एक विशिष्ट नाट्यप्रकार. इंग्रजीत तो ‘मेलोड्रामा’ या नावाने ओळखला जातो. ‘मेलोस’ (गीत) ह्या ग्रीक शब्दावरून मेलोड्रामा हा शब्द तयार झाला. अभिजाततावादी नाट्यतंत्राचे पुनरुज्जीवन करण्याच्या प्रयत्नात अतिनाट्याचा आरंभ झाला. इटलीत रीनूतचीनीचे (१५६२–१६२१) डॅफ्ने (१५९४) हे अतिनाट्यतंत्राने लिहिलेले पहिले नाटक होय. प्रारंभी अशी नाटके संगीतप्रधान असत. संगीत आणि संवाद यांत साधलेली संगती हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यामुळेच सु. शंभर वर्षे ही नाटके ‘संगीतिका’ ह्या प्रकारातच मोडत होती. तथापि कालौघात त्यांचे स्वरुप पालटले आणि एक व्यवच्छेदक लक्षण म्हणून असलेली त्यांची संगीतप्रधानता नाहीशी झाली. प्रेक्षकांच्या भावनांना सतत आवाहन करून त्यांच्या मनात भय, करुणा अथवा आनंद या भावनांची तीव्र जागृती घडवून आणणे हे अतिनाट्याचे एक महत्त्वाचे तंत्र झाले. ते वापरताना कार्यकारणाच्या सुसंगतीकडेही दुर्लक्ष केले जाई; परंतु रंगभूमीवरील सतत बदलणारी भव्य दृश्ये आणि वेगाने घडणाऱ्या सनसनाटी घटना ह्यांच्या साहाय्याने प्रेक्षकांना भारून टाकण्यात येई. शिव आणि अशिव ह्यांमधील संघर्ष हा अतिनाट्याचा नित्यविषय. त्याची मांडणी सर्वगुणसंपन्न नायकनायिका आणि दुर्गुणांनी भरलेला खलनायक अशा संकेतबद्ध, ठोकळेबाज व्यक्तिरेखनाद्वारे भडकपणे केली जाई. साहजिकच आकस्मित स्थित्यंतरांमुळे खलनायकाचा पराभव होऊन काव्यन्याय प्रस्थापित करण्यात येत असे. ह्या नाटकांना व्यावसायिक यश भरपूर लाभले. ह्यूगो, द्यूमा, शॉ यांसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांनीही अतिनाट्याच्या काही क्लृप्त्यांचा उपयोग आपल्या काही नाट्यकृतींच्या प्रकृतीनुसार प्रभावीपणे करून घेतला. मराठीसह सर्वच जागतिक नाट्यसाहित्यात अतिनाट्याचा प्रकार कमीअधिक फरकांनी रूढ असल्याचे दिसून येते. नाट्यकलेच्या विकासात अतिनाट्याचे महत्त्व लक्षणीय आहे. मृषानाट्यासारख्या अत्याधुनिक नाट्यप्रकारातही अतिनाट्यतंत्रांचे अर्थपूर्ण उपयोजन केल्याचे दिसते.
संदर्भ Booth, M. R. English Melodrama, London, 1965.
लेखक: अ. र. कुलकर्णी
माहिती स्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 3/5/2020