., त्याच्या शोकात्मिकांना सुखात्मिकांची कलाटणी देण्याचे प्रयोग झाले.

मध्यम वर्गाने रंगभूमीवर बहिष्कार टाकल्यामुळे नाटकाला फक्त खालच्या वर्गातील प्रेक्षकांकडूनच आश्रय मिळाला. हे प्रेक्षक व नाटककंपनीचा व्यवस्थापक यांच्या कात्रीत ह्या वेळची रंगभूमी सापडली होती. व्यवस्थापकास प्रेक्षकांवर अवलंबून राहावे लागले. चटकन रिझविणारी हलकीफुलकी नाटके लिहिणारे नाटककार लोकप्रिय झाले व खरे प्रतिभावान लेखक नाट्यक्षेत्र सोडून कांदबरीकडे वळले.

मध्यम वर्गाच्या वर्चस्वामुळे त्याला रुचतील अशी नाटके लिहिण्याचा प्रयत्‍नही अनेकांनी केला. पण ह्याही तऱ्हेच्या नाटकांच्या रचनेचा एक साचा निर्माण झाला. उदा., ही नाटके बहुतांशी सुखान्त असत. पहिल्या चार अंकांत त्यांतील पात्रे सर्व तऱ्हेचा अनाचार व स्वैर वर्तन करताहेत, असे दाखवून शेवटच्या अंकात त्यांचे हृदयपरिवर्तन झाल्याचे दाखविण्यात येत असे. परंपरागत नीतिनियम व त्यांचे व्यावहारिक फायदे ह्यांवर अवास्तव भर देण्यात येत असे. अनीतिमान, दुष्ट माणसाचे पारिपत्य व सद्‍गुणी माणसाचा विजय हे नैतिक सूत्र पुष्कळ नाटकांत अनुस्यूत होते. ह्या नैतिक दृष्टिकोणाचा अतिरेक ह्या नाटकांना कलेच्या दृष्टीने मारकच ठरला.

अशा ह्या परिस्थितीत फारच थोडे नाटककार आपल्या वैशिष्ट्याने चमकले. अर्थात त्यांची प्रसिद्धीही केवळ त्यांच्या कारकीर्दीपुरतीच टिकली. स्टीलने द टेंडर हस्‌बंड (१७०५) व द कॉन्शस लव्हर्स (१७२२) ही दोन नाटके लिहिली. त्यांत त्याने माणसाची प्रवृत्ती निसर्गत:च नैतिक असते, हे फारसे अवडंबर न माजविता मांडले आहे. नाटकांतल्या कृत्रिम भावविवशतेला आवर घालायचा एक स्तुत्य प्रयत्‍न म्हणून ही नाटके त्यावेळी प्रसिद्धीस आली. हेन्‍री फील्डिंग (१७०७–१७५४) या सुप्रसिद्ध कादंबरीकाराने टॉम थंब (१७३०) हे नाटक लिहिले. त्यात त्याने हिरोइक ट्रॅजेडीची भरपूर थट्टा केली आहे.

प्राचीन ग्रीक व लॅटिन नाटकांतील विचारांचे व त्यांच्या रचनेचे अनुकरण करणारी नाटकेही लिहिली गेली. त्यांत जोसेफ अ‍ॅडिसनचे केटो (१७१३) व डॉ. जॉन्सनचे आयरीन (१७४९) ही दोन प्रसिद्ध आहेत.

जॉर्ज लिलोच्या (१६९३–१७३९) द लंडन मर्चंट (१७३१) ह्या नाटकात एक प्रबळ खलनायक व दुर्बळ सत्प्रवृत्त नायक ह्यांच्यातील तीव्र संघर्ष दाखविण्यात आला आहे. ह्यात भडक शोकात्मकतेचे वातावरण निर्माण करून प्रेक्षकांना हेलावून सोडण्याचा प्रयत्‍न केला आहे. जॉन गे ह्या लेखकाची बेगर्स ऑपेरा ही संगीतिका हे ह्या शतकातील आणखी एका लोकप्रिय नाट्यप्रकाराचे उदाहरण. ह्या शतकाच्या उत्तरार्धातील दोन महत्त्वाचे नाटककार म्हणजे ऑलिव्हर गोल्डस्मिथ व रिचर्ड शेरिडन (१७५१–१८१६). गोल्डस्मिथच्या शी स्टूप्स टू काँकर (१७७३) ह्या नाटकाला अफाट लोकप्रियता लाभली. ह्या नाटकाच्या रचनेतली सहजता व नैसर्गिकपणा ह्यांचे तत्कालीन प्रेक्षकांना एकदम आकर्षण वाटले; कारण त्या आधीच्या साठ वर्षांत इंग्रजी रंगभूमीवर असे काही पहावयास मिळाले नव्हते. शेरिडनची द रायव्हल्स (१७७५) व द स्कूल फॉर स्कँडल (१७७७) ही ह्या शतकातील अत्यंत विनोदी प्रहसने. शेरिडनचे संवाद विनोदाने बहरलेले असतात व त्याच्या भाषेवर एक अपूर्व झळाळी असते. द रायव्हल्समधील मिसेस मॅलप्रॉप हे पात्र तर अमरच झाले आहे. बोलताना भलभलते शब्द वापरून विनोदनिर्मिती करणे, हे ह्या पात्राचे वैशिष्ट्य. तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून एक शब्दच (मॅलप्रॉपिझम) इंग्रजी शब्दकोशात दाखल झाला आहे.

कादंबरी : १६७८ साली प्रसिद्ध झालेल्या बन्यनच्या पिल्‌ग्रिम्स प्रोग्रेसमध्ये कादंबरीचे काही गुण आहेत; पण ती मुख्यत: एक रूपक कथा आहे, रूढ अर्थाने कादंबरी नाही; म्हणून इंग्रजी कादंबरीचा पाया खऱ्या अर्थाने अठराव्या शतकात घातला गेला आणि तो डॅन्यल डीफोच्या (१६६० ?–१७३१) कादंबऱ्यांनी घातला, असे म्हणता येईल, एका प्रत्यक्ष प्रसंगावर आधारलेल्या रॉबिन्सन क्रूसो (१७१९) ह्या त्याच्या कादंबरीत सत्य आणि कल्पित ह्यांचे इतके प्रभावी आणि मनोवेधक मिश्रण आहे, की प्रसिद्ध होताच ती लोकप्रिय झाली आणि आजही तिची लोकप्रियता कायम आहे. जगातील सर्व प्रमुख भाषांत तिची भाषांतरे झाली आहेत. त्यानंतर त्याने सत्य आणि कल्पित ह्यांवर आधारलेल्या अनेक कादंबऱ्या लिहिल्या. त्याच्या लेखनात भाषासौष्ठवाचे किंवा कलात्मक शैलीचे गुण नाहीत; पण सत्य घटनांना कल्पिताचा आधार देऊन त्या मनोवेधक रीतीने उभ्या करण्यात तो यशस्वी झाला आहे आणि त्याच्या लेखनात एक जोमदारपणा आणि वास्तवाचे जिवंत चित्र उभे करण्याचे सामर्थ्य आहे. पुढे ह्या शतकात कादंबरीवाङ्‍‍मयाने वास्तववादी, सूक्ष्म मनोविश्लेषणात्मक अथवा मुक्त चिंतनपर असे वळण घेतले आणि मध्यमवर्गीयांच्या मनोभावनांचे चित्रण करणारा हा निवेदनप्रकार गद्यमहाकाव्याच्या पंक्तीला नेऊन बसविला. १७४० मध्ये सॅम्युएल रिचर्ड्‌सन (१६८९–१७६१) ह्या छपाईचा धंदा करणाऱ्या अल्पशिक्षित लेखकाने पॅमेला ऑर व्हर्च्यू रिवॉर्डेड ह्या नावाची पत्रात्मक कादंबरी प्रसिद्ध केली. ह्या कादंबरीचा दुसरा भाग १७४१ मध्ये प्रसिद्ध झाला. व्यक्तिरेखेच्या भोवती जाणीवपूर्वक गुंफलेले एकसंध गतिमान कथानक व त्यातून फुलणारा मानवी स्वभाव दीर्घ गद्यकथानकात प्रथमच निर्माण झाला. म्हणून रिचर्ड्‌सनला कादंबरीच्या जनकत्वाचा मान अनेक वेळा दिला जातो. पॅमेला, क्‍लॅरिसा हार्लो (२ भाग, १७४७–४८) द हिस्टरी ऑफ सर चार्ल्स ग्रँडिसन (७ खंड, १७५३–५४), ह्या कादंबऱ्यांतून रिचर्ड्‌सनने मध्यमवर्गीय जीवनाचे चित्रण करून मध्यमवर्गीय नीतिमूल्यांचा गौरव केला. हळुवार, सूक्ष्म भावच्छटा निर्माण करणे, हे त्याचे वैशिष्ट्य. ह्या भावच्छटा नीत्युपदेशाच्या आवरणाखाली कित्येक वेळा झाकून जातात. क्‍लॅरिसा ही शोकात्म कादंबरी तिच्यातील कुंटणखान्यांच्या आणि शहरी भपकेबाज जीवनाच्या वास्तववादी चित्रणामुळे संस्मरणीय झाली आहे. चार्ल्स ग्रँडिसन मधील धनिकाचे चित्रण त्याच्या सर्वगुणसंपन्नतेमुळे फिके वाटते. रिचर्ड्‌सनच्या भावविवश चित्रणाचा आणि बारकाव्याचा फार मोठा प्रभाव सर्व समकालीन यूरोपीय कथावाङ्‍मयावर पडला. हेन्‍री फील्डिंग हा अठराव्या शतकातील आणखी एक महत्त्वाचा कादंबरीकार. फील्डिंगच्या जोसेफ अँड्रूज (१७४२) ह्या कादंबरीचा उदय रिचर्ड्‌सनच्या संकुचित, मर्यादित व पुस्तकी नीतिकल्पनांचे आणि सांकेतिक भावविवशतेचे विडंबन करण्यासाठी झाला; परंतु केवळ विडंबनाने वा उपहासाने फील्डिंगच्या खऱ्या सर्जनशक्तीला वाव मिळण्यासारखा नव्हता. जोसेफ अँड्रूज ह्या कादंबरीत भोळ्या, सालस, ध्येयवादी पार्सन अ‍ॅडम्सचे फील्डिंगने केलेले चित्रण श्रेष्ठ दर्जाचे ठरले व त्यातूनच पुढील प्रगत स्वभाव-चित्रणाची पूर्वसूचना मिळाली. ए जर्नी फ्रॉम धिस वर्ल्ड टू द नेक्स्ट (१७४३), मि. जॉनाथन वाइल्ड द ग्रेट (१७४३) ह्या अनुक्रमे अद्‍‍भुतरम्य व विडंबनात्मक कथांनंतर फील्डिंगच्या टॉम जोम्स, अ फाउंडलिंग (१७४९) आणि अमीलिया (१७५१) ह्या श्रेष्ठ कादंबऱ्या प्रकटल्या. रिचर्ड्‌सनच्या संकुचित नीतिमूल्यांपेक्षा हृदयांच्या श्रीमंतीवर, मनाच्या व संस्कृतीच्या प्रगल्भतेवर नीती अवलंबून आहे, हे फील्डिंगने दाखविले. उदार मनाचा आणि साधेपणाचा वारसा ज्याला लाभला, तो टॉम जोन्स त्याची रूढ नैतिक स्खलनशीलता जमेस धरूनही प्रशंसनीय आदर्श ठरतो. त्याने रहस्यपूर्ण उत्कंठेला ताण देईल अशा कल्पक कथानकाचा आदर्श ह्या कादंबरीत उभा केला. आपल्या कादंबऱ्यांतून अनेकविध व्यक्तिरेखांचे वास्तववादी चित्रण त्याने केले व विविध जीवनानुभवांना कलारूप देण्याचे आपले कौशल्य प्रकट केले. टोबायस स्मॉलिट (१७२१–१७७१) ह्याच्या रॉडरिक रँडम (१७४८) व पेरीग्रीन पिकल (१७५१) ह्या कादंबऱ्यांत जीवनातील भीषण अनुभवांचे हृद्य चित्रण दिसते. हंफ्री क्‍लिंकर (१७७१) ही त्याची अधिक प्रगल्भ कलाकृती ब्रँबल कुटुंबातील विचित्र, विक्षिप्त स्वभावाच्या व्यक्ती साकार करते. अशाच प्रकारच्या तऱ्हेवाईक परंतु मानवतेने ओथंबलेल्या व्यक्तिरेखांवर भर देऊन लॉरेन्स स्टर्न (१७१३–१७६८) ह्याने ट्रिस्ट्रम शँडी (९ खंड, १७६०–१७६७) ही कादंबरी प्रसिद्ध केली. कोठल्याही रूढ निवेदनपद्धतीत न बसणाऱ्या ह्या कथेत अंकल टोबी, कॉर्पोरल टिम, पार्सन योरीक ह्यांसारख्या श्रेष्ठ व्यक्तिरेखा निर्माण झाल्या. मनोव्यापारांचे दर्शन घडवीत लिहिलेल्या ह्या कादंबरीत एक प्रकारचा आधुनिकपणा आहे. व्यक्तींच्या मनोव्यापारांचे चित्रण करीत असताना काही बोध करणे, काही प्रवृत्ती दडपणे, नाट्यपूर्ण परिणाम घडवून आणणे ही बंधने स्टर्नने टाळली. भावनेला, संवेदनक्षमतेला त्याने स्थान दिले आहे; पण नीतिनिष्ठेच्या दडपणातून ही कादंबरी मुक्त झाली आहे. व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडविण्याचे सर्वोत्कृष्ट साधन या दृष्टीने पुढल्या काळात कादंबरी ह्या वाङ्‍‍मयप्रकाराला जे महत्त्व प्राप्त झाले, त्याचा हा प्रारंभ म्हणता येईल. तसेच एक प्रकारे ही कादंबरी स्वच्छंदतावादाचीही पूर्वसूचक आहे. सेंटिमेंटल जर्नी (१७६८) हे त्याच्या फ्रान्सच्या प्रवासाचे वर्णनही त्यातील सूक्ष्म आणि अचूक निरीक्षण, सौम्य विनोद, आत्मनिष्ठा आणि सहज केलेले जीवनचिंतन ह्यांमुळे आधुनिक झाले आहे. हॉरिस वॉल्पोल (१७१७–१७९७) ह्याने जुनाट पडके वाडे, गढ्या, अंधारी तळघरे, भुयारे इत्यादींची वर्णने असलेल्या आणि गूढ, भयानक वातावरण निर्माण करणाऱ्या कादंबऱ्या लिहिल्या (उदा., कॅसल ऑफ ऑट्रँटो, १७६४). त्यांचा परिणाम काही अंशी पुढे वॉल्टर स्कॉटवरही झाला.

अठराव्या शतकाच्या अखेरीस सामाजिक चालीरीतींमध्ये विशेषत: स्त्रीपुरुष-संबंधांत-हळुवारपणा, नागरी सभ्यता हे गुण आले. त्यामुळे काही स्त्री कादंबरीकारांनी स्त्रीपुरुषसंबंधांवर आधारलेल्या कादंबऱ्या लिहिल्या. हॅना मोर (१७४५–१८३३) हिने लिहिलेली एकच कादंबरी (सीलेब्ज इन सर्च ऑफ अ वाइफ, १८०९) अतिशय लोकप्रिय ठरली. फॅनी बर्नी (१७५२–१८४०) हिच्या कादंबऱ्यांत तत्कालीन समाजाचे चित्र दिसते, तर मराया एजवर्थ (१७६७–१८४९) हिच्या कॅसल रॅकरेंट (१८००) व बेलिंडा  (१८०१) ह्यां आयरिश जीवनावरील कादंबऱ्या अधिक वास्तववादी आहेत. त्यांचे महत्त्व म्हणजे त्यांनी स्कॉटसारख्या श्रेष्ठ एतिहासिक कांदबरीकाराला स्कॉटिश आयुष्याबद्दल लिहिण्याची स्फूर्ती दिली.

वाङ्‍‍मयसमीक्षा : वाङ्‍मयसमीक्षेला आरंभ सतराव्या शतकात ड्रायडनच्या लेखनापासून झाला असला, तरी तिला अधिक भरीवपणा अठराव्या शतकात आला. ह्या शतकातील वाङ्‍मयसमीक्षा वाङ्‍मयाचा नित्य व अविभाज्य भाग बनून गेली. ह्या साहित्यविचारांवर अ‍ॅरिस्टॉटल, सिसेरो, हॉरिस यांसारख्या प्राचीन ग्रीक व लॅटिन आणि आधुनिक ब्वालो (१६३६–१७११) व रापँ (१६२१–१६८७) या फ्रेंच समीक्षकांचा खोल परिणाम झाला. प्राचीनांच्या साहित्यकृती व साहित्यविचार यांचे अनुकरण केल्यानेच इंग्रजी वाङ्‍मय आधीच्या काळातील अराजकातून बाहेर पडेल, अशी विचारधारा होती उदा., पोपचे एसे ऑन क्रिटिसिझम (१७११). परंतु अ‍ॅडिसन, पोप व डॉ. जॉन्सन यांनी साहित्यसमीक्षेचा प्रसंगानुसार स्वतंत्रपणे व निर्भीडपणे विचार केला.

‘निसर्गाला अनुसरा’ या संदेशाला अठराव्या शतकातील वाङ्‍मयात एक विशिष्ट अर्थ होता. मानवी जीवनाचे निरीक्षण करणे, त्याचा अर्थ समजावून घेणे व तो प्रभावी भाषेत मांडणे हा तो अर्थ. ही जीवनाकडे बुद्धिवादी चिकित्सकपणे पहाण्याची भूमिका. यातून जीवनावर चिकित्सक व टीकात्मक भाष्य करणारे वाङ्‍मय निर्माण झाले.

वरील संदेशाचा दुसरा अर्थ : निसर्गात सर्व गोष्टी एक सुसूत्र पद्धतीने रचिल्या आहेत. ह्याचे वाङ्‍मयात प्रतिबिंब दिसले पाहिजे, म्हणजेच कलाकृती रेखीव असली पाहिजे. योग्य शब्द योग्य ठिकाणीच वापरले पाहिजेत. अभिव्यक्तीत स्वच्छपणा, ओज व भारदस्त साधेपणा हवा. शैलीत खटाटोप दिसू नये; पण काही खास अलौकिक वेगळेपणा जाणवावा. वाङ्‍मयाच्या भाषेत सभ्यता पाहिजे. त्या भाषेचा सूर सुसंस्कृत मनाला पटला पाहिजे.

ललित लेखनामागील प्रतिभेचे स्वरूप व वाङ्‍मयाभिरुचीचे स्वरूप यांचा फारच तपशीलवार विचार झाला. प्रतिभा ही एक दिव्य शक्ती आहे; तिच्या योगाने लेखकाला जीवनातील अनुभवांमधला आगळेपणा उमगतो; त्यांतील सौंदर्य उमगते; जीवनातील दिव्यत्वाचा साक्षात्कार होतो; असे अ‍ॅडिसनने व जॉन डेनिसने (१६५७–१७३४) म्हटले आहे. अ‍ॅडिसनने पॅरडाइस लॉस्ट या मिल्टनच्या महाकाव्याचे समीक्षण नि:पक्षपातीपणे केले आहे.

शाफ्ट्स्बरीने (१६७१–१७१३) वाङ्‍मयाभिरुचीविषयी मौलिक विचार व्यक्त केले. तो म्हणतो: जे चांगले व सुंदर आहे त्याकडे मनाची असलेली स्वाभाविक ओढ ही मनुष्यस्वभावातल्या नैतिकतेचीच साक्ष देते. साहित्य समीक्षकाने जाणीवपूर्वक या नैतिकतेची जोपासना केली पाहिजे. तो पूर्वग्रहदूषित व पक्षपाती समीक्षेचा निषेध करतो.

वाङ्‍मयाचे विषय कोणते, तर प्रातिनिधिक, नित्य परिचयाची, परंपरेने माहीत असलेली जीवनविषयक सत्ये; कारण मानवी स्वभाव व मन ह्या न बदलणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे ही सत्ये सर्वसाधारण मनुष्यांच्या जीवनात आढळतातच. नेमके या गोष्टीत डॉ. जॉन्सनने शेक्सपिअरचे मोठेपण हेरले. तऱ्हेवाईक, एकांगी किंवा एकरंगी व्यक्तिमत्त्व रंगविणे म्हणूनच कालापव्यय मानला गेला. त्याचप्रमाणे समाजाच्या वरच्या थरातच जीवनाची अंगे फुलतात व जोपासली जातात म्हणून ह्या समाजाचेच चित्रण वाङ्‍मयात आवश्यक ठरते, अशी डॉ. जॉन्सनसारख्यांची भूमिका होती.

प्रतिभेच्या योगानेच प्रातिनिधिक सत्यांचा जिवंत साक्षात्कार होतो. जे आहे त्यालाच नव्याने गवसलेल्या गोष्टींची नवलाई आणणे किंवा आहे त्याचे वास्तविक स्वरूप विशद करणे म्हणजेच प्रतिभेची नवनिर्मिती. यामुळेच शेक्सपिअरच्या काळातला प्रतिभेचा बेबंद व मुक्त संचार या शतकात नीट आकलन झाला नाही. प्रातिनिधिक सत्याच्याच अभिनव मांडणीवर पुन्हापुन्हा भर देण्यात आला. तथापि शेक्सपिअरप्रभृती जुन्या कवींचे वास्तविक वाङ्‍‍मयीन महत्त्व याच शतकातल्या समीक्षेने प्रथम पटवून दिले. टॉमस हॅन्मर, थीओबॉल्ड (१६८८–१७४४), पोप व जॉन्सन यांनी शेक्सपिअरच्या नाटकांचे अधिकृत पाठ निश्चित करण्यात खूपच मेहनत घेतली. अशा प्रयत्‍नांतूनच एखाद्या साहित्यकृतीतील मूळ पाठ चिकित्सकपणे ठरविण्याची तत्त्वे उदयास आली. ह्या संदर्भात डॉ. जॉन्सनने शेक्सपिअरकृत नाटकांच्या खंडांसाठी लिहिलेली विस्तृत प्रस्तावना फारच मोलाची आहे.

डॉ. जॉन्सन हा ह्या शतकातील समीक्षकांचा मुकुटमणी. त्याचे समीक्षाविषयक सिद्धांत फारच मोलाचे आहेत. समीक्षा केवळ सिद्धांत व पूर्वीची उदाहरणे यांवर अवलंबून ठेवू नये. साहित्यकृतीचे डोळस परीक्षण हाच तिचा खरा आधार असला पाहिजे. समीक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाशी निगडित झाली पाहिजे. लेखकाचे मनोगत लक्षात घेऊन समीक्षा केली पाहिजे, या मतांचे समर्थनच जणू त्याने द लाइव्ह्‌ज ऑफ द पोएट्स (१७७९–१७८१) ह्या ग्रंथाच केले. लेखकाच्या जीवनाचे त्याच्या साहित्यकृतींच्या समीक्षेमध्ये केवढे महत्त्वाचे स्थान आहे, हे त्याने दाखवून दिले. त्याच्या मते वाङ्‍‍मयाचा हेतू जीवनातील अनुभवांचे स्वरूप स्पष्ट करणे हा आहे. सर्वसामान्यांचे अनुभव म्हणजेच खरे नैसर्गिक अनुभव असतात. त्यांचेच चित्रण वाङ्‍मयात झाले पाहिजे. हा सर्वसाधारणपणे नैतिक दृष्टिकोण आहे, असे म्हणावे लागते. ह्यामुळे जॉन्सनने मिल्टन व डन या कवींवर त्यांचे काव्य नीट समजावून न घेता टीकास्त्र सोडले.

साहित्यकृतींवरील परामर्शात्मक लेखनामुळे टीकाकारांना वाङ्‍मयीन जगतामध्ये एक आदरयुक्त भीतीचे स्थान प्राप्त झाले. वाङ्‍मयव्यापार ही महत्त्वाची गोष्ट आहे, ती नीट पायावर उभी राहिली पाहिजे, निकोप राहिली पाहिजे, दर्जेदार पाहिजे, असे सांगणाऱ्या समीक्षकांना एक उच्च दर्जा प्राप्त झाला.

अठराव्या शतकातील इंग्रजी भाषेची घडण : १६६० पासूनच इंग्रजी भाषेच्या सुधारणेचा विचार सुरू झाला; कारण इंग्रजीत प्रचंड संख्येने इतर भाषांतून शब्द व वाक्‌प्रचार येऊन दाखल झाले होते. परंतु इंग्रजीतील सर्वच शब्दांच्या अर्थांची आणि शब्दांतील अक्षरांची व त्यांच्या उच्चारांची निश्चिती व्हायची होती. इंग्रजी व्याकरणाबाबतही गोंधळाचीच परिस्थिती होती. ह्या सर्व गोष्टी लक्षात येऊ लागल्यावर भाषासुधारणेचे युग सुरू झाले. फ्रेंचांप्रमाणे एक संस्था (अकॅडमी) स्थापून हे कार्य करावे असे विचार ड्रायडन, डीफो, स्विफ्टप्रभृती अनेकांनी व्यक्त केले; पण संस्था स्थापून असले काम होत नाही, असे डॉ. जॉन्सनचे मत होते. प्रत्यक्षात अशी संस्था स्थापन झाली नाहीच. शेवटी अठराव्या शतकातील वाचकवर्गाच्या अपेक्षा व त्या पुऱ्या करण्यासाठी लेखकांनी केलेले प्रयत्‍न ह्यांमुळेच इंग्रजी भाषेत व अभिव्यक्तीत इष्ट ती सुधारणा घडून आली. एक सहजसुगम, वैयक्तिक व तऱ्हेवाईक वैशिष्ट्यांपासून मुक्त अशी इंग्रजी शैली निर्माण झाली. सबंध सुशिक्षित समाजाने एकसंधपणे अशा रीतीने भाषा वापरण्याचा इंग्‍लंडच्या जीवनातील हा पहिला व शेवटचाच कालखंड.

ह्या संदर्भात ‘रॉयल सोसायटी’ने केलेल्या प्रयत्‍नांचा अवश्य निर्देश हवा. या संस्थेने जाणीवपूर्वक सोप्या, स्वच्छ, ओजस्वी व थोड्या शब्दांत पूर्णपणे अर्थ व्यक्त करणाऱ्या लेखनशैलीचा व भाषणशैलीचा सातत्याने पुरस्कार केला. त्याचप्रमाणे अ‍ॅडिसन, स्विफ्ट, स्टीलप्रभृती लेखकांनी इंग्रजी शैलीत आमूलाग्र बदल घडवून आणले. स्विफ्टने योग्य ठिकाणी योग्य शब्द, अशी शैलीची व्याख्या केली आहे. जॉन ह्यूज ह्या विशेष प्रसिद्ध नसलेल्या लेखकाने शैलीवर निबंध लिहिला. त्या त्या लेखनप्रकाराला आणि विषयाला अनुरूप अशी शैली असावी, याचाही जाणीवपूर्वक विचार झाला.

शब्दकोश रचण्याचेही अनेक प्रयत्‍न झाले. सर्वांनीच शब्दांचे अर्थ, वर्णलेखन (स्पेलिंग), उच्चार व व्युत्पत्ती देण्याचा हेतू बाळगला. त्यात डॉ. जॉन्सनचा प्रयत्‍न भव्य व मूलगामी आहे. त्याने शब्दांचे सोदाहरण अर्थ दिले; पण शब्दोच्चार मात्र दिले नाहीत.

इंग्रजीची व्याकरणेही अनेक झाली. इंग्रजी भाषेचा प्रचलित वापर लक्षात घेऊन व्याकरण रचायचे, का तर्ककर्कश नियमांत भाषा बसवावयाची, ह्या वादात दुसरी विचारसारणी प्रबळ ठरली. शतकाच्या शेवटीशेवटी शब्दांचे वर्णलेखन व उच्चार ह्यांना सध्याचे स्वरूप प्राप्त झाले.

काव्याची भाषा मात्र कृत्रिम ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्‍न झाला; कारण प्रचलित भाषा काव्यास अनुकूल नसते, असे मत रूढ होते. यासाठी होमर, व्हर्जिल, स्पेन्सर, मिल्टन इत्यादींच्या शैलींचा अभ्यास झाला. साध्या भाषेत लिहिलेल्या काव्याचे विडंबन होण्याची भीती वाटल्यामुळेही काव्याच्या शैलीत कृत्रिमता जोपासण्यात आली. त्यामुळे ठराविक विशेषणे, वाक्प्रचार, वर्णानांचा तोचतोपणा या काव्यात आला.

एकंदर समाज सर्वच बाबतींत सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी ह्या शतकात जो प्रयत्‍न झाला, त्याचाच एक भाग म्हणजे भाषेला वळण लावणे हा होता. त्यातूनच एकसंध, सहजसुलभ, लोकशिक्षणाला अनुकूल अशी इंग्रजी भाषा निर्माण झाली.

शैलीसाठी विशेष नावाजलेल्या लेखकांचा स्वतंत्र निर्देश करणे आवश्यक आहे. अ‍ॅडिसनने नियतकालिक निबंधास योग्य अशा शैलीची जोपासना केली. स्विफ्टने अत्यंत धारदार व ओजस्वी भाषा निर्माण केली. डॉ. जॉन्सनने अभिव्यक्तीमध्ये विद्वत्तेला साजेसे गांभीर्य आणले. त्याच्या लेखनाने इंग्रजी भाषा प्रगल्भ बनली. गोल्डस्मिथच्या भाषेतील प्रसन्न खेळकरपणा जॉन्सनच्या शैलीच्या तुलनेने अधिकच विलोभनीय वाटतो. गोल्डस्मिथच्या निबंधांमध्ये जे लालित्य दिसते ते आजच्या ललितनिबंधाचे पूर्वरूपच म्हणता येईल. गिबनची शैली डौलदार आहे. त्याची पल्लेदार वाक्ये त्याच्या गंभीर आशयाला साजेशीच आहेत. ह्या सर्व व्यक्तिगत वैशिष्ट्यांशिवाय सर्वांच्याच शैलींमध्ये अठराव्या शतकातील इंग्रजीच्या प्रातिनिधिक खुणा दिसतातच. सर्वांत ठळक खूण म्हणजे आपले लिखाण लोकांच्या नित्याच्या भाषेत करण्याची प्रत्येकाची धडपड; कारण ह्या शतकातील सर्वच लेखनाचे उद्दिष्ट प्रामुख्याने लोकशिक्षण हेच होते.

संदर्भ : सर्वसाधारण :

1. Baugh, A. C. A Literary History of England, London, 1948.

2. Compton-Rickett, A. A History of English Literature, London, 1963.

3. Daiches, D. A Critical History of English Literature, 2 Vols, London, 1961.

4. Ford, B. The Pelican Guide to English Literature, 7 Vols. 1961-1963.

5. Legouis, E.; Cazamian, L. A. History of English Literature, London, 1961.

6. Ward, A. W.; Waller, A. R. The Cambridge History of English Literature, 15 Vols. Cambridge, 1961-1963.

सातवे शतक ते सु. सोळावे शतक :

1. Anderson, G. K. The Literature of the Anglo-Saxons, 1949.

2. Bateson, F. W. Ed. The Cambridge Bibliography of English Literature, Vol.1, New York, 1941.

3. Bennett, H. S. Chaucer and the Fifteenth Century, Oxford, 1947.

4. Chambers, E. K.The Medieval Stage, Oxford, 1903.

5. Craig. H. Religious Drama in the Middle Ages, London, 1955.

6. Kane, G. Middle English Literature, London, 1951.

7. Loomis, R. S. Introduction to Mediaval Literature, New York, 1948.

8. Schalauch, M. English Mediaval Literature and its Social Foundations, Warsaw, 1956.

9. Schofield, W. H. English Literature From the Norman Conquest to Chaucer, London, 1906.

10. Speirs, J. Mediaeval English Poetry, The Non-Chaucerian Tradition, London, 1957.

11. Wells, J. E. A Manual of the Writings in Middle Ages, 1050-1400, New Haven, 1916-1952.

12. Wilson, R. N. Early Middle English Literature, London, 1939.

सोळावे-सतरावे शतक :

1. Atkins. J. W. H. English Literary Criticism, the Renascence, London, 1947.

2. Bradbrook, M. C. Elizabethan Stage Conditions, Cambrigde, 1932

3. Bradbrook, M. C. Shakespeare and Elizabethan Poetry, London, 1951

4. Bradbrook, M. C. The Growth and Structure of Elizabethan Comedy, London, 1955.

5. Bradbrook, M. C. Themes and Conventions of Elizabethan Tragedy, Cambridge, 1935.

6. Bush, D. English Literature in the Earlier Seventeenth Century, 1600-1660, Oxford, 1945.

7. Chambers, E. K. Elizabethan Stage, 4 vols., Oxford, 1924.

8. Craig, H. The Enchanted Glass; the Elizabethan Mind in Literature, New York, 1936.

9. Morris, H. Elizabethan Literature, London, 1958.

10. Nicoll, A. A History of Restoration Drama 1660-1700, Cambridge, 1928.

11. Palmer, J. The Comedy of Manners, London, 1913.

12. Spingarn, J. E. History of Literary Criticism in the Renaissance, New York, 1899.

13. Walton, G. Metaphysical to Augustan, Cambridge, 1955.

14. Wedgewood, C. V. Seventeenth Century Literature, London, 1950.

15. White, H. C. The Metaphysical Poets, New York, 1936.

अठरावे शतक :

1. Atkins, J. W. H. English Literary Criticism; 17th and 18th Centuries, London, 1951.

2. Baker, E. A. The History of the English Novel. Vols. 3-5, London, 1934-1937.

3. Bosker, A. Literary Criticism in the Age of Johnson, Groningen, 1930.

4. Bourne, H. R. F. English Newspapers, 2 Vols., London, 1889.

5. Courthope, W. J. A History of English Poetry, III-IV, London, 1903-1905.

6. Deane, C. V. Aspects of Eighteenth Century Natural Poetry, Oxford, 1935.

7. Dobree, Bonamy, English Literature in the Early Eighteenth Century 1700-1740, Oxford, 1959.

8. Graham, W. English Literary Periodicals, New York, 1930.

9. Jack, I. R. J. Augustan Satire, London, 1952.

10. McKillop, A. D. English Literature from Dryden to Burns, New York, 1948.

11. Morison, Stanley, The English Newspaper, Cambridge, 1932.

12. Nicoll, A. A History of Early Eighteenth Century Drama 1700-1750, Cambridge, 1925.

13. Nicoll, A. A History if Late Eighteenth Century Drama 1750-1800,Cambridge, 1927.

14. Smith, D. N. Some Observations on Eighteenth Century Poetry, London, 1937.

15. Starnes, W. T. de; Noyes, G. E. The English Dictionary from Cawdrey to Johnson 1604-1755 Chapel Hill, 1946.

16. Walker, Hugh, The English Essays and Essayists, London, 1915.

17. Watt, I. The Rise of the Novel, Studies in Defoe, Richardson and Fielding, London, 1957.

लेखक:

म. कृ. नाईक

अ. के. भागवत

रा. भि. जोशी

अ. के. भागवत

वा. चिं. देवभर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 12/6/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate